महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!
पावसाळा आला, पाऊस सुरू झाला
मेघ गरजले, वीजा कडाडल्या
आधी मुंबईची तुंबई झाली
लाईफ लाईन सगळी पाण्याखाली गेली
मुंबईचा प्रथम नागरिक म्हणाला पूर आलाच नाही
कारण त्याचा मुलगा गटारात पडून हरवला नाही...
लोक ढिगाऱ्याखाली दबून मेले, कुणी मॅनहोल मध्ये गडप झाले
भर पावसातही अश्रू अनावर झाले, सरकार मात्र झोपेतच राहिले
कोल्हापूरची महालक्ष्मी मी 14 तास पुरात अडकली
प्रशासनाला मात्र उशिराने जाग आली
स्थानिकांनी माणुसकी दाखवली म्हणून एक्सप्रेस पुरातून सुटली...
दरवर्षी मुंबापुरीची तुंबापुरी होते, पण जनता याला फक्त नैसर्गिक आपत्तीच समजते
मग मुंबईकरांचा तथाकथित मुंबई स्पिरीट जागा होतो,
अन् सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाकडे तो सहज कानाडोळा करतो
मुंबईकरांच्या ह्याच भोळेपणाचा फायदा सत्ताधारी घेतो
म्हणूनच काहीही झालं तरी पुन्हा तोच निवडून येतो...
मुंबईकरांना असले अंध स्पिरीट महाग पडणार आहे,
नेत्यांना काही फरक नाही, ते त्यांच्या महालात सुरक्षित राहणार आहे
दररोज मरणयातना सहन करत मुंबईकर पुन्हा उभा राहणार आहे
आमची मुंबई - आमची मुंबई करत तो स्वतः मात्र मुंबईतूनच हद्दपार होणार आहे
कारण तो त्याच लोकांना निवडून देणार आहे,
जे अनेक वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना गृहितच धरणार आहे...
असो... यंदाही मुंबईने कसाबसा पावसाळा सहन केला
पण अर्धा महाराष्ट्र मात्र महापुराने वेढला गेला.
कोकण, रायगड,सातारा, सांगली, कोल्हापूर.. सगळीकडे पूरच पूर...
अनेक जीव जात होते, संसार उध्वस्त होत होते
आपले मुख्यमंत्री महोदय मात्र महाजनादेश यात्रा करत होते
जलसंपदा मंत्री पूर पर्यटन करत होते, सेल्फी काढत होते
महापुराचा आढावा सोडा ते तर नौकाविहार करत होते...
पूर परिस्थिती हाताबाहेर गेली, मग राज्याच्या राजाला जाग आली
राजाने हवेतूनच पूर बघितला, त्याच्या पायाला पाण्याचा साधा स्पर्शही नाही झाला
देशातल्या प्रत्येक राज्याच्या मदतीला माझा महाराष्ट्र धावून गेला,
पण आज शेजारचा कर्नाटकही आपल्या मदतीसाठी उदासिन झाला
महाराष्ट्र जणू पोरकाच झाला
केंद्र आणि राज्य दोघांसाठी परका झाला....
राज्यात आलेला महापूर सत्ताधार्यांसाठी प्रचाराचा नवा मार्ग ठरला
मोफत गहू - तांदूळ देऊन त्यावर पक्षाचा शिक्का मात्र मारला.
पुरात मरण पावलेल्या आई - बाळाच्या मृतदेहासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देणारे असंवेदनशील नेतेही दिसले,
पूरग्रस्तांच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसणारे खलनायकही दिसले....
अंध-अपंग,बहिऱ्या सरकारला माध्यमांनी अखेर जागे केले.
कर्तव्य बजावताना सांगलीच्या कुलदीप मानेला अश्रू मात्र अनावर झाले
अर्धा महाराष्ट्र बुडत होता, रडत होता, मरत होता आणि पंतप्रधान मात्र 370 च्या नावाखाली देशाला संबोधन करत होता.
सगळीकडे अंधार, निराशा आणि उध्वस्त झालेला संसार...
असा माझा महाराष्ट्र संघर्ष करत होता...
जाती-पाती भांडण-तंटे सर्व काही सोडून एकत्र येण्याचे आवाहन करत होता...
अशात एक "माणूस" नावाचा नायक मदतीला धावून आला
माणसाचं शरीर असलेल्या त्या नायकातून जणू देवच बाहेर आला.
माणुसकीचं शस्त्र काढून त्या नायकाने केला संकटांवर प्रहार
पूरग्रस्तांना झाला जणू देवाचाच साक्षात्कार...
मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, गिरिजाघर सगळेच देव बुडले होते
पण वर्दीतले देव मात्र सर्वांनाच वाचवत होते.
माणुसकी या एकाच धर्माचे ते सर्व देव होते
कारण ते भारतीय जवान होते.
माणूस असो वा प्राणी सर्वांनाच ते वाचवत होते,
स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटाशी ते लढत होते....
जवानाच्या पाया पडणारी बोटीवरची ती स्त्री असो,
जवानांचे औक्षण करणारी माता असो,
व्हीलचेअरवरची अपंग आजी असो,
हृदयरुग्ण असलेले आजोबा असो,
बोटीवरचे ते हसणारे बाळ असो,
आठ महिन्यांची गरोदर महिला असो,
माकड असो, कुत्रा असो, गाय, म्हैस किंवा मांजर असो
या सर्वांनाच जीवनदान देणारे लोक माणुसकीचे खरे दूत होते
कारण, ते भारतीय जवान होते....
या महापुरात एक गोष्ट मात्र चांगली झाली,
जात-पात ही जणू पुरात वाहूनच गेली.
माणुसकीचा पुन्हा नवजन्म झाला,
माझा महाराष्ट्र खूप दिवसांनी पुन्हा पुरोगामी दिसला.
हिंदू मशिदीत जेवला, मुस्लिम मंदिरात जेवला,
सर्व धर्मियांनी विहारात आसरा घेतला, श्रीमंत - गरीब एकाच जागी राहिला....
अनेक संकटे आली महाराष्ट्रावर... या महाराष्ट्राची मान कधी झुकू देणार नाही...
माणसं आहोत आम्ही, माणुसकी कधी मरू देणार नाही...
असेल वेगळी आमची जात, धर्म, पंथ, नेते व विचारसरणी,
पण आज कळलं संकटाच्या वेळी कामी फक्त येते माणुसकी....
या महापुरातून महाराष्ट्र सावरेल याची मला खात्री आहे.
पण येथे जन्मलेल्या माणुसकीच्या संगोपनाची जबाबदारीही आपलीच आहे!!!
शपथ घेतो शिवरायाची,
शपथ घेतो महाराष्ट्राची,
शपथ घेतो फुले, शाहू, आंबेडकरांची...
शपथ घेतो महाराष्ट्र धर्माची,
शपथ घेतो भारतीयत्वाची,
आणि शपथ घेतो माणुसकीची...
माणूस आहे माणसासारखाच वागणार.
मानवधर्म जपणार, मानवधर्म वाढवणार....
असेल मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, ख्रिश्चन, मराठा, बौद्ध,
महार, मातंग, साळी, माळी, कोळी, आगरी, न्हावी, शिंपी, आदिवासी किंवा अजून काही....
पण मी प्रथम भारतीय आहे... आणि एक मानव आहे...
कारण मी पाहिलं आहे त्या वर्दीतल्या देवांना...
जे कोणत्या जातीचे - होते ते मलाही माहीत नाही.
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे रक्ताची नाती नसतानाही मदत करत होते
मी पाहिलं आहे त्या तरुणांना, जे आपल्या पूर्ण शक्तीने समाजकार्य करत होते
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे देवापेक्षा मोठं काम करत होते.
माणुसकी ही ईश्वरसेवा, माणुसकी हा धर्म, माणुसकी हे परम कर्त्यव्य
माणुसकी ही राष्ट्रभक्ती, माणुसकी ही सेवा...
माणूस आहे माणसाप्रमाणेच वागणार,
स्वतःच्या बुद्धीचा आणि आत्म्याचा आवाज आता मीही ऐकणार...
माणुसकीसाठी, महाराष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी ,स्वतःसाठी मला माझा योग्य राजा निवडायचा आहे!!!
आता नको मला दुष्काळ,
नको महापूर,
नको बेरोजगारी,
नको जातीयवाद,
नको मुस्कटदाबी,
नको हिटलरशाही...
मला हवी लोकशाही...
मला हवं स्वराज्य,
मला हवी स्वच्छ हवा,पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,नोकरी
मला हवं संवेदनशील प्रशासन... आणि जाणता राजा!!!
यासाठी लढण्याची तयारी हवी,
एकाला दुसऱ्याची अन् दुसऱ्याला तिसऱ्याची साथ हवी.
यशस्वी होईल लोकशाही, नांदेल पुन्हा माणुसकी,
जेव्हा - जेव्हा आयुष्यात येईल प्रवास महापुरातला...
मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!
click for social media contacts: