Hello... अस-सलामअलैकुम। -मेरा नाम हैं आयशा आरिफ खान। और मैं जो भी कुछ करने जा रही हूं अपनी मर्जी से करना चाहती हूं, इसमें किसी का दौर या दबाव नहीं है। अब बस क्या कहें??? ये समझ लीजिए खुदा की जिंदगी इतनी ही होती है, और मुझे इतनी ही जिंदगी बहुत सुकून वाली मिली। और डियर डैड कब तक लड़ेंगे अपनों से? केस विड्रॉल कर दो... नही करना। ये आयशा लड़ाइयों के लिए नहीं बनी। प्यार करतें है आरिफ से, उसे परेशान थोड़ी न करेंगे, अगर उसे आज़ादी चाहिए... ठीक है वह आज़ाद रहें। चलो... अपनी जिंदगी तो यही तक है।
मैं खुश हूं कि में अल्लाह से मिलूंगी। उन्हें कहूंगी कि, मेरे से गलती कहा रह गई? मां - बाप बहुत अच्छे मिले, दोस्त भी बहुत अच्छे मिले। पर शायद कहीं कमी रह गई। मुझमें या शायद तकदीर मे। में खुश हूं... सुकून से जाना चाहती हू, अल्लाह से दुआ करती हू कि अब दोबारा इंसानों की शक्ल ना दिखाए।
एक चीज जरूर सीख रही हु। मोहब्बत करनी है तो दो तरफा करो एक तरफा में कुछ हासिल नहीं। चलो कुछ मोहब्बत तो निकाह के बाद में भी अधूरी रहती है। यह प्यारी सी नदी... प्रेय करते हैं कि, यह मुझे अपने आप में समा ले। और मेरे पीठ पीछे जो भी हो, प्लीज ज्यादा बखेड़ा मत करना। मैं हवाओं की तरह हूं... बस बहना चाहती हूं... और बहते रहना चाहती हूं... किसी के लिए नहीं रुकना।
मैं खुश हूं आज के दिन... की, मुझे जिस सवाल के जवाब चाहिए थे वह मिल गए। और मुझे जिसको जो बताना था सच्चाई वह बता चुकी हूं... बस काफी है... थैंक यू... और मुझे दुवाओं में याद करना... क्या पता जन्नत मिले या ना मिले... चलो, अलविदा!!!
वरील मजकूर हिंदी चित्रपटातील एखाद्या इमोशनल सीनसाठी लिहिलेली स्क्रिप्ट वाटू शकते. मात्र ही स्क्रिप्ट नसून एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पतीला पाठवलेला शेवटचा व्हिडिओ संदेश आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारी २३ वर्षीय आयशा आरिफ खान आता या जगात नाहीय. २५ फेब्रुवारीला तिनं साबरमती नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबद्दलची बातमी अनेक प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही पाहिली अथवा वाचली असेलच. आयशाचा हा सुसाईड व्हिडीओ देशभर बघितला जात असून हळहळ व्यक्त केली जातेय. अंतःकरणातलं दुःख लपवत, डोळ्यांतले अश्रू रोखत चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत दाठलेल्या कंठाने आयशानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि हाच तिचा अखेरचा संदेश ठरला. आयशा तिच्या आयुष्याला इतकी कंटाळली कि तिनं मृत्यूला मिठी मारणं पसंत केलं. पैशांसाठी पतीकडून आणि सासरच्यांकडून होणार छळ आणि याच छळामुळे प्रचंड मानसिक तणावात गेलेल्या आयशाला मृत्युशिवाय दुसरा मार्ग सापडलाच नाही. या घटनेनं पुन्हा एकदा हुंडा प्रथा किती खोलवर समाजात रुजलेली आहे याची आठवण करून दिली.
आयशाचे वडील लियाकत अली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं कि, मी तिला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. तिला 'पवित्र कुराण'ची शपथ दिली, खूप समजावलं मात्र तिनं कुणाचाही ऐकलं नाही. आयशा एक सुशिक्षित तरुणी होती. तिला पीएचडी करून प्रोफेसर बनायचं होतं हे सांगताना तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. केवळ हुंडयारूपी पैशांच्या लालसेमुळे आयशा सारख्या होतकरू तरुणीला आत्महत्या करावी लागते ही गोष्ट संपूर्ण समाजासाठी घातक आहेत. अशा अजून किती विवाहितांना केवळ हुंड्याच्या नावाखाली त्रास दिला जातोय? प्रत्येक दुसऱ्या - तिसऱ्या घरात एक आयशा नक्कीच असेल... पती आणि सासरच्यांकडून हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या शारीरिक मानसिक छळाला त्रासली असेल.
आयशाचा तो व्हिडिओ पाहून मला समाजतल्या या अनिष्ट प्रथांची प्रचंड चीड येते. आपल्याकडे एकतर अहंकाराने माजलेली आणि स्त्रियांना दुय्यम दर्जा देणारी ''पुरुषप्रधान'' संस्कृती. त्यात स्त्रियांनी नेहमी पुरुषांच्या खाली राहावं ही घाणरेडी मानसिकता... आणि याच मानसिकतेमुळे कायद्याने बंदी असलेल्या मात्र तरीही समाजमान्य असलेल्या हुंडा यांसारख्या ''स्त्री - विरोधी'' प्रथा आजही जिवंत आहेत. इथे कायदा कमी पडतो असं मला वाटत. कारण समाजाची असलेली मानसिकता... जर एखाद्या मुलीचे वडील लग्न ठरवताना जावयाला किंवा मुलीच्या सासरच्यांना ''स्त्रीधन'' या नावने दबावाखाली येऊन रोख रक्कम, दागिने, प्रॉपर्टी किंवा अन्य भेटवस्तू देत असतील तर तो हुंडा समजला जातो आणि त्यामुळेच आजही हुंडाप्रथा चालूच आहे. मुलाकडची बाजू वरची आणि मुलीकडची बाजू खालची या मानसिकतेमुळेच हे असले प्रकार घडतात आणि घडत राहतील. काही ठिकाणी कायद्यापेक्षा समाजमन, नैतिकता, मानसिकता या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात. मी हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही असं प्रत्येकानं ठरवलं तर याठिकाणी कायद्याची गरजच उरणार नाही.
पण ते म्हणतात ना कि, लातो के भूत बातो से नही मानते... काहींना कायद्याचा हिसका द्यावाच लागतो. त्यामुळेच १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा आणण्यात आला. या कायद्याच्या कलम 3 नुसार हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे कारावासाची आणि कमीत कमी रुपये 15,000/- अथवा अशा हुंडयाच्या मुल्याइतकी रक्कम दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र आयशाच्या प्रकरणामध्ये ''मुस्लिम पर्सनल लॉ'' लागू होत असल्याने त्यातील तरतुदींबद्दल माहिती घ्यावी लागेल. पण शेवटी मानसिकता कधी बदलणार हा प्रश्न मला पडतो. त्यात प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जात पंचायती या कायद्यापेक्षा मोठ्या आहेत का? हा प्रश्नही मला पडतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना नुकताच राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी झालेली नाही, सत्य समोर आलेलं नाही. असं असताना पोहरादेवी इथल्या धर्मपीठाच्या महंतांनीही आधीच संजय राठोड यांच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जातीसमूह, त्यांचे प्रमुख, जातपंचायती भारतीय संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
शेवटी एवढंच सांगेन - ज्याच्या घरात स्त्री आहे, बहीण आहे त्यानं आधुनिक विचार ठेवून हुंडा देणं - घेणं टाळावं. आपल्या मुलांमध्ये पुरुषी अहंकार न येऊ देता स्त्री - पुरुष समानता रुजवावी. स्त्रियांचा आदर करण्यापासून ते त्यांना बरोबरीचा दर्जा देणं शिकवावं. आधूनिक विचार असलेला मुलगा कधीही हुंडा घेणार नाही आणि आधुनिक विचार असलेली मुलगी हुंडा देणार नाही त्यामुळे हुंडाप्रथा हळूहळू हा होईना नक्कीच संपुष्टात येईल. इंग्रजानांनी १८२९ मध्ये कायदा करून सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. समाजसुधारकांनीही खूप प्रयत्न केले आणि आज सतीप्रथा संपुष्टात आली तशी हुंडाप्रथाही कासव गतीने का होईना पण संपुष्टात नक्की येईल. फक्त एवढंच कि, परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करावी. सर्वांच्या घरातली ''आयशा'' माहेरी सुखी राहावी आणि सासरीही सुखीच नांदावी...
प्रेम कसं होतं?... २५ ऑगस्ट २०१७ ला ही कविता लिहिली होती. तेव्हा मी BMM च्या फर्स्ट ईअरला होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं अतिप्रेम झालं की ते प्रेम कागदावर उमटलं. कविता ज्यांना ज्यांना पाठवली सर्वानांच ती आवडली. त्याच वर्षी म्हणजे २०१७ ला मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. त्यात अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितेचं वाचन करून त्यांना आदरांजली देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी विज्ञान,कला वाणिज्य, पत्रकारिता अशा सर्व शाखेचे जवळपास २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या कवितेचं वाचन झालं. तेव्हा 'BMM मधून कोण नाही का कविता करणारा?'' असं सूत्रसंचालन करणाऱ्या दीपक गवादे सरांनी विचारलं. आम्ही सगळे जण एकमेकांची तोंडं पाहू लागलो. माझी कविता मित्रांना माहित होती. तेवढयात माझा वर्गमित्र प्रसादने नंदू सरांना सांगितलं कि सर अक्षयने लिहिली आहे कविता. मला जाम अवघडल्यासारखं झालं. कारण ती कविता प्रेमावर होती आणि मी इतका लाजरा... त्यात ती सर्वांसमोर वाचायची, सगळे हसणार, मजा घेणार याची मला भीती... नंदू सरांनी मला जा पुढे कविता वाच म्हणून हट्टाने आणि आदेशाने सांगितलं. मी घाबरत घाबरत माझ्या मोबाईलवर माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढे गेलो... दीपक सरांना विनंती केली कि, सर मला कविता वाचता येणार नाही प्लीज तुम्हीच वाचा... असं सांगून मी माझा मोबाईल दीपक सरांकडे दिला आणि पटकन माझ्या बेंचवर बसलो. यावेळी माझ्या हृदयाचे ठोके भयंकर वाजत होते. कारण मी कुणावर प्रेम करतो हे या कवितेतून स्पष्ट कळत होतं.
तर दीपक सरांकडे मोबाईल दिला, त्यांनी माझ्या कवितेचं नाव वाचूनच कवितेचा आशय समजून घेतला. आणि जसं कवितेचं नाव वाचलं तसं सर्वजण ओ... म्हणून दाद देऊ लागले. दीपक सर भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कवितेचं वाचन कौशल्य खरंच अप्रतिम आहे. जेव्हा दीपक सरांनी कवितेचं वाचन सुरु केलं तेव्हा प्रत्येक ओळीवर सर्वजण दाद देत होते, हसत होते, माझ्याकडे बघत होते आणि मी मात्र खूपच नर्व्हस होतो. कारण ती कविता म्हणजे तिला जाहीररीत्या प्रपोजच होता. बोल दीपक सरांचे आणि शब्द माझे. माझ्या कवितेचं रसग्रहण आणि सादरीकरण ज्याप्रकारे दीपक सरांनी केलं ते खूप अप्रतिम होत. प्रत्येकाला ही कविता रिलेट करत होती. थेट हृदयातून आलेल्या या कवितेत माझ्या १००% खऱ्या आणि निखळ भावना होत्या. कवितेच्या शेवटच्या कडव्यात एक ओळ होती ज्यामुळे सर्वजण खळखळून हसले ती ओळ अशी - ''प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.'' बालिश वाटते ना? मलाही आता वाटते. पण तेव्हा हीच फीलिंग होती. आता कळतंय आपण किती बालिश होतो ते... पण काहीही असो जे वाटलं ते लिहिलं... माझ्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट झाला. आणि निघताना मला सगळेजण दाद देत होते, तारीफ करत होते, अभिंनदन करत होते... मी फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरचे सिनिअर विदयार्थीं मला अभिनंदन करायला आले. दीपक सरांनी तर माझं कौतुक केलं. कारण पत्रकारितेचा विदयार्थी म्हणून माझा स्वतःचा ब्लॉग आहे आणि मी काहीतरी लिहितोय यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. सोबतच थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना ''शिका काहीतरी यांच्याकडून'' असं म्हणत त्यांना हटकलं. सरांनी केलेल्या कवितेच्या वाचनामुळे मला कॉलेजात जरा वेगळी ओळख मिळाली आणि मी काही दिवसांचा सेलेब्रिटी झालो होतो. पण....
पण... जी कविता सर्वांनां आवडली, जी कविता मी तिला स्वतः पाठवली होती, त्याच मुलीने मला विचारलं... ''अक्षु, कुणासाठी लिहिलीय कविता?'' आईशप्पथ काळजाची तार छेडणं काय असतं हे त्याक्षणी कळलं. नेमकं ती माझ्या बाजूला बसली होती. बाजूला म्हणजे मुलामुलींचे वेगळे बेंच होते आम्ही दोघे कडेला बसलो होतो, मध्ये गॅप होता. तिच्या बाजूला बसला यावं म्हणून मी मुद्दाम तिकडे बसलो होतो. पण साला तिला खरंच कळलं नाही का? कि ती कविता तिच्यासाठीच होती... कॉलेजात कसं काय टॉप केलं तिने काय माहित? वेडी कुठली... एकतर ती खूप वेडी होती, नाहीतर तिला सगळं कळत असूनही माझी शाळा घेत होती...असो... ते दिवसच वेगळे होते. या कवितेचं वाचन माझी मैत्रीण श्वेता वाळंजने सुद्धा केलाय. आम्ही कल्याणच्या जनशक्ती न्यूजमध्ये सोबत काम करायचो. तेव्हा तिलाही कविता खूप आवडली आणि तिने तर थेट तिच्याच फेसबुकवरून लाईव्ह करत कवितेचं वाचन केलं. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही कविता हृदयाच्या खूप जवळ आहे. आज या कवितेला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून ही कविता पुन्हा शेयर करतोय...कशी वाटली सांगा... जमलं तर...आता तर कविता सुचत नाही कारण आता तशा भावनाच येत नाही. त्यामुळे मी ज्या काही मोजक्या ४-५ कविता केल्या आहेत त्याच माझ्या हृदयातल्या आणि मनातल्या गोष्टी आहेत असं समजा...पुन्हा अशा कविता सुचतील कि नाही...माहित नाही. कारण आता प्रेम वैगेरे म्हटलं कि भीती वाटते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि बाकी राहिली शून्य!!! पण बघू ,काय सांगता येत नाही. ये दिल तो बच्चा है जी...😊
@bbcnewsmarathi चे सर्व १०० #coronapodcast बघितले होते. ते खूप आवडले म्हणून त्यावर सविस्तर ब्लॉग लिहिला. आज त्याच ब्लॉगचा उल्लेख विनायक सर आणि आशिष सर यांनी त्यांच्या कारोना पॉडकास्टच्या १०२व्या भागाच्या शेवटी केला. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. pic.twitter.com/59QHdxwt8A
गेले १०० दिवस दररोज रात्री ०८:१५ वाजता आपण हा आवाज ऐकत आलो आहोत. गेल्या १०० दिवसांत या आवाजाची इतकी सवय झाली आहे कि, सुरवातीची ओळ वाचताना सुद्धा त्या दोन व्यक्तींच्या आवाजात आणि त्यांच्या त्या ट्यूनमध्ये, त्या स्टाईलमध्येच मनातल्या मनात का होईना पण ते त्याचप्रकारे बाहेर येतं. एखादा प्रसिद्ध डायलॉग किंवा जिंगल ज्याप्रमाणे लक्षात राहते व ते आपण कधीमधी गुणगुणत राहतो त्याचप्रमाणे जणू हे बिना म्युजिकचं वाक्य आता अनेकांच्या डोक्यात फिट्ट बसलंय. अर्थातच आपण बोलत आहोत बीबीसी मराठीच्या कोरोना पाॅडकास्ट बद्दल...मला याबद्दल लिहावसं वाटलं याचं कारण एका वाक्यात सांगायचं झालं तर - "I really Like it."
