लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Thursday, 26 December 2019

सर्जिकल स्ट्राईक इन माय कॉलेज लायब्ररी....


      माझ्या कॉलेजची लायब्ररी... म्हणजेच ग्रंथालय,वाचनालय किंवा अभ्यासिका. नेहमप्रमाणेच अगदी शांत होती. ज्युनिअर - सिनिअर विदयार्थी होते, लायब्ररीअन सर होते, मुले आणि मुली सर्वजण होते. कुणी मनापासून वाचत होते तर कोण पोपटपंची किंवा घोकमपट्टी करत होते. कोण परीक्षेत पहिला नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तर कोण केटी  सोडवण्यासाठी झटत होते. सायन्स,कॉमर्स, आर्ट्स, पत्रकारिता, कायदा अशा अनेक शाखेतील विद्यार्थी आपापल्या अभ्यासात मग्न होते. त्यातल्या काही नमुन्यांचे अभ्यासात कमी आणि "तिच्या"कडेच जास्त लक्ष होते. थोडी जरी चुळबुळ झाली किंवा आवाज झाला तर लायब्ररीअन सर डस्टर टेबलावर आपटून त्यांना शांत राहण्याची ताकीद देत होते.  एकूणच माझ्या कॉलेजच्या लायब्ररीत नेहमीप्रमाणेच शांतता आणि शिस्त होती.
     लायब्ररीत लोकं अभ्यास करण्यासाठी जातात. पण तो अभ्यास करण्यामागे प्रत्येकाचा काही ना काही हेतू, उद्देश अथवा स्वप्नं असतं. आपण अभ्यास करून चांगलं शिकून मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळेच ग्रंथालय हे आपल्या स्वप्नपूर्तीला बळ देणारे पवित्र मंदिरच असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
     माझ्या कॉलेजची लायब्ररी म्हणजे असंच एक पवित्र मंदिर. हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासरुपी तपश्चर्या याच लायब्ररीत केली. अनेकांनी आपली स्वप्ने पूर्ण केली. याच लायब्ररीत दररोज प्रमाणे सर्वकाही सामान्यपणे दिनक्रम चालू होता. पण... पण... आज असं काही घडणार होतं जे कधीच इतिहासात घडलं नाही.
      आज अचानक कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू झाला. मुले - मुली इकडे - तिकडे पळत होते. काही मुली रडत होत्या तर मुलेही घाबरली होती. कोवळ्या वयातली पोरं ती... कसेबसे स्वतः ला आणि आपापल्या मित्रांना सावरत  होते. आमचे वर्ग शिक्षक, सर, मॅडम, कॉलेजातले शिपाई काका, झाडूवाल्या मावशी आणि मुख्याध्यापक सुद्धा आम्हाला सांभाळण्यासाठी जिवाचं रान करत होते.
     नेमकं असं काय घडलं होतं की अचानक  एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तर त्याचं उत्तर आहे - कॉलेजवर करण्यात आलेला सशस्त्र हल्ला...
      ऐकण्यात आलं की, अचानक पोलिसांच्या वर्दी मध्ये  काही सशस्त्र दहशतवाद्यांनी शेकडोंच्या संख्येने महाविद्यालयावर ताबा मिळवला आहे आणि आता ते दिसेल त्याला अमानुषपणे मारहाण करत आहेत.  प्रत्येकाकडे अश्रुवायु बॉम्ब, जाड लाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, जॅकेट, बूट, कम्युनिकेशन साठी वॉकी-टॉकी, बंदुका सर्वकाही होते. एका क्षणासाठी विचार आला की  एवढ्या मोठ्या प्रमाणत दहशतवादी आले कुठून आणि तेही पोलिसांच्या वेशातच का आले असावे? तेव्हा कळले ते दुसरे तिसरे कुणीच नसून खरोखरचे पोलीसच होते. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने त्यांना आदेश दिले होते. कोणत्यातरी कायद्या विरोधात शांतपणे पण तीव्र विरोध आम्ही करत असल्याने जणू जनरल डायरने आम्हा विद्यार्थ्यांना बदडण्याचे आदेश  दिले होते. त्यानुसारच पोलिसही आम्हा  विद्यार्थ्यांवर इंग्रज सैनिकांप्रमाणे तुटून पडले आणि लाठ्या-काठ्या घेऊन, बुटाच्या लाथा, बंदुकीचे दांडे, चामड्याचे पट्टे इत्यादींनी मारत सुटले. हा भयंकर अत्याचार बघून कोवळ्या वयातली ती पोरं घाबरली आणि स्वतःला वाचवण्यासाठी कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन लपली. काही जण तर टॉयलेट मध्ये लपले. पोलिस आता अजुनच आक्रमक झाले होते. "त्या कायद्याचा विरोध" करणाऱ्या प्रत्येकाला दडपून टाकण्यासाठी दिसेल त्याला मारहाण करून त्याला तुरुंगात टाकण्यात येत होते.
      आता ते हळू - हळू आमच्या दिशेने येऊ लागले. आम्हीही इतरांप्रमाणेच लायब्ररीत घुसलो आणि आतून दरवाजाच्या सर्व कड्या बंद केल्या.  आतमध्ये आधीच सर्वजण घाबरलेली होती. अशातच त्यांनी दरवाजावर दस्तक दिली आणि ते जोर - जोरात दरवाजा आपटत दरवाजा खोलण्यासाठी आम्हाला धमकाऊ लागले. भितीपोटी कुणीही दरवाजा उघडला नाही. इतक्यात  एका खिडकीतून काहीतरी वस्तू त्यांनी फेकली. क्षणार्धात सगळीकडे धुरच - धूर पसरला. आमच्या डोळ्यांची प्रचंड जळजळ व्हायला लागली श्वास घ्यायलाही त्रास होत होता, डोके प्रचंड दुखू लागले. पोलिसांनी अश्रू गॅसचा वापर केला होता. दरवाजा खोला... आम्ही आत आलो तर कुत्र्यासारखे मार मारू... एकेकाची मस्ती उतरवतो... देशद्रोही कुठले...  असं म्हणत शेवटी त्यांनी ग्रंथालयाचा दरवाजा तोडलाच. ते आत आले. दिसेल त्याला लाथा - बुक्क्यांनी, काठ्यांनी, बंदुकीच्या बटीने  मारले. माझ्या एका मित्राला काठीचा जोरदार मार लागल्याने त्याचा हात माझ्यासमोर तुटला. एकाचे डोके फुटले. मलाही पाठीला आणि पायाला जबर मार लागला होता. आम्हाला वाचवण्यासाठी आलेले आमचे सर आणि शिपाई काका यांनाही मार लागला. एवढी क्रूरता आम्ही कुणीच आजपर्यंत पहिली अथवा अनुभवली नव्हती. त्यामुळे आम्ही प्रचंड त्रासात होतो,घाबरलेले होतो. चारही बाजूंनी विद्यार्थ्यांचा रडण्याचा आवाज येत होता.  कॉलेजची ती शांत लायब्ररी आज  मात्र अतिशय अशांत झाली होती.  सगळीकडे रक्ताचे डाग पसरलेले होते. लायब्ररी एखादा कत्तलखाना वाटत होती. टीव्ही वर बातम्या बघून काळजीपोटी घरच्यांचा  फोन आला. मी गुपचूप पणे लपून अगदी हळू आवाजात आईशी बोलत होतो. मी सुखरूप आहे म्हणून तिला दिलासा देत होतो. इतक्यात माझ्या समोर दोन पोलिस आले. त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेऊन तो फोडून टाकला. नंतर मला आणि माझ्या मित्राला बेदम मारहाण करून दोघांनाही फरफटत पोलिसांच्या गाडीत डांबले, ज्यात अगोदरच डझनभर विद्यार्थ्यांना गुरा - ढोरांप्रमाणे अमानुष मारहाण करून कोंबले आणि मग पोलिस स्टेशनला नेले. तिकडे गेल्यावर आम्हा प्रत्येकाला नाव, पत्ता, वैगेरे विचारण्यात आले. आणि नंतर एकेकाला अर्धनग्न करून सच बोल पट्ट्याने,काठीने जोरदार मारहाण करण्यात आली. याचदरम्यान मीही प्रचंड तणावात होतो. मला आणि माझ्या मित्राला वेगळे ठेवण्यात आले होते. पोलिस मारत तर होतेच पण सोबतच शिव्याही देत होते. शारीरिक आणि मानसिक यातना सर्व आंदोलनकर्त्यांना देण्यात येत होत्या.
