लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Sunday, 31 March 2019

#माझे_पत्र तुम्हाला मिळाले का?



माझ्या सर्व मित्र, मैत्रीण, शिक्षक आणि प्रियजनांना सप्रेम नमस्कार...

     माझ्या प्रिय हितचिंतकांनो डिसेंबर महिना संपत आला  होता. नवीन वर्ष म्हणजेच २०१९ यायला अवघे १० दिवस शिल्लक होते. माझ्या मनात सहज विचारचक्र सुरु झाले.  काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः नव्वदच्या दशकात  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्याची आणि नववर्ष साजरा करण्याची पद्धत पूर्णतः वेगळी होती. तेव्हा मोबाईल, इंटरनेट ही माध्यमे फक्त श्रीमंत लोकांकडे  असत. त्यामुळे बहुतेक लोक संपर्क साधन्यासाठी एकमेकांशी पत्रव्यवहार करत असत. नवीन वर्षाला एकमेकांना भेटणे, परिवार, मित्र यासोबत आनंदाने नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जात असे. कारण "सुरुवात चांगली, तर शेवटही चांगला" अशी म्हण प्रचलित आताही आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी ला सर्वजण मागील गोष्टी विसरून नव्याने सुरवात करत. 
     आजच्या  आधुनिक काळात मोबाईल,संगणक, इंटरनेट, सोशल मिडिया इत्यादी माध्यमांनी जग जवळ आणले पण माणसं मात्र दुरावली. तुम्ही दररोज एकमेकांना व्हाट्सएप्प, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांतून शुभेच्छा पाठवतात. दररोज इतके मेसेजेस येतात कि ते आता कंटाळवाणी वाटू लागले आहेत. प्रत्येक सणाला  तर सोडा पण दररोज हजारो मेसेजेसचा महापूर येतो. त्यामुळे या अशा भावनाहीन मेसेजेस आणि शुभेच्छांचा मलातरी कंटाळा आलाय. त्यामुळे या वर्षी म्हणजेच २०१९ च्या नववर्षाच्या शुभेच्छा मी माझ्या प्रियजनांना जरा हटके पद्धतीने द्यायचे ठरवले. आणि लगेच "पत्र" या माध्यमाची आठवण आली.  मग काय... गेलो पोस्टात आणि आणली ६०-७०  पोस्टकार्ड्स. एका पोस्टकार्ड्ची किंमत फक्त ५० पैसे. आणि  सर्वांना पत्र पाठवण्यासाठी त्यांच्या राहत्या पत्त्याची गरज होती. मग या ना त्या कारणाने सर्वांकडे कॉलेज आयडी किंवा पत्ता मागितला. ज्यांनी विश्वास ठेवून मला आयडी आणि पत्त्ते पाठवले त्या सर्वांनाच मी मनापासून पत्र लिहून माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मी स्वतःच्या हाताने लिहिलेली जवळपास  ४५ पत्र पोस्ट केली. पण अनौपचारिक पत्र ही ४-५ दिवस किंवा आठवड्याने पत्त्यावर पोहोचतात. मी २६ डिसेंबर २०१८ ला पोस्ट केलेली पत्र काहीना २ जानेवारी, काहीना ४,५,८, जानेवारीला पोहोचली. पण विश्वास ठेवा भले त्यांना माझे पत्र उशिरा मिळाले , पण ते माझ्या अशा प्रकारे शुभेच्छा देण्याने खूप खुश झाले. जवळपास सर्वांनाच त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पोस्टकार्ड म्हणजेच पत्र लिहून शुभेच्छा दिल्या अशा त्यांच्या भावना होत्या. माझ्या या उपक्रमामध्ये लिहिण्यची जरा मेहनत होती पण त्यामुळे माझ्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर मी असा आंनद पाहू शकलो ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची आहे.
      पण शेवटी कोण काय जाणे? मी लिहिलेल्या  पत्रांपैकी अनेक पत्र  त्यांना पोहोचलीच नाहीत. त्यामुळे मी आणि ते दोघेही उदास झालो. आज मार्च महिना संपत आहे. ज्यांना माझे पत्र मिळाले नाही त्यांना ती पत्र माझ्या या ब्लॉगवर वाचायला मिळेल. मी लिहिलेल्या सर्व पत्रांचे फोटोज काढून ठेवले होते. त्यामुळे सर्व पत्र इथे तुम्हाला मिळतील. खरंतर एवढी पत्रे उपलोड करून हो पोस्ट करत असताना मला खूप कंटाळा येतोय. पण काहींना पत्र वाचायचीच आहे त्यासाठी मी ही पोस्ट करत आहे. त्यामुळे माझ्या या  ब्लॉगवर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात अशी नम्र विनंती.

कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली पोस्ट शाखेतून याच पत्रपेटीतून मी आपणा सर्वांना  पत्र पाठवली होती.














































ज्यांना माझे पत्र मिळाले त्या काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया ...

शुभम, नाशिक


आकाश, उल्हासनगर
प्रणाली ताई, कल्याण.

#प्रतिक्रिया

रुचिका,कल्याण


#प्रतिक्रिया


निलेश कारभारी सर,कल्याण.

माझ्या या उपक्रमला टाईमपास म्हणा  किंवा इतर काही... पण यातून मला समाधान आणि माझ्या प्रियजनांना नक्कीच छान वाटले. मी माझ्या पत्रांद्वारे माझ्या भावना त्यांच्या पर्यत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

                                                                              - धन्यवाद.

Tuesday, 12 February 2019

१८ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीची कल्याणात सभा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केलेली एक विडंबनात्मक कविता...

भाजपचे सॉरी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आज आपल्या कल्याणात येत आहे त्या पार्श्वभूमीवर भावना व्यक्त करण्यासाठी काहीतरी लिहिले... याला कविता म्हणा किंवा अन्य काहीही... भावना महत्त्वाच्या....
🥕 आज मोदी येणार आहे.... 🥕

आज सगळेच खूप खुश आहे कारण, कल्याणात मोदी येणार आहे...
इथलं वातावरण भाजपमय होणार आहे...
देशातील सर्व प्रसार - माध्यमांमध्ये "मोदी - मोदी" च्या घोषणा दिसणार आहे..
कारण, इथे आज मोदी येणार आहे...

मेट्रोच्या भूमीपूजनाने कल्याणकरांना लवकरच मेट्रो मिळणार आहे...
"भाईयों और बहनों" म्हणत नेहमीप्रमाणे मोदी सगळ्यांचेच हृदय जिंकणार आहे अन् करोडोंच्या योजना आपल्याला देणार आहे कारण, इथे आज मोदी येणार आहे...

मोदींच्या इथे येण्याने सामान्यांचे सर्वच प्रश्न चटकन् सुटणार आहे स्वच्छ पाणी, रस्ते, आरोग्य सुधारून आपलं कल्याण ''स्मार्ट सिटी'' मध्ये परिवर्तित होणार आहे कारण, आपल्याकडे आज मोदी येणार आहे...
मोदींच्या येण्याने कल्याणच काय तर उल्हासनगर - अंबरनाथमधीलही डंपिंग ग्राऊंड्सचा प्रश्न क्षणात सुटणार आहे... सर्वांना स्वच्छतेत जगण्याचं जणू वरदानच मिळणार आहे... कारण, आज इथे माननीय मोदी येणार आहे...
शहरातील पत्रीपुलचा विषय असो अथवा बत्तीगुलचा... मोदी सरकारचे नेते सर्व प्रश्न नेहमीप्रमाणे लगेच सोडवणार आहे... कारण आज कल्याणात चक्क मोदी साहेब येणार आहे....
केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र सरकार आल्यापासून जणू काही "रामराज्य" आलंय... सर्वकाही अगदी कुशल - मंगल झालंय...
कल्याणातील २७ गावांचा प्रश्न अगदी सुटतच आलाय अन् नेवाळीच्या शेतकरी बांधवांनाही एक अविस्मणीय अनुभव आलाय...
आता हीच विकासाची लाट आपल्या शहरात येणार आहे...कारण, आज याठिकाणी प्रधानसेवक मोदी येणार आहे...