माझ्या या ब्लॉगवर मी माझ्या मनातल्या गोष्टी लिहीत असतो. मग तो कोणताही विषय असो, मला त्यावर व्यक्त व्हावंस वाटलं कि मी ते लिहितोच. आजचा विषय जरा वेगळा आहे. या लेखाच्या शीर्षकावरून bbc मराठीची जाहिरात करत असल्याचा भास होत असेल, पण तसं काहीही नाही. एक पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून आणि bbc मराठीचा एक प्रेक्षक व वाचक म्हणून मला त्याबद्दल काय वाटतं हे मी शेयर करणार आहे. bbc मराठी सध्या सोशल मीडिया आणि वेब पोर्टल यांच्या माध्यमातून बातम्या आणि माहिती देत असते. मी bbc मराठी अगदी सुरवातीपासून पाहत आलोय. त्यातील अनेक गोष्टी मला आवडतात. सध्या थेट bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टबद्दल बोलतो.
तर, कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधानांनी सुरुवातीला जनता कर्फ्यूची घोषणा केली, आणि मग लॉकडाऊन जाहीर केले ते २४ मार्चला रात्री ८ वाजताच्या फेसबुक लाईव्हद्वारे. म्हणजेच २५ मार्चच्या मध्यरात्रीपासूनच देशात पहिले लॉकडाऊन सुरु झाले. पण लॉकडाऊनची पूर्वकल्पना जवळपास सर्वच पत्रकारांना आणि वृत्तसंस्थांना होती. त्यामुळे वर्क फ्रॉम कसं करता येईल याचा सगळीकडे विचार होत होता. शिवाय पत्रकारांनी कसं काम करायचं याबद्दलही रणनीती ठरत होती. सर्व वृत्तसंस्था आपापल्या परीने काम करत होत्या. तेव्हा bbc मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि bbc मराठीचे ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट विनायक गायकवाड यांनी लॉकडाऊनच्या पाच दिवस अगोदरपासूनच म्हणजेच दिनांक २० मार्च २०२० पासून फेसबुक लाईव्ह द्वारे बातम्या, माहिती आकडेवारी देणे सुरु केले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून म्हणजेच २० मार्च पासून ते २७ जुलै पर्यंत १०० दिवसांत १०० फेसबुक लाईव्ह(कोरोना पॉडकास्ट) कोणताही खंड न पडू देता सलगपणे पूर्ण केले. याबद्दल विनायक सर आणि आशिष सर यांच्यासह संपूर्ण bbc मराठीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन.
bbc news marathi चे कोरोना पॉडकास्ट मला का आवडले?
तसं पाहायला गेलं तर पॉडकास्ट, फेसबुक लाईव्ह अशा संकल्पना काही नवीन नाहीत. पण बातम्या देण्याची पद्धत, फॉरमॅट, साधेपणा, नैसर्गिकपण, खात्रीलायक माहिती, आकडेवारी, कमेंटद्वारे वाचकांशी असलेला संवाद(टू वे कम्युनिकेशन) अशा अनेक बाबी bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टला काही खास बनवतात.
१) वृत्तनिवेदक
बातमी देणारा तो वृत्तनिवेदक. प्रत्येक वृत्तनिवेदक हा आपल्या खास शैलीमुळे ओळखला जातो. तशीच खास शैली आशिष सर आणि विनायक सर यांची आहे. सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे Hi...नमस्कार...मी विनायक. Hello...मी आशिष😊 आणि मग छोटीशी स्माईल. या हसऱ्या आणि पॉझिटिव्ह शैलीमुळेच कदाचित मला आणि अनेकांना bbc मराठीच्या
कोरोना पॉडकास्टने आकर्षित केलं.
२) केमिस्ट्री
वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वृत्तनिवेदकाची खास शैली असते. पण जेव्हा दोन वृत्तनिवेदक एकत्रितपणे काम करतात, तेव्हा एकमेकांशी समन्वय साधून संवाद वाहता ठेवणे आव्हानात्मक असते. मधेच सायलेंट पॉज किंवा एकाचवेळी बोलणे, गोंधळने, गडबडने असे होऊ शकते. पण या दोन्ही मान्यवरांचा एकमेकांशी असलेला समन्वय, हजरजबाबीपणा यांमुळे कुठेही संवाद न थांबता तो सुरळीत राहतो.
३) फॉरमॅट
जवळपास १ तासाच्या या संवादात सुरवातीला सर्वाना वेलकम करणे, महत्वाचे मुद्दे सांगणे, त्यावर माहिती देणे, वाचकांच्या प्रतिक्रया वाचून त्यावर बोलणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या कमेंट्स वाचणे, निगेटिव्ह कमेंट्सनाही हसतमुख राहून पॉझिटिव्ह उत्तर देणे, नंतर जग, देश, राज्य, जिल्हा यानुसार आकडेवारी सांगणे, शासन निर्णय, नेते/अधिकारी यांची वक्तव्ये, लशीबद्दल अपडेट्स, थोड्या इकडच्या - तिकडच्या गोष्टी, कोरोनाला न घाबरण्याचे आवाहन, गमंत म्हणून लशीचा पुरस्कार, मग पुन्हा वाचकांच्या कमेंट्स, शेवटी रेकमेंडेशन आणि मग शुभ रात्री.... अवघ्या एक तासांत एवढी माहिती तेही आरडाओरड न करता साध्या नैसर्गिक संवादातून मिळते, त्यामुळे ही पद्धत मला जास्त आवडली.
४) प्रेझेंटेशन
आपण टीव्हीवर बातम्या बघतो तेव्हा आपल्याला मथळे, फोटोज, व्हिडिओज, व्हाईस ओव्हर, वृत्तनिवेदकाचे हावभाव, ग्राफिक्स अशा अनेक गोष्टी दिसत असतात. मात्र फेसबुक लाईव्ह करताना मोबाईल स्क्रीनवर तुम्ही आणि तुमचा आवाज एवढयाच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पण इथे केवळ संभाषण कला, ज्ञान, शब्दभांडार आणि अधिकृत माहिती यांच्या जोरावर अगदी बोलीभाषेतून 'न' आणि 'ण' सांभाळून या दोन्ही मान्यवरांनी उत्तमरीत्या बातम्या व माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. माझ्यासारख्याला यातून प्रेझेंटेशन स्किल कसं असावं हे शिकायला मिळालं.