        माझ्या समोरची धक्कादायक गोष्ट म्हणजे माझेच दोन मित्र एकाचं नाव हर्षद तर दुसऱ्याचं नाव अशरद... दोघेही या पूर्ण प्रकारापासून अनभिज्ञ होते. कोणता कायदा? कसला विरोध? इत्यादींबाबत त्यांना कल्पनाही नव्हती. तरीहि दोघांना मारण्यात आले. "विशेष करून अशरद" ला पोलिसांनी इतके मारले की तो बेशुद्ध होऊन अर्धमेला झाला. तिकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मुलींनाही महिला पोलिसांतर्फे प्रचंड मारहाण करण्यात आली.
     हे सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर घडत होते. माझे प्रिय मित्र,मैत्रिणी यांना जबर मार बसला पण सैन्य शक्तीपुढे, शस्त्रांपुढे, आम्ही सामान्य विद्यार्थी म्हणजे  गिधडापुढे चिमणी वाटत होतो. त्यांच्याकडे मजबूत बांधा, आधुनिक शस्त्रे आणि आमच्याकडे पुस्तके आणि मेंदू असा तो सामना होता. त्यांच्यापुढे आमचा निभाव लागणं अशक्यच....
      असं असूनही डोक्यात अनेक विचार घर करत होते. शेकडो प्रश्नांनी मेंदू गजबजून डोक्याचा नसा फडफड उडत होत्या. जणू काही डोके फुटेल की काय असं वाटतं होतं.
आपल्यासोबत असं का झालं? आपली चूक काय?  आपण असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे की आपल्याला आहे मारहाण करण्यात आली? सरकार विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह आहे का? आंदोलन करणाऱ्याला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात येते? रक्षणकर्ते जर भक्षक बनले तर मदत कुणाकडे मागायची? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे की, त्यांना लाठीचार्ज आदेश देणाऱ्या नेत्यांकडे?
कुठे आहे कायदा? कुठे आहे सरकार? कुठे आहे माणुसकी? कुठे आहे देशभक्ती?
      काही क्षणासाठी वाटलं की आपण नक्की भारतातच राहतोय ना की पाकिस्तान, अफगानिस्तान, सीरिया, पॅलेस्टाईन की हिटलरच्या जर्मनीत....???
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
जय हिंद!!!
      शाळेत अगदी बालवाडीपासून म्हणत आलेलो प्रतिज्ञा आजही संपूर्ण तोंडपाठ आहे. या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या विरोधात मी कधीही गेलो नाही याची मला १००% खात्री आहे.
पण, तरीही आज माझ्यासोबत जे घडले त्याने मी फार दुःखी आणि हताश होऊन खचून गेलो आहे. आता या देशाची, या सरकारची, पोलिस प्रशासनाची, आणि अगदी लोकांची सुध्दा भीती वाटायला लागली आहे. देशभक्ति च्या नावावर देशाला आणि देशातील प्रत्येकाला तोडण्याचे काम सुरू आहे. खरंच मी हताश झालो आहे.
      हताश आणि हतबल होऊन निर्णय घेतला की हा देशच सोडावा. अशा एका ठिकाणी जावं की जिथे जात, धर्म आणि देशभक्ती च्या नावाखाली लोकं एकमेकांचा जीव घेणार नाही. सरकार आणि प्रशासन हे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे संरक्षण करेल.          पण... काहीही झालं तरी मी ह्याच मातीतला. हा देश माझा. लोकं माझी. मी या देशाचा एक नागरिक. हृदय आणि मन देश सोडायला तयार नव्हतं. शेवटी माझ्या मेंदूने माझ्याच मनाचा आणि हृदयाचा खून केला आणि म्हणाला यापुढे सुखात जगायचं असेल तर इथून निघ.... मग शेवटी ठरलं... देश सोडायचा. अगदी कठोर अन् कडवट निर्णय.
      देश सोडायची तयारी करू लागलो. म्हटलं जाता - जाता शेवटचं आपल्या मित्रांना, प्रियजनांना भेटून जावं. पण काय करणार? सुरक्षेच्या नावाखाली सरकारने दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवेवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. त्यातल्या त्यात परिसरात कलम १४४ लागू केले होते. कसेबसे लपून छपून ३-४ मित्रांना भेटलो. सगळे अखेरचे गळ्यात भेटलो खूप रडलो. मग स्वतःला सावरत मी आणि माझा परिवार गुपचूप बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला. बाहेर पडणार इतक्यात दरवाजावर दस्तक्त झाली. आईने दरवाजा उघडला तसे ५-६ सशस्त्र सैनिक घरात घुसले. त्यातला एकजण माझ्याकडे आला. त्याच्या हातात माझा फोटो आणि इतर बरीच माहिती होती. तो म्हणाला तू देशद्रोही आहेस. सरकारला विरोध करून तू मोठा गुन्हा केला आहे. याची शिक्षा तुला मिळणारच असं म्हटलं संपूर्ण परिवारासमोर त्याने माझ्यावर तीन - चार गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात माझ्या मृत फोटोसह बातमी आली की, - "देशाच्या सुरक्षिततेला घातक असणाऱ्या देशद्रोह्याचा पोलिसांनी केला एन्काऊंटर..."
      इकडे माझ्या अंत्यविधीसाठी मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची अट सरकारने घातली. तेही पोलिस बंदोबस्तात. जास्त रडायचे नाही, हंगामा करायचा नाही अशी ताकीद एक दिवस अगोदरच सर्वांना देऊन ठेवली होती.
    माझ्या मृत शरीरावर डोके ठेऊन आई रडत होती. ऊठ रे सोन्या म्हणून माझ्या छातीवर डोके ठेवून हाका मारत होती....
   आणि अशातच मी उठलो!!! होय मी उठलो. डोळे उघडले. माझी झोप मोड झाली होती आणि हे वाईट स्वप्नही शेवटी एकदाचे संपलेच!...

