लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Sunday 3 July 2022

'साम'... माझ्या आयुष्यातली एक आशावादी सकाळ!

I Have Completed One Year In Saam Tv's Digital Portal

आजच्या दिवशी म्हणजेच १ जुलैला 'साम' टीव्हीच्या वेबसाईटसाठी कंटेंट एडिटर म्हणून काम करताना मला एक वर्ष पूर्ण झालं. १ जुलै २०२१ ला मी साम डिजिटलला जॉईन झालो होतो. या वर्षभरातला साम टीव्हीतला अनुभव मिश्र पद्धतीचा होता. काम करताना चांगले-वाईट असे अनेक अनुभव आले आणि येतायत. पण यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे या एका वर्षात मी बरंच काही शिकलोय आणि अजूनही काम करताना शिकत असतो. लोकल माध्यमांमध्ये, यूट्यूब चॅनेल्समधली तीन वर्ष आणि 'साम'मधलं एक वर्ष यांची तुलना केल्यास मी 'साम'मध्येच सर्वात जास्त शिकलो असं मी म्हणू शकतो. पण, लोकल चॅनेल्सचाही अनुभव असल्याने दोघांमधला फरक हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. हे वर्ष एवढ्या पटकन् गेलं की, साममध्ये एक वर्ष पूर्ण झालं हे अजूनही वाटत नाही. कारण या एका वर्षात माझ्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या आणि होतायत, त्यामुळे स्वतःबाबत आणि इतरांबाबत विचार करायलाही पुरेसा वेळ मिळत नाही, अर्थात त्यालाही मीच जबाबदार आहे. टाईम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट अशा बऱ्याच गोष्टी नीट शिकण्याची गरज आहे. असो... आता जरा कामाबद्दल सांगतो.

साम डिजिटलमध्ये माझा रोल (पद)

साम टीव्ही ही एक महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारी मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची डिजिटल आवृत्ती सामटीव्ही डॉट कॉम या वेबसाईटसाठी मी काम करतो. या वेबसाईटसाठी मी कंटेंट एडिटर म्हणून काम करतोय. कंटेंट एडिटर म्हणजे सामग्री संपादक. आता सामग्री या शब्दाचा इथे टेक्स्ट (Text) असा अर्थ होतो. म्हणजे पत्रकारांनी पाठवलेल्या लीड्सवरुन किंवा पॉईंटर्सवरुन बातम्या लिहीणं आणि त्या वेबसाईटवर टाकणं हे माझं मुख्य काम आहे. हे झालं सोप्या भाषेत. पण अजूनही बरेच टास्क असतात त्याबद्दलही थोडक्यात सांगतो.

https://www.saamtv.com/author/akshay-baisane


साम डिजिटलमध्ये मी नक्की काय-काय काम करतो?

१) पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांधलं शुद्धलेखन, व्याकरण, माहिती हे सगळं तपासून बातमी प्रमाणित भाषेत लिहून ती बातमी वेबसाईटवर टाकणे. यावेळी बेसिक फोटो एडिटींग, एसईओ (SEO) अशा अनेक गोष्टी येतात त्यानंतर सीएमएसमधून (CMS) बातमी साईटवर जाते.

२) ज्या बातम्या आमच्या साईटवर नाहीत त्यांचा इतर ठिकाणांहून संदर्भ घेऊन त्या बातम्या करणे. यात हिंदी आणि इंग्रजी बातम्यांचं मराठी भाषेत भाषांतर करुन वाचनीय कंटेंट देणं हे माझं मुख्य काम आहे.

३) बातम्या सोशल मीडियावर जसे फेसबुक, ट्विटर, शेयरचॅट यांवर शेयर करुन जास्तीत जास्त ट्रॅफिक साईटवर यावा यासाठी प्रयत्न करणे.

४) वेबसाईट अपडेटेड ठेवणे. आता यातही अनेक टास्क आहेत.

a) बातमीचं वेटेज ठरवून योग्य क्रमाने लावणे.

b) वेबसाईटवरचं टिकर अपडेट ठेवणे.

c) महत्वाच्या बातम्यांचे पुश नोटीफिकेशन पाठवणे.

५) गुगल रनडाऊनला बातम्या टाकणे.

६) महत्वाचे ट्विट करणे, ट्विटरवर टॅग करणे.

