लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.
Showing posts with label माझा चांगला अनुभव. Show all posts
Showing posts with label माझा चांगला अनुभव. Show all posts

Sunday, 3 July 2022

'साम'... माझ्या आयुष्यातली एक आशावादी सकाळ!

I Have Completed One Year In Saam Tv's Digital Portal

आजच्या दिवशी म्हणजेच १ जुलैला 'साम' टीव्हीच्या वेबसाईटसाठी कंटेंट एडिटर म्हणून काम करताना मला एक वर्ष पूर्ण झालं. १ जुलै २०२१ ला मी साम डिजिटलला जॉईन झालो होतो. या वर्षभरातला साम टीव्हीतला अनुभव मिश्र पद्धतीचा होता. काम करताना चांगले-वाईट असे अनेक अनुभव आले आणि येतायत. पण यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे या एका वर्षात मी बरंच काही शिकलोय आणि अजूनही काम करताना शिकत असतो. लोकल माध्यमांमध्ये, यूट्यूब चॅनेल्समधली तीन वर्ष आणि 'साम'मधलं एक वर्ष यांची तुलना केल्यास मी 'साम'मध्येच सर्वात जास्त शिकलो असं मी म्हणू शकतो. पण, लोकल चॅनेल्सचाही अनुभव असल्याने दोघांमधला फरक हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. हे वर्ष एवढ्या पटकन् गेलं की, साममध्ये एक वर्ष पूर्ण झालं हे अजूनही वाटत नाही. कारण या एका वर्षात माझ्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या आणि होतायत, त्यामुळे स्वतःबाबत आणि इतरांबाबत विचार करायलाही पुरेसा वेळ मिळत नाही, अर्थात त्यालाही मीच जबाबदार आहे. टाईम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट अशा बऱ्याच गोष्टी नीट शिकण्याची गरज आहे. असो... आता जरा कामाबद्दल सांगतो.

साम डिजिटलमध्ये माझा रोल (पद)

साम टीव्ही ही एक महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारी मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची डिजिटल आवृत्ती सामटीव्ही डॉट कॉम या वेबसाईटसाठी मी काम करतो. या वेबसाईटसाठी मी कंटेंट एडिटर म्हणून काम करतोय. कंटेंट एडिटर म्हणजे सामग्री संपादक. आता सामग्री या शब्दाचा इथे टेक्स्ट (Text) असा अर्थ होतो. म्हणजे पत्रकारांनी पाठवलेल्या लीड्सवरुन किंवा पॉईंटर्सवरुन बातम्या लिहीणं आणि त्या वेबसाईटवर टाकणं हे माझं मुख्य काम आहे. हे झालं सोप्या भाषेत. पण अजूनही बरेच टास्क असतात त्याबद्दलही थोडक्यात सांगतो.

https://www.saamtv.com/author/akshay-baisane


साम डिजिटलमध्ये मी नक्की काय-काय काम करतो?

१) पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांधलं शुद्धलेखन, व्याकरण, माहिती हे सगळं तपासून बातमी प्रमाणित भाषेत लिहून ती बातमी वेबसाईटवर टाकणे. यावेळी बेसिक फोटो एडिटींग, एसईओ (SEO) अशा अनेक गोष्टी येतात त्यानंतर सीएमएसमधून (CMS) बातमी साईटवर जाते.

२) ज्या बातम्या आमच्या साईटवर नाहीत त्यांचा इतर ठिकाणांहून संदर्भ घेऊन त्या बातम्या करणे. यात हिंदी आणि इंग्रजी बातम्यांचं मराठी भाषेत भाषांतर करुन वाचनीय कंटेंट देणं हे माझं मुख्य काम आहे.

३) बातम्या सोशल मीडियावर जसे फेसबुक, ट्विटर, शेयरचॅट यांवर शेयर करुन जास्तीत जास्त ट्रॅफिक साईटवर यावा यासाठी प्रयत्न करणे.

४) वेबसाईट अपडेटेड ठेवणे. आता यातही अनेक टास्क आहेत.

a) बातमीचं वेटेज ठरवून योग्य क्रमाने लावणे.

b) वेबसाईटवरचं टिकर अपडेट ठेवणे.

c) महत्वाच्या बातम्यांचे पुश नोटीफिकेशन पाठवणे.

५) गुगल रनडाऊनला बातम्या टाकणे.

६) महत्वाचे ट्विट करणे, ट्विटरवर टॅग करणे.

(ही कामे सर्व टीम मिळून करते)

'साम'मध्ये कसा जॉईन झालो?

BMM ची डिग्री झाल्यानंतर मी फारसं काही करत नव्हतो, एकप्रकारे मीडिया फिल्डच्या बाहेर फेकल्या गेलो होतो. काहीतरी करावं म्हणून मास्टर्स करत होतो. सोबत इंटर्नशीप, कंटेंट रिलेडेट छोटी कामं केली, ब्लॉगवैगरे... असला जरा टाईमपास करत होतो. लोकल चॅनेलमध्ये काही होणार नाही हे लक्षात यायल मला तीन वर्ष लागली, अर्थात त्यामागेही वेगळं कारण आहे. पण नंतर मी तेही सोडलं, मग चांगल्या वृत्तसंस्थेत संधीसाठी शोध सुरू झाला. याबाबत माझ्यासाठी जॉब बघा असं मी अनेकांना सांगितलं होतं. यात ते लोकंही होते, ज्यांनी कधीकाळी मला मोठ्ठी आश्वासनं दिली होती. पण, कुणाकडूच काम झालं नाही. कोरोनाही सुरु झाला आणि मलाही झाला. कोरोनामुक्त झाल्यानंतर सकारात्मक बदलाला सुरूवात झाली.

 

माझी प्रिय मैत्रिण श्वेता वाळंज हिने माझ्यासाठी प्रयत्न केले. साम डिजिटलमध्ये काम करतोय यात तिचं सर्वात मोठं योगदान आहे. तिनेच मला स्वतःहून याबाबत सांगितलं, कॉन्टॅक्ट्स दिले. माझ्यासाठी तिने तिचे मार्गदर्शक तथा लोकमत कल्याण-डोंबिलीचे प्रतिनिधी प्रशांत माने सर यांना सांगून ठेवलं होतं. त्यानुसार श्वेता आणि प्रशांत सर यांच्या रेफ्रेन्सने मी सामपर्यंत पोहोचलो. यावेळी श्वेताचं सहकार्य हे माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे.

ऑनलाईन टेस्ट

सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल कंटेंट लीड विश्वास पुरोहित सर यांनी माझी सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली. १४ जून २०२१ ला त्यांना माझा रेझ्यूमे पाठवला, १५ जूनला त्यांनी बातम्यांच्या २ लिंक्स पाठवल्या, त्या मी माझ्या भाषेत ट्रान्सलेट करुन त्यांना मराठीत पाठवल्या. १६ जूनला दुपारी सव्वा एकच्या दरम्यान गुगल मीटवर त्यांनी माझी ऑनलाईन टेस्ट घेतली, यात अनेक प्रश्न, ठाकरे नावाची स्पेलिंग असे अनेक प्रश्न विचारले. यात मला अजूनही आठवतंय की, त्यांनी मला Novak Djokovic बद्दल विचारलं आणि मी त्यांना चक्क तो रशियाचा विरोधी पक्षनेता आहे आणि त्याच्यावर विषप्रयोग झाला आहे असं फालतू उत्तर दिलं. त्यांनी लगेचच माझा गैरसमज दूर केला. यादरम्यान माझ्या मास्टर्सच्या फायनल परिक्षाही सुरू होत्या. त्यामुळे २३ जूननंतर मी कॉल करतो असं मी सरांना कळवलं. त्यानंतर लेखी परिक्षा २३ जूनला संपल्या, २४ जूनला माझ्या संशोधन प्रबंधासाठी प्रशांत माने सराची मुलाखत ही प्रत्यक्षपणे डोंबिवली प्रेसरुममध्ये जाऊन घेतली. ती विश्वास सरांनाही पाठवली. विशेष म्हणजे आतापर्यंत मला इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग जमत नव्हतं, हे मी विश्वास सरांना प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्यांनी मला इनस्क्रिप्ट शिकायला सांगितलं, तेव्हापासून मी इनस्क्रिप्टमध्ये टायपिंगला सुरुवात केली आणि आज त्यात काम करतोय. मी अपूर्ण असतानाही त्यांनी माझ्यावर तेव्हा दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी मोलाचा ठरला आणि मीही तो सार्थ ठरवण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि करतोय. यासाठी विश्वास सरांचे मनापासून आभार मानायला हवे.

जॉईनिंग प्रोसेस

विश्वास सरांशी २४ आणि २५ जून २०२१ ला बोलण झालं. त्यानुसार त्यांनी कामाचं स्वरुप सांगितलं. मला अगोदर बातम्या अपलोड करण्यासाठी सकाळमध्ये घ्यायचं ठरलं होतं. पण नंतर कळलं की मला साममध्ये काम करायचं आहे. असो, सगळं बोलणं झाल्यावर मला १ जुलै २०२१ ला ऑफर लेटर ऑनलाईन आलं. फोनही आले. यावेळी जे आहे, जी सॅलरी, नियम, अटी हे सगळं आहे तसं मान्य केलं. १ जुलै २०२१ ला मी दुसऱ्यांदा सकाळ भवनमध्ये पाऊल ठेवलं. 