मी शरीराने आणि मेंदूने आजही जिवंत आहे याची सर्वप्रथम खात्री झाली.

मी बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या भारतात राहतो याचीही जाणीव झाली.

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय याचा गर्व झाला.

मी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणाऱ्या देशात राहतोय याचा अभिमान झाला.

मी महाराष्ट्राच्या "सदरक्षणाय खलनिग्रहणाय " हे ब्रीदवाक्य असलेल्या मजबूत खाकीच्या सुरक्षेत राहतो हा विश्वास झाला.

बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी आज जिवंत आणि स्वतंत्र आहे याची पुन्हा एकदा प्रखर जाणीव झाली. बाबासाहेबांच्या फोटोपाशी गेलो. अतिशय आदरपूर्वक विनम्रतेने महामानवाला अभिवादन केले आणि कॉलेजला निघालो....
.
.
.
#अक्षय्यनामा✍️


Saturday, 9 November 2019

गावाकडची रात्र

गावाकडची रात्र

हाताने विणलेली लाकडी चारपाई 
त्यावर पांघरलेली कापसाची मऊ गादी
हातानेच बनवलेली गोधडी अन् उशी
सर्व अंथरूण असे जणू काही बाळाची झोळी....


या झोळीत टाकूनी अंग मीही होतो चिमुकले बाळ
राहत असलो शहरात तरी कशी तुटेल गावाकडची नाळ
झोळीत झोपलेल्या मज मोठ्या बाळाला नाद या गावाचा
आभाळाची चादर, चंद्राचा मंद प्रकाश, रातराणीचा सुगंध
झाडांतून जन्मलेली शुद्ध थंड वाहणारी हवा एसीलाही लाजवते
मला मात्र लहान बाळाप्रमाणे अगदी साखर-झोपेत निजवते....


गावाकडची ही शांत रात्र गोंधळलेले मनही शांत करते
शहरात राहिलेली अपूर्ण झोप गावात येवून पूर्ण होते
घराच्या अंगणातल्या चारपाईवर टाकून अंग मी बघतो त्या चंद्राला
त्याच्या त्या मंद प्रकाशने झोप येते जणू चिमुकल्या बाळाला
रातराणीच्या फुलांचा सुगंध एक वेगळीच भूल देतो
थंड झालेल्या वातावरणात जणू काही अत्तर शिंपडतो....


शांत अन् थंड वातावरणात रातकिडा किर्र - किर्र करतो
नंदीच्या गळ्यातील घंटा ही अधून - मधून सौम्य असे संगीत देते
शहराच्या तुलनेत गावाकडची रात्र निरोगी अन् सुखकर असते
पण ही गावातली रात्र प्रत्येकाच्याच नशिबी नसते...


अशी ही गावाकडची रात्र खूप वर्षांनी मिळाली
आज मन भरून आभाळात पहायचं आहे त्या चंद्राला लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांशी गप्पा मारायच्या आहे
या सुंदर गावातील सुंदर रात्रीत गाढ झोप घ्यायची आहे....


शहरातल्या प्रत्येकाने एकदा गावाकडची रात्र अनुभवावी
गावाकडे येऊन अंगणात चारपाई टाकून एक झोप घ्यावी
चंद्र,चांदणी,रातराणी यांचा एकत्रित आस्वाद घेऊन काही क्षण विश्रांती घ्यावी....!



click for social media contacts:





https://m.facebook.com/story.php?story_fbid=2580932481994315&id=100002327668023

#अक्षय्यनामा #गावाकडच्या_गोष्टी #मनातल्या_गोष्टी #परसामळ #शिंदखेडा #धुळे #शिघ्रकविता #साखरझोप #goodnight

Monday, 19 August 2019

माझा स्वाभिमान... भारतीय संविधान!!!

हा एकच ग्रंथ आहे जो भारताला एकसंघ आणि मजबूत ठेवू शकेल. 



संविधान नाही तर भारतवर्ष नाही
संविधान नाही तर लोकशाही नाही
संविधान नाही तर न्याय नाही
संविधान नाही तर समता नाही
संविधान नाही तर समभाव नाही
संविधान नाही तर देशप्रेम नाही
संविधान नाही तर स्वराज्य नाही
संविधान नाही तर मूलभूत हक्‍क नाही
संविधान नाही तर प्रगती नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय सुरक्षा नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय एकता नाही
संविधान नाही तर शिक्षण नाही
संविधान नाही तर सामाजिक, आर्थिक राजकीय प्रगती नाही
संविधान नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही
संविधान नाही तर देशांतर्गत शांतता नाही
संविधान नाही तर सामान्य जनतेला अधिकार नाही
संविधान नाही तर लोकशाही,लोकराज्य,समता, स्वातंत्र्य, न्याय,एकात्मता,बंधुता, माणुसकी आणि देशही...असं काहीच राहणार नाही.

म्हणून संविधानाला धोका असणाऱ्या शक्तींना वेळीच आवरा. संविधान वाचवा आणि सुरक्षित व सुशिक्षित हाती द्या.

#माझा_स्वाभिमान_भारतीय_संविधान
#लोकशाहीचा_विजय_असो
#जय_संविधान



Sunday, 11 August 2019

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!


पावसाळा आला, पाऊस सुरू झाला
मेघ गरजले, वीजा कडाडल्या
आधी मुंबईची तुंबई झाली
लाईफ लाईन सगळी पाण्याखाली गेली
मुंबईचा प्रथम नागरिक म्हणाला पूर आलाच नाही
कारण त्याचा मुलगा गटारात पडून हरवला नाही...

लोक ढिगाऱ्याखाली दबून मेले, कुणी मॅनहोल मध्ये गडप झाले
भर पावसातही अश्रू अनावर झाले, सरकार मात्र झोपेतच राहिले
कोल्हापूरची महालक्ष्मी मी 14 तास पुरात अडकली
प्रशासनाला  मात्र उशिराने जाग आली
स्थानिकांनी माणुसकी दाखवली म्हणून एक्सप्रेस पुरातून सुटली...

दरवर्षी मुंबापुरीची तुंबापुरी होते, पण जनता याला फक्त नैसर्गिक आपत्तीच समजते
मग मुंबईकरांचा तथाकथित मुंबई स्पिरीट जागा होतो, 
अन् सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाकडे तो सहज कानाडोळा करतो 
मुंबईकरांच्या ह्याच भोळेपणाचा फायदा सत्ताधारी घेतो
म्हणूनच काहीही झालं तरी पुन्हा तोच निवडून येतो...