मोदींच्या आगमनापूर्वीच पालिका प्रशासन कसं खडबडून जागं झालं... नवे रस्ते, स्वच्छता आणि अनधिकृत बांधकामांवर हातोडा हे सर्व काही क्षणांत झालं... मोदींच्या येण्याने हे पालिका प्रशासन आता रोजच २४ x ७ तास जागे राहणार आहे... कारण, २४ x ७ तास काम करणारे एकमेव पंतप्रधान मोदी येथे येणार आहे...
कुणाला १५ लाख मिळो न मिळो पण कल्याणकरांना ते लवकरच मिळणार आहे... इथल्या तरूणांना रोजगारच काय तर चक्क स्वतःचा व्यवसायही करता येणार आहे... कारण, इथे सर्व तरुणांचे आदर्श "आदरणीय मोदीजी" येणार आहे....
राष्ट्र विकासात मोलाची कामगिरी करणारे भारतमातेचे एकमेव सुपुत्र मोदीजी... बुलेट ट्रेन आणणारे, स्मार्ट सिटी बनवणारे आणि या देशाचा विकास करणारे मोदीजी, आपल्या आईचा आदर कसा करावा हे शिकवणारे मोदीजी, देशाला ७० वर्षात जे जमलं नाही ते ४.५ वर्षात करणारे मोदीजी, राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीरही भारताचे नाव उज्वल करणारे "राष्ट्र - सम्राट" मोदीजी... खरंच असा नेता होणे नाही...
"मोदी - शहा - फडणवीस" जणू काही "रँचो - फरहान - राजू" अशीच जोडी... "All is Well..." म्हणत संपूर्ण राज्याचा अन् देशाचा कायापालटच केला... आणि सिद्ध केलं बच्चा काबिल बनो... कामयाबी तो साली झक मारके पिछे आएगी...(Incoming in BJP)
मोदींच्या येण्याचे मराठी माणसाचे भाग्य खुलणार आहे... महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी माणूसच टिकणार आहे...परप्रांतीयांचा प्रश्नही निकाली लागणार आहे...मोदी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतूनच करतात याचा महाराष्ट्राला अभिमान आहे... चला लागा तयारीला आज गुजरातचा पूर्व मुख्यमंत्री अन् देशाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपल्याकडे येणार आहे...
अशा या महान नेत्याच्या पदस्पर्शाने ही भूमी आज पावन होणार आहे... कल्याणचा रखडलेला विकास लवकरच होणार आहे... आपलं कल्याण "सुजलाम् सुफलाम्" होणार आहे... कारण, आज इथे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोरदास मोदी येणार आहे...



✍️ अक्षय बैसाणे.
-एक कल्याणकर नागरीक 📩7559119269
माझ्या फेसबुकवरील लिंक - https://www.facebook.com/akshay.baisane/posts/2042706265816942

१ जानेवारी २०१८... एक अनुभवकथन...

   आज १ जानेवारी....आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यातील भीमा कोरेगाव येथील विजयास्तंभाला मानवंदना दिली. प्रचंड ऊर्जा मिळाली. आपले पूर्वज किती शूरवीर, लढवय्ये होते याची ग्वाही तिकडचे वातावरण देते. सोबतच एक नवं चैतन्य निर्माण करते. चळवळीतला पँथर जागा करते. त्यामुळे आज विजयस्तंभाकडून जी उर्जा जो अनुभव मिळला तो खरच अविस्मरणीय आहे.
  