(ही कामे सर्व टीम मिळून करते)

'साम'मध्ये कसा जॉईन झालो?

BMM ची डिग्री झाल्यानंतर मी फारसं काही करत नव्हतो, एकप्रकारे मीडिया फिल्डच्या बाहेर फेकल्या गेलो होतो. काहीतरी करावं म्हणून मास्टर्स करत होतो. सोबत इंटर्नशीप, कंटेंट रिलेडेट छोटी कामं केली, ब्लॉगवैगरे... असला जरा टाईमपास करत होतो. लोकल चॅनेलमध्ये काही होणार नाही हे लक्षात यायल मला तीन वर्ष लागली, अर्थात त्यामागेही वेगळं कारण आहे. पण नंतर मी तेही सोडलं, मग चांगल्या वृत्तसंस्थेत संधीसाठी शोध सुरू झाला. याबाबत माझ्यासाठी जॉब बघा असं मी अनेकांना सांगितलं होतं. यात ते लोकंही होते, ज्यांनी कधीकाळी मला मोठ्ठी आश्वासनं दिली होती. पण, कुणाकडूच काम झालं नाही. कोरोनाही सुरु झाला आणि मलाही झाला. कोरोनामुक्त झाल्यानंतर सकारात्मक बदलाला सुरूवात झाली.

 

माझी प्रिय मैत्रिण श्वेता वाळंज हिने माझ्यासाठी प्रयत्न केले. साम डिजिटलमध्ये काम करतोय यात तिचं सर्वात मोठं योगदान आहे. तिनेच मला स्वतःहून याबाबत सांगितलं, कॉन्टॅक्ट्स दिले. माझ्यासाठी तिने तिचे मार्गदर्शक तथा लोकमत कल्याण-डोंबिलीचे प्रतिनिधी प्रशांत माने सर यांना सांगून ठेवलं होतं. त्यानुसार श्वेता आणि प्रशांत सर यांच्या रेफ्रेन्सने मी सामपर्यंत पोहोचलो. यावेळी श्वेताचं सहकार्य हे माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे.

ऑनलाईन टेस्ट

सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल कंटेंट लीड विश्वास पुरोहित सर यांनी माझी सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली. १४ जून २०२१ ला त्यांना माझा रेझ्यूमे पाठवला, १५ जूनला त्यांनी बातम्यांच्या २ लिंक्स पाठवल्या, त्या मी माझ्या भाषेत ट्रान्सलेट करुन त्यांना मराठीत पाठवल्या. १६ जूनला दुपारी सव्वा एकच्या दरम्यान गुगल मीटवर त्यांनी माझी ऑनलाईन टेस्ट घेतली, यात अनेक प्रश्न, ठाकरे नावाची स्पेलिंग असे अनेक प्रश्न विचारले. यात मला अजूनही आठवतंय की, त्यांनी मला Novak Djokovic बद्दल विचारलं आणि मी त्यांना चक्क तो रशियाचा विरोधी पक्षनेता आहे आणि त्याच्यावर विषप्रयोग झाला आहे असं फालतू उत्तर दिलं. त्यांनी लगेचच माझा गैरसमज दूर केला. यादरम्यान माझ्या मास्टर्सच्या फायनल परिक्षाही सुरू होत्या. त्यामुळे २३ जूननंतर मी कॉल करतो असं मी सरांना कळवलं. त्यानंतर लेखी परिक्षा २३ जूनला संपल्या, २४ जूनला माझ्या संशोधन प्रबंधासाठी प्रशांत माने सराची मुलाखत ही प्रत्यक्षपणे डोंबिवली प्रेसरुममध्ये जाऊन घेतली. ती विश्वास सरांनाही पाठवली. विशेष म्हणजे आतापर्यंत मला इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग जमत नव्हतं, हे मी विश्वास सरांना प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्यांनी मला इनस्क्रिप्ट शिकायला सांगितलं, तेव्हापासून मी इनस्क्रिप्टमध्ये टायपिंगला सुरुवात केली आणि आज त्यात काम करतोय. मी अपूर्ण असतानाही त्यांनी माझ्यावर तेव्हा दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी मोलाचा ठरला आणि मीही तो सार्थ ठरवण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि करतोय. यासाठी विश्वास सरांचे मनापासून आभार मानायला हवे.