५) वर्क फ्रॉम होम
सुरवातीच्या काही कोरोना पॉडकास्टमध्ये मस्त घरात बसून, चहा घेत, शॉट्स घालून(छोटी पँट) bbc मराठीचे संपादक आशिष सर आणि त्यांचे सहकारी विनायक सर यांनी फेसबुक लाईव्ह केले. हे असं मी पहिल्यांदा बघितलं. पण आता त्यात एवढी सुधारणा झाली कि, ते टीव्ही न्यूजपेक्षा जास्त आवडतं. आणि वर्क फ्रॉम होम या संकल्पनेचे उत्तम उदाहरण म्हणजे
bbc मराठीचे कोरोना पॉडकास्ट होय.
६) सकारात्मक पत्रकारिता
जेव्हा आजही अनेक प्रसार माध्यमे कोरोनाच्या बातम्या भयंकररीत्या सतत दाखवतात, तेव्हाच bbc मराठी सोपी गोष्ट, कोरोना पॉडकास्ट आणि आता अगदी नवीन गावाकडची गोष्ट यांसारखे माहितीपर आणि सकारात्मक व्हिडिओ सिरीज, स्टोरीज, मुलाखती, लेख प्रसिद्ध करत आहे. याची स्तुती खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली आहे.(आता या स्तुती मागची सोपी गोष्ट मला माहित नाही) पण एकूणच सकारात्मक पत्रकारितेमुळे या काळात bbc मराठीचा प्रेक्षक वर्ग झपाट्याने वाढला, त्यात मीही आहेच.
७) टीम वर्क
bbc मराठीच्या १०० व्या कोरोना पॉडकास्टमध्ये आशिष सर आणि विनायक सरांनी या मोठ्या प्रवासाचं रहस्य सांगितलं. दररोजच्या कोरोना पॉडकास्टसाठी लागणारी माहिती, आकडेवारी, ताजे अपडेट्स, लाईव्ह दरम्यान वाचकांसाठी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आणि बातम्यांच्या लिंक्स शेयर करणे ही सर्व कामे बॅकग्राउंडला म्हणजेच पडद्यामागे होत असत. त्यामुळे bbc मराठीच्या १०० कोरोना पॉडकास्टच्या यशाचे रहस्य म्हणजेच bbc ची संपूर्ण टीम होय.
८) सातत्य
जेव्हा लॉकडाऊन लागू झाले तेव्हा अनेक वृत्तसंस्थांनी व पत्रकारांनी सुरवातीला फेसबुक लाईव्ह करून बातम्या दिल्या. पण नंतर अनेकांनी काही दिवसांतच ते बंद केले. पण
bbc मराठीचे कोरोना पॉडकास्ट दररोज रात्री ०८:१५ ला सुरु व्हायचे , त्यामुळे प्रेक्षकांना त्याची सवय लागली. कधी ५-१० मिनिटे उशिराने पॉडकास्ट सुरु झाले तर प्रेक्षक त्याबद्दल जाब विचारायचे. म्हणजेच प्रेक्षक bbc मराठीच्या
कोरोना पॉडकास्टची वाट बघायचे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सातत्य.
९) नवा प्रयोग
मी आधीही सांगितल्याप्रमाणे पॉडकास्ट, फेसबुक लाईव्ह यात नवं असं काही नाही, ही माध्यमे सर्वांनाच अवगत आहे. मात्र
bbc मराठीच्या
कोरोना पॉडकास्टमध्ये काहीतरी नवं होतं . सूट घातलेला अँकर
टीव्हीवर
बातमी वाचतो हे
लोकांना
माहित आहे, त्यात मग जाहिराती, बॅकग्राउंड म्युझिक, फोनो, टेलीफोन बाईट, जुने फुटेजेस आणि व्हिज्युअल्स उगाच कुठेही वापरणे अशा पद्धतीला नॉर्मल जगात बोअर होत नाही. मात्र जेव्हा लॉकडाऊनमुळे तुम्ही घरीच असतात आणि सतत टीव्हीवरच्या बातम्या बघतात तेव्हा तुमचं डोकं नक्कीच खराब होतं, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हे मला खूप कंटाळवाणं आणि नकोसं वाटणारं आहे. अशातच bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टने उत्तमरीत्या काम केले... करत राहतील ही विनंती आणि अपेक्षाही.
१०) शुद्धीकरण
मी अनेक वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल यांच्या सोशल मीडियाच्या कमेंट्समध्ये वाचकाकांच्या भयानक प्रतिकिया वाचल्या. मग त्यात अगदी शिव्याही असतात. अर्थात प्रत्येक वृत्तसंस्था हीदेखील काही प्रमाणात याला जबाबदार असतेच. मात्र
bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये अशा भयानक कमेंट्स, शिव्या, हाणामारीची भाषा इत्यादी बोटावर मोजण्याइतकी आहे. कारण तुम्ही कोणत्या बातम्या कशाप्रकारे देतात? छुपा अजेंडा चालवता का?, बातमीत 'बात' किती आणि 'मी' किती असते? यावरही तुमचे प्रेक्षक कसे आहेत ते ठरते.
bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्ट दरम्यान अनेक कमेंट्स येतात. सकारात्मक, नकारात्मक, स्तुती, निंदा, राग, विनोदी अशा सर्वच हावभावांचे कमेंट्स किंवा प्रतिक्रिया येतात. मात्र त्यात शिव्या किंवा खालच्या पातळीवरील टीका यांचे प्रमाण खूपच कमी आहे. व्यक्त व्हावं.. पण कसं व्हावं हे सुद्धा तेव्हढाच महत्वाचं आहे. उगाच शिव्या देऊन आपण आपले विचार लोकांना पटवून देऊ शकत नाही. लोकं bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये योग्यरीत्या व्यक्त होतायत. म्हणजेच टीका - टिपण्णी ही शुद्ध आणि चांगल्या भाषेत केल्याने एकप्रकारे याला काही प्रमाणात माध्यमांचे शुद्धीकरण म्हणावे लागेल. असं असलं तरी १००% चांगल्याच प्रतिकिया हे मुळीच नाही. कारण, ज्याप्रमाणे कोणतेही सॅनिटायझर १००% विषाणूंना मारू शकत नाही त्याचप्रमाणे कुणीही १००% हेट कमेंट्स बंद करु शकत नाही.