मुंबईकरांना असले अंध स्पिरीट महाग पडणार आहे,
नेत्यांना काही फरक नाही, ते त्यांच्या महालात सुरक्षित राहणार आहे
दररोज मरणयातना सहन करत मुंबईकर पुन्हा उभा राहणार आहे
आमची मुंबई - आमची मुंबई करत तो स्वतः मात्र मुंबईतूनच हद्दपार होणार आहे
कारण तो त्याच लोकांना निवडून देणार आहे,
जे अनेक वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना गृहितच धरणार आहे...

असो... यंदाही मुंबईने कसाबसा पावसाळा सहन केला
पण अर्धा महाराष्ट्र मात्र महापुराने वेढला गेला.
कोकण, रायगड,सातारा, सांगली, कोल्हापूर.. सगळीकडे पूरच पूर...

अनेक जीव जात होते, संसार उध्वस्त होत होते 
आपले मुख्यमंत्री महोदय मात्र महाजनादेश यात्रा करत होते
जलसंपदा मंत्री पूर पर्यटन करत होते, सेल्फी काढत होते
महापुराचा आढावा सोडा ते तर नौकाविहार करत होते...

पूर परिस्थिती हाताबाहेर गेली, मग राज्याच्या राजाला जाग आली
राजाने हवेतूनच पूर बघितला, त्याच्या पायाला पाण्याचा साधा स्पर्शही नाही झाला
देशातल्या प्रत्येक राज्याच्या मदतीला माझा महाराष्ट्र धावून गेला,
पण आज शेजारचा कर्नाटकही आपल्या मदतीसाठी उदासिन झाला
महाराष्ट्र जणू पोरकाच झाला 
केंद्र आणि राज्य दोघांसाठी परका झाला....

राज्यात आलेला महापूर सत्ताधार्यांसाठी प्रचाराचा नवा मार्ग ठरला
मोफत गहू - तांदूळ देऊन त्यावर पक्षाचा शिक्का मात्र मारला.
पुरात मरण पावलेल्या आई - बाळाच्या मृतदेहासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देणारे असंवेदनशील नेतेही दिसले,
पूरग्रस्तांच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसणारे खलनायकही दिसले....

अंध-अपंग,बहिऱ्या सरकारला माध्यमांनी अखेर जागे केले.
कर्तव्य बजावताना सांगलीच्या कुलदीप मानेला अश्रू मात्र अनावर झाले
अर्धा महाराष्ट्र बुडत होता, रडत होता, मरत होता आणि पंतप्रधान मात्र 370 च्या नावाखाली देशाला संबोधन करत होता.
सगळीकडे अंधार, निराशा आणि उध्वस्त झालेला संसार...
असा माझा महाराष्ट्र संघर्ष करत होता... 
जाती-पाती भांडण-तंटे सर्व काही सोडून एकत्र येण्याचे आवाहन करत होता...

अशात एक "माणूस" नावाचा नायक मदतीला धावून आला
माणसाचं शरीर असलेल्या त्या नायकातून जणू देवच बाहेर आला.
माणुसकीचं शस्त्र काढून त्या नायकाने केला संकटांवर प्रहार
पूरग्रस्तांना झाला जणू देवाचाच साक्षात्कार...

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, गिरिजाघर सगळेच देव बुडले होते
पण वर्दीतले देव मात्र सर्वांनाच वाचवत होते.
माणुसकी या एकाच धर्माचे ते सर्व देव होते
कारण ते भारतीय जवान होते.
माणूस असो वा प्राणी सर्वांनाच ते वाचवत होते, 
स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटाशी ते लढत होते....

जवानाच्या पाया पडणारी बोटीवरची ती स्त्री असो,
जवानांचे औक्षण करणारी माता असो,
व्हीलचेअरवरची अपंग आजी असो, 
हृदयरुग्ण असलेले आजोबा असो,
बोटीवरचे ते हसणारे बाळ असो,
आठ महिन्यांची गरोदर महिला असो,
माकड असो, कुत्रा असो, गाय, म्हैस किंवा मांजर असो
या सर्वांनाच जीवनदान देणारे लोक माणुसकीचे खरे दूत होते
कारण, ते भारतीय जवान होते....

या महापुरात एक गोष्ट मात्र चांगली झाली,
जात-पात ही जणू पुरात वाहूनच गेली.
माणुसकीचा पुन्हा नवजन्म झाला,
माझा महाराष्ट्र खूप दिवसांनी पुन्हा पुरोगामी दिसला.
हिंदू मशिदीत जेवला, मुस्लिम मंदिरात जेवला, 
सर्व धर्मियांनी विहारात आसरा घेतला, श्रीमंत - गरीब एकाच जागी राहिला....

अनेक संकटे आली महाराष्ट्रावर... या महाराष्ट्राची मान कधी झुकू देणार नाही...
माणसं आहोत आम्ही, माणुसकी कधी मरू देणार नाही...
असेल वेगळी आमची जात, धर्म, पंथ, नेते व  विचारसरणी,
पण आज कळलं संकटाच्या वेळी कामी फक्त येते माणुसकी....

या महापुरातून महाराष्ट्र सावरेल याची मला खात्री आहे.
पण येथे जन्मलेल्या माणुसकीच्या संगोपनाची जबाबदारीही आपलीच आहे!!!

शपथ घेतो शिवरायाची,
शपथ घेतो महाराष्ट्राची,
शपथ घेतो फुले, शाहू, आंबेडकरांची...
शपथ घेतो महाराष्ट्र धर्माची,
शपथ घेतो भारतीयत्वाची,
आणि शपथ घेतो माणुसकीची...
माणूस आहे माणसासारखाच वागणार.
मानवधर्म जपणार, मानवधर्म वाढवणार....

असेल मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, ख्रिश्चन, मराठा, बौद्ध, 
महार, मातंग, साळी, माळी, कोळी, आगरी, न्हावी, शिंपी, आदिवासी किंवा अजून काही....
पण मी प्रथम भारतीय आहे... आणि एक मानव आहे...
कारण मी पाहिलं आहे त्या  वर्दीतल्या देवांना...
जे कोणत्या जातीचे -  होते ते मलाही माहीत नाही.
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे रक्ताची नाती नसतानाही मदत करत होते
मी पाहिलं आहे त्या तरुणांना, जे आपल्या पूर्ण शक्तीने समाजकार्य करत होते 
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे देवापेक्षा मोठं काम करत होते.
माणुसकी ही ईश्वरसेवा, माणुसकी हा धर्म, माणुसकी हे परम कर्त्यव्य
माणुसकी ही राष्ट्रभक्ती, माणुसकी ही सेवा...

