लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Thursday 26 December 2019

सर्जिकल स्ट्राईक इन माय कॉलेज लायब्ररी....


      माझ्या कॉलेजची लायब्ररी... म्हणजेच ग्रंथालय,वाचनालय किंवा अभ्यासिका. नेहमप्रमाणेच अगदी शांत होती. ज्युनिअर - सिनिअर विदयार्थी होते, लायब्ररीअन सर होते, मुले आणि मुली सर्वजण होते. कुणी मनापासून वाचत होते तर कोण पोपटपंची किंवा घोकमपट्टी करत होते. कोण परीक्षेत पहिला नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तर कोण केटी  सोडवण्यासाठी झटत होते. सायन्स,कॉमर्स, आर्ट्स, पत्रकारिता, कायदा अशा अनेक शाखेतील विद्यार्थी आपापल्या अभ्यासात मग्न होते. त्यातल्या काही नमुन्यांचे अभ्यासात कमी आणि "तिच्या"कडेच जास्त लक्ष होते. थोडी जरी चुळबुळ झाली किंवा आवाज झाला तर लायब्ररीअन सर डस्टर टेबलावर आपटून त्यांना शांत राहण्याची ताकीद देत होते.  एकूणच माझ्या कॉलेजच्या लायब्ररीत नेहमीप्रमाणेच शांतता आणि शिस्त होती.
     लायब्ररीत लोकं अभ्यास करण्यासाठी जातात. पण तो अभ्यास करण्यामागे प्रत्येकाचा काही ना काही हेतू, उद्देश अथवा स्वप्नं असतं. आपण अभ्यास करून चांगलं शिकून मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळेच ग्रंथालय हे आपल्या स्वप्नपूर्तीला बळ देणारे पवित्र मंदिरच असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
     माझ्या कॉलेजची लायब्ररी म्हणजे असंच एक पवित्र मंदिर. हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासरुपी तपश्चर्या याच लायब्ररीत केली. अनेकांनी आपली स्वप्ने पूर्ण केली. याच लायब्ररीत दररोज प्रमाणे सर्वकाही सामान्यपणे दिनक्रम चालू होता. पण... पण... आज असं काही घडणार होतं जे कधीच इतिहासात घडलं नाही.
      आज अचानक कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू झाला. मुले - मुली इकडे - तिकडे पळत होते. काही मुली रडत होत्या तर मुलेही घाबरली होती. कोवळ्या वयातली पोरं ती... कसेबसे स्वतः ला आणि आपापल्या मित्रांना सावरत  होते. आमचे वर्ग शिक्षक, सर, मॅडम, कॉलेजातले शिपाई काका, झाडूवाल्या मावशी आणि मुख्याध्यापक सुद्धा आम्हाला सांभाळण्यासाठी जिवाचं रान करत होते.
     नेमकं असं काय घडलं होतं की अचानक  एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तर त्याचं उत्तर आहे - कॉलेजवर करण्यात आलेला सशस्त्र हल्ला...
      ऐकण्यात आलं की, अचानक पोलिसांच्या वर्दी मध्ये  काही सशस्त्र दहशतवाद्यांनी शेकडोंच्या संख्येने महाविद्यालयावर ताबा मिळवला आहे आणि आता ते दिसेल त्याला अमानुषपणे मारहाण करत आहेत.  प्रत्येकाकडे अश्रुवायु बॉम्ब, जाड लाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, जॅकेट, बूट, कम्युनिकेशन साठी वॉकी-टॉकी, बंदुका सर्वकाही होते. एका क्षणासाठी विचार आला की  एवढ्या मोठ्या प्रमाणत दहशतवादी आले कुठून आणि तेही पोलिसांच्या वेशातच का आले असावे? तेव्हा कळले ते दुसरे तिसरे कुणीच नसून खरोखरचे पोलीसच होते. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने त्यांना आदेश दिले होते. कोणत्यातरी कायद्या विरोधात शांतपणे पण तीव्र विरोध आम्ही करत असल्याने जणू जनरल डायरने आम्हा विद्यार्थ्यांना बदडण्याचे आदेश  दिले होते. त्यानुसारच पोलिसही आम्हा  विद्यार्थ्यांवर इंग्रज सैनिकांप्रमाणे तुटून पडले आणि लाठ्या-काठ्या घेऊन, बुटाच्या लाथा, बंदुकीचे दांडे, चामड्याचे पट्टे इत्यादींनी मारत सुटले. हा भयंकर अत्याचार बघून कोवळ्या वयातली ती पोरं घाबरली आणि स्वतःला वाचवण्यासाठी कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन लपली. काही जण तर टॉयलेट मध्ये लपले. पोलिस आता अजुनच आक्रमक झाले होते. "त्या कायद्याचा विरोध" करणाऱ्या प्रत्येकाला दडपून टाकण्यासाठी दिसेल त्याला मारहाण करून त्याला तुरुंगात टाकण्यात येत होते.
      आता ते हळू - हळू आमच्या दिशेने येऊ लागले. आम्हीही इतरांप्रमाणेच लायब्ररीत घुसलो आणि आतून दरवाजाच्या सर्व कड्या बंद केल्या.  आतमध्ये आधीच सर्वजण घाबरलेली होती. अशातच त्यांनी दरवाजावर दस्तक दिली आणि ते जोर - जोरात दरवाजा आपटत दरवाजा खोलण्यासाठी आम्हाला धमकाऊ लागले. भितीपोटी कुणीही दरवाजा उघडला नाही. इतक्यात  एका खिडकीतून काहीतरी वस्तू त्यांनी फेकली. क्षणार्धात सगळीकडे धुरच - धूर पसरला. आमच्या डोळ्यांची प्रचंड जळजळ व्हायला लागली श्वास घ्यायलाही त्रास होत होता, डोके प्रचंड दुखू लागले. पोलिसांनी अश्रू गॅसचा वापर केला होता. दरवाजा खोला... आम्ही आत आलो तर कुत्र्यासारखे मार मारू... एकेकाची मस्ती उतरवतो... देशद्रोही कुठले...  असं म्हणत शेवटी त्यांनी ग्रंथालयाचा दरवाजा तोडलाच. ते आत आले. दिसेल त्याला लाथा - बुक्क्यांनी, काठ्यांनी, बंदुकीच्या बटीने  मारले. माझ्या एका मित्राला काठीचा जोरदार मार लागल्याने त्याचा हात माझ्यासमोर तुटला. एकाचे डोके फुटले. मलाही पाठीला आणि पायाला जबर मार लागला होता. आम्हाला वाचवण्यासाठी आलेले आमचे सर आणि शिपाई काका यांनाही मार लागला. एवढी क्रूरता आम्ही कुणीच आजपर्यंत पहिली अथवा अनुभवली नव्हती. त्यामुळे आम्ही प्रचंड त्रासात होतो,घाबरलेले होतो. चारही बाजूंनी विद्यार्थ्यांचा रडण्याचा आवाज येत होता.  कॉलेजची ती शांत लायब्ररी आज  मात्र अतिशय अशांत झाली होती.  सगळीकडे रक्ताचे डाग पसरलेले होते. लायब्ररी एखादा कत्तलखाना वाटत होती. टीव्ही वर बातम्या बघून काळजीपोटी घरच्यांचा  फोन आला. मी गुपचूप पणे लपून अगदी हळू आवाजात आईशी बोलत होतो. मी सुखरूप आहे म्हणून तिला दिलासा देत होतो. इतक्यात माझ्या समोर दोन पोलिस आले. त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेऊन तो फोडून टाकला. नंतर मला आणि माझ्या मित्राला बेदम मारहाण करून दोघांनाही फरफटत पोलिसांच्या गाडीत डांबले, ज्यात अगोदरच डझनभर विद्यार्थ्यांना गुरा - ढोरांप्रमाणे अमानुष मारहाण करून कोंबले आणि मग पोलिस स्टेशनला नेले. तिकडे गेल्यावर आम्हा प्रत्येकाला नाव, पत्ता, वैगेरे विचारण्यात आले. आणि नंतर एकेकाला अर्धनग्न करून सच बोल पट्ट्याने,काठीने जोरदार मारहाण करण्यात आली. याचदरम्यान मीही प्रचंड तणावात होतो. मला आणि माझ्या मित्राला वेगळे ठेवण्यात आले होते. पोलिस मारत तर होतेच पण सोबतच शिव्याही देत होते. शारीरिक आणि मानसिक यातना सर्व आंदोलनकर्त्यांना देण्यात येत होत्या.