     मागील वर्षी झालेल्या प्रकारामुळे बहुतेक लोक याठिकाणी येण्याचे टाळतील असा विचार दंगलखोरांनी केला असावा... पण त्यांच्या या स्वप्नाचा पार कचरा झाला. दरवर्षीपेक्षा कितीतरी अधिक पटीने लोक याठिकाणी आले होते. अंदाजे २५ ते ३० लाख लोक आले असल्याचे कळले. आम्हाला जेवढा तोडण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या दुप्पट ताकदीने आम्ही उभे राहू ही धमकीच जणू जमलेल्या भीमसैनिकांनी आपल्या एकतेतून या जातीयवाद्यांना दिली. 
      बाकी सभोवतालचे वातावरण पाहता आणि प्रशासनाने केलेली व्यवस्था फक्त नाममात्र आणि अपुरी होती. काही मोजकी दुकाने वगळता बहुतांश दुकाने बंद होती जणू काही अघोषित बहिष्कार टाकला आहे. पार्किंग व्यवस्था ही अपुरीच. रस्त्यांवर सुमारे १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था ही देखील तोकडीच.. शेवटी आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करून १० किलोमीटर चालत जाऊन विजयस्तंभाजवळ पोहोचलो आणि अभिवादन केले.
     विजयास्तंभाच्या परिसरातही प्रचंड धुळीचे साम्राज्य त्यात गर्दी आणि ऊन... त्याठिकाणी ग्रीन मॅट टाकले असते तर धुळीमुळे होणारा त्रास टाळता आला असता. सकाळी ८ वाजता कल्याणहून निघालो होतो आणि संध्याकाळी ६ वाजता विजयस्तंभाजवळ पोहोचलो. प्रशासनाने भीम अनुयांनाना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याची पुरेपूर तयारी केल्याचे जाणवले. मानवंदना दिल्यानंतर पुन्हा १० किलोमीटर पायपीट करत गाडीजवळ पोहोचलो. ७:३० वाजले होते, आता थंडी जाणवायला लागली त्यात अंधारही. विजयस्तंभाजवळचा काही परिसर वगळता इतर ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधार होता पण वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहनांपासून पुरेसा प्रकाश मिळत होता. पण धुळीने मात्र शेवटपर्यंत साथ सोडली नाही त्यामुळे सर्दी - खोकला डोकेदुखी जाणवू लागली. अभिवादन करून झाले आता सर्वांना लवकरात लवकर घरी पोहोचण्याची घाई लागली. मात्र अनेक महत्त्वाचे रस्ते बंद केल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले होते त्यामुळे वाहतूक अगदी कासव गतीने होत होती. जे लोक रेल्वेने आले होते त्यांचे तर खूपच हाल झाले. कारण प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या बसेस अगदी नाममात्र असल्याने ते अपुऱ्या पडत होता. त्यामुळे बरेच लोक पायी प्रवास करत होते. एकूणच परिस्थितीत पाहता फार त्रासदायक होती. जरा नजर चुकीली की सोबत असलेले लोक विस्कळीत व्ह्यायचे. मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही आमच्या समुहापासून वेगळे झालो होतो. आम्हाला एकमेकांना शोधायला अर्धा तास गेला. त्यात प्रशासनाने इंटरनेट सेवा देखील बंद केली होती त्यामुळे खूप असुविधा झाली. कुठे काय चालले आहे कुणाला काहीच कळेना. व्हॉट्सअँप लोकेशन वापरून एकमेकांना शोधता आले असते पण भित्र्या प्रशासनाने इंटरनेट सेवाच बंद केली होती.. म्हणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न... वैगेरे.. वैगेरे... शेवटी आम्ही सगळे पुन्हा भेटलो सर्वांना प्रचंड भूक लागलेली. एका ठिकाणी मिसळ खाण्यास थांबलो तर पाव नाही पण भाव ५० रू. प्लेट.. साधा बटाटा वडाही या दिवशी १५ रुपयाला विकत घ्यावा लागला. मिळेल ते खाऊन पटकन निघालो. पार्क केलेली गाडी मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी अजून अर्धातास... ट्रॅफिकमुळे! यात मात्र ट्रॅफिक कंट्रोल करण्यास कुणीही दिसले नाही. काही भीमसैनिक रस्त्यावर उतरून सर्वांना मदत करत होते, ट्रॅफिक कंट्रोल करत होते. शेवटी हळू हळू का होईना आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रॅफिक जॅम तर होतीच, आम्ही लोणीकंदला पोहोचलो आणि इथेच आमची आणि अनेकांची अजून फजिती झाली. ट्रॅफिक जॅम,खड्डेमय खराब रस्ते, आणि रस्त्याचा चढ यामुळे बहुतेक वाहनांच्या क्लज प्लेट्स निकामी होत होत्या. त्यात आमच्याही गाडीची क्लज प्लेट बिघडली. आम्ही गाडीतून उतरून गाडीला धक्का देऊन गाडी रस्त्याच्या कडेला लावली. आमच्या पुढे अगोदरच