तर ही होती
bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टबद्दल माझ्या मनातली गोष्ट. लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं, बाकी काही नाही. bbc मध्ये सिद्धनाथ गानू , निलेश धोत्रे, गुलशनकुमार वनकर, अमृता दवे, गुरप्रीत सैनी, सर्वप्रिय सांगवान अशी अनेक मान्यवर व काहींची नावे सध्या आठवत नाही पण मी त्यांना नेहमी ऐकत असतो, पाहत असतो. कधी असंच वाटलं तर त्याबद्दलही लिहेन. सध्या या लेखासाठी बरीच मेहनत घेतलीय. काही फायदा नसताना केवळ स्वतःच्या मनासाठी आणि मनातली गोष्ट इतरांना सांगण्यासाठी हा खटाटॊप.
bbc मराठीच्या कोरोना पॉडकास्टच्या अगदी पहिल्या पॉडकास्टपासून(२०मार्च) ते आताच्या १००व्या (२७ जुलै) पर्यंतच्या पॉडकास्टच्या सर्व १०० लिंक्स शोधून त्या एकत्रितपणे माझ्या ब्लॉगवर बघायला मिळतील... म्हणून म्हटलं जाम मेहनत घेतलीय या पोस्टसाठी.. जस्ट फॉर फन... क्रेझी ना... 😀 😀 😀
BBC News Marathi चे १ ते १०० CoronaPodcast पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
आज सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. खरंच खूप वाईट वाटलं. त्याआधी इरफान खान, ऋषी कपूर, वाजीद खान, आणि आज सुशांतसिंग राजपूत. असे हे दिग्गज एकामागोमाग - एक निघून गेले. मात्र सुशांत त्याला अपवाद होता. त्याने स्वतःहूनच मृत्यूला जवळ केलं. त्याच्या आत्महत्येचे कारण कळेल/ न - कळेल कुणाला ठाऊक? पण नैराश्यातून माणूस काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सुशांतच्या आत्महत्येची अनेक कारणे असू शकतील, पण त्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे - तो सध्या परिवारापासून दूर आणि एकटा राहत होता. तो परिवारासोबत असता तर कदाचित त्याने हे टोकाचं पाउल उचलताना जरा आणखी जास्त विचार केला असता आणि कदाचित त्याने स्वतःला रोखलंही असतं. इथेच माणसाचा स्वभाव दिसून येतो. एखादी व्यक्ती कितीही परिपूर्ण असली तरी समाजात आणि माणसांत मिसळण्याची नैसर्गिक वृत्ती हीच माणसाच्या मनाचा, बुद्धिमत्तेचा, मेंदूचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करते. त्यामुळेच आज आपल्यालाला घरात बसून राहणे अक्षरशः नकोसे वाटते. एकमेकानां भेटावं, बोलावं, फिरायला जावं अशी इच्छा होणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. आजच्या घटनेने आपल्या सर्वांना एक धडा दिला आहे, तो म्हणजे मानसिक स्थिती सांभाळण्याचा... डिप्रेशनमध्ये न जाता मनाची स्थिती चांगली ठेवण्याचा...
एकतर ह्या कोरोनाने आपल्या सगळ्यांना घरातच नजरकैद केलं आहे. घरातील व्यक्ती वगळता इतर प्रियजनांचा, मित्रांचा, जवळच्या माणसांचा एकमेकांशी होणारा नैसर्गिक संवाद बंद झालाय. डिजिटल किंवा व्हर्चुअल संवादातून फक्त माहिती पोहोचते, संवेदना नाही. समाजशील असलेले आपण घरात बसून खूप वैतागलो आहे. मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी सध्यातरी घरात राहणे हाच सर्वोत्तम असल्याने जमेल तेवढे त्याचे पालन केले पाहिजे. यात दुमत नाही. पण त्यासोबतच मनाची स्थिती सतत तपासत राहिली पाहिजे. जे वर्क फॉर्म होम करतायत त्यांचा बऱ्यापैकी दिवस निघून जातो. मात्र, ज्यांना सध्या काम नाही किंवा घरून काम करणे शक्य नाही, असे बरेचसे लोक शांत, अस्वस्थ काहीसे निराश झालेले दिसतात. ही गोष्ट काहीशी माझ्या बाबतीत सुधा लागू होते. २ - ३ महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आपली ही परिस्थिती होते, तर जन्मापासून पिंजऱ्यात वाढणाऱ्या आणि शेवटी तिथेच अस्त होणाऱ्या प्राण्यांबद्दल आपलं काय मत आहे? माणूस किती निर्दयी आहे, हे केरळमधील गर्भवती हत्तीणीला विचारा, माणसाने जे पेरलं आहे त्याचंच फळ कोरोनाच्या रुपात त्याला मिळालं आहे. असो... विषयांतर होतंय...
तर सध्याच्या काळात २०२० वर्ष कोरोनाच्या नावावरच आहे, असं माझं ठाम मत आहे. तज्ञ म्हणतायत कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे... नक्कीच... पण मानसिक आरोग्याचं काय? जर आपण एकमेकांशी बोललो नाही, भेटलो नाही, व्यक्त झालो नाही तर आपण मेंटल होऊ हे नक्की. कोरोनासोबत जगायला नक्कीच शिकलं पाहिजे पण आपल्या माणसांना सोबत घेऊन...नाती जपून...नियमांचं पालन करून आपण आता एकेमेकांच्या सुख - दुःखात सहभागी झालं पाहिजे. येणारा काळ फार अवघड असेल. आपल्यातला कोण जर सुशांत प्रमाणे डिप्रेशनमध्ये असेल तर...? काही अनर्थ झाल्यावर आपण जर केवळ श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवणारे असू तर आपण कसले माणूस? कसले मित्र?
आणि
कसले नातेवाईक? सगळं काही डिजिटल आणि व्हर्चुअल नाही होऊ शकत नाही ...बरोबर ना? कोरोनासोबत जगताना माणसांना आणि माणुसकीला विसरता कामा नये. एकमेकाची विचारपूस केली पाहिजे, शक्य असल्यास नियम पाळून गजावाजा न करता भेटही घेतली पाहिजे हे माझं मत आहे. कारण कोरोना कधी जाईल ते माहित नाही, मात्र आपली लोक आपल्यापासून दूर जाता कामा नये. फिजिकल अंतर ठेवायचंय, सोशल नाही. 😊
आज जागतिक रंगभूमी दिवस. अवघ्या विश्वाला एका लाकडी मंचावर सादर करण्याचं सामर्थ्य आहे ते याच रंगभूमीत. जेथे सर्व रंग एकाच ठिकाणी एकत्र होतात अशी ती गजबची रंगभूमी. संहिता, अभिनय, कलाकार, नैपथ्य, संगीत, प्रकाश योजना, संगीत संयोजन, रंगमंच व्यवस्थापन, विंग, पडदा अशा अनेक शब्दांचा काही वर्षांपूर्वी माझा काडीमात्रही संबंध नव्हता. मी २० वर्षांचा होईपर्यंत कधी कोणते नाटक अथवा एकांकिका प्रत्यक्षात पाहिल्याचेही मला आठवत नाही. त्यामुळे रंगमंच, रंगभूमी, अभिनय या गोष्टींची समीक्षा करण्याचा नैतिक अधिकारही मला नाही, असे मला स्वतःला वाटते. मी स्वतः कलाकार नाही मात्र मी कलेचा पुजारी आहे. संगीत, अभिनय, संवाद, डायलॉग्स, देहबोली, डोळ्यांतील बोलकेपणा यांनी मी नक्कीच संमोहित होतो. मी बोटावर मोजण्याइतकीच नाटके किंवा एकांकिका बघितल्या आहेत, त्यामुळे अभिनयाच्या आणि कलेच्या या महान रंगभूमीवर मी क्षणभंगुर असा सूक्ष्मजीव आहे. मात्र तरीही आज मी याबद्दल माझ्या मनातल्या गोष्टी बोलू इच्छितो.