पहिल्यांदा सकाळ भवनात गेलो होतो तेव्हा BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला गेलो होतो, तेव्हा निलेश खरे सर हे सामचे संपादक होते. सोबतच एचआर या सुरभी समेळ मॅम होत्या. त्यांना बघितल्यासारखं वाटल्याने मी कॉलेज आयव्हीचे फोटो बघितल्यावर कळलं मला की, यांनीच आपल्याला सामचा दौरा करवून दिला होता आणि आज त्याच सुरभी मॅम यांनी आपली जॉईनिंग प्रोसेस करवून घेतली. हे लक्षात आल्यावर त्यांनाही मी कॉलेज आयव्हीचे फोटोज् दाखवले ज्यात आमच्या ग्रुपने सुरभी मॅमसोबत फोटो काढले होते. खरंचं माझ्यासाठी हा एक इमोशनल क्षण होता. 

BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला पहिल्यांचा सकाळ भवनाला भेट दिली होती.


१ जूलै २०२१, गुरुवारी सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्या आणि मी 'साम'ला जॉईन झालो. याचदिवशी पहिल्यांदांच अमित गोळवलकर सर, प्रसन्न जोशी सर, विनोद तळेकर सर अशा अनेक सिनिअर्सना भेटलो. प्रसन्न सरांशी हात मिळवताना भिती आणि आनंद या दोन्ही भावना एकत्र होत्या. अमित सर कामाच्या बाबतीत खूपच डेडीकेटेट! केवळ १५ मिनिटांत त्यांनी आम्हाला क्वीनटाईपची तोंडओळख करुन दिली. मी अगोदरच माझा स्वतःचा ब्लॉग लिहीत असल्याने, माय महानगर आणि रायगड माझा यांत डिजिटलमध्ये इंटर्नशीप केल्याने आणि टोक्नोसॅव्ही असल्याने मला हे काम चांगलं जमेल असा कॉन्फिडन्स त्याचदिवशी मला आला.

पुणे दौरा

१ जूलैला सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ जूलै २०२१ ला ट्रेनिंगसाठी मला पुण्याच्या बाणेर इथल्या सकाळ ऑफिसला बोलवलं गेलं, तेही ६ दिवसांसाठी. अजून एक महत्वाचं म्हणजे १ जूलैला मी, जगदीश पाटील (मल्टीमीडिया प्रोड्युसर), यश वैद्य (व्हिडिओ एडिटर) आणि रिद्धेश तरे (व्हिडिओ एडिटर) असे चारजण एकाच दिवशी साम डिजिटला जॉईन झालो होतो आज त्यांनाही 'साम'मध्ये एक वर्ष पूर्ण झालं आहे. असो... तर पुण्याचा ट्रेनिगंदरम्यानचा अनुभव मस्तच होता. पुण्यासाठी ५ जूलै २०२१ ला सकाळी कल्याणहून डेक्कन एक्सप्रेसने निघालो आणि मग पुणे स्टेशनहून बाणेरच्या सकाळ नगरमधल्या ऑफिसला पोहोचलो. जगदीश याठिकाणी आधीच आला होता, शिवाय त्याने इथे आधीही काम केलंयं, तो मला ऑफिसबाहेर घ्यायला आला. मग मी बॅगेसहीत थेट न्यूज रुममध्ये गेलो. अमित सर तेव्हा आमचे टीम लीडर होते त्यांना भेटलो, बाकीच्या टीमला भेटलो. 

Sakal Office, Baner - Pune




सर्वात अगोदर शिवानीसोबत ओळख झाली, अमित सरांनी सांगितल्याप्रमाणे तिने मला सगळं समजवून सांगितलं. नंतर दिगंबरसोबत ओळख झाली, मग सानिका, कृष्णा, प्रविण, अनुराधा अशा अनेक सहकाऱ्यांसोबत ओळख झाली. पण, सर्वात जास्त मी दिगंबर, सानिका आणि शिवानी यांच्यात राहिलो. ५ जुलैची दुपार ते ११ जुलैच्या दुपारपर्यंत असे सहा दिवस मी बाणेरमधील Ivory Estates येथील Gold coast सोयायटीतील छान गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. या गेस्टहाऊमधील रुममध्ये सहा दिवस एकटाच तेही उत्तम आणि सर्व सोयी-सुविधांचा आनंद घेत मी ट्रेनिंग पूर्ण केली आणि ११ जूलै २०२१ ला, रविवारी रात्री कल्याणला परतलो. 

प्रत्यक्ष कामाला सुरुवात

१२ जूलै २०२१ ला सोमवारी बेलापूर आफिसमधून मला लॅपटॉप देण्यात आलं आणि मग प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. कोरोनामुक्त होऊन ९० दिवस झाले नसल्याने मी व्हॅक्सिन घेतली नव्हती त्यामुळे मी सुरुवातीला कल्याण ते बेलापूर असा प्रवास दररोज बसने करायचो. १०० रुपये दररोज प्रवास खर्च आणि १५० रुपये नाष्टा, जेवण वैगरे असे २५० ते कधी ३०० रुपये नेहमी खर्च व्हायचे. मग मला वर्क फ्रॉम होम देण्यात आलं, तरिही मी आठवड्यातून एकदातरी ऑफिसला जायचोच. सुरुवातीला माझ्या कामाची गती कासवासारखी होती. इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग, क्वीन टाईप, २५० शब्दांची बातमी अशा बऱ्याच गोष्टींमुळे सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला माझ्या केवळ ४-५ बातम्या व्हायच्या. नंतर हळूहळू स्पीड येत गेला. पण घरुन काम करत असल्याने मला काम करत असल्याचा फील येत नव्हता, पण तरिही काम सुरू होतं. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२१, शनिवार कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला त्यानंतर २० नोव्हेंबर २०२१, शनिवार लसीचा दुसरा डोस घेतला. यादरम्यान मी घरुन काम करत होतो, कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता, कामातही सुधारणा झाली होती. मग नियमानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १५ व्या दिवशी लोकल प्रवासासाठी पास काढता आला आणि ६ डिसेंबर २०२१ पासून मी रेग्युलर ऑफिसला यायला सुरूवात केली.

तेव्हा कल्याणला राहायचो, मावशीकडे. मग पहाटे ४ वाजता उठायचं, सगळं आवरुन सहाला घर सोडायचं. कल्याणहून ठाणे गाठायचं, ठाण्याहून बेलापूर. मग पटकन नाष्टा आणि चहा घेऊन मग ८:२० ला काम सुरु करायचं. ८ ते ४ शिफ्ट असायची. मी ऑफिसमधून ६-७ ला निघायचो आणि ८-९ ला घरी पोहोचायचो. पण ऑफिसमधून काम करताना मजा वाटत होती. कारण आजूबाजूला असलेलं न्यूजरुमचं वातावरण आणि सिनिअर्सचे शब्द कानावर पडायचे, नवीन गोष्टी माहित व्हायच्या.

'साम'मधल्या छोट्या पण माझ्या कायम लक्षात राहणाऱ्या गोष्टी

१) कॉलेजमध्ये असताना ज्याठिकाणी आपण विद्यार्थी आणि विजीटर म्हणून आलो होतो, त्याठिकाणी काम करेल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हाही सुरभी मॅम एचआर आणि आताही... त्यामुळे ही माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. कारण एका चांगल्या ब्रॅण्डमध्ये हा माझा पहिला जॉब आहे.

२) एसएसटी कॉलेजमधली माझी वर्गमैत्रिण करुणा साममध्ये अॅंकर आहे, आणि ती उत्तम अॅंकरिंग करते. मी जॉईन झालो तेव्हा बऱ्याच कालावधीनंतर आमची भेट झाली. आम्ही बेस्टफ्रेंड्स नाही आणि कधी सोबतही नव्हतो, आमचा साधा फोटोही सोबत नाहीये, पण आमच्या बॅचची ती एकमेव अशी मुलगी आहे जिला यशस्वी म्हणू शकतो त्यामुळे तिची रिस्पेक्ट आहेच. ऑफिसमध्ये आताही जास्त बोलणं होत नाही, पण दिसेल तेव्हा एकमेकांना हाय-हॅलो करायचं एवढीच आमची फॉर्मल मैत्री. असो... पण करुणाबद्दल रिस्पेक्ट आणि आपलेपणा तेवढाच वाटतो. एक छोटीशी गोष्ट शेयर करायची झाली तर, मी जॉईन झाल्यानंतर ऑफिसमध्ये काम करत होतो. तेव्हा एके दिवशी ऑफिसमध्ये चहा आला. ज्यांनी चहा मागवला होता त्या सगळ्यांना चहावाल्याने चहा दिला. करुणानेही चहा घेतला. मी चहा मागवला नव्हता, पण तरही तो चहावाला माझ्या डेस्कजवळ आला, त्याने चहा ठेवला. मी, म्हटलं मी तर नाही मागवला, तेव्हा तो म्हणाला करुना मॅडमने देने को बोला है! बस्स... मनाला खूप छान वाटलं. माझ्या आयुष्यात अशा गोष्टींना मी कधीही विसरु शकत नाही, या छोट्या गोष्टी माझ्या मनाला खूप भावतात.
सुरुवातीला ऑफिसमध्ये जाम एकटं वाटायचं, अनोखळी चेहरे आणि कर्तुत्वाने मोठ्या अशा सगळ्या माणसांमध्ये मी स्वतःला अगदी लहान समजत होतो. पण, करुणासोबत बोलंलं की हरवलेल्या गर्दीत आपलं कुणीतरी दिसावं असं वाटायचं. आमचं काम पुर्णतः वेगळं आहे, शिवाय आता आम्ही डिजिटलवाले तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झालोय. यामुळे आता अगोदरसारखं हाय-हॅलोही होत नाही. पण, जेव्हा ती ऑनएअर येते तेव्हा नक्कीच छान वाटतं. करुणा पुढे आणखीन चांगलं काम करेल याबाबत शंका नाहीच, तिला मनापासून शुभेच्छा असणार आहेत.