काही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या त्यांना विचारले असता त्यांच्याही गाडीचा तोच प्रॉब्लेम होता. असेच आमच्या समोर अनेक बाईक, चारचाकी वाहने बंद पडली ते या ट्रॅफिकमुळे. आमची गाडी बंद पडली तिथे आसपास काही वस्ती वैगेरे नव्हती त्यात इंटरनेट सेवेवर बंदी असल्याने एखाद्या मेकॅनिकचा नंबर मिळवणहीे शक्य झाले नाही. शेवटी आमच्यातील दोघेजण गॅरेज किंवा मेकॅनिक शोधायला पायी निघाले आणि पाऊण तासानंतर रिकाम्या हाताने परतले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते, आता थंडीही खूप वाढली होती त्यामुळे आम्ही सर्वजण काहीवेळ गाडीतच बसलो. मदतीसाठी नातेवाईकांना फोन लावले तेव्हा कळलं की आमच्याच परिसरातले काही लोक तिकडे आले आहेत, काही वेळानंतर ती मंडळी आम्हाला भेटली आणि आमच्या मदतीसाठी पुढे निघून गेली जेणेकरून ते पुढे जाऊन गाडी टो करण्यासाठी तरी मदत पाठवतील. याचदरम्यान काळजाची तार छेडणारा आणि प्रशासनाविरोधात चीड आणणारा प्रसंग माझ्यासमोर घडला. एक ५५-६० वर्षांची महिला आमच्याकडे आली, तिने आम्हाला पोलिस स्टेशनचा पत्ता विचारला आणि तिला अचानक रडू कोसळले. आम्ही त्यांना धीर देत मावशी काय झालयं म्हणून विचारलं असता त्यांनी सांगितले की ती आपल्या नातेवाईकांसोबत साताऱ्याहून आली आहे आणि हरवली आहे. त्यात शिक्षित नसल्याने फोन नंबर किंवा पत्ता देखील त्यांना माहीत नव्हता. बिचाऱ्या त्या माऊलीबद्दल खूप वाईट वाटले. तेव्हाच आमच्या समोरून पोलिसांच्या गाड्यांचा एक ताफा जात होता आणि मध्यभागी कुणीतरी मोठा पोलीस अधिकारी होता, त्यापैकी एका गाडीला थांबवून त्यांना त्या महिलेच्या मदतीसाठी विचारले असता हो किंवा नाही असा कोणताही प्रतिसाद न देता ती पोलिसांची गाडी चक्क सरळ पुढे निघून गेली. हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. त्या महिलेबद्दल जेवढी चिंता होती त्याच्या कितीतरी अधिक पटीने मला त्या पोलिसांचा राग आला. शेवटी आमच्यातल्या एकाने त्या महिलेला १०० रू. दिले, आम्ही एक पाण्याची बाटली दिली तिला धीर देत पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले.               त्यानंतर पुढे गेलेल्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने रात्री ११ वाजता आम्हाला मदत आली आणि आम्ही त्या ग्रामीण भागातून मुख्य हायवेवर दुसऱ्या गाडीतून आलो. त्या व्यक्तीचं नावं तर नाही आठवत पण त्या भल्या व्यक्तीने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी गाडी तात्पुरती दुरुस्त करून दिली आणि आमच्या ड्रायव्हरला काही सूचना दिल्या. त्या देवमाणसाचे आभार मानत आम्ही रात्री १२ वाजता परतीचा प्रवास सुरू केला. गाडीला प्रॉब्लेम असल्याने ६०-७० पेक्षा जास्त स्पीडने चालवणे शक्य नव्हते म्हणून सर्व प्रवास हळू - हळू चालू होता त्यात थंडीही खूप होती. गाडी गरम झाली की पिकअप घेत नव्हती त्यामुळे गाडी थंड करण्यासाठी तासभर तरी थांबावे लागत होते. असे तीनवेळा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही थांबलो. गाडीत भीमगीते आम्हाला नवी ऊर्जा देत होते, त्यातच कडूबाई खरात यांच्या आवाजातील गोडवा सर्व काही गोड करतो...असं करत करत शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जानेवारी ला सकाळी ८:०० वाजता आम्ही कल्याणला पोहोचलो. जवळपास २३ तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही बाहेरच होतो. असो.... शेवटी विजयस्तंभाला मानवंदना करायला मिळाली हे महत्त्वाचे.
    केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वांचे असे हाल झाले त्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला "शासनाचा चोख बंदोबस्त" हा दावा फोल ठरलेला दिसतो. त्यातच १ जानेवारी २०१८ च्या त्या हिंसक घटनेचा विचार केला तरी अंगाला काटा येतो की, एकतर प्रशासनाचे असे ढिसाळ आणि अपूर्ण नियोजन त्यात महाराष्ट्रभरातून अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर अचानकपणे झालेला भ्याड हल्ला. खरंच तेव्हा काय अवस्था झाली असेल तिकडे असलेल्या आंबेडकरी जनतेची. अजूनही त्या आठवणी ताज्या आहेत.