माणूस आहे माणसाप्रमाणेच वागणार,
स्वतःच्या बुद्धीचा आणि आत्म्याचा आवाज आता मीही ऐकणार...
माणुसकीसाठी, महाराष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी ,स्वतःसाठी मला माझा योग्य राजा निवडायचा आहे!!!

आता नको मला दुष्काळ,
नको महापूर, 
नको बेरोजगारी,
नको जातीयवाद,
नको मुस्कटदाबी,
नको हिटलरशाही...

मला हवी लोकशाही...
मला हवं स्वराज्य,
मला हवी स्वच्छ हवा,पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,नोकरी
मला हवं संवेदनशील प्रशासन... आणि जाणता राजा!!!
 
यासाठी लढण्याची तयारी हवी,
एकाला दुसऱ्याची अन् दुसऱ्याला तिसऱ्याची साथ हवी.
यशस्वी होईल लोकशाही, नांदेल पुन्हा माणुसकी,
जेव्हा - जेव्हा आयुष्यात येईल प्रवास महापुरातला...
मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!



click for social media contacts:








Wednesday, 7 August 2019

आपला मेंदू सांभाळा,जातीयवादी सक्रीय झाले आहेत....

दिनांक २१ जुलै  २०१९ रोजी मी माझ्या फेसबुक वाॅलवर लिहिलेली अभ्यासपूर्ण पोस्ट जागल्या या वेब पोर्टल ने स्वतःच्या फेसबुक वाॅलवर माझ्या परवानगीने शेयर केली. तीच पोस्ट आपल्या हक्काच्या ब्लॉगवर पुन्हा प्रकाशित करत आहे. आपण माझी पोस्ट www.jaaglya.com च्या अधिकृत फेसबुक पेजवरही पाहू शकतात. त्यासाठी इथे क्लिक करा.

#सावधान!!!
#ताबडतोब_हा_ग्रुप_सोडा.

आपला मेंदू सांभाळा,जातीयवादी सक्रीय झाले आहेत....

     आज सकाळी नेहमीप्रमाणे फेसबुक चाचपडत होतो. एका वर्ग मैत्रिणीने मला टॅग करत एक पोस्ट शेयर केली होती. त्यात एका फेसबुक ग्रुप मध्ये एका अकाऊंट वरून आक्षेपार्ह आणि भडकाऊ पोस्ट करण्यात आली होती. अर्थातच माझ्यासाठी ही काही नवीन बाब नव्हती. वेळेअभावी तेव्हा ती पोस्ट मला व्यवस्थित पाहता आली नाही. ती पोस्ट आत्ता बघितली आणि यावर लिहिणं गरजेचं वाटलं म्हणून लिहितोय.
तर आता त्या पोस्ट बद्दल सांगतो... 
   त्या पोस्ट मध्ये पूजा शिंदे नावाच्या एका फेसबुक अकाऊंट वरून एक चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे कि, - " मी सर्व हिंदूंना भीमट्याच्या ग्रुपमध्ये ऍड करत आहे... त्यांनी १०० हिंदूंना ऍड करावे ही विनंती.... चला आपणही दाखवत आपली पावर, hindu warriors" अशा प्रकारची हि पोस्ट होती. मित्रांनो ह्या अकाऊंट वरून अशा बऱ्याच पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील काहींचे स्क्रीन शॉट्स माझ्याकडे आहेत. अर्थात ते इतरांना सावध करण्यासाठी आणि पुरावा म्हणून काढून ठेवले आहेत. पूजा शिंदे हे फेसबुक अकाऊंट अभ्यासून समजले कि, हे एक १००% फेक अकाऊंट असून केवळ हिंदू, मुस्लिम,बौद्ध बांधवांमध्ये भांडणे लावण्यासाठी याचा उपयोग चलाखीने केला जात आहे. अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर आता हे अकाउंट अचानक गायब झाले आहे. त्यामुळे जातीय द्वेष पसरविणे हाच त्या समाजकंटकांच्या उद्देश होता हे समजण्यासाठी कुण्या विद्वानाची गरज नाही. त्यामुळे आता तथाकथित पूजा शिंदे च्या नावाने टीका टिपण्णी अथवा शिवीगाळ करून उगाच आपला वेळ वाया घालवू नका कारण मुळात अशी कोणतीही व्यक्ती नसून ते एक फेक फेसबुक प्रोफाईल आहे.
ह्या ग्रुप बद्दल माहिती आणि विश्लेषण ....
     SAPNA CHOUDHARY UNOFFICIAL या नावाने फेसबुकवर एक ग्रुप आहे ज्यात आत्तापर्यंत (म्हणजे दि. २० जुलै २०१९, सायंकाळी ०५:३० पर्यंत) एकूण ११,७३,१४३(अकरा लक्ष, त्र्याहत्तर हजार, एकशे त्रेचाळीस) सदस्य आहेत. (विवादास्पद पोस्ट नंतर आता ह्या ग्रुपमधून सदस्य बाहेर पडत आहेत.) ३ ऑगस्ट २०१३ रोजी हा ग्रुप एका वेगळ्या नावाने तयार करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये माझ्या फ्रेंडलिस्ट मधील सुमारे २७५ लोक आहेत. आत्तापर्यंत अनेकदा या ग्रुपचे नाव गरजेनुसार आणि ट्रेंड नुसार बदलण्यात आले असण्याची शक्यता आहे. या ग्रुपचे एकूण सहा ऍडमिन आणि एक moderator (नियंत्रक) आहे. सपना चौधरी ही आपल्या खास हरियाणवी नृत्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे तिचा चाहता वर्गही मोठा आहे. याचाच फायदा घेऊन अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने सोशल मीडियावर बरेच फेक अकाउंट्स मोठ्या प्रमाणात तयार केले जातात आणि त्याचा विविध प्रकारे स्वतःसाठी फायदा करून घेतला जातो. इथेही हाच प्रकार आहे. त्यामुळे अशा फेक अकाउंट्स आणि पेजवरून प्रसिद्ध केलेल्या मजकुराला किती आणि का महत्व द्यायचे? हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. कारण सोशल मीडिया सहज, सोपे आणि स्वस्त प्रसारमाध्यम असल्यामुळे समाजकंटकांकडून याचा सर्रासपणे वापर केला जातो. आता ह्याच ग्रुपमध्ये पहा जेवढे ऍडमिन आहेत त्यातील एकानेही आपली खरी आणि स्पष्ट ओळख न सांगता खोटे फोटोज् प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहेत. सपना चौधरीच्या नावाने लाखो लोक या ग्रुपमध्ये सामील झाले. त्यात सर्व धर्म - जातीचे लोक आहेत, त्यामुळे काही समाजकंटकांनी याचाच फायदा घेत ग्रुप जॉईन केला आणि आक्षेपार्ह पोस्ट करत द्वेष पसरवत आहे.

त्या ग्रुपमधील काही स्क्रीनशॉट्स आपण पाहू शकता... कि जातीयवादी लोक समाजात कशाप्रकारे द्वेष पसरवत आहेत.


