लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Tuesday, 19 April 2022

श्रीरामा कोणता झेंडा घेऊ हाती?



हिंदुत्व म्हणजे भाजप! असं साधं-सरळ समीकरण देशात आहे. पण महाराष्ट्रात हे समीकरण जरा गुंतागुंतीचं बनलंय. कारण देशपातळीवर हिंदुत्ववादाचा चेहरा भाजप आहे, मात्र महाराष्ट्रात ही परिस्थिती वेगळी आहे. राज्यात प्रखर हिंदुत्वाचा (Hindutva) दावा करणारे तीन पक्ष आहे. ज्यात सत्ताधारी शिवसेना (Shivsena), केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणारा मनसे (MNS). हे तिन्ही पक्ष आपलंच हिंदुत्व कसं खरं आहे हे दाखवण्याची धडपड करतायत. यात मनसेला सध्या भाजपची साथ मिळतेय असं दिसत असलं तरी भाजप आपल्या हक्काचा हिंदुत्ववादी मतदार राजकीय स्वार्थाशिवाय कुणासोबतही का शेयर करेल? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सध्या शिवसेनेच्या हिंदुत्वाला गौण ठरवण्यासाठी, शिवसेना सेक्युलर झाल्याचे आरोप करणाऱ्या भाजपची ताकद सध्या कमी पडतेय. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन मोठा हिंदुत्ववादी मतदारांचा समूह तयार करण्याचा भाजपचा कार्यक्रम दिसतो. त्यामुळेच की काय काही वर्षांपूर्वी 'मराठीहृदयसम्राट' असलेले राज ठाकरे हे आता 'हिंदुजननायक' बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. एक म्हणजे मविआमध्ये (MVA) सामील होऊनही  शिवसेना हिंदुत्ववाद सोडायला तयार नाही, दुसरं हिंदुत्ववादाशिवाय भाजपचा विचार करणं शक्य नाही आणि तिसरं म्हणजे आता मनसेनंही ब्ल्यू प्रिंट सोडून भगवा हातात घेतल्यानं महाराष्ट्रातील हिंदुत्वावादी विचारसरणीच्या मतदाराला कुणाचा झेंडा हातात घ्यावा हा मोठा प्रश्न पडलाय. कुणाचं हिंदुत्व खरं? भाजपचं, शिवसेनेचं की, मनसेचं?

हे देखील पहा -




फ्लॅशबॅक:

फडणवीसांचा कार्यकाळ संपल्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) उप-मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पावरमुळे फडणवीस गेले, उद्धव ठाकरे आले, अजित पवार मात्र टिकून राहिले. हातात आलेली सत्ता गमावल्यामुळे पेटून उठलेले फडणवीस चांगलेच अॅक्टीव्ह झाले. मात्र कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष फिल्डवरचं राजकारण, सभा, मोर्चे काही फारसं झालं नाही, तरीही फडणवीसांना जे करता आलं ते त्यांनी तेव्हाही केलं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कोरोना आटोक्यात आलाय. सभा, मोर्चे सगळं सुरु झालंय. 

मविआ सरकारला धारेवर धरण्याची फडणवीसांनी एकही संधी सोडली नाही. सर्वप्रथम पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद गमवावं लागलं. नंतर १०० कोटी वसूली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पद गमवावं लागलं, शिवाय ते सध्या तुरुंगवासही भोगत आहेत. त्यानंतर दाऊदच्या मालमत्तेशी संबंधीत मनी लॉन्ड्रींग केसमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनाही ईडीने अटक केली, तेही तुरुंगात आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik) यांना ईडीने दिलेला झटका, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडी चौकशी, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्ती, मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar patankar) यांच्यावरील ईडी कारवाई, मविआ नेत्यांच्या चौकश्या आणि धाडी. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Atidya Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. या सगळ्यांमुळे फडणवीसांची तळमळ, ताकद आणि कुटनीती दिसून येते. मात्र एवढं होऊनही मविआ सरकार टिकून आहे. आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर कितीही मोठा असला किंवा केंद्रात सत्तेत असला तरी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हरवणं भाजपला कठीण आहे याची फडणवीसांना चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच की काय २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच पुर्वतयारी आणि भाजपला पोषक अशी वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसलीये.