जॉईनिंग प्रोसेस

विश्वास सरांशी २४ आणि २५ जून २०२१ ला बोलण झालं. त्यानुसार त्यांनी कामाचं स्वरुप सांगितलं. मला अगोदर बातम्या अपलोड करण्यासाठी सकाळमध्ये घ्यायचं ठरलं होतं. पण नंतर कळलं की मला साममध्ये काम करायचं आहे. असो, सगळं बोलणं झाल्यावर मला १ जुलै २०२१ ला ऑफर लेटर ऑनलाईन आलं. फोनही आले. यावेळी जे आहे, जी सॅलरी, नियम, अटी हे सगळं आहे तसं मान्य केलं. १ जुलै २०२१ ला मी दुसऱ्यांदा सकाळ भवनमध्ये पाऊल ठेवलं. 

पहिल्यांदा सकाळ भवनात गेलो होतो तेव्हा BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला गेलो होतो, तेव्हा निलेश खरे सर हे सामचे संपादक होते. सोबतच एचआर या सुरभी समेळ मॅम होत्या. त्यांना बघितल्यासारखं वाटल्याने मी कॉलेज आयव्हीचे फोटो बघितल्यावर कळलं मला की, यांनीच आपल्याला सामचा दौरा करवून दिला होता आणि आज त्याच सुरभी मॅम यांनी आपली जॉईनिंग प्रोसेस करवून घेतली. हे लक्षात आल्यावर त्यांनाही मी कॉलेज आयव्हीचे फोटोज् दाखवले ज्यात आमच्या ग्रुपने सुरभी मॅमसोबत फोटो काढले होते. खरंचं माझ्यासाठी हा एक इमोशनल क्षण होता. 

BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला पहिल्यांचा सकाळ भवनाला भेट दिली होती.


१ जूलै २०२१, गुरुवारी सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्या आणि मी 'साम'ला जॉईन झालो. याचदिवशी पहिल्यांदांच अमित गोळवलकर सर, प्रसन्न जोशी सर, विनोद तळेकर सर अशा अनेक सिनिअर्सना भेटलो. प्रसन्न सरांशी हात मिळवताना भिती आणि आनंद या दोन्ही भावना एकत्र होत्या. अमित सर कामाच्या बाबतीत खूपच डेडीकेटेट! केवळ १५ मिनिटांत त्यांनी आम्हाला क्वीनटाईपची तोंडओळख करुन दिली. मी अगोदरच माझा स्वतःचा ब्लॉग लिहीत असल्याने, माय महानगर आणि रायगड माझा यांत डिजिटलमध्ये इंटर्नशीप केल्याने आणि टोक्नोसॅव्ही असल्याने मला हे काम चांगलं जमेल असा कॉन्फिडन्स त्याचदिवशी मला आला.

पुणे दौरा

१ जूलैला सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ जूलै २०२१ ला ट्रेनिंगसाठी मला पुण्याच्या बाणेर इथल्या सकाळ ऑफिसला बोलवलं गेलं, तेही ६ दिवसांसाठी. अजून एक महत्वाचं म्हणजे १ जूलैला मी, जगदीश पाटील (मल्टीमीडिया प्रोड्युसर), यश वैद्य (व्हिडिओ एडिटर) आणि रिद्धेश तरे (व्हिडिओ एडिटर) असे चारजण एकाच दिवशी साम डिजिटला जॉईन झालो होतो आज त्यांनाही 'साम'मध्ये एक वर्ष पूर्ण झालं आहे. असो... तर पुण्याचा ट्रेनिगंदरम्यानचा अनुभव मस्तच होता. पुण्यासाठी ५ जूलै २०२१ ला सकाळी कल्याणहून डेक्कन एक्सप्रेसने निघालो आणि मग पुणे स्टेशनहून बाणेरच्या सकाळ नगरमधल्या ऑफिसला पोहोचलो. जगदीश याठिकाणी आधीच आला होता, शिवाय त्याने इथे आधीही काम केलंयं, तो मला ऑफिसबाहेर घ्यायला आला. मग मी बॅगेसहीत थेट न्यूज रुममध्ये गेलो. अमित सर तेव्हा आमचे टीम लीडर होते त्यांना भेटलो, बाकीच्या टीमला भेटलो. 

Sakal Office, Baner - Pune




सर्वात अगोदर शिवानीसोबत ओळख झाली, अमित सरांनी सांगितल्याप्रमाणे तिने मला सगळं समजवून सांगितलं. नंतर दिगंबरसोबत ओळख झाली, मग सानिका, कृष्णा, प्रविण, अनुराधा अशा अनेक सहकाऱ्यांसोबत ओळख झाली. पण, सर्वात जास्त मी दिगंबर, सानिका आणि शिवानी यांच्यात राहिलो. ५ जुलैची दुपार ते ११ जुलैच्या दुपारपर्यंत असे सहा दिवस मी बाणेरमधील Ivory Estates येथील Gold coast सोयायटीतील छान गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. या गेस्टहाऊमधील रुममध्ये सहा दिवस एकटाच तेही उत्तम आणि सर्व सोयी-सुविधांचा आनंद घेत मी ट्रेनिंग पूर्ण केली आणि ११ जूलै २०२१ ला, रविवारी रात्री कल्याणला परतलो. 

प्रत्यक्ष कामाला सुरुवात

१२ जूलै २०२१ ला सोमवारी बेलापूर आफिसमधून मला लॅपटॉप देण्यात आलं आणि मग प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. कोरोनामुक्त होऊन ९० दिवस झाले नसल्याने मी व्हॅक्सिन घेतली नव्हती त्यामुळे मी सुरुवातीला कल्याण ते बेलापूर असा प्रवास दररोज बसने करायचो. १०० रुपये दररोज प्रवास खर्च आणि १५० रुपये नाष्टा, जेवण वैगरे असे २५० ते कधी ३०० रुपये नेहमी खर्च व्हायचे. मग मला वर्क फ्रॉम होम देण्यात आलं, तरिही मी आठवड्यातून एकदातरी ऑफिसला जायचोच. सुरुवातीला माझ्या कामाची गती कासवासारखी होती. इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग, क्वीन टाईप, २५० शब्दांची बातमी अशा बऱ्याच गोष्टींमुळे सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला माझ्या केवळ ४-५ बातम्या व्हायच्या. नंतर हळूहळू स्पीड येत गेला. पण घरुन काम करत असल्याने मला काम करत असल्याचा फील येत नव्हता, पण तरिही काम सुरू होतं. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२१, शनिवार कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला त्यानंतर २० नोव्हेंबर २०२१, शनिवार लसीचा दुसरा डोस घेतला. यादरम्यान मी घरुन काम करत होतो, कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता, कामातही सुधारणा झाली होती. मग नियमानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १५ व्या दिवशी लोकल प्रवासासाठी पास काढता आला आणि ६ डिसेंबर २०२१ पासून मी रेग्युलर ऑफिसला यायला सुरूवात केली.

तेव्हा कल्याणला राहायचो, मावशीकडे. मग पहाटे ४ वाजता उठायचं, सगळं आवरुन सहाला घर सोडायचं. कल्याणहून ठाणे गाठायचं, ठाण्याहून बेलापूर. मग पटकन नाष्टा आणि चहा घेऊन मग ८:२० ला काम सुरु करायचं. ८ ते ४ शिफ्ट असायची. मी ऑफिसमधून ६-७ ला निघायचो आणि ८-९ ला घरी पोहोचायचो. पण ऑफिसमधून काम करताना मजा वाटत होती. कारण आजूबाजूला असलेलं न्यूजरुमचं वातावरण आणि सिनिअर्सचे शब्द कानावर पडायचे, नवीन गोष्टी माहित व्हायच्या.

'साम'मधल्या छोट्या पण माझ्या कायम लक्षात राहणाऱ्या गोष्टी

१) कॉलेजमध्ये असताना ज्याठिकाणी आपण विद्यार्थी आणि विजीटर म्हणून आलो होतो, त्याठिकाणी काम करेल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हाही सुरभी मॅम एचआर आणि आताही... त्यामुळे ही माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. कारण एका चांगल्या ब्रॅण्डमध्ये हा माझा पहिला जॉब आहे.