                                                       



१) ऍडमिन चे नाव : Sapna sharma (हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/qayoom.qayoom.1088
२) ऍडमिन चे नाव : Umair Ali (पाकिस्तान,हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता: https://www.facebook.com/IAMUMAIROFFICIAL
३) ऍडमिन चे नाव : Divyanka Singh (हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/divyanakasingh32
४) ऍडमिन चे नाव : GROUP ISHAQ (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/GROUP-ISHAQ-1819605068062417/
५) ऍडमिन चे नाव : Funny videos (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/Funny-videos-2048461625455243/
६) ऍडमिन चे नाव : Jai Mata Di (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/jaimatadiofficialpage/
७) ऍडमिन चे नाव : मोहब्बत ही मोहब्बत (हा फेसबुकग्रुप आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/mohabbatheemohabbat/
८) नाव : Vishwa Ratna (हा फेसबुक पेजचा सर्वेसर्वा असण्याची शक्यता आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/VishwaRatna
ह्या ग्रुपचा पूर्णपणे अभ्यास केला असता लक्षात आले कि हा ग्रुप समाजात जातीय द्वेष आणि दंगली पसरवणाऱ्या समाजकंटकांकडून चालविण्यात येत असून समाजात अशांतता आणि अराजकता पसरविणाऱ्या अज्ञात शक्तींचे हे एक षडयंत्र आहे. समाजात जातीय द्वेष आणि दंगली पसरविण्यासाठी खोटा मजकूर, फेक पोस्ट, फोटोशॉप, व्हिडिओ एडिटर यांचा वापर करून हे समाजकंटक आपलं उद्धिष्ट साधत आहे. मोठ - मोठ्या समाजसुधारकांवर आणि नेत्यांवर अगदी खालच्या पातळीतून हे लोक आपली ओळख लपवून अथवा खोटी ओळख सांगून टीका - टिपण्णी आणि चिखलफेक करत आहे.

आपण काय करावे?
१) सर्वप्रथम आपण आपल्या विवेकबुद्धीचा वापर करत पोस्ट खरी कि खोटी हे समजून घ्यावे. पोस्टची सत्यता तपासण्याचे अनेक मार्ग आहेत त्यासाठी सोशल मीडियाचा वापर योग्यरित्या करता येणे आवश्यक आहे. 
२) एखादी पोस्ट आक्षेपार्ह, जातीय आणि सामाजिक द्वेष पसरवणारी अथवा खोटी आहे असे लक्षात आल्यास त्या पोस्टला त्वरित रिपोर्ट करून ब्लॉक करावे आणि शक्य झाल्यास सायबर क्राईम शाखेत किंवा पोलिसात तक्रार द्यावी.
३) चुकीच्या आणि हिंसक अथवा जातीयवादी पोस्ट शेयर करू नये, आपण अशा पोस्ट शेयर करून नकळत समाजकंटकांना मदत करतो.
४) सोशल मीडिया हे सहज उपलब्ध होणारे स्वस्त पण प्रभावी माध्यम आहे त्यामुळे त्याचा वापर जपूनच करावा. आपण काय आणि का पोस्ट करतोय याची समज आपल्याला असावी. भावनेच्या अथवा रागाच्या भरात केलेली चिथावणीखोर पोस्ट समाजाला व आपल्यालाही नुकसानदायक ठरू शकते.
५)आपल्याला हिंसक, जातीयवादी, दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट आढळल्यास त्याचे स्क्रीनशॉट्स काढून आणि URL कॉपी करून ठेवावा जेणेकरून तक्रार देताना पुरावा म्हणून त्याचा उपयोग होईल.
६) अनेकदा आपल्या परिचयातील व्यक्तीसुद्धा नको त्या हिंसक किंवा जातीयवादी पोस्ट शेयर करत असतात, त्यांना याचे गांभीर्य सांगावे. असे अज्ञानी किंवा भावनिक लोक समाजकंटकांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात.
७) सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती असणं आवश्य आहे नाहीतर चुकून अथवा आपली फसवणूक करून आपल्याच सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे युजरनेम आणि पासवर्ड सुरक्षित असावा.
८) आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन किंवा संगणकाची काळजी घ्यावी. यात अँटीव्हायरस चांगल्या कंपनीचा असावा. तसेच वापरून झाल्यानंतर लॉग आउट करण्यास विसरु नये.
९) सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्यावी. आपण असे अनेक उदाहरणे पहिली आहेत कि ज्यात चुकीच्या अथवा भडकाऊ पोस्टमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सध्या मॉब लिंचिंग ही भारतातील मोठी समस्या बनली आहे. त्याला बऱ्यापैकी सोशल मीडिया देखील जबाबदार आहे.
१०) सर्वात महत्वाचं आहे कि अशा पोस्टवर रिऍक्ट न होणं!!! कारण आपण अशा पोस्टवर व्यक्त होऊन काहीही साध्य होत नाही. त्या पोस्ट शेयर करून आणि त्यावर कमेंट्स करून उलट त्यांनाच आपण नकळत प्रसिद्धी देत मदत करतो. त्यामुळे अशा बिनकामाच्या आणि भडकाऊ पोस्टवर व्यक्त होण्यात, वाद - विवाद करण्यात आपला वेळ वाया घालू नका त्यापेक्षा चांगल्या आणि अभ्यासू व्यक्तींच्या पोस्ट वाचत चला त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.

थोडंस मनातलं :
     प्रिय मित्र - मैत्रिणींनो आपण सगळे अनेक जाती -धर्माचे असलो तरी आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहोत हे विसरू नये. उगाच कोणतरी आपल्याला भडकवणार आणि आपण इकडे एकमेकांची डोकी फोडणार. याला कायअर्थ आहे? आपण आपला मेंदू गहाण ठेवलाय का? जे काहीही विचार न करता आपण एकमेकांच्या जीवावर उठतो. कधी कुण्या नेत्याच्या भाषणामुळे तर कधी अफवेमुळे, कधी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे तर कधी कट्टर धार्मिक विचारसरणीमुळे... अशा अनेक कारणांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन हत्या, दंगली होतात. ज्यात मारणारेही आपणच असतो आणि मरणारेही आपणच. फक्त त्याला एका धर्म किंवा जातीचं नाव देऊन समाजकंटक आपल्याला वेगळं करून आपल्यात भांडणं लावून गंमत बघत बसतात. मग आपण इकडे हिंदू विरुद्ध मुस्लीम, मराठा विरुद्ध बौद्ध, अमुक विरुद्ध तमुक या लफड्यात पडून आपलं नुकसान करून घेतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांनी आपलं आयुष्य वंचितांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी अर्पण केलं. राजश्री शाहू महाराजांनी वंचितांना आरक्षण देऊन त्यांची प्रगती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिल. या सर्व महामानवांनी आपली जात आणि धर्म यापेक्षा आपली माती आणि आपली माणसं यांनाच जास्त महत्व दिलं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आधारित संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. बाबासाहेब महात्मा फुलेंना आपले आदर्श मानायचे. बाबासाहेब आणि शाहू महाराजांची मैत्री तर जगाला माहित होती. या महामानवांनी कधीही एकमेकांची जात पहिली नाही, पाहिलं ते फक्त एक स्वप्नं... स्वत्रंत भारताचं.. समानतेच्या भारताचं... बंधुता आणि एकात्मतेच्या भारताचं.... पण आपण काय करतोय? आपल्या कृतीवरून आपण या महापुरुषांचे वारसदार शोभतो का? हा प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारायला हवा.
विषय भरकटतोय ... पण काय करणार? सध्याची परिस्थिती पाहून असं वाटतं कि आपणच आपल्या महामानवांच्या विचारांची विटंबना करत आहोत. त्यासाठी मी माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली. व्यक्त होणं गरजेचं आहे.
असो.... माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि या समाजकंटकांच्या जाळ्यात अडकून आपापसात भांडू नका. आपल्या मेंदूचा वापर इतरांना करून देऊ नका. प्रत्येक पोस्ट ही खरी आहे की खोटी हे अगोदर तपासा. महामानवांचे विचार त्यांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या कलेसाठी, आपल्या सत्कर्मासाठी, आपल्या लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी, आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी, शिक्षणासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग करा हीच नम्र विनंती.
- तुमचा मित्र,अक्षय.

