लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Tuesday, 25 August 2020

प्रेम कसं होतं? एक आठवण...

     प्रेम कसं होतं?... २५ ऑगस्ट २०१७ ला ही कविता लिहिली होती. तेव्हा मी BMM च्या फर्स्ट ईअरला होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं अतिप्रेम झालं की ते प्रेम कागदावर उमटलं. कविता ज्यांना ज्यांना पाठवली सर्वानांच ती आवडली. त्याच वर्षी म्हणजे २०१७ ला मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. त्यात अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितेचं वाचन करून त्यांना आदरांजली देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी विज्ञान,कला वाणिज्य, पत्रकारिता अशा सर्व शाखेचे जवळपास २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या कवितेचं वाचन झालं. तेव्हा 'BMM मधून कोण नाही का कविता करणारा?'' असं सूत्रसंचालन करणाऱ्या दीपक गवादे सरांनी विचारलं. आम्ही सगळे जण एकमेकांची तोंडं पाहू लागलो. माझी कविता मित्रांना माहित होती. तेवढयात माझा वर्गमित्र प्रसादने नंदू सरांना सांगितलं कि सर अक्षयने लिहिली आहे कविता. मला जाम अवघडल्यासारखं झालं. कारण ती कविता प्रेमावर होती आणि मी इतका लाजरा... त्यात ती सर्वांसमोर वाचायची, सगळे हसणार, मजा घेणार याची मला भीती... नंदू सरांनी मला जा पुढे कविता वाच म्हणून हट्टाने आणि आदेशाने सांगितलं. मी घाबरत घाबरत माझ्या मोबाईलवर माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढे गेलो... दीपक सरांना विनंती केली कि,  सर मला कविता वाचता येणार नाही प्लीज तुम्हीच वाचा... असं सांगून मी माझा मोबाईल दीपक सरांकडे दिला आणि पटकन माझ्या बेंचवर बसलो. यावेळी माझ्या हृदयाचे ठोके भयंकर वाजत होते. कारण मी कुणावर प्रेम करतो हे या कवितेतून स्पष्ट कळत होतं. 
        तर दीपक सरांकडे मोबाईल दिला, त्यांनी माझ्या कवितेचं नाव वाचूनच कवितेचा आशय समजून घेतला. आणि जसं कवितेचं नाव वाचलं तसं सर्वजण ओ... म्हणून दाद देऊ लागले. दीपक सर भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कवितेचं वाचन कौशल्य खरंच अप्रतिम आहे. जेव्हा दीपक सरांनी कवितेचं वाचन सुरु केलं तेव्हा प्रत्येक ओळीवर सर्वजण दाद देत होते, हसत होते, माझ्याकडे बघत होते आणि मी मात्र खूपच नर्व्हस होतो. कारण ती कविता म्हणजे तिला जाहीररीत्या प्रपोजच होता. बोल दीपक सरांचे आणि शब्द माझे. माझ्या कवितेचं रसग्रहण आणि सादरीकरण ज्याप्रकारे दीपक सरांनी केलं ते खूप अप्रतिम होत. प्रत्येकाला ही कविता रिलेट करत होती. थेट हृदयातून आलेल्या या कवितेत माझ्या १००% खऱ्या आणि निखळ भावना होत्या. कवितेच्या शेवटच्या कडव्यात एक ओळ होती ज्यामुळे सर्वजण खळखळून हसले ती ओळ अशी -  ''प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.'' बालिश वाटते ना? मलाही आता वाटते. पण तेव्हा हीच फीलिंग होती. आता कळतंय आपण किती बालिश होतो ते... पण काहीही असो जे वाटलं ते लिहिलं... माझ्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट झाला. आणि निघताना मला सगळेजण दाद देत होते, तारीफ करत होते, अभिंनदन करत होते... मी फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरचे सिनिअर विदयार्थीं मला अभिनंदन करायला आले. दीपक सरांनी तर माझं कौतुक केलं. कारण पत्रकारितेचा विदयार्थी म्हणून माझा स्वतःचा ब्लॉग आहे आणि मी काहीतरी लिहितोय यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. सोबतच थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना ''शिका काहीतरी यांच्याकडून'' असं म्हणत त्यांना हटकलं. सरांनी केलेल्या कवितेच्या वाचनामुळे मला कॉलेजात जरा वेगळी ओळख मिळाली आणि मी काही दिवसांचा सेलेब्रिटी झालो होतो. पण.... 
       पण... जी कविता सर्वांनां आवडली, जी कविता मी तिला स्वतः पाठवली होती, त्याच मुलीने मला विचारलं... ''अक्षु, कुणासाठी लिहिलीय कविता?'' आईशप्पथ  काळजाची तार छेडणं काय असतं हे त्याक्षणी कळलं. नेमकं ती माझ्या बाजूला बसली होती. बाजूला म्हणजे मुलामुलींचे वेगळे बेंच होते आम्ही दोघे कडेला बसलो होतो, मध्ये गॅप होता. तिच्या बाजूला बसला यावं म्हणून मी मुद्दाम तिकडे बसलो होतो. पण साला तिला खरंच कळलं नाही का? कि ती कविता तिच्यासाठीच होती... कॉलेजात कसं काय टॉप केलं तिने काय माहित? वेडी कुठली... एकतर ती खूप वेडी होती, नाहीतर तिला सगळं कळत असूनही माझी शाळा घेत होती...असो... ते दिवसच वेगळे होते. या कवितेचं वाचन माझी मैत्रीण श्वेता वाळंजने सुद्धा केलाय. आम्ही कल्याणच्या जनशक्ती न्यूजमध्ये सोबत काम करायचो. तेव्हा तिलाही कविता खूप आवडली आणि तिने तर थेट तिच्याच फेसबुकवरून लाईव्ह करत कवितेचं वाचन केलं. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही कविता हृदयाच्या खूप जवळ आहे. आज या कवितेला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून ही कविता पुन्हा शेयर करतोय...कशी वाटली सांगा... जमलं तर...आता तर कविता सुचत नाही कारण आता तशा भावनाच येत नाही. त्यामुळे मी ज्या काही मोजक्या ४-५ कविता केल्या आहेत त्याच माझ्या हृदयातल्या आणि मनातल्या गोष्टी आहेत असं समजा...पुन्हा अशा कविता सुचतील कि नाही...माहित नाही. कारण आता प्रेम वैगेरे म्हटलं कि भीती वाटते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि बाकी राहिली शून्य!!! पण बघू ,काय सांगता येत नाही. ये दिल तो बच्चा है जी...😊


मूळ कविता वाचण्यासाठी हृदयावर 💓💓💓💓 क्लिक करा


New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...