लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Thursday 21 April 2022

'सकाळ'ला पोहोचण्यासाठी 'युलु' आली धावून अ्न मी गेलो बुरुम बुरुम

Yulu Zone At CBD Belapur Railway Station


आज सकाळी उठायला २५-३० मिनिटं उशीर झाला. सगळं आवरुन हॉस्टेलहून (नायर हॉस्टेल, बेलापूर) ऑफिसला निघालो तर, बराच वेळ रिक्षा मिळेना. ५-७ मिनिटांनंतर एक रिक्षा मिळाली पण त्या रिक्षावाल्याकडे गुगल पे नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती. सकाळी ८ ची शिफ्ट, ऑफिस (सकाळ भवन, बेलापूर) हॉस्टेलपासून १.४ किमी. माझ्या स्पीडने जायचं झालं तर कमीत-कमी २५ मिनिटं आणि फास्ट चाललो तरी २० मिनिटं ऑफिसला पोहोचायला वेळ लागणार हे नक्की. सकाळी-सकाळी चांगलीच फजिती. शिवाय आज पुण्याहून सिनिअर सहकारी (बॉस लोकं) येणार होते, त्यात मला ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय यामुळे डोकं फिरलं. बेलापूर गावातल्या अमृतवेल तलावासमोर उभा होतो, तेवढ्यात तिथे पार्क केलेल्या सायकलींवर नजर गेली. तशा त्या सायकली नेहमीच बघत असतो, पण आज जरा आशादायक नजरेने त्या सायकलींकडे (Yulu Bike) बघितलं. रिक्षा मिळत नाही, मिळाली तर कॅश नाही, जवळपास एटीएम नाही आणि एटीएम जरी मिळालं तरी सुट्ट्या पैशांचे वांदे. अशात सायकलवर ऑफिसला जाण्याचा विचार डोक्यात आला. (Yulu Bike Experience By Akshay Baisane)

Yulu Cycle Photo By Akshay Baisane At CBD Belapur Railway Station

हा विचार डोक्यात आला. २-३ मिनिटं विचार करण्यात गेला मग शेवटी काढला मोबाईल आणि युलु अ‍ॅप डाऊनलोड (Yulu App) केलं. तसं ते आधीही वापरलं होतं टाईमपास म्हणून... त्यात ३० रुपये होते. लगेच चांगली सायकल निवडली, सायकलची घंटी, हवा वैगेरे सगळं बघितलं, सीट हाईटनुसार अ‍ॅडजस्ट केली. अ‍ॅपमधून सायकलवरचा क्यूआर कोड स्कॅन केला, सायकल अनलॉक झाली. मग काय मस्त बसलो सायकलवर अन् निघालो ऑफिसला. सकाळची वेळ असल्याने रस्ते मोकळे, थंड हवा, त्यात सीबीडी परिसरातले रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ असल्याने सायकल चालवायला काही अवघड वाटलं नाही. शिवाय युलु सायकल चालवायला खूप स्मूथ वाटली. हॅण्डलला असलेली घंटी ट्रिंग-ट्रिंग मुद्दामच वाजवत होतो. सायकल जेवढी स्मूथ वाटत होती, तेवढी मजबूतही वाटली. सामान ठेवण्यासाठी हॅण्डलला कॅरीअर होतं, पण माझी बॅग फारशी जड नसल्याने मी ती बॅग पाठीवरच लावली होती. खूप वर्षांनी सायकल चालवल्याने जरासा दम लागला, पण तेवढीच सकाळची एक्सरसाइज म्हटलं... आकाशी रंगाच्या सायकलवर मी कसा दिसत असेल असा विचार मनात आला, फोटो काढून बघावं तर सोबत कोण नव्हतं. विचार करता-करता स्टेशनला पोहोचलोही. तेही अवघ्या सात मिनिटांत. मी ७ः५० ला निघालो होतो आणि ७ः५७ ला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळच्या युलु बाईक झोनला पोहोचलोही. (Yulu Bike Zone At CBD Belapur Railway Station)