Monday, 29 April 2019

मतदान कुणाला आणि का करावे? यावर मी दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजी फेसबुकवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. तोच आज मतदान दिनाच्या निमित्ताने पुनःप्रकाशित करतोय. आपल्या हक्काच्या ब्लॉगवर... आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी २९-०४-२०१९ ला मतदान होत आहे. मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य नक्की पार पाडा.

VBA, CONGRESS आणि  BJP या तिन्ही पक्षांचे  २९१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे  जाहीरनामे 

*मैं ना भूलूंगा...मैं ना भूलूंगी...इन रस्मों को इन कसमों को इन रिश्ते नातों को!!!मैं ना भूलूंगा...मैं ना भूलूंगी...*
मित्रांनो...लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत खरंच अप्रतिम आहे. शब्दांना स्वरांसोबतच भावनेचीही जोड आहे. त्यामुळे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक गीत. या गाण्याचे मी नेहमीच रसग्रहण करत आलोय. त्यामुळे या गाण्याला मी फक्त प्रेम भावनेनेच ऐकत आलो आहे. पण आज हे गाणं मोबाईलवर ऐकत असतानाच टी.व्ही. वर मा. पंतप्रधानांचे भाषण दिसले आणि ह्या गाण्याकडे बघण्याच्या माझा दृष्टिकोनच बदलून गेला. एरव्ही या गाण्यात मंत्रमुग्ध होणारा मी... आज मात्र हे गाणं ऐकून मनात वेगळेच विचार यायला लागले. मग या गाण्याच्या शब्दांचा जरा बारकाईने विचार केला. तर त्याचा मराठीत(थोडक्यात)असा अर्थ होतो की - *मी नाही विसरणार... तुला आणि तुला दिलेल्या वचनांना, तुला दिलेल्या आश्वासनांना आणि शपथींना... मी नाही विसरणार आपल्या या नात्याला...* हे सर्व काही त्या गाण्यातील नायक आपल्या प्रेयसीला उद्देशून बोलतोय. तर मित्रांनो थोड्या वेळासाठी आपण त्या नायकाच्या जागी आपल्या नेत्यांना आणि प्रेयसीच्या जागी स्वतःला (म्हणजे मतदारांना) ठेवून बघा...(नेता आणि मतदार यांच्यातील नात्याची कल्पना करा) गाण्याचा पार अर्थच बदलतो... आणि ते गाणं नकोसे वाटू लागते. थोडं हास्यास्पद वाटेल! पण जरा नीट विचार करा. निवडणुकीच्या काळात हे नेते आपल्याकडे मतं मागायला येतात आणि म्हणतात *मैं ना भूलूंगा... इन कसमों को... इन रस्मों को... इन रिश्ते नातों को...* तुम्ही मतदार आमचे मायबाप, दादा, भाऊ, ताई,माई, आक्का वैगेरे... अशी अनेक नाती आपल्याशी जोडतात आणि निवडूण आल्यानंतर मात्र ते आपल्याला चक्क विसरून जातात.
त्यांनी आपल्याला केलेले वायदे, दिलेली आश्वासने, वचने इत्यादी सर्व काही के लोक चक्क विसरून जातात अथवा ते पूर्ण करत नाही.
#उदाहरणार्थ:- २०१४ चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात प्रत्येकी १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. (काँग्रेसने यावर्षी गरिबांना ७२००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे)नंतर निवडणूक झाली. केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने निवडून आले. परंतू मोदींचे ते १५ लाख कुणाच्याच खात्यात आले नाही. यावर नंतर अनेक उडवाउडवची उत्तरे देण्यात आली. अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी "वह एक चुनावी जुमला था" असे वक्त्यव करून या १५ लाखांची कटकट संपवून टाकली. मित्रांनो या प्रकारामुळे पूर्ण देशाच्या जनतेची जाहीर फसवेगिरी आणि क्रूर थट्टा केली गेेली असे म्हणने वावगे ठरणार नाही. कारण १५ लाख रुपये जर सामान्यांच्या खात्यात जमा होत असेल तर गरिबांचे जवळपास ९०% समस्या सुटतील यात काही शंका नाही. या आणि अशाच प्रकारच्या अनेक आश्वासनांनी प्रभावित होऊन भोळ्या - भाबड्या जनतेने भाजपला बहुमताने निवडून दिले. परंतू आज पाच वर्षे होऊनही अनेक आश्वासने पूर्ण करणे तर सोडाच हे नेते चक्क ते विसरून गेले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशाची आणि देशवासीयांची काय अवस्था झाली आहे हे मी सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाला त्याचा अनुभव आहेच.
तर त्या घटनेला आता पाच वर्षे झाली आहेत. आणि आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुक -२०१९ च्या निमित्ताने तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ते लोक (विविध पक्षांचे नेते) तुमच्या घरी येणार, तुम्हाला नको तेवढा आदर देणार, तुम्हाला विविध आश्वासने देणार, काहीजण तर नोट के बदले वोट मागणार हे सर्वकाही प्रत्येक निवडणुकीला होतंच राहणार. पण मित्रांनो आपण जर प्रत्येकवेळी निष्काळजीपणाने अयोग्य आणि खोटारड्या उमेदवाराला पुन्हा निवडून दिले तर मग झाले आपलेच कल्याण... म्हणून या निवडणुकीत योग्य आणि आपल्या शब्दावर ठाम राहणाऱ्या सुशिक्षित उमेदवारालाच आपले बहुमूल्य मत द्या. तुमचे मत तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला द्या, भाजपच्या उमेदवाराला द्या, बसपा असो, एम.आय.एम असो किंवा आत्ताच उदयास आलेली वंचित बहुजन आघाडी असो... मत कोणत्याही पक्षाला द्या... त्याबद्दल वाद नाही. पण... पण... मत देताना त्या उमेदवाराची कारकीर्द, पार्श्वभूमी, त्याने केलेली कामे, त्याचे शिक्षण, समाजकारण आणि राजकारण यांची असलेली समज, तो गुन्हेगारी अथवा भ्रष्टाचारी तर नाही ना? त्याची विचारसरणी... अशा अनेक गोष्टी स्वतः तपासून पाहा आणि जर तुमच्या बुध्दीला तो उमेदवार खरंच पटत असेल तर नक्की पूर्ण आत्मविश्वासाने त्याला मतदान करा. मग तो भाजप, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी अथवा अपक्ष का असेना... तो तुम्हाला योग्य वाटत असेल तर १००% आनंदाने त्यालाच मतदान करा.