     पण...पण ते काहीही असो आंबेडकरी समाज हा कितीही विखुरलेला असला तरी तो जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याची खरी ताकद दिसून येते. ते दंगलखोर इतका जनसमुदाय बघून नक्कीच दरवाजाच्या वरच्या - खालच्या दोन्हीही कड्या लावून आत गुपचूप बसले असणार हे नक्की.. कारण मागच्या वेळी जो हल्ला झाला तो अचानकपणे झालेला होता आणि ह्यावेळी सर्वजण तयारीतच होते. आणि समोरासमोर दोन हात करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं उंदराचं नाही. ह्या डरपोक लोकाच्या असल्या भ्याड हल्ल्यांना आंबेडकरी जनता जराही भिक घालत नाही आणि घालणार नाही.
     बाबासाहेबांनी बुद्धाच्या पदरी टाकून आम्हाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवला आणि सर्व समाज त्याचं आचरण देखील करत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ढिसाळ नियोजनामुळे त्रास होऊसुद्धा कुणीही दंगा केला नाही की तक्रार केली नाही. उत्साहात आले... शहिदांना अभिवादन... केले आणि शांतपणे निघून गेले. चोख नियोजन नसतानाही समाजाने कोणतीही तक्रार करता शांतता राखत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीतही आंबेडकरी जनतेने दाखवलेला संयम आणि शांतता ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
     जातीयवाद्यांना आणि दंगलखोरांना एकच सांगेन - बौद्ध आहोत बौद्धच राहुद्या... अन्यथा महार झालो की काय परिणाम हे इतिहासाला विचारा!!!
शिंदे शाहीचं एक गाणं आठवलं... 
तुम्ही कितीही लावा शक्ती
अन् कितीबी लढवा युक्ती
तुम्ही करारं कितीही हल्ला
लय मजबूत भीमाचा किल्ला.....
तर.... हा होता भीमा कोरेगाव येथील माझा एक अविस्मरणीय अनुभव!!!
भीमा - कोरेगावला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेचे जे काही हाल होतात ते होवू नये म्हणून पुढील उपाययोजना कराव्यात:
१) सर्वप्रथम हा एक मोठा उत्सव असल्याने शासन स्तरावर तो अधिक चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा व्हावा.
२) या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता त्याबद्दल जागरूकता निर्माण करावी.
३) या शौर्यदिनाला विरोध करणाऱ्या अथवा अडथळा आणू पाहणाऱ्या शक्तींना कडक शासन व्हावे.
४) ज्याप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांना काहीही कारण नसताना षडयंत्र रचून रा.सु.का. अंतर्गत तुरुंगात पाठवले गेले किंवा नुकतेच मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आले त्याचप्रमाणे या उत्सवात विघ्न आणणाऱ्या खऱ्या दंगलखोरांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाही व्हावी.
५) १ जानेवारी चा दिवस लक्षात घेऊन २-३ महिने अगोदरच शासनातर्फे सुरक्षा, नियोजन आणी इतर तयारी करण्यात यावी.
६) शासनाने इंटरनेट सेवा, टेलिफोन सेवा,प्रसार माध्यमे अशा कोणत्याही मध्यामावर बंधन घालू नये. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व्हावे.
७) ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता सर्व रस्ते खुले करावे, दुरुस्त करावे, मुख्य चौकात सक्षम ट्रॅफिक पोलिस यंत्रणा व अधिकारी नेमण्यात यावे.
८) विजयस्तंभ परिसरात विशेष काळजी घ्यावी. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून ग्रीन मॅटचा वापर करावा. सुचनाफलफे, मार्गदर्शनपर माहिती, नकाशे लावण्यात यावे.
९) मदतीसाठी किंवा आपातकाळासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर करावा.
१०) सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, छुपे कॅमेरे यांसह इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
११) पोलीस यंत्रणा अधिक सुसज्ज करावी आणि योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे.
१२) समता सैनिक दल हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करते, त्यामुळे समता सैनिक दलाच्या जवानांना त्या दिवशी विषेश अधिकार द्यावा. त्यांचा सन्मान व्हावा.
*अन्य काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात.
भीमा कोरेगाव बद्दल प्रसारित झालेल्या बातम्या:-