३) सोनाली शिंदे मॅडम. यांना मी कधीही प्रत्यक्षात भेटलो नव्हतो. पण त्यांना फेसबुकवर कॉलेजपासून फॉलो करायचो. शिवाय त्यांनी लिहीलेलं पॉलिक्लिक हे पुस्तक मी बीएमएमला असताना वाचलं होतं, वागळे सरांची पोस्ट पाहून ते पुस्तक मी विकत घेतलं आणि ते पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचवलं हे साममध्ये व्हिडिओ एडिटर असणारे योगेश गायकवाड यांनी. योगेश गायकवाड हे उल्हासनगरला भेटले आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं. शिवाय नंतर मास्टर्सच्या संशोधन प्रंबंधासाठी मी या पुस्तकातला संदर्भ घेतला आहे. त्यामुळे सोनाली मॅन यांना मी अगोदरपासून ओळखतो, त्या ओळखत नसल्या तरी.

४) राजश्री वाघमारे. लॉकडाऊनच्या काळात मी न्यूज अनकट या पुण्यातल्या न्यूज पोर्टलसाठी घरुन काम करत होतो. यात राजश्रीही होती. मी सर्वांच्या बातम्या तपासून त्या एडिट करुन पुढे पाठवायचो. ऑनलाईन काम असल्याने आमची कधी भेट झालेली नव्हती. शिवाय ती साममध्ये आहे हे पण माहित मला माहित नव्हतं. पण जेव्हा मी ऑफिसात गेलो तेव्हा तिला बघून मला वाटलं की ही, राजश्री असावी. डीपी बघितला होता... आणि मग तिनेही ओळखलं. अशी आणखी एक ओळख निघाली.

५) विकास मिरगणे. रायगड माझामध्ये काही काळ मी इंटर्नशीप केली होती. तिकडे विकास दादा होता. मी त्यावेळी मास्टर्सला नुकतचं अॅडमिशन घेतलं होतं. हे विकास यांना कळलं आणि त्यांनी मलाही मास्टर्स करायचंय, तुझ्यासोबत माझंही होऊन जाईल म्हणून मला विचारलं. मी त्यांचे सगळे फॉर्म भरले, अॅडमिशन झालं आणि ते माझे क्लासमेटही झाले. २ वर्षांत त्यांना सगळ्या नोट्स, प्रोजेक्ट आणि जमेल ती हेल्प केली आणि माझ्यासह त्यांचंही मास्टर्स पूर्ण झालं. त्यांच्या बातम्या मी नेहमी करायचो. आता ते साममध्ये नाही, पण थाडेफार संपर्कात असतात.

 




करुणा, सुरभी मॅम, सोनाली मॅम, राजश्री, विकास मिरगणे, योगेश गायकवाड, प्रशांत सागवेकर यांच्यासह अनेक लोकांना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळखतो आणि तेही ओळखतात. फक्त सध्या मी नवीन लोकं जोडणं, त्यांच्याशी बोलणं हे काहीसं विसरल्याने माझी इथे अद्याप कुणाशीही पक्की मैत्री झाली नाही, फक्त प्रोफेशनली सर्वांशी कनेक्टेड आहे. 

नंदू सरांची एन्ट्री

सुरुवातीला आम्हाला टीम लिडर अमित सर होते. पण ते पुण्याहून ऑपरेट करायचे. साम डिजिटलचा मेन डेस्क पुण्यात होता. मुंबई ऑफिसला आम्ही अवधे ३-४ जण होतो. यामुळे इथे आम्ही बेलगाम घोड्यांसारखे होतो. मुंबईत आम्हाला कॅप्टन ऑफ द शीप नव्हता. आता सामचा मेन डेस्क बेलापूर ऑफिसला आहे. नंदकुमार जोशी सर आमचे टीम लिडर आहे. ते जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतंयं, मार्गदर्शन मिळतं, दिशा मिळते. यामुळे आमच्या सगळ्याच टीमच्या कामात कमालीचा फरक पडला आहे. हे सगळं आकडेवारुन स्पष्ट कळंत. शिवाय आमच्या टीममध्ये राजकारण हे अगदी मीठासारखंच आहे. फक्त चवीएवढं. तेवढं तर हवंच ना? नाहीतर सगळं गोड-धोड असेल तर शुगर वाढायची... असो. पण कमी मनुष्यबळात कामाचा आलेख चढता ठेवण्यात नंदू सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यश येतंयं हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. 

एक वर्षाचा आढावा

गेल्या १ मार्च २०२२ पासून बेलापूरमध्ये पूर्णतः आत्मनिर्भरपणे राहतोय. कुठलाही फॅमिली सपोर्ट नाही, स्वतःच सगळं काही... पण या सगळ्या व्यापात मी माझ्या कामात मात्र कधी अडथळा येऊन दिला नाही. १२ महिन्यांत १२ सुट्ट्या फ्री असतात, त्यापैकी ९ खर्च केल्या ३ सु्ट्ट्या घेतल्याच नाही, आता ते वाया गेल्या. शिवाय आता माझ्या बातम्यांना चांगला रीच असतो, गुगल अॅनॅलिटीक्सवर बातम्या रॅंक होत असतात, डीएच मिळतं, माझ्या वेबस्टोरी सर्वात जास्त चालतात. अगोदरपेक्षा कितीतरी पटीने कामांत सुधारणा झाली आहे. शिवाय बातम्यांव्यतिरिक्त इतर टास्कही आता करतो. ही सगळी स्वतःची स्तुती नसून गेल्या एका वर्षांत मी जे शिकलो त्याचं ते फळ आहे की, हे सगळं मला करता येतंयं. दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे आता माझी मास्टर्स डिग्री (MACJ) पुर्ण झाली आहे, तेही चांगल्या मार्कांनी. यात विशेष म्हणजे मी प्रामाणिकपणे तयार केलेला संशोधन प्रबंध सर्वांनाच आवडला, त्यामुळे पोस्ट ग्रॅज्यूएट होणं नक्कीच सार्थकी लागलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे 'चष्मेबहाद्दर' झालो, आता ही गोष्ट चांगली म्हणता येणार नाही.

थोडसं मनातलं

मी हे सगळं लिहीलेलं वाचण्यात माझ्याशिवाय आणखी बोटावर मोजण्याइतक्या माझ्या जवळच्या लोकांना इंटरेस्ट असेल याची मला जाणीव आहे. पण, इतकं लांबलचक आणि सविस्तर लिहिण्याचं कारण एकच की, भविष्यात मला हे सगळं मला लक्षात रहावं. मी कुठून सुरुवात केली, कुणी कशी मदत केली, कशी वागणूक दिली हे सर्वकाही लक्षात राहणार नाही. कामाच्या व्यापात अनेक गोष्टी डोक्यातून कालांतराने निघून जातात त्यामुळे त्या सगळ्या मनातल्या गोष्टी इथे माझ्या ब्लॉगवर ओतून टाकत असतो. त्याचप्रमाणे असं काही लिहील्याने मला मानसिक शांतता आणि समाधान मिळतं, त्यासाठीही हा सगळा प्रपंच आहे.

आजच्या घडीला साममध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामात आता चांगला झालो आहे, असं म्हणता येईल. पण, अजून चांगलं होता येईल हेही तितकचं खरं आणि सिनीअर्सने सांगितलेल्या या सल्ल्यावर नक्कीच काम करेन. सध्या प्रचंड स्ट्रगल करतोय, वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पण, तरीही अद्याप माझा हवा तसा आर्थिक विकास झालेला नाही. एवढं कष्ट, करुनही जेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्याची मानवी वृत्ती आपोआप जागी होते.

आपण लायक असताना जर त्याचं योग्य फळ योग्य वेळेत मिळालं नाही तर मोठी निराशा होते. आज एका वर्षात साममध्ये मी जर काही कमावलं असेल तर ते फक्त "काम आणि काम". बाकी आर्थिक बाबतीत अजूनही सर्वात मागासलेलाच आहे. अजूनही मी परफेक्ट नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, पण एवढा 'ढ' सुद्धा नाही की कुणी माझ्या कामाला आणि मला इग्नोर करावं. एकतर या जगात माणसाची नाही तर त्याच्या पदाची आणि आर्थिक स्थितीची जास्त किंमत असते. अशा जगात जर चांगलं काम करुनही आपली दखल घेतली जात नसेल आणि इतरांना मात्र जास्तच दिलं जात असेल तर प्रत्येक मानवी स्वभावाप्रमाणे माझ्याही मनात ईर्षेची भावना येतेच. मूलभूत गरजाही पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणे, अशा मोबदल्यात काम करुन पेशन्स ठेवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. पण, सध्या तेही करतोच आहे... शेवटी आयुष्य यालाच म्हणतात. पोटात भूक असताना, मनात दुःख असताना, डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ असताना कामात फोकस ठेवणं आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवणं ही कला आता शिकतोय. 

