गावाकडची रात्र
हाताने विणलेली लाकडी चारपाई
त्यावर पांघरलेली कापसाची मऊ गादी
हातानेच बनवलेली गोधडी अन् उशी
सर्व अंथरूण असे जणू काही बाळाची झोळी....
या झोळीत टाकूनी अंग मीही होतो चिमुकले बाळ
राहत असलो शहरात तरी कशी तुटेल गावाकडची नाळ
झोळीत झोपलेल्या मज मोठ्या बाळाला नाद या गावाचा
आभाळाची चादर, चंद्राचा मंद प्रकाश, रातराणीचा सुगंध
झाडांतून जन्मलेली शुद्ध थंड वाहणारी हवा एसीलाही लाजवते
मला मात्र लहान बाळाप्रमाणे अगदी साखर-झोपेत निजवते....
गावाकडची ही शांत रात्र गोंधळलेले मनही शांत करते
शहरात राहिलेली अपूर्ण झोप गावात येवून पूर्ण होते
घराच्या अंगणातल्या चारपाईवर टाकून अंग मी बघतो त्या चंद्राला
त्याच्या त्या मंद प्रकाशने झोप येते जणू चिमुकल्या बाळाला
रातराणीच्या फुलांचा सुगंध एक वेगळीच भूल देतो
थंड झालेल्या वातावरणात जणू काही अत्तर शिंपडतो....
शांत अन् थंड वातावरणात रातकिडा किर्र - किर्र करतो
नंदीच्या गळ्यातील घंटा ही अधून - मधून सौम्य असे संगीत देते
शहराच्या तुलनेत गावाकडची रात्र निरोगी अन् सुखकर असते
पण ही गावातली रात्र प्रत्येकाच्याच नशिबी नसते...
अशी ही गावाकडची रात्र खूप वर्षांनी मिळाली
आज मन भरून आभाळात पहायचं आहे त्या चंद्राला लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांशी गप्पा मारायच्या आहे
या सुंदर गावातील सुंदर रात्रीत गाढ झोप घ्यायची आहे....
शहरातल्या प्रत्येकाने एकदा गावाकडची रात्र अनुभवावी
गावाकडे येऊन अंगणात चारपाई टाकून एक झोप घ्यावी
चंद्र,चांदणी,रातराणी यांचा एकत्रित आस्वाद घेऊन काही क्षण विश्रांती घ्यावी....!
click for social media contacts:
#अक्षय्यनामा #गावाकडच्या_गोष्टी #मनातल्या_गोष्टी #परसामळ #शिंदखेडा #धुळे #शिघ्रकविता #साखरझोप #goodnight
Mast akki
ReplyDelete