फडणवीसांचा मास्टर प्लॅन:

भाजप देशासह राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. पण तरीही राज्यातली सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडी बाधा ठरतेय. त्यात २५ वर्षे सोबत असणारी शिवसेना आज सत्तेत असल्यानं भाजपचं मुख्य टार्गेट शिवसेनाच असल्याचं दिसतंय. सेनेमुळे सत्ता गमावल्याची प्रचंड चीड भाजपच्या मनात आहे. सेनेला संपवायला हवं यासाठीच भाजप जास्त प्रयत्नशील दिसते. सेनेला संपवण्यासाठी सेनेचं सर्वात मोठं अस्त्र म्हणजे हिंदुत्व! भाजप हे सेनेकडून हिंदुत्वच हिसकावयाला निघालं आहे. सेनेकडून हिंदु्त्व हिसकावण्यासाठी त्यांनी राज ठाकरे नावाच्या जुन्या गड्याला 'भगवाधारी' (Bhagwadhari) करुन मैदानात उतरवलंय. या गड्यानंही आल्या आल्या जोरदार 'भोंगा' पसरवत चांगलाच गागट केलाय. भोंग्याच्या आवाजानं सेनेलाही धडकी भरली अन् सेनाही आता आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी खटाटोप करतेय. मनसेने सुरु केलेल्या हनुमान चालीसेत (Hanuman Chalisa) सेना नकळत ओढली जातेय. शिवाय राष्ट्रवादीही आपलं सेक्युलरीझम दाखवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करतेय. अशात मनसेच्या अजेंड्याला सेना-राष्ट्रवादी बळी पडली असं वाटत असलं तरी, मुख्य सुत्रधार हे फडणवीस आहेत मात्र, हे सगळ्यांना दिसत नाही. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून मनसेच्या इंजिनखाली शिवसेनेच्या वाघाला चिरडायचं आणि नंतर त्या वाघाला कमळाच्या फुलानं श्रद्धांजली द्यायची असा मास्टर प्लॅन फडणवीसांचा दिसतोय.


कोणता झेंडा हाती घ्यायचा?

हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र भाजप-मनसेची वाढती जवळीक पाहता भाजप-मनसेचा झेंडा दिसायला वेगळा असला तरी तो एकच असल्याचं किंवा भविष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या एकत्र होण्याची चिन्हं दिसतायत. शिवसेनाही आपल्या हिंदुत्वाच्या अस्त्राला बळ देण्यासाठी युवराजांना अयोध्येत (Ayodhya) पाठवण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे लवकरत अयोध्येत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र मविआच्या किमान-समान कार्यक्रमामुळे सेनेच्या वाघाला डरकाळीही हळू आवाजात द्यावी लागते असं चिंत्र आहे. या सगळ्यात फडणवीसांचा अजेंडा मात्र जोरदारपणे रेटला जातोय. ज्याला भाजप, मनसे प्रत्यक्षपणे आणि शिवसेना, राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तो अजेंडा म्हणजे हिंदुत्व... जे उत्तर प्रदेशात परिणामी देशात भाजपला सर्वशक्तीमान करतं! बाकी कॉंग्रेसचं बोलायचं झालं तर कॉंग्रेसला स्वतःच्या भविष्याची काळजी आहे की नाही हा प्रश्न पडतो.

.

.

.

- अक्षय्यनामा✍️


1 comment:

  1. Makeover of Raj from Marathi to Hinduism..
    Politics is at his peak level now..
    Great analysis Akshay.

    ReplyDelete

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...