पहीलं बघीतलेलं नाटक
तसं बघायला गेलं तर मी आजही काही अगदीच नाट्यवेडा वैगेरे नाही, हे मी प्रमाणिकपणे सांगतो. ते माझं क्षेत्र नाही, पण मी नाट्यप्रेमी मात्र नक्कीच आहे. मी चित्रपट वैगेरे एका सामान्य प्रेक्षकाप्रमाणेच बघायचो. त्यातला अभिनय, स्क्रिप्ट वैगेरे इतका सखोल विचार मी कधी केलाच नव्हता. २०१६ मध्ये मी 'बॅचलर ऑफ मास मीडिया'साठी उल्हासनगरच्या 'एसएसटी महाविद्यालयात' प्रवेश घेतला. १२ वी आर्टस् सुद्धा इथूनच पास झालो होतो. 'बीएमएम' म्हणजे काय? याबाबत फारशी माहिती नव्हती. कुणीतरी सांगितलं कि, चांगले मार्क्स आहेत आर्टस् करण्यापेक्षा बीएमएम कर. मग मी घेतलं ऍडमिशन बीएमएमएला. फर्स्ट ईयरला माझे वर्गशिक्षक प्रमोद गायकवाड सर होते. अगदी फ्रेंडली स्वभावाचे. आजही आम्ही अधून-मधून भेटत असतो. तर... विषयाकडे येतो, २०१६ साली जेव्हा मी बीएमएमच्या फर्स्ट ईयरला होतो तेव्हा प्रमोद सरांनी मला आणि माझा वर्गमित्र आकाश जाधव आम्हा दोघांना नाटक बघायला नेलं होतं. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी असल्याने त्यांनी ते नाटक पाहण्यासाठी आम्हाला नेलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं ''दोन स्पेशल''... जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यात मुख्य भूमिकेत होते. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे दुपारी ३ वाजताचा प्रयोग असावा. आम्ही सर्वात स्वस्त तिकीट घेऊन मागेच बसलो. जसा पडदा उघडला तसं काहीतरी आश्चर्य बघावं असा मी रिऍक्ट झालो. मी पहिल्यांदा लाईव्ह नाटक बघत होतो. नाटक आणि चित्रपट यातला मुख्य फरक आणि बऱ्याच गोष्टी उमगल्या. सर अधून-मधून दबक्या आवाजात आम्हाला नाटकाबद्दल सांगत होते. नाटक संपल्यावर सरांनी आम्हला बॅकस्टेजला नेऊन जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांची भेट घालून दिली, फोटोज काढले, मस्त वाटलं... आयुष्य पहिल्यांदा कुण्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढला असावा. नंतर भिजत-भिजत घरी आलो. काहीतरी नवीन अनुभव घेतल्याचा आनंद तर होताच, पण सेलिब्रिटींबरोबर फोटो काढल्याचा आनंद त्यापेक्षा दुप्पट होता. कदाचित इथूनच रंगमंच, नाटक, कलाकार, अभिनय यांची ओळख झाली. नाटकाचं बेसिक कॉन्सेप्ट तरी कळलं. नाहीतर त्याअगोदर नाटक म्हणजे शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाच-गाणं एवढंच मला माहित होतं. नाटकाची ओळख प्रमोद सरांनी करून दिली त्याबद्दल त्यांना मनापासून थँक्स....
निखिल आणि नाटक
कॉलेज सुरु झालं. पाहिलंच वर्ष होतं. सगळेच एकमेकांचे गुपचूप तोंडं बघत बसले होते. नंतर हळूहळू बोलायला लागलो. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एक जाडा आणि दिसायला टपोरी असा मुलगा वर्गात आला आणि पहिल्याच बाकावर येऊन बसला. तो होता निखिल जाधव सगळ्यांशी असा बोलत होता जसं काय लय दिवसांपासून ओळख आहे. पहिल्याच दिवशी सरांना नाटकाबद्दल विचारपूस करू लागला. युथ, आयएनटी वैगेरे... वैगेरे. सगळेजण त्याला विचित्रच समजायचो. शिक्षक आला कि गेला हा चिपकायला, असं तेव्हा माझ्यासह सगळेच बोलत होते. नंतर हळू- हळू मैत्री होत गेली, एकमेकांचे स्वभाव कळू लागले, मग भावा आणि शिव्या सुरु झाल्या. आता याचा नाटकाशी काय संबंध? असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल! तर... नंतर मी, निखिल, चेतन, प्रसाद, आकाश खरात अशी आमची गॅंग बनली. निखिल हा नाटकात काम केलेला मुलगा. तेव्हाही करायचा. नाटकाच्या रिहर्सलसाठी उल्हासनगरहून कल्याणच्या नालंदा शाळेत यायचा, माझ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. असं भेटणं वैगेरे तर रोजच व्हायचं, पण एकदा त्याने मला त्यांची रिहर्सल बघायला चल असा आग्रहच केला. मी पण लगेच गेलो. आम्हाला उशीर झाला होता, रिहर्सल सुरु होऊन १० मिनिटे झाली असावीत. निखिलने गेल्या - गेल्या त्याची जागा घेतली. मी मात्र तसाच दरवाजाजवळ उभा. तेवढयात एक भयंकर रागात असलेला माणूस अचानक माझ्यावर ओरडू लागला, माझी जराशी फाटलीच.. मला काहीच कळेना. निखिल कॅरेक्टर मध्ये होता, म्हणून त्याने केवळ इशाऱ्यातच मला रिलॅक्स राहण्यात सांगितले. मला वाटले कि मी यांच्या रिहर्सल मध्ये व्यत्यय आणल्याने हा माणूस माझ्यावर चिडला असावा, पण नंतर लगेच कळलं कि, तो त्याचे डायलॉग्स बोलत होता. रिहर्सल हॉल छोटा होता, त्यात मी त्याच्या जागेवरच उभा होतो जिकडे त्याचा सीन होता. तो तर त्याचं-त्याचं काम करत होता. मात्र त्यांची ऍक्टिंग एवढी असली होती कि, सुरवातीला मला ते कळलंच नाही. मला खूप इम्बॅरेसिंग फील झालं. म्हंटलं पाहिल्यांदाच आलो आणि हीअशी च्युत्यागिरी झाली. निखिलचा जाम राग आला होता, कुठं फसवलं मला ह्याने असं वाटत होत.
"हवे पंख नवे"
रिहर्सल संपली. निखिलने सर्वांची ओळख करून दिली. अशोक हंडोरे सर, विक्रांत शिंदे, स्नेहल थाटर आणि अजून काही जण असतील. हंडोरे सरांनीही मला ''येशील का रिहर्सलला'' असं विचारलं, मीही तिकडे जायला लागलो. रिहर्सलची म्युझिक ऑपरेट करायला तेव्हा कुणी नव्हते, तर मी ते करत असे. मग रिहर्सलमध्ये दररोजचे डायलॉग्स, स्क्रिप्ट, हावभाव, आवाजातील चढ-उतार, नैपथ्य, वेशभूषा, मेकअप, केशभूषा, नृत्य, प्रकाश, ऍडजस्टमेन्ट अशा अनेक गोष्टी दररोज अनुभवत होतो. मीही माझ्या कामात म्हणजेच संगीत संयोजन (म्युझिक ऑपरेटर) म्ह्णून माझे काम ठीक-ठाक पद्धतीने करत होतो. एकूणच बोधी नाट्य परिषद निर्मित, प्रेमानंद गज्वी लिखित आणि अशोक हंडोरे दिग्दर्शित - "हवे पंख नवे" या नाटकाचा ''संगीत संयोजक'' म्हणून माझे नाव लागले. अनेक आठवड्यांच्या मेहनत आणि २०-३० रिहर्सल नंतर या नाटकाचा पहिला प्रयोग पहिला प्रयोग - दि. १९/१२/२०१६ सोमवार रोजी,शिवाजी नाट्य मंदिर,दादर. संध्याकाळी ७:३० वाजता (टिकीट रु.१०० आणि रु.२००), दूसरा प्रयोग - २०/१२/२०१६ मंगळवार रोजी, अत्रे रंगमंदिर, कल्याण. रात्री ८:०० वाजता (टिकीट रु.१०० आणि रु.२००), तिसरा प्रयोग - २१/१२/२०१६ बुधवार रोजी, प्रबोधनकार ठाकरे (मिनी), बोरीवली.रात्री ८:०० वाजता (टिकीट रु.२००) असे सलग तीन प्रयोग लागले. मी अगदी नवखा असल्याने गडबड होऊ नये म्हणून पहिल्या तीन प्रयोगांच्या संगीत संयोजनासाठी दुसरी लोकं होती, मला त्यांच्या बाजूला बसून अनुभव घेण्यास सांगितले. त्यानंतर मात्र पुढचे सर्व प्रयोगांचे संगीत संयोजन मी एकट्यानेच केले. ज्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश होता.
माझ्यातला बदल
मी नाटकात काम करण्याची दोन मुख्य कारणे होती, एक म्हणजे खास मित्राचा आग्रह, दुसरं म्हणजे नाटकाचा विषय. हे नाटक बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित असल्याने मी यात तन-मन-धन लावून काम केले. या नाटकाच्या तीस-एक प्रयोगांमध्ये मी संगीत संयोजनाचे काम केले. तसेच फेसबुकवर पेज बनवून नाटकाची जाहिरात केली. कोल्हापूर, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले ज्यात मी संगीत संयोजन केले. या नाटकाने माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी बदल घडवला. या नाटकाने नव्याने बाबासाहेब कळले. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात प्रयोग होता, तेव्हा माझा पूर्ण परिवार त्या प्रयोगाला उपस्थित होता. नाटक सुरु होत असताना जेव्हा संगीत संयोजन म्हणून माझं नाव घेतलं, तेव्हा माझ्या घरच्यांनाही नक्कीच समाधान मिळालं असेल. एकूणच नाटकात ती ताकद आहे, जी माणसाला पूर्णपणे बदलवून टाकते. नाटकामुळे मी माझ्यातला बदल अनुभवला होता. नक्कीच तो विलक्षण होता.
सुखद धक्का
दुसरा सर्वात बेस्ट अनुभव म्हणजे प्रेमानंद गज्वी सर... माझी १० वी २०१० साली झाली. आमच्या मराठीच्या पुस्तकात पान न. ५६ वर ११ वा धडा होता - "म्या साळा सिकनार' आणि या धड्याचे लेखक आहेत... प्रेमानंद गज्वी सर!!! जेव्हा मी नाटकात काम करायला लागलो होतो तेव्हाच सरांशी भेट झाली होती. कालांतराने एकदा असंच पुस्तकांचा कप्पा साफ करताना दहावीचं माझ्याकडे असलेलं एकमेव मराठी या विषयाचं पुस्तक माझ्या हातात आलं. ते सहजच वाचायला घेतलं, तो ११ वा धडा आला आणि प्रेमानंद गज्वी हे नाव दिसलं. तसा मी सप्राईज झालो. आणि मग लक्षात आलं कि, ज्या लेखकाचा धडा आपण शाळेत शिकलो त्याच लेखकाला आपण भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या नाटकात कामही केलं... याचा शोध मला लागला. हा माझ्या आयुष्यातला एक सुखद धक्का होता.
चांगले मित्र - मैत्रिणी लाभले
पुढे कॉलेजमधली उत्खनन एकांकिका असो किंवा नांगेली एकांकिका असो यातही मी संगीत संयोजक म्हणून काम केले. मी फक्त माझ्याबद्दलच सांगतोय, याचं कारण म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, ते काम मी प्रत्यक्षात केलं, त्यामुळे त्याचं मला समाधान आहे. दुसरं म्हणजे इतरांच्या अभिनयाची आणि माझ्या संगीत संयोजक म्हणून कामची तुलना कधीच होऊन शकत नाही. शेकडो प्रेक्षकांसमोर उभे राहून अभिनय करणे, आवाज लावणे आणि व्हरांड्यात बसून लॅपटॉपवर संगीत वाजवणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. त्यामुळे सर्वच कलाकारांचं काम नक्कीच श्रेष्ठ आहे यात तिळमात्रही शंका नाही. या सर्व प्रवासादरम्यान अनेक चांगले मित्र - मैत्रिणी लाभले. ज्यात प्रणाली ताई आणि प्रशांत दादा,प्रियंका,सुनील, विरेश, हर्षदा, एकता, वर्षा, उमेश, राकेश ही मंडळी आहेत. या सगळ्या प्रवासाची सुरुवात ज्या ड्रॉयव्हरने करून दिली तो म्हणजे निखिल जाधव. हे सर्व काही घडण्यासाठी तोच निमित्त होता. त्याचे यासाठी हृदयापासून धन्यवाद!!!
उत्सव घरातच साजरे करावे लागणार
कालांतराने अनेक कारणांमुळे जसे अभ्यास, आर्थिक अडचण, वेळ यांमुळे मी नाटकापासून दुरावलो, नाटकात कोणत्याही प्रकारचे काम करणे सोडून दिले ते कायमचेच. कारण मला कुठेतरी जाणीव झाली होती कि, आवड असणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं ते वेगळं... नाटक मला नाव आणि प्रसिद्धी देत होते पण आर्थिकदृष्ट्या मला सारं काही आलबेल वाटत होत. त्यामुळे शेवटी मी नाटकात काम करणं सोडून दिलं ते कायमचच. पण आजही मी नाटकाचा चाहता आहे. नाटक बघणं, त्यावर विचार मांडणं, परीक्षण किंवा समीक्षण करणं आणि नाटकाचा आस्वाद घेणं हे मला आजही आवडतं. हा माझा नाटकाचा प्रवास अगदी छोटा होता, पण जो काहो होता तो माझ्यासाठी खूपच खास होता. प्रवास संपलेला नाही थांबलेला आहे. बघू... काय होतं ते... सध्यातरी आपलंच नाटक होतंय. कोरोना व्हायरसने अवघ्या जगाला घरात कैद केलं, त्यामुळे यंदा बऱ्याच मोठ्या उत्सवांना घरातच साजरे करावे लागणार आहे. आज लाॅकडाऊनचा तिसरा दिवस आहे. कलाकारांनी आणि नाट्य-रसिकांनी घरातच आणि वैयक्तिकरीत्या आजचा " जागतिक रंगभूमी दिन" साजरा करावा. मी नाना पाटेकरांचा "वजूद" चित्रपट बघितला आणि या दिवसाचा आनंद घेतला. आपणही असंच काही करू शकता. आपणांस जागतिक रंगूभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज दिनांक २५ मार्च २०२० लॉक डाऊनचा पहिला दिवस. जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेणाऱ्या करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला, जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडली जावी. खरंतर याअगोदर २२ मार्च रोजी रविवारी पंतप्रधानांनी जो 'जनता कर्फ्यू' घोषित केला होता तेव्हाच त्याची चाहूल लागली होती की पुढे भारतालाही संपूर्णतः लॉकडाऊन करावे लागेल. मंगळवारी रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत आपल्या नेहमीच्या शैलीत 'भाईयों और बहनों' असे म्हणून देश लॉकडाऊन केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागतच आहे, कारण सध्या करोना व्हायरसवर कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. जर या व्हायरसपासून आपल्याला वाचायचे असेल तर स्वतःला या व्हायरसची लागण न होऊ देणे, हा एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी अवघा देश आणि त्यातल्या जनतेने स्वतःला आपापल्या घरातच 'होम क्वॉरंटाईन' (अलगीकरण) करून घेणे आवश्यक आहे. आजच्या घडीला फारच गंभीर होतेय. भारतात आत्तापर्यंत ६४५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना बाधित रुग्ण आहेत, महाराष्ट्रात हा आकडा १२२ पर्यंत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरात ३ लाख ७२ हजार ७५७ जणांना या व्हायरसची लागण झाली असून सुमारे १६ हजार २३१ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अजूनही हा आकडा वाढतच आहे. WHO ने याआधीच करोनाला 'जागतिक महामारी' घोषित केले आहे. चीन आणि इटली सारख्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिका, ब्रिटन यांसारखे समृद्ध देशही करोनामुळे त्रस्त झालेले आहेत. एकूणच संपूर्ण जगात हा रोग झपाट्याने आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 'गुणाकार पद्धतीने' पसरत आहे.