स्टेशनला पोहोचल्यावर युलु अ‍ॅप ओपन केलं. राईड संपवली, सायकल लॉक केली आणि बिल बघतो तर अवघे १०.२० रुपये फक्त शुल्क आकारले होते. दररोज रिक्षाला मीटरप्रमाणे २० ते २६ (Base Fare 21) रुपये लागतात. पण आज मी अवघ्या दहा रुपयांत हॉस्टेल ते ऑफिस असं १.४ किमीचा प्रवास केला. तेही शून्य प्रदूषणासह, थोडंस वॉर्मअप आणि पैशांची बचत हे सगळं एका सायकलने शक्य झालं. ही अप्रतिम सेवा देण्यासाठू युलु बाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानायला हवे. आता सकाळची शिफ्ट असेल तेव्हा दररोज युलुच्या सायकलनेच ऑफिसला जायचा विचार आहे. युलुची इलेक्ट्रिक बाईकही आहे, त्याचीही टेस्ट राईड एकदा घ्यायची आहे. पण, माझ्या हॉस्टेलजवळ असलेल्या युलु झोनला इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय नाही, फक्त सायकलच आहे. पण काहीही म्हणा जवळच्या अंतराला सायकल बेस्ट आहे. बाकी एवढं करुनही ऑफिसला उशीर झालाच... चहा-नाष्टा करण्यात जरा वेळ गेला. पण, सायकल नसती तर जास्त उशीर झाला असता. असो... छोटासा अनुभव होता, शेयर करावासा वाटला, केला... तुमच्या परिसरात युलु असेल तर एकदा नक्की अनुभव घ्या!

युलु अ‍ॅप डाऊनलोड व रिचार्ज (Yulu App Download & Recharge)

युलु सायकल वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर युलु अ‍ॅप डाऊनलोड करा. मग आपली माहिती भरा. त्यानंतर डिपॉजिट २०० रुपये भरावे लागतील जे रिफंडेबल असतील. यानंतर रिचार्ज करावा लागेल जो ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत टॉपअप करु शकता. गुगल पे, यूपीआय, ऑनलाईन बॅंकिंग किंवा डेबिट-क्रेडीट कार्डने हे पेमेंट करु शकता.

युलु सायकल/बाईक अशी वापरा (How To Use Yulu Bike)

युलु सायकलजवळ जा. सायकलच्या सीटमागचा किंवा मागच्या मर्डगार्डवरचा क्यूआर कोड हा अ‍ॅपमध्ये स्कॅन करा. त्यानंतर सायकल अनलॉक होईल, किंवा हातने अनलॉक करण्यास अ‍ॅपमध्ये सांगितलं जाईल. बस, सायकल अनलॉक झाल्यापासून तुम्हाला सायकलचं भाडं लागू होईल.

युलु सायकलचं भाडं (Rent Of Yulu Bike)

पहिल्या राईडसाठी काहीतरी १० रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट लागतात. नंतरच्या राईडला बेसिक भाडं ५ रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं आकारलं जातं. हे नवी मुंबई बेलापूरसाठी आहे. बाकी दुसरीकडचं मला माहित नाही.

युलु सायकल वापरण्याचे नियम (Rule For Ride Yulu Bike)

१) सायकल बुक केल्यानंतर सायकलची जबाबदारी पुर्णपणे तुमची असेलय

२) सायकल कुठेही पार्क करता येणार नाही, फक्त युलु झोनमध्येच सायकल पार्क करता येईल,

३) राईड चालू असताना मोबाईलचं इंटरनेट आणि ब्लूटूथ चालू असणं गरजेचं आहे.

४) सायकल जोपर्यंत अनलॉक आहे तोपर्यंत  १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं तुमच्या युलु खात्यातून वजा होईल.

५) वाहतुकीचे सर्व नियम पाळत सायकल चालवावी.

तर हा होता माझा आजचा मस्त अनुभव. जे चांगलं आहे, त्याबद्दल बोललंच पाहिजे, त्याचं कौतुक इतरांनाही सांगितलं पाहिजे या शुद्ध भावनेने हा वैयक्तिक प्रपंच...! 

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

No comments:

Post a Comment

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...