        माझ्या समोरची धक्कादायक गोष्ट म्हणजे माझेच दोन मित्र एकाचं नाव हर्षद तर दुसऱ्याचं नाव अशरद... दोघेही या पूर्ण प्रकारापासून अनभिज्ञ होते. कोणता कायदा? कसला विरोध? इत्यादींबाबत त्यांना कल्पनाही नव्हती. तरीहि दोघांना मारण्यात आले. "विशेष करून अशरद" ला पोलिसांनी इतके मारले की तो बेशुद्ध होऊन अर्धमेला झाला. तिकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मुलींनाही महिला पोलिसांतर्फे प्रचंड मारहाण करण्यात आली.
     हे सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर घडत होते. माझे प्रिय मित्र,मैत्रिणी यांना जबर मार बसला पण सैन्य शक्तीपुढे, शस्त्रांपुढे, आम्ही सामान्य विद्यार्थी म्हणजे  गिधडापुढे चिमणी वाटत होतो. त्यांच्याकडे मजबूत बांधा, आधुनिक शस्त्रे आणि आमच्याकडे पुस्तके आणि मेंदू असा तो सामना होता. त्यांच्यापुढे आमचा निभाव लागणं अशक्यच....
      असं असूनही डोक्यात अनेक विचार घर करत होते. शेकडो प्रश्नांनी मेंदू गजबजून डोक्याचा नसा फडफड उडत होत्या. जणू काही डोके फुटेल की काय असं वाटतं होतं.
आपल्यासोबत असं का झालं? आपली चूक काय?  आपण असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे की आपल्याला आहे मारहाण करण्यात आली? सरकार विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह आहे का? आंदोलन करणाऱ्याला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात येते? रक्षणकर्ते जर भक्षक बनले तर मदत कुणाकडे मागायची? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे की, त्यांना लाठीचार्ज आदेश देणाऱ्या नेत्यांकडे?
कुठे आहे कायदा? कुठे आहे सरकार? कुठे आहे माणुसकी? कुठे आहे देशभक्ती?
      काही क्षणासाठी वाटलं की आपण नक्की भारतातच राहतोय ना की पाकिस्तान, अफगानिस्तान, सीरिया, पॅलेस्टाईन की हिटलरच्या जर्मनीत....???
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
जय हिंद!!!
      शाळेत अगदी बालवाडीपासून म्हणत आलेलो प्रतिज्ञा आजही संपूर्ण तोंडपाठ आहे. या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या विरोधात मी कधीही गेलो नाही याची मला १००% खात्री आहे.
पण, तरीही आज माझ्यासोबत जे घडले त्याने मी फार दुःखी आणि हताश होऊन खचून गेलो आहे. आता या देशाची, या सरकारची, पोलिस प्रशासनाची, आणि अगदी लोकांची सुध्दा भीती वाटायला लागली आहे. देशभक्ति च्या नावावर देशाला आणि देशातील प्रत्येकाला तोडण्याचे काम सुरू आहे. खरंच मी हताश झालो आहे.