हे गरजेचं आहे

या सगळ्यात एक गोष्ट आता जाणवतेय आणि हितचिंतकांनीही सांगितलं की, मी जे काम करतो ते मला ते मला कदाचित इतरांना दाखवता आलं नाही, सेल्फ प्रमोशन करणं मला जमलं नाही. स्वतःला प्रमोट करणं, स्वतःची ब्रॅंडींग करणं हे आताच्या जगात महत्वाचं असताना मी याकडे लक्ष दिलं नाही. दुसरं म्हणजे माझा स्वभाव. Attitude Is Everything: Change Your Attitude ... Change Your Life! असं म्हटलं जातं. पण हे अॅटीट्यूड वैगेरे माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे, मला खरंचं ते जमत नाही. शेवटी आपला मूळ स्वभाव सहजासहजी बदलत नाही. जवळची माणसं म्हणतात एवढं मवाळ राहिलं आणि अॅटीट्यूड दाखवला नाही तर लोकं आपल्याला ग्रॅंटेड घेणारच म्हणून स्वभाव बदल आणि अॅटीट्यूड ठेव. आता मी स्वभावच बदलायला सांगणं म्हणजे कासवाला धावायला सांगण्यासारखं आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता मला माझ्यात, स्वभावात, देहबोलीत आणि अजून अशा बऱ्याच बाबतीत काही बदल करण्याची खरंच गरज आहे हे सत्य नाकारता येणार नाही. शेवटी जो दिखता है वही बिकता है...!

#अक्षय्यनामा✍️

Thursday, 21 April 2022

'सकाळ'ला पोहोचण्यासाठी 'युलु' आली धावून अ्न मी गेलो बुरुम बुरुम

Yulu Zone At CBD Belapur Railway Station


आज सकाळी उठायला २५-३० मिनिटं उशीर झाला. सगळं आवरुन हॉस्टेलहून (नायर हॉस्टेल, बेलापूर) ऑफिसला निघालो तर, बराच वेळ रिक्षा मिळेना. ५-७ मिनिटांनंतर एक रिक्षा मिळाली पण त्या रिक्षावाल्याकडे गुगल पे नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती. सकाळी ८ ची शिफ्ट, ऑफिस (सकाळ भवन, बेलापूर) हॉस्टेलपासून १.४ किमी. माझ्या स्पीडने जायचं झालं तर कमीत-कमी २५ मिनिटं आणि फास्ट चाललो तरी २० मिनिटं ऑफिसला पोहोचायला वेळ लागणार हे नक्की. सकाळी-सकाळी चांगलीच फजिती. शिवाय आज पुण्याहून सिनिअर सहकारी (बॉस लोकं) येणार होते, त्यात मला ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय यामुळे डोकं फिरलं. बेलापूर गावातल्या अमृतवेल तलावासमोर उभा होतो, तेवढ्यात तिथे पार्क केलेल्या सायकलींवर नजर गेली. तशा त्या सायकली नेहमीच बघत असतो, पण आज जरा आशादायक नजरेने त्या सायकलींकडे (Yulu Bike) बघितलं. रिक्षा मिळत नाही, मिळाली तर कॅश नाही, जवळपास एटीएम नाही आणि एटीएम जरी मिळालं तरी सुट्ट्या पैशांचे वांदे. अशात सायकलवर ऑफिसला जाण्याचा विचार डोक्यात आला. (Yulu Bike Experience By Akshay Baisane)

Yulu Cycle Photo By Akshay Baisane At CBD Belapur Railway Station

हा विचार डोक्यात आला. २-३ मिनिटं विचार करण्यात गेला मग शेवटी काढला मोबाईल आणि युलु अ‍ॅप डाऊनलोड (Yulu App) केलं. तसं ते आधीही वापरलं होतं टाईमपास म्हणून... त्यात ३० रुपये होते. लगेच चांगली सायकल निवडली, सायकलची घंटी, हवा वैगेरे सगळं बघितलं, सीट हाईटनुसार अ‍ॅडजस्ट केली. अ‍ॅपमधून सायकलवरचा क्यूआर कोड स्कॅन केला, सायकल अनलॉक झाली. मग काय मस्त बसलो सायकलवर अन् निघालो ऑफिसला. सकाळची वेळ असल्याने रस्ते मोकळे, थंड हवा, त्यात सीबीडी परिसरातले रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ असल्याने सायकल चालवायला काही अवघड वाटलं नाही. शिवाय युलु सायकल चालवायला खूप स्मूथ वाटली. हॅण्डलला असलेली घंटी ट्रिंग-ट्रिंग मुद्दामच वाजवत होतो. सायकल जेवढी स्मूथ वाटत होती, तेवढी मजबूतही वाटली. सामान ठेवण्यासाठी हॅण्डलला कॅरीअर होतं, पण माझी बॅग फारशी जड नसल्याने मी ती बॅग पाठीवरच लावली होती. खूप वर्षांनी सायकल चालवल्याने जरासा दम लागला, पण तेवढीच सकाळची एक्सरसाइज म्हटलं... आकाशी रंगाच्या सायकलवर मी कसा दिसत असेल असा विचार मनात आला, फोटो काढून बघावं तर सोबत कोण नव्हतं. विचार करता-करता स्टेशनला पोहोचलोही. तेही अवघ्या सात मिनिटांत. मी ७ः५० ला निघालो होतो आणि ७ः५७ ला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळच्या युलु बाईक झोनला पोहोचलोही. (Yulu Bike Zone At CBD Belapur Railway Station)

स्टेशनला पोहोचल्यावर युलु अ‍ॅप ओपन केलं. राईड संपवली, सायकल लॉक केली आणि बिल बघतो तर अवघे १०.२० रुपये फक्त शुल्क आकारले होते. दररोज रिक्षाला मीटरप्रमाणे २० ते २६ (Base Fare 21) रुपये लागतात. पण आज मी अवघ्या दहा रुपयांत हॉस्टेल ते ऑफिस असं १.४ किमीचा प्रवास केला. तेही शून्य प्रदूषणासह, थोडंस वॉर्मअप आणि पैशांची बचत हे सगळं एका सायकलने शक्य झालं. ही अप्रतिम सेवा देण्यासाठू युलु बाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानायला हवे. आता सकाळची शिफ्ट असेल तेव्हा दररोज युलुच्या सायकलनेच ऑफिसला जायचा विचार आहे. युलुची इलेक्ट्रिक बाईकही आहे, त्याचीही टेस्ट राईड एकदा घ्यायची आहे. पण, माझ्या हॉस्टेलजवळ असलेल्या युलु झोनला इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय नाही, फक्त सायकलच आहे. पण काहीही म्हणा जवळच्या अंतराला सायकल बेस्ट आहे. बाकी एवढं करुनही ऑफिसला उशीर झालाच... चहा-नाष्टा करण्यात जरा वेळ गेला. पण, सायकल नसती तर जास्त उशीर झाला असता. असो... छोटासा अनुभव होता, शेयर करावासा वाटला, केला... तुमच्या परिसरात युलु असेल तर एकदा नक्की अनुभव घ्या!

युलु अ‍ॅप डाऊनलोड व रिचार्ज (Yulu App Download & Recharge)

युलु सायकल वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर युलु अ‍ॅप डाऊनलोड करा. मग आपली माहिती भरा. त्यानंतर डिपॉजिट २०० रुपये भरावे लागतील जे रिफंडेबल असतील. यानंतर रिचार्ज करावा लागेल जो ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत टॉपअप करु शकता. गुगल पे, यूपीआय, ऑनलाईन बॅंकिंग किंवा डेबिट-क्रेडीट कार्डने हे पेमेंट करु शकता.

युलु सायकल/बाईक अशी वापरा (How To Use Yulu Bike)

युलु सायकलजवळ जा. सायकलच्या सीटमागचा किंवा मागच्या मर्डगार्डवरचा क्यूआर कोड हा अ‍ॅपमध्ये स्कॅन करा. त्यानंतर सायकल अनलॉक होईल, किंवा हातने अनलॉक करण्यास अ‍ॅपमध्ये सांगितलं जाईल. बस, सायकल अनलॉक झाल्यापासून तुम्हाला सायकलचं भाडं लागू होईल.

युलु सायकलचं भाडं (Rent Of Yulu Bike)

पहिल्या राईडसाठी काहीतरी १० रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट लागतात. नंतरच्या राईडला बेसिक भाडं ५ रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं आकारलं जातं. हे नवी मुंबई बेलापूरसाठी आहे. बाकी दुसरीकडचं मला माहित नाही.

युलु सायकल वापरण्याचे नियम (Rule For Ride Yulu Bike)

१) सायकल बुक केल्यानंतर सायकलची जबाबदारी पुर्णपणे तुमची असेलय

२) सायकल कुठेही पार्क करता येणार नाही, फक्त युलु झोनमध्येच सायकल पार्क करता येईल,

३) राईड चालू असताना मोबाईलचं इंटरनेट आणि ब्लूटूथ चालू असणं गरजेचं आहे.

४) सायकल जोपर्यंत अनलॉक आहे तोपर्यंत  १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं तुमच्या युलु खात्यातून वजा होईल.

