लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Saturday 10 February 2018

मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते... परंतु त्याच लाईफलाईन मधून प्रवास करताना काय मरण यातना होतात हे केवळ दररोज ट्रेन ने प्रवास करणारा मुंबईकरच सांगू शकेल... २००६ चा साखळी बॉम्बस्फोट असो किंवा , ३० सप्टेंबर २०१७ रोजी झालेली चेंगरा-चेंगरी ची दुर्घटना असो... प्रत्येकवेळी मरतोय तो फक्त सामान्य माणूस आणि हा मुंबईकर... ट्रेन मधील यातना मी स्वतः रोज अनुभवतो... त्यामुळे याबद्दल मनातली गोष्ट मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे... आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या...

कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो... 


रोज पहाटे  मी पाच वाजता उठतो          तयारी करून धावत-पळत स्टेशन गाठतो
गच्च भरलेल्या डब्यात  मी जिद्दीने शिरतो                 
अन इथूनच माझा दम कोंडायला लागतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



ट्रेन मध्ये मी नेहमी उभाच असतो
पाय ठेवायला थोडीशी जागा शोधत असतो
खांद्यावरच्या बॅगेसोबत स्वतःला मी सांभाळत  असतो         
अन धक्के-बुक्के खात मी सर्वकाही झेलत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...  

                                                       
गर्दीच्या दाबामुळे छातीवर भासते कितीतरी किलोचे वजन      स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुद्धा संघर्ष करतो प्रत्येक जण
एकीकडे चालू असते भजन
तर दुसरीकडे माझ्या आयुष्याचं किर्तन
हे सर्वकाही मी निमूटपणे सहन करत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


कधी उशीर झाल्यावर माझ्यावर येते दरवाजाला लटकण्याची बारी
तेव्हा भीती वाटते आजच तर नाही ना जाणार मी देवाघरी
या भीतीपोटी मला नेहमी आठवते माझी आई, जी मला म्हणत असते बाळा करू नकोस एवढी घाई
पण मी रोजच घाई करत असतो
कारण,  मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


प्रवासात ट्रेन अचानक मध्येच कुठंतरी थांबते 
तेव्हा इच्छित स्थळी जाण्याची वेळही लांबते
मग लक्ष त्या लाल सिग्नल कडे जाते
जो पिवळा होण्याची सर्वच पब्लिक वाट पाहते
पण हा सगळा खेळ नेहमीचाच असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



प्रवास करताना अचानक कुणाचातरी तोल जातो   अपघातात तो लंगडा-पांगळा होतो, नंतर तो  संपून जातो
रोज दिसणारा तो अनोळखी चेहरा अचानक गायब होतो
सामान्य माणूस रोज-रोज असाच मरतो
अन् सरकार नावाचा प्रेक्षक फक्त गंमत बघतो
हा क्रम नेहमी असाच चालू रहातो
कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत  असतो...        
      

महिनाभर कष्ट करून पगार मी घेतो
पण एखादा चोर खिशातला पगार चोरतो                        
काय सांगू तेव्हा जीव खूपच तळमळतो
चोर निघून जातो अन् मी स्टेशन वर  एकटाच रडत बसतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



अजूनही आठवतो तो २००६ चा साखळी बॉम्बस्फोट
ज्याने घेतला होता अनेक निष्पापांच्या नरडीचा घोट
अनेक तान्हुल्यांनी गमावले होते आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाचे बोट
स्फोटाच्या त्या आगीत लुप्त झाले ते हसणारे ओठ
स्फोटाचा हा राक्षस फारच भयंकर असतो
आणि, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...




लिहिण्यासारखं खूप काही आहे पण संपू लागलयं माझ्या वहीचं पान 
अन लिहिता- लिहिता सारखंच हरपतोय मी माझं भान
डोळ्यातील अश्रू पडू लागलेयत माझ्या कवितेवर
पण हे अश्रू देखील नाही पुसू शकणार या दुःखद आठवणी.



हे सर्व विसरण्याचा  मी नेहमीच प्रयत्न करतोय
सगळं काही चांगलं होण्याची मी नेहमीच वाट बघतोय
ट्रेनप्रमानेच मीही पुन्हा गतीमान होण्याचा प्रयत्न करतोय
आणि मी मुंबईकर पुन्हा एकदा ट्रेन ने प्रवास करतोय........





 - अक्षय बैसाणे,एक सामान्य मुंबईकर....

No comments:

Post a Comment

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...