२) एसएसटी कॉलेजमधली माझी वर्गमैत्रिण करुणा साममध्ये अॅंकर आहे, आणि ती उत्तम अॅंकरिंग करते. मी जॉईन झालो तेव्हा बऱ्याच कालावधीनंतर आमची भेट झाली. आम्ही बेस्टफ्रेंड्स नाही आणि कधी सोबतही नव्हतो, आमचा साधा फोटोही सोबत नाहीये, पण आमच्या बॅचची ती एकमेव अशी मुलगी आहे जिला यशस्वी म्हणू शकतो त्यामुळे तिची रिस्पेक्ट आहेच. ऑफिसमध्ये आताही जास्त बोलणं होत नाही, पण दिसेल तेव्हा एकमेकांना हाय-हॅलो करायचं एवढीच आमची फॉर्मल मैत्री. असो... पण करुणाबद्दल रिस्पेक्ट आणि आपलेपणा तेवढाच वाटतो. एक छोटीशी गोष्ट शेयर करायची झाली तर, मी जॉईन झाल्यानंतर ऑफिसमध्ये काम करत होतो. तेव्हा एके दिवशी ऑफिसमध्ये चहा आला. ज्यांनी चहा मागवला होता त्या सगळ्यांना चहावाल्याने चहा दिला. करुणानेही चहा घेतला. मी चहा मागवला नव्हता, पण तरही तो चहावाला माझ्या डेस्कजवळ आला, त्याने चहा ठेवला. मी, म्हटलं मी तर नाही मागवला, तेव्हा तो म्हणाला करुना मॅडमने देने को बोला है! बस्स... मनाला खूप छान वाटलं. माझ्या आयुष्यात अशा गोष्टींना मी कधीही विसरु शकत नाही, या छोट्या गोष्टी माझ्या मनाला खूप भावतात.
सुरुवातीला ऑफिसमध्ये जाम एकटं वाटायचं, अनोखळी चेहरे आणि कर्तुत्वाने मोठ्या अशा सगळ्या माणसांमध्ये मी स्वतःला अगदी लहान समजत होतो. पण, करुणासोबत बोलंलं की हरवलेल्या गर्दीत आपलं कुणीतरी दिसावं असं वाटायचं. आमचं काम पुर्णतः वेगळं आहे, शिवाय आता आम्ही डिजिटलवाले तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झालोय. यामुळे आता अगोदरसारखं हाय-हॅलोही होत नाही. पण, जेव्हा ती ऑनएअर येते तेव्हा नक्कीच छान वाटतं. करुणा पुढे आणखीन चांगलं काम करेल याबाबत शंका नाहीच, तिला मनापासून शुभेच्छा असणार आहेत.

३) सोनाली शिंदे मॅडम. यांना मी कधीही प्रत्यक्षात भेटलो नव्हतो. पण त्यांना फेसबुकवर कॉलेजपासून फॉलो करायचो. शिवाय त्यांनी लिहीलेलं पॉलिक्लिक हे पुस्तक मी बीएमएमला असताना वाचलं होतं, वागळे सरांची पोस्ट पाहून ते पुस्तक मी विकत घेतलं आणि ते पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचवलं हे साममध्ये व्हिडिओ एडिटर असणारे योगेश गायकवाड यांनी. योगेश गायकवाड हे उल्हासनगरला भेटले आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं. शिवाय नंतर मास्टर्सच्या संशोधन प्रंबंधासाठी मी या पुस्तकातला संदर्भ घेतला आहे. त्यामुळे सोनाली मॅन यांना मी अगोदरपासून ओळखतो, त्या ओळखत नसल्या तरी.

४) राजश्री वाघमारे. लॉकडाऊनच्या काळात मी न्यूज अनकट या पुण्यातल्या न्यूज पोर्टलसाठी घरुन काम करत होतो. यात राजश्रीही होती. मी सर्वांच्या बातम्या तपासून त्या एडिट करुन पुढे पाठवायचो. ऑनलाईन काम असल्याने आमची कधी भेट झालेली नव्हती. शिवाय ती साममध्ये आहे हे पण माहित मला माहित नव्हतं. पण जेव्हा मी ऑफिसात गेलो तेव्हा तिला बघून मला वाटलं की ही, राजश्री असावी. डीपी बघितला होता... आणि मग तिनेही ओळखलं. अशी आणखी एक ओळख निघाली.