५) वाहतुकीचे सर्व नियम पाळत सायकल चालवावी.

तर हा होता माझा आजचा मस्त अनुभव. जे चांगलं आहे, त्याबद्दल बोललंच पाहिजे, त्याचं कौतुक इतरांनाही सांगितलं पाहिजे या शुद्ध भावनेने हा वैयक्तिक प्रपंच...! 

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

Thursday, 23 September 2021

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...


आज पोस्ट ग्रॅज्युएट झालो!!! मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी "मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम"(#एमएसीजे) उत्तीर्ण झालो. ६ जुलै २०१९ ला बॅचलर ऑफ मास मीडिया (#BMM) आणि आज २२ सप्टेंबर २०२१ रोजी (#MACJ) उत्तीर्ण झालो होतो. आनंद नक्कीच आहे. पण, जेवढा आनंद १२ वी पास झाल्यावर किंवा पदवीधर झाल्यावर झाला होता तेवढा आनंद यंदा नाही. त्याची अनेक कारणं आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं आणि ऑनलाईनच परीक्षा द्याव्या लागल्या हे त्याचं मुख्य कारण... त्यामुळे यंदा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनही काही विशेष केलं असं वाटलं नाही. निकाल 'हाच' असेल याचा अंदाज होताच. कारण MCQ पद्धतीनं ५० पैकी ४० प्रश्न सोडवणं तेही (अभ्यासासाठी?) दिलेल्या प्रश्नावलीतून हे अगदी १२ वी च्या विद्यार्थ्यालाही जमेल असं होतं. विजयाची माळ कष्ट न करता गळ्यात पडावी असं वाटतंय. पण असो... आता मी पदव्युत्तर पदवीधारक आहे हे मला मान्य करावं लागेल.

बाकी मी या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात काय शिकलोय हे मला फारसं आता सांगता येणार नाही. कोरोनाने नको त्यांची चांदी केली, पण आमची मात्र मजा घालवली. कॉलेजला जाण्याची मजा, नवीन मित्र-मैत्रीणी जोडण्याचा तो काळ, वर्गात बाकावर बसून शिकण्याचा तो आनंद, कॉलेज डेज आणि एकुणच अख्खी कॉलेज लाईफ या कोरोनाने हिरावून घेतली. नशीबी आलं ते कृत्रीम, व्हर्चुअल आणि ऑनलाईन जग. एकेकाळी स्मार्टफोनमध्ये तासन्-तास रमणारा मी आता या नकली ऑनलाईन जगताला खरंच वैतागलो आहे.

मला एसएसटी कॉलेजचे ते सुंदर दिवस आठवतात, जेव्हा मी रीअल कॉलेज लाईफ मनसोक्तपणे जगली होती. किती नवे मित्र, नव्या मैत्रिणी, शिक्षक अशा सर्वांशीच अगदी दिलखुलास संबंध होते. कॉलेजमध्ये थोडीफार हवा होती. पण, नंतर मास्टर्ससाठी जोशी-बेडेकर कॉलेजला आल्यावर फक्त पहिली सेमीस्टर लिखीत दिली, त्यातही खूप कमी वेळा कॉलेजला गेलो होतो त्यामुळे क्लासमेटही मला ओळखत नाही याबद्दल जरा वाईट वाटतं. कारण मला मित्र-मैत्रिणी म्हणजे अत्यावश्यक बाब वाटतात. मी घरच्यांच्या नजरेत जरी माणूसघान्या असलो तरी बाहेरच्या दुनियेत माणसाळलेला प्राणी आहे. त्यामुळे बेडेकर कॉलेजमध्ये हे एकटेपण मला सतावत होतं. एकतर मास्टर्स करायचं ठरलं नव्हतं. मग अचानक करावं असं वाटलं आणि अॅडनिमिशन घेतलं, तेही पहिल्या सेमीस्टरच्या एक ते दीड महीने अगोदर... त्यामुळे जरा गडबड झाली होती. त्यात तेव्हा मी काही दिवस ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात काम करत होतो, नतंर माय महानगरमध्ये इंटर्नशीप म्हणून मला कॉलेजला जायला जमलंच नाही. मग जेव्हा कधीतरी जायचो तेव्हा इतरांशीही काही जास्त बोलणं होत नव्हतं त्यामुळे कुणाशी खास अशी मैत्री झालीच नाही. फक्त हाय...हॅलो पुरती मैत्री मला नको वाटते. मग रेग्युलर जाण्याचा विचार केला, तसं प्लॅनिंगही केलं, मग कोरोना महाशयांमुळे लॉकडाऊन झालं ते अदयापही कॉलेज बंदच आहे. अशातच आमची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पुर्ण झाली तेही आजच ऑनलाईन कळलंय. कॉलेज लाईफ जगण्याची इच्छा कोरोनाने हिरावून तर घेतली शिवाय आयुष्यातल्या अनेक चांगल्या क्षणांपासून दुर केलं. असो... आता सगळं झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीच, पण मन मोकळं करावं म्हणून हे इकडे लिहीलं आहे.

आता अधिकृतपणे कॉलेजलाईफ संपली आणि दुनियादारी सुरु झाली. आता आयुष्यात मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नोट्स, बेंच यांची जागा सहकारी, संपादक, टास्क, डेस्क यांनी घेतली. अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदल माझ्यासाठी सकारात्मकच आहे. पण, कॉलेज लाईफचा असा दी एन्ड झाल्याने आयुष्याशी जरासा नाराज आहे, लवकरच ही नाराजगी दुर होईल... कारण माझी नाराजगी दुर करणारा मी एकटाच आहे...अद्यापही अन् सध्यातरी...! बाकी मी आज पोस्ट ग्रॅजुएट झालो याचा मला नक्कीच आनंद आहे.
एकेकाळी बारावी सायन्समधून नापास झाल्यावर.....बस्स झालं! यावर आता नंतर कधीतरी पकवेन, मला झोप आणि कंटाळा दोन्हीही एकसोबत आल्याने गुडनाईट.....

Tuesday, 25 August 2020

प्रेम कसं होतं? एक आठवण...

     प्रेम कसं होतं?... २५ ऑगस्ट २०१७ ला ही कविता लिहिली होती. तेव्हा मी BMM च्या फर्स्ट ईअरला होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं अतिप्रेम झालं की ते प्रेम कागदावर उमटलं. कविता ज्यांना ज्यांना पाठवली सर्वानांच ती आवडली. त्याच वर्षी म्हणजे २०१७ ला मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. त्यात अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितेचं वाचन करून त्यांना आदरांजली देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी विज्ञान,कला वाणिज्य, पत्रकारिता अशा सर्व शाखेचे जवळपास २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या कवितेचं वाचन झालं. तेव्हा 'BMM मधून कोण नाही का कविता करणारा?'' असं सूत्रसंचालन करणाऱ्या दीपक गवादे सरांनी विचारलं. आम्ही सगळे जण एकमेकांची तोंडं पाहू लागलो. माझी कविता मित्रांना माहित होती. तेवढयात माझा वर्गमित्र प्रसादने नंदू सरांना सांगितलं कि सर अक्षयने लिहिली आहे कविता. मला जाम अवघडल्यासारखं झालं. कारण ती कविता प्रेमावर होती आणि मी इतका लाजरा... त्यात ती सर्वांसमोर वाचायची, सगळे हसणार, मजा घेणार याची मला भीती... नंदू सरांनी मला जा पुढे कविता वाच म्हणून हट्टाने आणि आदेशाने सांगितलं. मी घाबरत घाबरत माझ्या मोबाईलवर माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढे गेलो... दीपक सरांना विनंती केली कि,  सर मला कविता वाचता येणार नाही प्लीज तुम्हीच वाचा... असं सांगून मी माझा मोबाईल दीपक सरांकडे दिला आणि पटकन माझ्या बेंचवर बसलो. यावेळी माझ्या हृदयाचे ठोके भयंकर वाजत होते. कारण मी कुणावर प्रेम करतो हे या कवितेतून स्पष्ट कळत होतं. 
        तर दीपक सरांकडे मोबाईल दिला, त्यांनी माझ्या कवितेचं नाव वाचूनच कवितेचा आशय समजून घेतला. आणि जसं कवितेचं नाव वाचलं तसं सर्वजण ओ... म्हणून दाद देऊ लागले. दीपक सर भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कवितेचं वाचन कौशल्य खरंच अप्रतिम आहे. जेव्हा दीपक सरांनी कवितेचं वाचन सुरु केलं तेव्हा प्रत्येक ओळीवर सर्वजण दाद देत होते, हसत होते, माझ्याकडे बघत होते आणि मी मात्र खूपच नर्व्हस होतो. कारण ती कविता म्हणजे तिला जाहीररीत्या प्रपोजच होता. बोल दीपक सरांचे आणि शब्द माझे. माझ्या कवितेचं रसग्रहण आणि सादरीकरण ज्याप्रकारे दीपक सरांनी केलं ते खूप अप्रतिम होत. प्रत्येकाला ही कविता रिलेट करत होती. थेट हृदयातून आलेल्या या कवितेत माझ्या १००% खऱ्या आणि निखळ भावना होत्या. कवितेच्या शेवटच्या कडव्यात एक ओळ होती ज्यामुळे सर्वजण खळखळून हसले ती ओळ अशी -  ''प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.'' बालिश वाटते ना? मलाही आता वाटते. पण तेव्हा हीच फीलिंग होती. आता कळतंय आपण किती बालिश होतो ते... पण काहीही असो जे वाटलं ते लिहिलं... माझ्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट झाला. आणि निघताना मला सगळेजण दाद देत होते, तारीफ करत होते, अभिंनदन करत होते... मी फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरचे सिनिअर विदयार्थीं मला अभिनंदन करायला आले. दीपक सरांनी तर माझं कौतुक केलं. कारण पत्रकारितेचा विदयार्थी म्हणून माझा स्वतःचा ब्लॉग आहे आणि मी काहीतरी लिहितोय यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. सोबतच थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना ''शिका काहीतरी यांच्याकडून'' असं म्हणत त्यांना हटकलं. सरांनी केलेल्या कवितेच्या वाचनामुळे मला कॉलेजात जरा वेगळी ओळख मिळाली आणि मी काही दिवसांचा सेलेब्रिटी झालो होतो. पण.... 
       पण... जी कविता सर्वांनां आवडली, जी कविता मी तिला स्वतः पाठवली होती, त्याच मुलीने मला विचारलं... ''अक्षु, कुणासाठी लिहिलीय कविता?'' आईशप्पथ  काळजाची तार छेडणं काय असतं हे त्याक्षणी कळलं. नेमकं ती माझ्या बाजूला बसली होती. बाजूला म्हणजे मुलामुलींचे वेगळे बेंच होते आम्ही दोघे कडेला बसलो होतो, मध्ये गॅप होता. तिच्या बाजूला बसला यावं म्हणून मी मुद्दाम तिकडे बसलो होतो. पण साला तिला खरंच कळलं नाही का? कि ती कविता तिच्यासाठीच होती... कॉलेजात कसं काय टॉप केलं तिने काय माहित? वेडी कुठली... एकतर ती खूप वेडी होती, नाहीतर तिला सगळं कळत असूनही माझी शाळा घेत होती...असो... ते दिवसच वेगळे होते. या कवितेचं वाचन माझी मैत्रीण श्वेता वाळंजने सुद्धा केलाय. आम्ही कल्याणच्या जनशक्ती न्यूजमध्ये सोबत काम करायचो. तेव्हा तिलाही कविता खूप आवडली आणि तिने तर थेट तिच्याच फेसबुकवरून लाईव्ह करत कवितेचं वाचन केलं. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही कविता हृदयाच्या खूप जवळ आहे. आज या कवितेला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून ही कविता पुन्हा शेयर करतोय...कशी वाटली सांगा... जमलं तर...आता तर कविता सुचत नाही कारण आता तशा भावनाच येत नाही. त्यामुळे मी ज्या काही मोजक्या ४-५ कविता केल्या आहेत त्याच माझ्या हृदयातल्या आणि मनातल्या गोष्टी आहेत असं समजा...पुन्हा अशा कविता सुचतील कि नाही...माहित नाही. कारण आता प्रेम वैगेरे म्हटलं कि भीती वाटते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि बाकी राहिली शून्य!!! पण बघू ,काय सांगता येत नाही. ये दिल तो बच्चा है जी...😊