माझ्या फेसबुकवरील लिंक - https://www.facebook.com/akshay.baisane/posts/2067569606663941


या अविस्मरणीय दिवसाची काही छायाचित्रे :-



विजयस्तंभ!!!
या निळ्या निशाणाखाली सर्व एक व्हा रे....







या माऊलीला सलाम...





जनसागर....







Friday, 11 May 2018

कुणावरतरी प्रेम होणं... आणि ती व्यक्ती आपल्याला नकारच देणार हे माहित असूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करणं...अजबच असते ना ही भावना....

काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



हल्ली खूप बदललोय मी...
स्वतःच जणू स्वतःला विसरलोय मी...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुझं बोलणं, तुझं वागणं सर्वच मला आवडू लागलंय...
तुला काही फरक नाही पण माझंच सर्व बिनसलंय...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                              
                  

तुझं माझ्यापेक्षा इतरांशी जास्त बोलणं...       मला         बघूनही न बघितल्यासारखं करणं...
हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरतंय...
पण काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



तुला मान्य नाही आपलं हे नातं...
हे मला केव्हाच कळलंय...
पण तरीही तुझ्यासाठी हे हृदय खुपवेळा रडलंय...
सर्व काही कळतंय पण  वळत नाही...
तूच सांग...काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                            
 
 तुझ्याशी नातं जोडता-जोडता स्वतःचचं स्वतःशी नातं तुटलंय...तुझं प्रेम मिळवता-मिळवता मी स्वतःलाच गमावून बसलोय...कारण, काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!                        



तू मला स्पष्टपणे नाकरलंय...
अन मीही हे कटू सत्य स्वीकारलंय...
पण तरीही काय माहीत अधून-मधून हे  प्रेम कसं उतू जातं?...
असंच असतं का गं....हे एकतर्फी प्रेमाचं नातं?...
तुला नाही फरक पडला काही...पण मला हे सर्व कठीण जातंय... आता  तूच सांग... काय करू?
तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



                                                       -अक्षय बैसाणे.







Monday, 12 February 2018

आपल्या जवळची आणि आपल्याला आवडणारी आपली खास मैत्रीण जेव्हा आपल्यावर रुसते आणि अक्षरशः आपल्याशी बोलणंच बंद करून टाकते... तेव्हा मनाला काय वेदना होत असतील हे मैत्री जाणणाऱ्या तिच्या म्हणजेच रुसलेल्या मुलीच्या खऱ्या मित्रालाच कळेल...एका रुसलेल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काही ओळी सुचल्या त्याच इथे लिहिल्या.. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी एखादी मस्करी केल्यानंतर ती रुसली असेल तर तिला मनवण्यासाठी तुम्ही माझी कविता वापरू शकता... फक्त माझा ब्लॉग प्रामाणिकपणे तुमच्या फेसबुकआणि व्हाटसअॅपवर शेअर करा...आणि एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारा- ती तुमची नक्की मैत्रीणच आहे ना? कि अजून काही?.....माझी कविता खूपच लहान पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक आहे... ती आता पुन्हा बोलायला लागली....आणि लक्षात ठेवा कवितेत भावना फार महत्वाची...😉


तिच्याशी छोटीशी मस्करी केली,
अन् तिने माझ्याशी मैत्रीच् तोडली,

माझीच सवय मलाच नडली,

मला चांगलीच अद्दल घडली,
अशी ती अप्रिय घटना घडली,

तेव्हा मला अक्कल आली,

तिने मैत्री तोडून माझीच थट्टा केली,

माझ्या काळजाची तार अशी छेडली,

 Dear,

नाही करणार पुन्हा अशी चुकी,

मनापासून माफी मागतो तुझी,

पण मला पुन्हा हवी मैत्री  तुझी...



                    -अक्षय बैसाणे, तिचा वेडा... मित्र?