      हताश आणि हतबल होऊन निर्णय घेतला की हा देशच सोडावा. अशा एका ठिकाणी जावं की जिथे जात, धर्म आणि देशभक्ती च्या नावाखाली लोकं एकमेकांचा जीव घेणार नाही. सरकार आणि प्रशासन हे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे संरक्षण करेल.          पण... काहीही झालं तरी मी ह्याच मातीतला. हा देश माझा. लोकं माझी. मी या देशाचा एक नागरिक. हृदय आणि मन देश सोडायला तयार नव्हतं. शेवटी माझ्या मेंदूने माझ्याच मनाचा आणि हृदयाचा खून केला आणि म्हणाला यापुढे सुखात जगायचं असेल तर इथून निघ.... मग शेवटी ठरलं... देश सोडायचा. अगदी कठोर अन् कडवट निर्णय.
      देश सोडायची तयारी करू लागलो. म्हटलं जाता - जाता शेवटचं आपल्या मित्रांना, प्रियजनांना भेटून जावं. पण काय करणार? सुरक्षेच्या नावाखाली सरकारने दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवेवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. त्यातल्या त्यात परिसरात कलम १४४ लागू केले होते. कसेबसे लपून छपून ३-४ मित्रांना भेटलो. सगळे अखेरचे गळ्यात भेटलो खूप रडलो. मग स्वतःला सावरत मी आणि माझा परिवार गुपचूप बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला. बाहेर पडणार इतक्यात दरवाजावर दस्तक्त झाली. आईने दरवाजा उघडला तसे ५-६ सशस्त्र सैनिक घरात घुसले. त्यातला एकजण माझ्याकडे आला. त्याच्या हातात माझा फोटो आणि इतर बरीच माहिती होती. तो म्हणाला तू देशद्रोही आहेस. सरकारला विरोध करून तू मोठा गुन्हा केला आहे. याची शिक्षा तुला मिळणारच असं म्हटलं संपूर्ण परिवारासमोर त्याने माझ्यावर तीन - चार गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात माझ्या मृत फोटोसह बातमी आली की, - "देशाच्या सुरक्षिततेला घातक असणाऱ्या देशद्रोह्याचा पोलिसांनी केला एन्काऊंटर..."
      इकडे माझ्या अंत्यविधीसाठी मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची अट सरकारने घातली. तेही पोलिस बंदोबस्तात. जास्त रडायचे नाही, हंगामा करायचा नाही अशी ताकीद एक दिवस अगोदरच सर्वांना देऊन ठेवली होती.
    माझ्या मृत शरीरावर डोके ठेऊन आई रडत होती. ऊठ रे सोन्या म्हणून माझ्या छातीवर डोके ठेवून हाका मारत होती....
   आणि अशातच मी उठलो!!! होय मी उठलो. डोळे उघडले. माझी झोप मोड झाली होती आणि हे वाईट स्वप्नही शेवटी एकदाचे संपलेच!...

मी शरीराने आणि मेंदूने आजही जिवंत आहे याची सर्वप्रथम खात्री झाली.

मी बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या भारतात राहतो याचीही जाणीव झाली.

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय याचा गर्व झाला.

मी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणाऱ्या देशात राहतोय याचा अभिमान झाला.

मी महाराष्ट्राच्या "सदरक्षणाय खलनिग्रहणाय " हे ब्रीदवाक्य असलेल्या मजबूत खाकीच्या सुरक्षेत राहतो हा विश्वास झाला.

बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी आज जिवंत आणि स्वतंत्र आहे याची पुन्हा एकदा प्रखर जाणीव झाली. बाबासाहेबांच्या फोटोपाशी गेलो. अतिशय आदरपूर्वक विनम्रतेने महामानवाला अभिवादन केले आणि कॉलेजला निघालो....
.
.
.
#अक्षय्यनामा✍️


New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...