५) विकास मिरगणे. रायगड माझामध्ये काही काळ मी इंटर्नशीप केली होती. तिकडे विकास दादा होता. मी त्यावेळी मास्टर्सला नुकतचं अॅडमिशन घेतलं होतं. हे विकास यांना कळलं आणि त्यांनी मलाही मास्टर्स करायचंय, तुझ्यासोबत माझंही होऊन जाईल म्हणून मला विचारलं. मी त्यांचे सगळे फॉर्म भरले, अॅडमिशन झालं आणि ते माझे क्लासमेटही झाले. २ वर्षांत त्यांना सगळ्या नोट्स, प्रोजेक्ट आणि जमेल ती हेल्प केली आणि माझ्यासह त्यांचंही मास्टर्स पूर्ण झालं. त्यांच्या बातम्या मी नेहमी करायचो. आता ते साममध्ये नाही, पण थाडेफार संपर्कात असतात.

 




करुणा, सुरभी मॅम, सोनाली मॅम, राजश्री, विकास मिरगणे, योगेश गायकवाड, प्रशांत सागवेकर यांच्यासह अनेक लोकांना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळखतो आणि तेही ओळखतात. फक्त सध्या मी नवीन लोकं जोडणं, त्यांच्याशी बोलणं हे काहीसं विसरल्याने माझी इथे अद्याप कुणाशीही पक्की मैत्री झाली नाही, फक्त प्रोफेशनली सर्वांशी कनेक्टेड आहे. 

नंदू सरांची एन्ट्री

सुरुवातीला आम्हाला टीम लिडर अमित सर होते. पण ते पुण्याहून ऑपरेट करायचे. साम डिजिटलचा मेन डेस्क पुण्यात होता. मुंबई ऑफिसला आम्ही अवधे ३-४ जण होतो. यामुळे इथे आम्ही बेलगाम घोड्यांसारखे होतो. मुंबईत आम्हाला कॅप्टन ऑफ द शीप नव्हता. आता सामचा मेन डेस्क बेलापूर ऑफिसला आहे. नंदकुमार जोशी सर आमचे टीम लिडर आहे. ते जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतंयं, मार्गदर्शन मिळतं, दिशा मिळते. यामुळे आमच्या सगळ्याच टीमच्या कामात कमालीचा फरक पडला आहे. हे सगळं आकडेवारुन स्पष्ट कळंत. शिवाय आमच्या टीममध्ये राजकारण हे अगदी मीठासारखंच आहे. फक्त चवीएवढं. तेवढं तर हवंच ना? नाहीतर सगळं गोड-धोड असेल तर शुगर वाढायची... असो. पण कमी मनुष्यबळात कामाचा आलेख चढता ठेवण्यात नंदू सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यश येतंयं हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. 

एक वर्षाचा आढावा

गेल्या १ मार्च २०२२ पासून बेलापूरमध्ये पूर्णतः आत्मनिर्भरपणे राहतोय. कुठलाही फॅमिली सपोर्ट नाही, स्वतःच सगळं काही... पण या सगळ्या व्यापात मी माझ्या कामात मात्र कधी अडथळा येऊन दिला नाही. १२ महिन्यांत १२ सुट्ट्या फ्री असतात, त्यापैकी ९ खर्च केल्या ३ सु्ट्ट्या घेतल्याच नाही, आता ते वाया गेल्या. शिवाय आता माझ्या बातम्यांना चांगला रीच असतो, गुगल अॅनॅलिटीक्सवर बातम्या रॅंक होत असतात, डीएच मिळतं, माझ्या वेबस्टोरी सर्वात जास्त चालतात. अगोदरपेक्षा कितीतरी पटीने कामांत सुधारणा झाली आहे. शिवाय बातम्यांव्यतिरिक्त इतर टास्कही आता करतो. ही सगळी स्वतःची स्तुती नसून गेल्या एका वर्षांत मी जे शिकलो त्याचं ते फळ आहे की, हे सगळं मला करता येतंयं. दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे आता माझी मास्टर्स डिग्री (MACJ) पुर्ण झाली आहे, तेही चांगल्या मार्कांनी. यात विशेष म्हणजे मी प्रामाणिकपणे तयार केलेला संशोधन प्रबंध सर्वांनाच आवडला, त्यामुळे पोस्ट ग्रॅज्यूएट होणं नक्कीच सार्थकी लागलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे 'चष्मेबहाद्दर' झालो, आता ही गोष्ट चांगली म्हणता येणार नाही.