मूळ कविता वाचण्यासाठी हृदयावर 💓💓💓💓 क्लिक करा


Friday, 10 July 2020

BBC NEWS - Marathi कडून कौतुक... माझ्यासाठी कोरोनाच्या काळातला सर्वात पाॅझिटीव्ह आणि सुंदर दिवस 😊😊😊

मेहनत का फल मीठा होता है...😎😍😉





View this post on Instagram

@bbcnewsmarathi चे सर्व १०० #coronapodcast बघितले होते. ते खूप आवडले म्हणून त्यावर सविस्तर ब्लॉग लिहिला. आज त्याच ब्लॉगचा उल्लेख विनायक सर आणि आशिष सर यांनी त्यांच्या कारोना पॉडकास्टच्या १०२ व्या भागाच्या शेवटी केला. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझा ब्लॉग वाचला याचा मोठा आनंद आहे. त्यांनी केलेल्या कौतुकाने उत्साह आणि पॉझिटिव्ह नक्कीच वाटतंय. धन्यवाद विनायक सर आणि आशिष सर 🙏
A post shared by अक्षय्यनामा✍️™️©️ (@aksbaisane) on



Tuesday, 30 June 2020

CoronaPodcast - BBC News Marathi बद्दल माझ्या मनातली गोष्ट...


Hi...नमस्कार...मी विनायक. Hello...मी आशिष😊
    गेले १०० दिवस दररोज  रात्री ०८:१५ वाजता आपण हा आवाज ऐकत आलो आहोत. गेल्या १०० दिवसांत या आवाजाची इतकी सवय झाली आहे कि, सुरवातीची ओळ वाचताना सुद्धा त्या दोन व्यक्तींच्या आवाजात आणि त्यांच्या त्या ट्यूनमध्ये, त्या स्टाईलमध्येच मनातल्या मनात का होईना पण ते त्याचप्रकारे बाहेर येतं. एखादा प्रसिद्ध डायलॉग किंवा जिंगल ज्याप्रमाणे लक्षात राहते व ते आपण कधीमधी गुणगुणत राहतो त्याचप्रमाणे जणू हे बिना म्युजिकचं वाक्य आता अनेकांच्या डोक्यात फिट्ट बसलंय. अर्थातच आपण बोलत आहोत बीबीसी मराठीच्या कोरोना पाॅडकास्ट बद्दल...मला याबद्दल लिहावसं वाटलं याचं कारण एका वाक्यात सांगायचं झालं तर - "I really Like it."

    माझ्या या ब्लॉगवर मी माझ्या मनातल्या गोष्टी लिहीत असतो. मग तो कोणताही विषय असो, मला त्यावर व्यक्त व्हावंस  वाटलं कि मी ते लिहितोच. आजचा विषय जरा वेगळा आहे. या लेखाच्या शीर्षकावरून bbc मराठीची जाहिरात करत असल्याचा भास होत असेल, पण तसं काहीही नाही. एक पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून आणि bbc मराठीचा एक प्रेक्षक व वाचक म्हणून मला त्याबद्दल काय वाटतं हे मी शेयर करणार आहे. bbc मराठी सध्या सोशल मीडिया आणि वेब पोर्टल यांच्या माध्यमातून बातम्या आणि माहिती देत असते. मी bbc मराठी अगदी सुरवातीपासून पाहत आलोय. त्यातील अनेक गोष्टी मला आवडतात. सध्या थेट bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टबद्दल बोलतो. 
    तर, कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधानांनी सुरुवातीला जनता कर्फ्यूची घोषणा केली, आणि मग लॉकडाऊन जाहीर केले ते २४ मार्चला रात्री ८ वाजताच्या फेसबुक लाईव्हद्वारे. म्हणजेच २५ मार्चच्या मध्यरात्रीपासूनच देशात पहिले लॉकडाऊन सुरु झाले. पण लॉकडाऊनची पूर्वकल्पना जवळपास सर्वच पत्रकारांना आणि वृत्तसंस्थांना होती. त्यामुळे वर्क फ्रॉम कसं करता येईल याचा सगळीकडे विचार होत होता. शिवाय पत्रकारांनी कसं काम करायचं याबद्दलही रणनीती ठरत होती. सर्व वृत्तसंस्था आपापल्या परीने काम करत होत्या. तेव्हा bbc मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि bbc मराठीचे ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट विनायक गायकवाड यांनी लॉकडाऊनच्या पाच दिवस अगोदरपासूनच  म्हणजेच दिनांक २० मार्च २०२० पासून फेसबुक लाईव्ह द्वारे बातम्या, माहिती आकडेवारी देणे सुरु केले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून म्हणजेच २० मार्च पासून ते २७ जुलै पर्यंत १०० दिवसांत १०० फेसबुक लाईव्ह(कोरोना पॉडकास्ट) कोणताही खंड न पडू देता सलगपणे पूर्ण केले. याबद्दल विनायक सर आणि आशिष सर यांच्यासह संपूर्ण bbc मराठीच्या  टीमचे हार्दिक अभिनंदन.  

    bbc news marathi चे  कोरोना पॉडकास्ट मला का आवडले?

तसं पाहायला गेलं तर पॉडकास्ट, फेसबुक लाईव्ह अशा संकल्पना काही नवीन नाहीत. पण बातम्या देण्याची पद्धत, फॉरमॅट, साधेपणा, नैसर्गिकपण, खात्रीलायक माहिती, आकडेवारी, कमेंटद्वारे वाचकांशी असलेला संवाद(टू वे कम्युनिकेशन) अशा अनेक बाबी bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टला काही खास बनवतात. 

१) वृत्तनिवेदक 
बातमी देणारा तो वृत्तनिवेदक. प्रत्येक वृत्तनिवेदक हा आपल्या खास शैलीमुळे ओळखला जातो. तशीच खास शैली आशिष सर आणि विनायक सर यांची आहे. सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे Hi...नमस्कार...मी विनायक. Hello...मी आशिष😊 आणि मग छोटीशी स्माईल. या हसऱ्या आणि पॉझिटिव्ह शैलीमुळेच कदाचित मला आणि अनेकांना bbc मराठीच्या  कोरोना पॉडकास्टने आकर्षित केलं. 

