तो जगतोय,
कुणासाठी तरी का होईना तो जगात दिसतोय
अपेक्षांचा सुळका सर करताना दमछाक तर फार होते
जबाबदाऱ्यांचं अन् कर्तव्यांचं बिऱ्हाड वाहताना आपल्यांची उणीव फार होते
त्या उणीवेशीच आता घट्ट नातं बनलंय
या अनैतिक नात्यानं त्याला मात्र पूर्ण बदललयं
तरीही तो जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना झुरतो आहे
आवडती गाणी हल्ली हृदयाची तार छेडत नाही
सुंदर चेहरे पाहूनही हल्ली हृदय बावरत नाही
प्रेमाची भावना जास्त काळ साथ देत नाही
मैत्रीही सध्या जवळची वाटत नाही
असं वाटतं हृदयाचा दगड झालाय
मनातला भावी "तो" मेलाय
त्याच्या मनातला "तो" घायाळ झालाय
पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना लढतो आहे
पोट भरुन खा... असं ऐकायला तो आईजवळ नाही
दादा आम्हाला एक वहिनी आण असं चिडवणं ऐकायला तो बहिणीजवळ नाही
काळजी करु नको, मी आहे असं बापाकडून ऐकण्यासाठी तो वाटच पाहतोय
आईच्या हातची पोळी, भाजी, पोहे, चहा यासाठी तो रोजच तरसतोय
आईच्या वरण-भातापुढे त्याला बिर्याणाही फिकी वाटते
घरातल्या प्रत्येक क्षणांची त्याला लय खत वाटते
अनोळखी शहरात, अनोळखी लोकांत तो एकटाच फिरतोय
पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना प्रयत्न करतो आहे
तसा तो फुसका वाटला तरी कधीतरी तोही गागट करतो
स्वप्न त्याचीही आहेत, ध्येय त्याचीही आहेत
ती स्वप्न नेमकी कोणती हेच त्याला दिसत नसावं
त्यालाही वाटतं योग्य वाट दाखवणारं कुणीतरी त्याला मिळावं
भरकटलेल्या वाटेवर तो चालतचं जातोय
एका हातात कर्तव्य, दुसऱ्या हातात स्वप्न अन् डोक्यावर जबाबदारी
हा सगळा डोंबाऱ्याचा खेळ खेळत, आयुष्याच्या दोरीवर तो टिकण्याचा संघर्ष करतोय
अन्, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी?....
कुणासाठी तरी कशाला, तो आपल्याच लोकांसाठी जगतोय
कुटुंबासाठी, मित्रांसाठी, स्वतःसाठी अन् स्वतःच्या स्वप्नांसाठी तो जगतोय...
तो जगणारच... आणि मोठा होऊन तो अक्षय होणारच...!
.
.
.
- अक्षय्यनामा✍️
No comments:
Post a Comment