तर आता आपल्या देशाचं काय? आपल्या देशातील केंद्र सरकार, राज्यातील राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्व कोरोनाला आटोक्यात आणू शकतात? आणतील तर कशाप्रकारे आणतील? दुसरे देश काय उपयोजना करतायत? भारत कोणत्या चुका करतोय? देशातील जनता करोनाकडे कशी पाहते? असे अनेक प्रश्न मला पडतात. त्याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला, ते खालीलप्रमाणे -
१) केंद्र सरकारने न घेतलेले गांभीर्य
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या या व्हायरसचा शोध ३१ डिसेंबर २०१९ रोजी लागला. म्हणजे आजपासून जवळपास अडीच महिन्यांपूर्वीच या नव्या व्हायरसची जगाला माहिती झाली. त्यामुळे तेव्हाच जर काही ठोस उपायोजना केल्या गेल्या असत्या तर आज परिस्थिती काही वेगळी असती. एवढ्या गंभीर साथीचा रोग असूनही आतंरराष्ट्रीय वाहतूक चालूच होती आता कुठे ती बंद करण्यात आली आहे. पण याच काळात भारतात करोनाच्या केसेस येऊ लागल्या आणि आज ५४५ करोनाबाधित रुग्ण आहेत.
२) कमी प्रमाणात तपासण्या
भारतात करोना तपासण्या ह्या केवळ लक्षणे असणाऱ्यांना, परेशातून प्रवास केलेल्यांना आणि करोना बधितांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या संशयितांच्याच होत आहे. ही लक्षणे दिसण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीमुळे नकळत अनेकांना याची लागण होऊन संसर्गाची साखळी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे भारताने जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करायला हव्यात. जेणेकरून खरी आकडेवारी कळू शकेल.
३) करोनापेक्षा राजकारणालाच महत्त्व
अवघ्या जगात करोनामुळे माणसं मारली जात आहेत. भारतातही करोना पसरत चाललाय, मात्र मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करण्यात मोठ्या नेत्यांचा वेळ आणि श्रम गेले. या काळात देशासाठी जबाबदार असलेल्या शासन कर्त्यांनी याकडे पूर्णतः लक्ष न दिल्याने आणि निर्णय न घेतल्याने हे प्रकरण वाढले.
४) धार्मिक सण, यात्रा, उत्सव
धर्मापुढे किंवा धार्मिक उत्सव, सण यापुढे करोना फिका पडला. कारोनाची भयंकर साथ असतानाही होळी, धुळवड, राजकीय सभा असे अनेक सार्वजनिक कार्यक्रम होत होते. त्यामुळे गर्दीतून हा संसर्ग अनेकांपर्यंत पसरला. योगी आदित्यनाथ यांचं ताजं उदाहरण आपलाल्या माहिती असेलच.
५) जनता कर्फ्यु
करोनामुळे काहींचे मृत्यू झाले तेव्हा पंतप्रधानांनी रविवारी देशाला सबोधित केले. करोनाशी दोन हात करणाऱ्या विविध यंत्रणांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या - थाळ्या - घंटी वाजवून त्यांचे आभार मानावे असे आवाहन मोदींनी केले. दिवसभर घरात असलेली जनता रस्त्यावर आली आणि अक्षरशः धिंगाणा केला. शेवटी दिवसभराची मेहनत संध्याकाळी पाच वाजता पाण्यात गेली.
६) अपुरी साधने आणि वैद्यकीय सेवा
भारताची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे. यातल्या काही हजार लोकांना जरी करोनाची लागण झाली तर भारताला ते खूप महागात पडेल. चीन प्रमाणे १००० बेडस् असलेले रुग्णालय आपण काही दिवसांत अजूनपर्यंततरी तयार करू शकलेलो नाही. त्यात मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजारामुळे झालेला तुटवडा. तसेच डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी अशा अनेकांना संरक्षक कपडे, हॅण्डग्लोज अशा अनेक साधनांचा तुटवडा आहे.
७) जनतेची असंवेदशीलता
भारतातील जनता ही या व्हायरस बाबत प्रचंड असंवेदनशील आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांचे पालन केले जात नसल्यानेच आज रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. त्यामुळेच सरकारला आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
८) २१ दिवसांत भारत करोनामुक्त होईल का?
नाही!!! केवळ लॉकडाऊन करण्याने भारतातून करोना जाणार नाही. किंवा #GoCorona असे म्हणूनही जाणार नाही. पूजा पाठ आणि गोमूत्र - शेण यांनी तर बिल्कुल नाही. तर त्यासाठी या २१ दिवसांमध्ये ककडकडीत बंद पाळणे आवश्यक आहे. या काळात जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या व्हायला हव्यात. वैयक्तिक स्वच्छतेची आता कायमची सवय लावायला हवी. झोपडीपासून ते टोलेजंग इमारती सगळ्यांचे निर्जंतुकीकरण व्हावे. जनतेच्या आरोग्याविषयी मोठे निर्णय घेऊन ते अमलात आणणे गरजेचे आहे. सोबतच आतापासून अशा साथींच्या रोगांसाठी रुग्णालयांची संख्या आणि क्षमता वाढवण्याची गरज आहे. शाळेच्या पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे आणि प्रत्यक्ष कृती करवून घेणे आणि त्याची सवय लावणे आवश्यक आहे. जेणेकरून खोकताना आणि शिंकतांना तोंडावर रुमाल ठेवला पाहिजे हे सांगण्याची गरज भासणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे जनजागृती आणि जनतेची संवेदनशीलता. जनतेने अशा आपत्कालीन परिस्थितीत जर सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तर ते देशासाठी, समाजासाठी आणि स्वतः साठीही घातकच ठरेल. जनतेची पक्की साथ असेल तर येत्या २१ दिवसांत भारतात करोना व्हायरस शेवटच्या घटका मोजत असेल...१००%
९) चांगलं काम कोण करतंय? केंद्र की राज्य?
वैयक्तिकरित्या सध्याच्या घडीला मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन. आत्तापर्यंत त्यांनी परिस्थिती खूप चांगल्याप्रकारे हाताळली आहे. अनेकवेळा पत्रकार परिषदेतून प्रश्नांची उत्तरे दिली, फेसबुकच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली. जनतेला गोंधळात किंवा संभ्रमात टाकणारे कोणतेही वक्तव्य केले नाही. करोनाबाबत सतत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. सोबतच शासकीय यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करताना दिसतायत. त्यामुळे एकूणच सध्यस्थिती पाहता महाराष्ट्र सरकार करोनाबाबत नक्कीच चांगले काम करत आहे. आपण सर्वांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशा करूयात की लवकरच सगळं काही ठीक होईल.
टीप: वरील लेख मी माझ्या दैनंदिन अनुभवातून, निरिक्षणातून आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीने लिहिला आहे. आपले अनुभव किंवा मते यापेक्षा वेगळी असू शकतात. आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.