२) केमिस्ट्री 
वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वृत्तनिवेदकाची खास शैली असते. पण जेव्हा दोन वृत्तनिवेदक एकत्रितपणे काम करतात, तेव्हा एकमेकांशी समन्वय साधून संवाद वाहता ठेवणे आव्हानात्मक असते. मधेच सायलेंट पॉज किंवा एकाचवेळी बोलणे, गोंधळने, गडबडने असे होऊ शकते. पण या दोन्ही मान्यवरांचा एकमेकांशी असलेला समन्वय, हजरजबाबीपणा यांमुळे कुठेही संवाद न थांबता तो सुरळीत राहतो. 

३) फॉरमॅट
जवळपास १ तासाच्या या संवादात सुरवातीला सर्वाना वेलकम करणे, महत्वाचे मुद्दे सांगणे, त्यावर माहिती देणे, वाचकांच्या प्रतिक्रया वाचून त्यावर बोलणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या कमेंट्स वाचणे, निगेटिव्ह कमेंट्सनाही हसतमुख राहून पॉझिटिव्ह उत्तर देणे, नंतर जग, देश, राज्य, जिल्हा यानुसार आकडेवारी सांगणे, शासन निर्णय, नेते/अधिकारी यांची वक्तव्ये, लशीबद्दल अपडेट्स, थोड्या इकडच्या - तिकडच्या गोष्टी, कोरोनाला न घाबरण्याचे आवाहन, गमंत म्हणून लशीचा पुरस्कार, मग पुन्हा वाचकांच्या कमेंट्स, शेवटी रेकमेंडेशन आणि मग शुभ रात्री.... अवघ्या एक तासांत एवढी माहिती तेही आरडाओरड न करता साध्या नैसर्गिक संवादातून मिळते, त्यामुळे ही पद्धत मला जास्त आवडली. 

४) प्रेझेंटेशन 
आपण टीव्हीवर बातम्या बघतो तेव्हा आपल्याला मथळे, फोटोज, व्हिडिओज, व्हाईस ओव्हर, वृत्तनिवेदकाचे हावभाव, ग्राफिक्स अशा अनेक गोष्टी दिसत असतात. मात्र फेसबुक लाईव्ह करताना मोबाईल स्क्रीनवर तुम्ही आणि तुमचा आवाज एवढयाच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पण इथे केवळ संभाषण कला, ज्ञान, शब्दभांडार आणि अधिकृत माहिती यांच्या जोरावर अगदी बोलीभाषेतून 'न' आणि 'ण' सांभाळून या दोन्ही मान्यवरांनी उत्तमरीत्या बातम्या व माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. माझ्यासारख्याला यातून प्रेझेंटेशन स्किल कसं असावं हे शिकायला मिळालं.   

५) वर्क फ्रॉम होम 
सुरवातीच्या काही कोरोना पॉडकास्टमध्ये मस्त घरात बसून, चहा घेत, शॉट्स घालून(छोटी पँट) bbc मराठीचे संपादक आशिष सर आणि त्यांचे सहकारी विनायक सर यांनी फेसबुक लाईव्ह केले. हे असं मी पहिल्यांदा बघितलं. पण आता त्यात एवढी सुधारणा झाली कि, ते टीव्ही न्यूजपेक्षा जास्त आवडतं. आणि वर्क फ्रॉम होम या संकल्पनेचे उत्तम उदाहरण म्हणजे  bbc मराठीचे कोरोना पॉडकास्ट होय.   

६) सकारात्मक पत्रकारिता 
जेव्हा आजही अनेक प्रसार माध्यमे कोरोनाच्या बातम्या भयंकररीत्या सतत दाखवतात, तेव्हाच bbc मराठी सोपी गोष्ट, कोरोना पॉडकास्ट आणि आता अगदी नवीन गावाकडची गोष्ट यांसारखे माहितीपर आणि सकारात्मक व्हिडिओ सिरीज, स्टोरीज, मुलाखती, लेख प्रसिद्ध करत आहे. याची स्तुती खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली आहे.(आता या स्तुती मागची सोपी गोष्ट मला माहित नाही) पण एकूणच सकारात्मक पत्रकारितेमुळे या काळात bbc मराठीचा प्रेक्षक वर्ग  झपाट्याने वाढला, त्यात मीही आहेच. 

७)  टीम वर्क 
  bbc मराठीच्या १०० व्या कोरोना पॉडकास्टमध्ये आशिष सर आणि विनायक सरांनी या मोठ्या प्रवासाचं रहस्य सांगितलं. दररोजच्या कोरोना पॉडकास्टसाठी लागणारी माहिती, आकडेवारी, ताजे अपडेट्स, लाईव्ह दरम्यान वाचकांसाठी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आणि बातम्यांच्या लिंक्स शेयर करणे ही सर्व कामे बॅकग्राउंडला म्हणजेच पडद्यामागे होत असत. त्यामुळे bbc मराठीच्या १०० कोरोना पॉडकास्टच्या यशाचे रहस्य म्हणजेच bbc ची संपूर्ण टीम होय. 

८) सातत्य 
जेव्हा लॉकडाऊन लागू झाले तेव्हा अनेक वृत्तसंस्थांनी व पत्रकारांनी सुरवातीला फेसबुक लाईव्ह करून बातम्या दिल्या. पण नंतर अनेकांनी काही दिवसांतच ते बंद केले. पण  bbc मराठीचे  कोरोना पॉडकास्ट  दररोज रात्री ०८:१५ ला सुरु व्हायचे , त्यामुळे प्रेक्षकांना त्याची सवय लागली. कधी ५-१० मिनिटे उशिराने पॉडकास्ट सुरु झाले तर प्रेक्षक त्याबद्दल जाब विचारायचे. म्हणजेच प्रेक्षक bbc मराठीच्या  कोरोना पॉडकास्टची वाट बघायचे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सातत्य. 

९) नवा प्रयोग 
मी आधीही सांगितल्याप्रमाणे पॉडकास्ट, फेसबुक लाईव्ह यात नवं असं काही नाही, ही माध्यमे सर्वांनाच अवगत आहे. मात्र  bbc मराठीच्या  कोरोना पॉडकास्टमध्ये  काहीतरी नवं होतं . सूट घातलेला अँकर टीव्हीवर बातमी वाचतो हे लोकांना माहित आहे, त्यात मग जाहिराती, बॅकग्राउंड म्युझिक, फोनो, टेलीफोन बाईट, जुने फुटेजेस आणि व्हिज्युअल्स उगाच कुठेही वापरणे अशा पद्धतीला नॉर्मल जगात बोअर होत नाही. मात्र जेव्हा लॉकडाऊनमुळे तुम्ही घरीच असतात आणि सतत टीव्हीवरच्या बातम्या बघतात तेव्हा तुमचं डोकं नक्कीच खराब होतं, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हे मला खूप कंटाळवाणं आणि नकोसं वाटणारं आहे. अशातच bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टने उत्तमरीत्या काम केले... करत राहतील ही विनंती आणि अपेक्षाही. 

१०) शुद्धीकरण
मी अनेक वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल यांच्या सोशल मीडियाच्या कमेंट्समध्ये वाचकाकांच्या भयानक प्रतिकिया वाचल्या. मग त्यात अगदी शिव्याही असतात. अर्थात प्रत्येक वृत्तसंस्था हीदेखील काही प्रमाणात याला जबाबदार असतेच. मात्र  bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये अशा भयानक कमेंट्स, शिव्या, हाणामारीची भाषा इत्यादी बोटावर मोजण्याइतकी आहे. कारण तुम्ही कोणत्या बातम्या कशाप्रकारे देतात? छुपा अजेंडा चालवता का?,  बातमीत 'बात' किती आणि 'मी' किती असते? यावरही तुमचे प्रेक्षक कसे आहेत ते ठरते.  bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्ट दरम्यान अनेक कमेंट्स येतात. सकारात्मक, नकारात्मक, स्तुती, निंदा, राग, विनोदी अशा सर्वच हावभावांचे कमेंट्स किंवा प्रतिक्रिया येतात. मात्र त्यात शिव्या किंवा खालच्या पातळीवरील टीका यांचे प्रमाण खूपच कमी आहे. व्यक्त व्हावं.. पण कसं व्हावं हे सुद्धा तेव्हढाच महत्वाचं आहे. उगाच शिव्या देऊन आपण आपले  विचार लोकांना पटवून देऊ शकत नाही. लोकं bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये योग्यरीत्या व्यक्त होतायत. म्हणजेच टीका -  टिपण्णी ही शुद्ध आणि चांगल्या भाषेत केल्याने एकप्रकारे याला काही प्रमाणात माध्यमांचे  शुद्धीकरण  म्हणावे लागेल. असं असलं तरी १००% चांगल्याच प्रतिकिया हे मुळीच नाही. कारण, ज्याप्रमाणे कोणतेही सॅनिटायझर १००% विषाणूंना मारू शकत नाही त्याचप्रमाणे कुणीही १००% हेट कमेंट्स बंद करु शकत नाही. 


