माझ्या सर्व मित्र, मैत्रीण, शिक्षक आणि प्रियजनांना सप्रेम नमस्कार...
माझ्या प्रिय हितचिंतकांनो डिसेंबर महिना संपत आला होता. नवीन वर्ष म्हणजेच २०१९ यायला अवघे १० दिवस शिल्लक होते. माझ्या मनात सहज विचारचक्र सुरु झाले. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः नव्वदच्या दशकात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्याची आणि नववर्ष साजरा करण्याची पद्धत पूर्णतः वेगळी होती. तेव्हा मोबाईल, इंटरनेट ही माध्यमे फक्त श्रीमंत लोकांकडे असत. त्यामुळे बहुतेक लोक संपर्क साधन्यासाठी एकमेकांशी पत्रव्यवहार करत असत. नवीन वर्षाला एकमेकांना भेटणे, परिवार, मित्र यासोबत आनंदाने नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जात असे. कारण "सुरुवात चांगली, तर शेवटही चांगला" अशी म्हण प्रचलित आताही आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी ला सर्वजण मागील गोष्टी विसरून नव्याने सुरवात करत.
आजच्या आधुनिक काळात मोबाईल,संगणक, इंटरनेट, सोशल मिडिया इत्यादी माध्यमांनी जग जवळ आणले पण माणसं मात्र दुरावली. तुम्ही दररोज एकमेकांना व्हाट्सएप्प, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांतून शुभेच्छा पाठवतात. दररोज इतके मेसेजेस येतात कि ते आता कंटाळवाणी वाटू लागले आहेत. प्रत्येक सणाला तर सोडा पण दररोज हजारो मेसेजेसचा महापूर येतो. त्यामुळे या अशा भावनाहीन मेसेजेस आणि शुभेच्छांचा मलातरी कंटाळा आलाय. त्यामुळे या वर्षी म्हणजेच २०१९ च्या नववर्षाच्या शुभेच्छा मी माझ्या प्रियजनांना जरा हटके पद्धतीने द्यायचे ठरवले. आणि लगेच "पत्र" या माध्यमाची आठवण आली. मग काय... गेलो पोस्टात आणि आणली ६०-७० पोस्टकार्ड्स. एका पोस्टकार्ड्ची किंमत फक्त ५० पैसे. आणि सर्वांना पत्र पाठवण्यासाठी त्यांच्या राहत्या पत्त्याची गरज होती. मग या ना त्या कारणाने सर्वांकडे कॉलेज आयडी किंवा पत्ता मागितला. ज्यांनी विश्वास ठेवून मला आयडी आणि पत्त्ते पाठवले त्या सर्वांनाच मी मनापासून पत्र लिहून माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मी स्वतःच्या हाताने लिहिलेली जवळपास ४५ पत्र पोस्ट केली. पण अनौपचारिक पत्र ही ४-५ दिवस किंवा आठवड्याने पत्त्यावर पोहोचतात. मी २६ डिसेंबर २०१८ ला पोस्ट केलेली पत्र काहीना २ जानेवारी, काहीना ४,५,८, जानेवारीला पोहोचली. पण विश्वास ठेवा भले त्यांना माझे पत्र उशिरा मिळाले , पण ते माझ्या अशा प्रकारे शुभेच्छा देण्याने खूप खुश झाले. जवळपास सर्वांनाच त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पोस्टकार्ड म्हणजेच पत्र लिहून शुभेच्छा दिल्या अशा त्यांच्या भावना होत्या. माझ्या या उपक्रमामध्ये लिहिण्यची जरा मेहनत होती पण त्यामुळे माझ्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर मी असा आंनद पाहू शकलो ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची आहे.
पण शेवटी कोण काय जाणे? मी लिहिलेल्या पत्रांपैकी अनेक पत्र त्यांना पोहोचलीच नाहीत. त्यामुळे मी आणि ते दोघेही उदास झालो. आज मार्च महिना संपत आहे. ज्यांना माझे पत्र मिळाले नाही त्यांना ती पत्र माझ्या या ब्लॉगवर वाचायला मिळेल. मी लिहिलेल्या सर्व पत्रांचे फोटोज काढून ठेवले होते. त्यामुळे सर्व पत्र इथे तुम्हाला मिळतील. खरंतर एवढी पत्रे उपलोड करून हो पोस्ट करत असताना मला खूप कंटाळा येतोय. पण काहींना पत्र वाचायचीच आहे त्यासाठी मी ही पोस्ट करत आहे. त्यामुळे माझ्या या ब्लॉगवर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात अशी नम्र विनंती.
|
कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली पोस्ट शाखेतून याच पत्रपेटीतून मी आपणा सर्वांना पत्र पाठवली होती. |
ज्यांना माझे पत्र मिळाले त्या काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया ...
|
शुभम, नाशिक |
|
आकाश, उल्हासनगर |
|
प्रणाली ताई, कल्याण. |
|
#प्रतिक्रिया |
|
रुचिका,कल्याण |
|
#प्रतिक्रिया |
|
निलेश कारभारी सर,कल्याण. |
माझ्या या उपक्रमला टाईमपास म्हणा किंवा इतर काही... पण यातून मला समाधान आणि माझ्या प्रियजनांना नक्कीच छान वाटले. मी माझ्या पत्रांद्वारे माझ्या भावना त्यांच्या पर्यत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
- धन्यवाद.