प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या काळात जनतेला आश्वासने देत असतो ते आपल्या छापील स्वरूपात असलेल्या पक्षाच्या जाहीनाम्यात(manifesto)... हा पक्षाचा जाहीरनामा जनतेला प्रभावित करत असतो. जाहीरनाम्यात पक्षाचे धोरण, निवडून आल्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक धोरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आश्वासने दिलेली असतात. त्यामुळे विविध पक्षांद्वारे प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा एक प्रकारे पुरावा(on paper record) असतो. त्यामुळेच मतदान करण्यापूर्वी या पक्षांचे जाहीरनामे अभ्यासणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षित मतदाराने सर्व जाहीरनामे मतदानापूर्वी जरूर वाचावेत जेणेकरून आपण कुणाला आणि का मत देतोय हे ठरवण्यास मदत होईल. उगाच कोणाच्या सागण्यावरून, कुणाच्या दबावामुळे अथवा अंध भक्तीमुळे कर तुम्ही कुणाला मतदान करत असाल तर याद राखा तुम्ही इतरांना नाही तर स्वतःलाच फसवतायत.
तर आता लोकशाही, शिक्षण, राजकारण, समाजकारण, समता, स्वातंत्र्य, मतदान अशा अनेक विषयांवर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार लक्षात घेणे याठिकाणी गरजेचे आहे. ते खालीप्रमाणे,
१)" मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच"( I am Indian... Firstly and lastly).
*-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(बाबासाहेबांनी धर्म, जात, भाषा यापेक्षा भारतीयत्वाचा पुरस्कार केला आहे.)
२) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(अंधश्रद्धा त्यागून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास बाबासाहेब आग्रही होते.)
३) "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध पिणार तो वाघाप्रमाने डरकाळी फोडल्या शिवाय राहणार नाही."
*-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(बाबासाहेबांच्या या वाक्यावरून आपणास शिक्षणाचे महत्त्व लक्षात येते.)
४) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(आपले मत किती मूल्यवान आहे ते यावरून जाणवते.)
५)"समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(लोकशाही विषयी बाबासाहेबांचे स्पष्ट विचार.)
६) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(बाबासाहेबांनी धर्मापेक्षा माणसाला आणि माणुसकीला जास्त महत्त्व दिले आहे.)
७)"जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(स्वाभिमान आणि स्वातंत्र्य याबद्दल बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार)
८) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्‍या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(वर्णभेदाच्या बाबतीत बाबासाहेबांनी मांडलेले विचार.)
९) "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"!
*— डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार)
१०)जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(विद्येचे मानवी जीवनात असलेले महत्त्व बाबासाहेबांच्या या विचारातून लक्षात येते.)
११) "सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा अंगाठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल..!"
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(शिक्षित वर्गाला राजकारणात सक्रिय सहभागी होण्याची गरज बाबासाहेब व्यक्त करतात.)
मित्रांनो मतदान जागृती करण्यासाठी लिहीत असलेल्या या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही काही वाक्ये पुनरुच्चारीत करण्याचा उद्देश एकच आहे की संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणि हा देश नक्की कसा असावा याबद्दल त्यांचे विचार सर्व मतदारांर्यंत पोहोचावेत.
(टीप: यात कुणाला जातीयवाद दिसला असेल तर क्षमस्व... हा लेख तुमच्यासाठी नाही.)
तर आता काही प्रॅक्टिकल वर्क करूयात... ज्याने कुणाला आणि का मतदान करायचे हे ठरवण्यासाठी मदत होईल.
१) सर्वप्रथम स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्या. त्यासाठी निवडणूक आयोगाचे #voter_helpline हे ऍप डाऊनलोड करा त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
अथवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
२)तुम्ही मागच्या वर्षी कुणाला मतदान केले हे आठवा. आणि तो उमेदवार निवडून आला असेल तर त्याने काय काय काम केले याचा आढावा घ्या. आणि योग्य वाटेल त्यालाच मतदान करा.
३) #neta
या अँपवर तुम्हाला विविध नेत्यांचे अंदाजे रिपोर्टकार्ड, माहिती, कार्य इत्यादी विविध बाबी मिळतील. हे ऍप डाऊनलोड करा त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
अथवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
विविध पक्षांचे जाहीरनामे अभ्यासा. जाहीरनामे खालील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करून प्रिंट करू शकता अथवा मोबाईल मध्येही वाचू शकता.(प्रिंट करून घेतल्यास उत्तम)
४) मतदानादरम्यान काही संशयास्पद हालचाली अथवा गैरवर्तन आढळल्यास निवडणूक आयोगाच्या अँपवर ऑनलाईन तक्रार नोंदवून शकतात. त्याचप्रमाणे तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
#काँग्रेस(राहुल गांधी)*
२) *#भाजप(नरेंद्र मोदी)*
३) *#व्हीबीए (प्रकाश आंबेडकर)*
#काँग्रेस आणि भाजपचे जाहीरनामे यांच्यातील ठळक मुद्दे आणि तुलना पाहण्यासाठी प्रसिद्ध यूट्यूबर #ध्रुव_राठी यांचे अभ्यासपूर्ण व्हिडिओज पाहून शकता.
१) मतदान कार्ड कसे मिळवावे?
२) काँग्रेसचा जाहीरनामा(ठळक मुद्दे)
३) भाजपचा जाहीरनामा (ठळक मुद्दे)
#फेक न्यूज च्या विरोधात पत्रकारिता करणारी प्रसिद्ध वेब पोर्टल:-
२) #altnews
मित्रांनो मतदान नक्की करा...
त्यांच्यासाठी नाही...तर स्वतःसाठी....
या लेखात प्रामाणिकपणे सर्व काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे उद्देश केवळ मतदानासाठी जनजागृती करणे हा असून आपल्याला हा लेख महत्त्वाचा वाटत असल्यास लाईक l शेअर l आणि कमेंट्स कराव्यात..

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...