Saturday, 10 February 2018

मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते... परंतु त्याच लाईफलाईन मधून प्रवास करताना काय मरण यातना होतात हे केवळ दररोज ट्रेन ने प्रवास करणारा मुंबईकरच सांगू शकेल... २००६ चा साखळी बॉम्बस्फोट असो किंवा , ३० सप्टेंबर २०१७ रोजी झालेली चेंगरा-चेंगरी ची दुर्घटना असो... प्रत्येकवेळी मरतोय तो फक्त सामान्य माणूस आणि हा मुंबईकर... ट्रेन मधील यातना मी स्वतः रोज अनुभवतो... त्यामुळे याबद्दल मनातली गोष्ट मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे... आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या...

कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो... 


रोज पहाटे  मी पाच वाजता उठतो          तयारी करून धावत-पळत स्टेशन गाठतो
गच्च भरलेल्या डब्यात  मी जिद्दीने शिरतो                 
अन इथूनच माझा दम कोंडायला लागतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



ट्रेन मध्ये मी नेहमी उभाच असतो
पाय ठेवायला थोडीशी जागा शोधत असतो
खांद्यावरच्या बॅगेसोबत स्वतःला मी सांभाळत  असतो         
अन धक्के-बुक्के खात मी सर्वकाही झेलत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...  

                                                       
गर्दीच्या दाबामुळे छातीवर भासते कितीतरी किलोचे वजन      स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुद्धा संघर्ष करतो प्रत्येक जण
एकीकडे चालू असते भजन
तर दुसरीकडे माझ्या आयुष्याचं किर्तन
हे सर्वकाही मी निमूटपणे सहन करत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


कधी उशीर झाल्यावर माझ्यावर येते दरवाजाला लटकण्याची बारी
तेव्हा भीती वाटते आजच तर नाही ना जाणार मी देवाघरी
या भीतीपोटी मला नेहमी आठवते माझी आई, जी मला म्हणत असते बाळा करू नकोस एवढी घाई
पण मी रोजच घाई करत असतो
कारण,  मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


प्रवासात ट्रेन अचानक मध्येच कुठंतरी थांबते 
तेव्हा इच्छित स्थळी जाण्याची वेळही लांबते
मग लक्ष त्या लाल सिग्नल कडे जाते
जो पिवळा होण्याची सर्वच पब्लिक वाट पाहते
पण हा सगळा खेळ नेहमीचाच असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



प्रवास करताना अचानक कुणाचातरी तोल जातो   अपघातात तो लंगडा-पांगळा होतो, नंतर तो  संपून जातो
रोज दिसणारा तो अनोळखी चेहरा अचानक गायब होतो
सामान्य माणूस रोज-रोज असाच मरतो
अन् सरकार नावाचा प्रेक्षक फक्त गंमत बघतो
हा क्रम नेहमी असाच चालू रहातो
कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत  असतो...        
      

महिनाभर कष्ट करून पगार मी घेतो
पण एखादा चोर खिशातला पगार चोरतो                        
काय सांगू तेव्हा जीव खूपच तळमळतो
चोर निघून जातो अन् मी स्टेशन वर  एकटाच रडत बसतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



अजूनही आठवतो तो २००६ चा साखळी बॉम्बस्फोट
ज्याने घेतला होता अनेक निष्पापांच्या नरडीचा घोट
अनेक तान्हुल्यांनी गमावले होते आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाचे बोट
स्फोटाच्या त्या आगीत लुप्त झाले ते हसणारे ओठ
स्फोटाचा हा राक्षस फारच भयंकर असतो
आणि, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...




लिहिण्यासारखं खूप काही आहे पण संपू लागलयं माझ्या वहीचं पान 
अन लिहिता- लिहिता सारखंच हरपतोय मी माझं भान
डोळ्यातील अश्रू पडू लागलेयत माझ्या कवितेवर
पण हे अश्रू देखील नाही पुसू शकणार या दुःखद आठवणी.



हे सर्व विसरण्याचा  मी नेहमीच प्रयत्न करतोय
सगळं काही चांगलं होण्याची मी नेहमीच वाट बघतोय
ट्रेनप्रमानेच मीही पुन्हा गतीमान होण्याचा प्रयत्न करतोय
आणि मी मुंबईकर पुन्हा एकदा ट्रेन ने प्रवास करतोय........





 - अक्षय बैसाणे,एक सामान्य मुंबईकर....

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...