आज पोस्ट ग्रॅज्युएट झालो!!! मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी "मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम"(#एमएसीजे) उत्तीर्ण झालो. ६ जुलै २०१९ ला बॅचलर ऑफ मास मीडिया (#BMM) आणि आज २२ सप्टेंबर २०२१ रोजी (#MACJ) उत्तीर्ण झालो होतो. आनंद नक्कीच आहे. पण, जेवढा आनंद १२ वी पास झाल्यावर किंवा पदवीधर झाल्यावर झाला होता तेवढा आनंद यंदा नाही. त्याची अनेक कारणं आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं आणि ऑनलाईनच परीक्षा द्याव्या लागल्या हे त्याचं मुख्य कारण... त्यामुळे यंदा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनही काही विशेष केलं असं वाटलं नाही. निकाल 'हाच' असेल याचा अंदाज होताच. कारण MCQ पद्धतीनं ५० पैकी ४० प्रश्न सोडवणं तेही (अभ्यासासाठी?) दिलेल्या प्रश्नावलीतून हे अगदी १२ वी च्या विद्यार्थ्यालाही जमेल असं होतं. विजयाची माळ कष्ट न करता गळ्यात पडावी असं वाटतंय. पण असो... आता मी पदव्युत्तर पदवीधारक आहे हे मला मान्य करावं लागेल.
बाकी मी या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात काय शिकलोय हे मला फारसं आता सांगता येणार नाही. कोरोनाने नको त्यांची चांदी केली, पण आमची मात्र मजा घालवली. कॉलेजला जाण्याची मजा, नवीन मित्र-मैत्रीणी जोडण्याचा तो काळ, वर्गात बाकावर बसून शिकण्याचा तो आनंद, कॉलेज डेज आणि एकुणच अख्खी कॉलेज लाईफ या कोरोनाने हिरावून घेतली. नशीबी आलं ते कृत्रीम, व्हर्चुअल आणि ऑनलाईन जग. एकेकाळी स्मार्टफोनमध्ये तासन्-तास रमणारा मी आता या नकली ऑनलाईन जगताला खरंच वैतागलो आहे.
मला एसएसटी कॉलेजचे ते सुंदर दिवस आठवतात, जेव्हा मी रीअल कॉलेज लाईफ मनसोक्तपणे जगली होती. किती नवे मित्र, नव्या मैत्रिणी, शिक्षक अशा सर्वांशीच अगदी दिलखुलास संबंध होते. कॉलेजमध्ये थोडीफार हवा होती. पण, नंतर मास्टर्ससाठी जोशी-बेडेकर कॉलेजला आल्यावर फक्त पहिली सेमीस्टर लिखीत दिली, त्यातही खूप कमी वेळा कॉलेजला गेलो होतो त्यामुळे क्लासमेटही मला ओळखत नाही याबद्दल जरा वाईट वाटतं. कारण मला मित्र-मैत्रिणी म्हणजे अत्यावश्यक बाब वाटतात. मी घरच्यांच्या नजरेत जरी माणूसघान्या असलो तरी बाहेरच्या दुनियेत माणसाळलेला प्राणी आहे. त्यामुळे बेडेकर कॉलेजमध्ये हे एकटेपण मला सतावत होतं. एकतर मास्टर्स करायचं ठरलं नव्हतं. मग अचानक करावं असं वाटलं आणि अॅडनिमिशन घेतलं, तेही पहिल्या सेमीस्टरच्या एक ते दीड महीने अगोदर... त्यामुळे जरा गडबड झाली होती. त्यात तेव्हा मी काही दिवस ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात काम करत होतो, नतंर माय महानगरमध्ये इंटर्नशीप म्हणून मला कॉलेजला जायला जमलंच नाही. मग जेव्हा कधीतरी जायचो तेव्हा इतरांशीही काही जास्त बोलणं होत नव्हतं त्यामुळे कुणाशी खास अशी मैत्री झालीच नाही. फक्त हाय...हॅलो पुरती मैत्री मला नको वाटते. मग रेग्युलर जाण्याचा विचार केला, तसं प्लॅनिंगही केलं, मग कोरोना महाशयांमुळे लॉकडाऊन झालं ते अदयापही कॉलेज बंदच आहे. अशातच आमची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पुर्ण झाली तेही आजच ऑनलाईन कळलंय. कॉलेज लाईफ जगण्याची इच्छा कोरोनाने हिरावून तर घेतली शिवाय आयुष्यातल्या अनेक चांगल्या क्षणांपासून दुर केलं. असो... आता सगळं झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीच, पण मन मोकळं करावं म्हणून हे इकडे लिहीलं आहे.
आता अधिकृतपणे कॉलेजलाईफ संपली आणि दुनियादारी सुरु झाली. आता आयुष्यात मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नोट्स, बेंच यांची जागा सहकारी, संपादक, टास्क, डेस्क यांनी घेतली. अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदल माझ्यासाठी सकारात्मकच आहे. पण, कॉलेज लाईफचा असा दी एन्ड झाल्याने आयुष्याशी जरासा नाराज आहे, लवकरच ही नाराजगी दुर होईल... कारण माझी नाराजगी दुर करणारा मी एकटाच आहे...अद्यापही अन् सध्यातरी...! बाकी मी आज पोस्ट ग्रॅजुएट झालो याचा मला नक्कीच आनंद आहे.
एकेकाळी बारावी सायन्समधून नापास झाल्यावर.....बस्स झालं! यावर आता नंतर कधीतरी पकवेन, मला झोप आणि कंटाळा दोन्हीही एकसोबत आल्याने गुडनाईट.....