    तर ही होती  bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टबद्दल माझ्या मनातली गोष्ट. लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं, बाकी काही नाही. bbc मध्ये सिद्धनाथ गानू , निलेश धोत्रे, गुलशनकुमार वनकर, अमृता दवे, गुरप्रीत सैनी, सर्वप्रिय सांगवान अशी अनेक मान्यवर व काहींची नावे सध्या आठवत नाही पण मी त्यांना नेहमी ऐकत असतो, पाहत असतो. कधी असंच वाटलं तर त्याबद्दलही लिहेन. सध्या या लेखासाठी बरीच मेहनत घेतलीय. काही फायदा नसताना केवळ स्वतःच्या मनासाठी आणि मनातली गोष्ट इतरांना सांगण्यासाठी हा खटाटॊप.  bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टच्या अगदी पहिल्या पॉडकास्टपासून(२०मार्च) ते आताच्या १००व्या (२७ जुलै) पर्यंतच्या पॉडकास्टच्या सर्व १०० लिंक्स शोधून त्या एकत्रितपणे माझ्या ब्लॉगवर बघायला मिळतील... म्हणून म्हटलं जाम मेहनत घेतलीय या पोस्टसाठी.. जस्ट फॉर फन... क्रेझी ना...  😀 😀 😀
    
BBC News Marathi चे १  ते  १०० CoronaPodcast पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
      1. BBC news मराठी  CoronaPodcast Day 1 (20 March 2020)
      2. BBC news मराठी  CoronaPodcast Day 2 (21 March 2020)
      3. BBC news मराठी  CoronaPodcast Day 3 (22 March 2020)
      4. BBC news मराठी  CoronaPodcast Day 4 (23 March 2020)
      5. BBC news मराठी  CoronaPodcast Day 5 (24 March 2020)
      6. BBC news मराठी  CoronaPodcast Day 6 (25 March 2020)
      7. BBC news मराठी  CoronaPodcast Day 7 (26 March 2020)
      8. BBC news मराठी  CoronaPodcast Day 8 (27 March 2020)
      9. BBC news मराठी  CoronaPodcast Day 9 (28 March 2020)
      10. BBC news मराठी  CoronaPodcast Day 10 (29 March 2020)
      11. BBC news मराठी  CoronaPodcast Day 11 (30 March 2020)
      12. BBC news मराठी  CoronaPodcast Day 12 (31 March 2020)
      13. BBC news मराठी  CoronaPodcast Day 13 (1 April 2020)
      14. BBC news मराठी  CoronaPodcast Day 14 (2 April 2020)
      15. BBC news मराठी  CoronaPodcast Day 15 (3 April 2020)
      16. BBC news मराठी  CoronaPodcast Day 16 (4 April  2020)
      17. BBC news मराठी  CoronaPodcast Day 17 (5 April 2020)
      18. BBC news मराठी  CoronaPodcast Day 18 (6 April 2020)
      19. BBC news मराठी  CoronaPodcast Day 19 (7 April 2020)
      20. BBC news मराठी  CoronaPodcast Day 20 (8 April 2020)
      21. BBC news मराठी  CoronaPodcast Day 21 (9 April 2020)
      22. BBC news मराठी  CoronaPodcast Day 22 (10 April 2020)
      23. BBC news मराठी  CoronaPodcast Day 23 (11 April 2020)
      24. BBC news मराठी  CoronaPodcast Day 24 (12 April 2020)
      25. BBC news मराठी  CoronaPodcast Day 25 (13 April 2020)
      26. BBC news मराठी  CoronaPodcast Day 26 (14 April 2020)
      27. BBC news मराठी  CoronaPodcast Day 27 (15 April 2020)
      28. BBC news मराठी  CoronaPodcast Day 28 (16 April 2020)
      29. BBC news मराठी  CoronaPodcast Day 29 (17 April 2020)
      30. BBC news मराठी  CoronaPodcast Day 30 (18 April 2020)
      31. BBC news मराठी  CoronaPodcast Day 31 (19 April 2020)
      32. BBC news मराठी  CoronaPodcast Day 32 (20 April 2020)
      33. BBC news मराठी  CoronaPodcast Day 33 (21 April 2020)
      34. BBC news मराठी  CoronaPodcast Day 34 (22 April 2020)
      35. BBC news मराठी  CoronaPodcast Day 35 (23 April 2020)
      36. BBC news मराठी  CoronaPodcast Day 36 (24 April 2020)
      37. BBC news मराठी  CoronaPodcast Day 37 (25 April 2020)
      38. BBC news मराठी  CoronaPodcast Day 38 (26 April 2020)
      39. BBC news मराठी  CoronaPodcast Day 39 (27 April 2020)
      40. BBC news मराठी  CoronaPodcast Day 40 (28 April 2020)
      41. BBC news मराठी  CoronaPodcast Day 41 (29 April 2020)
      42. BBC news मराठी  CoronaPodcast Day 42 (30 April 2020)
      43. BBC news मराठी  CoronaPodcast Day 43 (1 May 2020)
      44. BBC news मराठी  CoronaPodcast Day 44 (2 May 2020)
      45. BBC news मराठी  CoronaPodcast Day 45 (3 May 2020)
      46. BBC news मराठी  CoronaPodcast Day 46 (4 May 2020)
      47. BBC news मराठी  CoronaPodcast Day 47 (5 May 2020)
      48. BBC news मराठी  CoronaPodcast Day 48 (6 May 2020)
      49. BBC news मराठी  CoronaPodcast Day 49 (7 May 2020)
      50. BBC news मराठी  CoronaPodcast Day 50 (8 May 2020)
      51. BBC news मराठी  CoronaPodcast Day 51 (9 May 2020)
      52. BBC news मराठी  CoronaPodcast Day 52 (10 May 2020)
      53. BBC news मराठी  CoronaPodcast Day 53 (11 May 2020)
      54. BBC news मराठी  CoronaPodcast Day 54 (12 May 2020)
      55. BBC news मराठी  CoronaPodcast Day 55 (13 May 2020)
      56. BBC news मराठी  CoronaPodcast Day 56 (14 May 2020)
      57. BBC news मराठी  CoronaPodcast Day 57 (15 May 2020)
      58. BBC news मराठी  CoronaPodcast Day 58 (16 May 2020)
      59. BBC news मराठी  CoronaPodcast Day 59 (17 May 2020)
      60. BBC news मराठी  CoronaPodcast Day 60 (18 May 2020)
      61. BBC news मराठी  CoronaPodcast Day 61 (19 May 2020)
      62. BBC news मराठी  CoronaPodcast Day 62 (20 May 2020)
      63. BBC news मराठी  CoronaPodcast Day 63 (21 May 2020)
      64. BBC news मराठी  CoronaPodcast Day 64 (22 May 2020)
      65. BBC news मराठी  CoronaPodcast Day 65 (23 May 2020)
      66. BBC news मराठी  CoronaPodcast Day 66 (24 May 2020)
      67. BBC news मराठी  CoronaPodcast Day 67 (25 May 2020)
      68. BBC news मराठी  CoronaPodcast Day 68 (26 May 2020)
      69. BBC news मराठी  CoronaPodcast Day 69 (27 May 2020) + Part 2
      70. BBC news मराठी  CoronaPodcast Day 70 (28 May 2020)
      71. BBC news मराठी  CoronaPodcast Day 71 (29 May 2020)
      72. BBC news मराठी  CoronaPodcast Day 72 (30 May 2020)
      73. BBC news मराठी  CoronaPodcast Day 73 (31 May 2020)
      74. BBC news मराठी  CoronaPodcast Day 74 (1 June 2020)
      75. BBC news मराठी  CoronaPodcast Day 75 (2 June 2020)
      76. BBC news मराठी  CoronaPodcast Day 76 (3 June 2020)
      77. BBC news मराठी  CoronaPodcast Day 77 (4 June 2020)
      78. BBC news मराठी  CoronaPodcast Day 78 (5 June  2020)
      79. BBC news मराठी  CoronaPodcast Day 79 (6June 2020)
      80. BBC news मराठी  CoronaPodcast Day 80 (7 June 2020)
      81. BBC news मराठी  CoronaPodcast Day 81 (8 June 2020)
      82. BBC news मराठी  CoronaPodcast Day 82 (9 June 2020)
      83. BBC news मराठी  CoronaPodcast Day 83 (10 June 2020)
      84. BBC news मराठी  CoronaPodcast Day 84 (11 June 2020)
      85. BBC news मराठी  CoronaPodcast Day 85 (12 June 2020) + Part 2
      86. BBC news मराठी  CoronaPodcast Day 86 (13 June 2020)
      87. BBC news मराठी  CoronaPodcast Day 87 (14 June 2020)
      88. BBC news मराठी  CoronaPodcast Day 88 (15 June 2020)
      89. BBC news मराठी  CoronaPodcast Day 89 (16 June 2020)
      90. BBC news मराठी  CoronaPodcast Day 90 (17 June 2020)
      91. BBC news मराठी  CoronaPodcast Day 91 (18 June 2020)
      92. BBC news मराठी  CoronaPodcast Day 92 (19 June 2020)
      93. BBC news मराठी  CoronaPodcast Day 93 (20 June 2020)
      94. BBC news मराठी  CoronaPodcast Day 94 (21 June 2020)
      95. BBC news मराठी  CoronaPodcast Day 95 (22 June 2020)
      96. BBC news मराठी  CoronaPodcast Day 96 (23 June 2020)
      97. BBC news मराठी  CoronaPodcast Day 97 (24 June 2020)
      98. BBC news मराठी  CoronaPodcast Day 98 (25 June 2020)
      99. BBC news मराठी  CoronaPodcast Day 99 (26 June 2020)
      100. BBC news मराठी  CoronaPodcast Day 100 (27 June 2020)


New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...