थोडसं मनातलं

मी हे सगळं लिहीलेलं वाचण्यात माझ्याशिवाय आणखी बोटावर मोजण्याइतक्या माझ्या जवळच्या लोकांना इंटरेस्ट असेल याची मला जाणीव आहे. पण, इतकं लांबलचक आणि सविस्तर लिहिण्याचं कारण एकच की, भविष्यात मला हे सगळं मला लक्षात रहावं. मी कुठून सुरुवात केली, कुणी कशी मदत केली, कशी वागणूक दिली हे सर्वकाही लक्षात राहणार नाही. कामाच्या व्यापात अनेक गोष्टी डोक्यातून कालांतराने निघून जातात त्यामुळे त्या सगळ्या मनातल्या गोष्टी इथे माझ्या ब्लॉगवर ओतून टाकत असतो. त्याचप्रमाणे असं काही लिहील्याने मला मानसिक शांतता आणि समाधान मिळतं, त्यासाठीही हा सगळा प्रपंच आहे.

आजच्या घडीला साममध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामात आता चांगला झालो आहे, असं म्हणता येईल. पण, अजून चांगलं होता येईल हेही तितकचं खरं आणि सिनीअर्सने सांगितलेल्या या सल्ल्यावर नक्कीच काम करेन. सध्या प्रचंड स्ट्रगल करतोय, वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पण, तरीही अद्याप माझा हवा तसा आर्थिक विकास झालेला नाही. एवढं कष्ट, करुनही जेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्याची मानवी वृत्ती आपोआप जागी होते.

आपण लायक असताना जर त्याचं योग्य फळ योग्य वेळेत मिळालं नाही तर मोठी निराशा होते. आज एका वर्षात साममध्ये मी जर काही कमावलं असेल तर ते फक्त "काम आणि काम". बाकी आर्थिक बाबतीत अजूनही सर्वात मागासलेलाच आहे. अजूनही मी परफेक्ट नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, पण एवढा 'ढ' सुद्धा नाही की कुणी माझ्या कामाला आणि मला इग्नोर करावं. एकतर या जगात माणसाची नाही तर त्याच्या पदाची आणि आर्थिक स्थितीची जास्त किंमत असते. अशा जगात जर चांगलं काम करुनही आपली दखल घेतली जात नसेल आणि इतरांना मात्र जास्तच दिलं जात असेल तर प्रत्येक मानवी स्वभावाप्रमाणे माझ्याही मनात ईर्षेची भावना येतेच. मूलभूत गरजाही पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणे, अशा मोबदल्यात काम करुन पेशन्स ठेवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. पण, सध्या तेही करतोच आहे... शेवटी आयुष्य यालाच म्हणतात. पोटात भूक असताना, मनात दुःख असताना, डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ असताना कामात फोकस ठेवणं आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवणं ही कला आता शिकतोय. 

हे गरजेचं आहे

या सगळ्यात एक गोष्ट आता जाणवतेय आणि हितचिंतकांनीही सांगितलं की, मी जे काम करतो ते मला ते मला कदाचित इतरांना दाखवता आलं नाही, सेल्फ प्रमोशन करणं मला जमलं नाही. स्वतःला प्रमोट करणं, स्वतःची ब्रॅंडींग करणं हे आताच्या जगात महत्वाचं असताना मी याकडे लक्ष दिलं नाही. दुसरं म्हणजे माझा स्वभाव. Attitude Is Everything: Change Your Attitude ... Change Your Life! असं म्हटलं जातं. पण हे अॅटीट्यूड वैगेरे माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे, मला खरंचं ते जमत नाही. शेवटी आपला मूळ स्वभाव सहजासहजी बदलत नाही. जवळची माणसं म्हणतात एवढं मवाळ राहिलं आणि अॅटीट्यूड दाखवला नाही तर लोकं आपल्याला ग्रॅंटेड घेणारच म्हणून स्वभाव बदल आणि अॅटीट्यूड ठेव. आता मी स्वभावच बदलायला सांगणं म्हणजे कासवाला धावायला सांगण्यासारखं आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता मला माझ्यात, स्वभावात, देहबोलीत आणि अजून अशा बऱ्याच बाबतीत काही बदल करण्याची खरंच गरज आहे हे सत्य नाकारता येणार नाही. शेवटी जो दिखता है वही बिकता है...!

#अक्षय्यनामा✍️

1 comment:

  1. मस्त रे अक्षय...

    ReplyDelete

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...