लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Thursday, 28 April 2022

प्रिय श्वेता... वाढदिवसाच्या मंगलमय कामना!




माझी खूप खूप प्रिय मैत्रिण श्वेता! आज तिचा वाढदिवस. तिच्या वाढदिवशी तिला अनेकांकडून शुभेच्छा येत असतील, तेही मोठया प्रमाणात. पण माझ्याकडून तिला शुभेच्छांसह खूप मोठं थँक्स. तिच्यासारखी मैत्रिण मिळणं हे माझं भाग्यच. २०१७ ला जेव्हा मी कॉलेजला (SYBMM) ला शिकत होतो त्याच दरम्यान कल्याणच्या जनशक्ती टीव्ही न्यूज या लोकल केबल चॅनलमध्ये मी इंटर्नशीप आणि नंतर जॉब करत होतो. इथेच श्वेता भेटली. ती याठिकाणी अँकर होती. तेव्हा सुरुवातीला मी तिला श्वेता मॅम म्हणायचो. आज ती २ वर्षांपासून झी २४ तासला काम करतेय. आमच्यातली मैत्री कधी एवढी घट्ट झाली हे मलाही कळलं नाही. ना रोजचं बोलणं, ना भेटणं पण तरीही तेव्हापासून ते आजच्या या क्षणापर्यंत आमची मैत्री पक्की होतेय आणि होत राहील.

श्वेताचं माझ्या आयुष्यातलं महत्त्वं म्हणजे एवढंच सांगेन की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. तसं मी आज यशस्वी नसलो तरी यशस्वी होण्याची जी आशा आहे ती आशा मला श्वेताने दिलीये. आज मीडिया क्षेत्रात मी जे काही, ज्या ठिकाणी काम करतोय त्याच्यामागे श्वेताची बरीच मेहनत आहे. त्यामुळेच भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. पण ही मेहनत करायची प्रेरणा ज्या व्यक्तीने दिली ती व्यक्ती म्हणजे डियर श्वेता. ब्युटी विथ ब्रेन अँड टॅलेंट म्हणजे श्वेता. नेहमीच मला चांगलं सांगणारी, चांगले सल्ले देणारी, मार्गदर्शन करणारी अशी मैत्रिण मला मिळाली आणि मी सारी जिंदगी तुला जपणार आहे हे प्रॉमिस. 

मला अजूनही आठवतं जेव्हा कॉलेज संपल्यानंतर मी मीडिया फील्डमध्ये काम करण्याची संधी शोधत होतो. श्वेता मला तेव्हापासून ते आज मी मीडियात काम करत असताना ती सतत माझ्या पाठीशी असते, बऱ्याच गोष्टी सांगत असते. साम टीव्हीमध्ये मला काम मिळावं यासाठी माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न श्वेतानेच केले. मीडिया क्षेत्रात वशिला लावणं वैगेरे शक्यतो चालत नाही, मी माझ्या प्रयत्नांनी अजूनही झटतोय. पण हीच झटण्याची प्रेरणा श्वेता नकळत मला देते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती नॉर्मली बोलता-बोलता असं काहीतरी बोलते की, पंच लागतो आणि किक मिळते. जेव्हा माझ्या आत्मविश्वासाचा पारा शून्यापेक्षा खाली गेला होता तेव्हा याच आणि फक्त या एकाच मैत्रिणीनं मला मानसिक आधार दिला. माझी विचारपूस केली. सगळं नीट होईल असं नुसतं सांगितलं नाही तर तिने सगळं नीट केलं ते माझ्यासाठी. मी म्हणायचो मला हे जमणार नाही, किंवा स्वतःवरच शंका यायची. तेव्हा श्वेता म्हणाली होती, अरे ट्रेनमध्ये जातो ना? सुरुवातीला गर्दी असते पण नंतर सीट मिळतेच ना... तिचं हे वाक्य थेट डोक्यात घुसलं आणि काहीशी अशा निर्माण झाली. आमचा एकमेकांना फोन खूप कमी असतो. रोज-रोज बोलणं किंवा चॅट करणं दोघांनाही शक्य होत नाही. पण तरीही जेव्हा आमचं बोलणं होतं त्यानंतर माझ्यात वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. ही आहे या बटलूची ताकद. छोटा पॅकेट बडा धमाका! 

कामाच्या बाबतीतही ती नेहमी गाईड करत असते. जनशक्तीला असतांनाच ती म्हणायची गोल्या मराठी टायपिंग शिकून घे, पण मी माझ्याच धुंदीत. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कळलं मीडिया जगतात प्रोफेशनलपणा किती महत्वाचा आहे. सामला जॉईन होण्याआधी ते होईपर्यंतसगळं काही श्वेताने सांगितलं. इंटरव्यूला काय विचारतील, कसं बोलायचं, काय बोलायचं, अशा बऱ्याच गोष्टी तिने फोनवर समजवल्या होत्या त्यानुसार फॉलो करत गेलो आणि सिलेक्ट झालो. त्यांनतरही अजूनपर्यंत बटलू मॅडम मला मार्गदर्शन करतच असतात. श्वेताच्या रूपानं एक चांगली मैत्रिण, मार्गदर्शक, मोटिवेशनल स्पीकर, कधीतरी जोकर सगळं काही मिळालं आहे. अशी सर्वगुणसंपन्न मैत्रिण तिच्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाईल आणि मला विसरणार नाही ही आशा. तसंच तिला तिच्या आयुष्याच जोडीदार हा सुद्धा तिच्यासारखाच मिळो आणि तिच्या चेहऱ्यावर कायम स्माईल, आनंद नांदत राहो ही तिच्या वाढदिवशी मंगल कामना.

जोडीदारावरून आठवलं, जेव्हा मी कॉलेजात असताना कुणाच्यातरी प्रेमात पडलो होतो आणि अचानक तथाकथित कवी बनलो होतो तेव्हा मी एक कविता  लिहिली होती (ज्याचं आता मला हसू येतं). तर ती कविता होती, प्रेम कसं होतं? माझी ही कविता श्वेताला एवढी आवडली की, ती म्हणाली होती आपण याचा व्हिडिओ बनवूया, काहीतरी करूया. ( हे आमचे बचकांडे चाळे २०१७ ला जनशक्तीला असतानाचे). तर त्या कवितेचं तिने छान वाचन केलं, त्याचा व्हिडिओ तिच्याच फेसबुकरून पोस्ट केला आणि बऱ्याच मोठया लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स आल्या होत्या. श्वेता तेव्हापासून ती अशीच आहे, तिचा हा स्वभाव आणि ती जास्त बदलू नये ही प्रार्थना. अशा माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवाच्या आभाळभर शुभेच्छा!

Thursday, 21 April 2022

'सकाळ'ला पोहोचण्यासाठी 'युलु' आली धावून अ्न मी गेलो बुरुम बुरुम

Yulu Zone At CBD Belapur Railway Station


आज सकाळी उठायला २५-३० मिनिटं उशीर झाला. सगळं आवरुन हॉस्टेलहून (नायर हॉस्टेल, बेलापूर) ऑफिसला निघालो तर, बराच वेळ रिक्षा मिळेना. ५-७ मिनिटांनंतर एक रिक्षा मिळाली पण त्या रिक्षावाल्याकडे गुगल पे नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती. सकाळी ८ ची शिफ्ट, ऑफिस (सकाळ भवन, बेलापूर) हॉस्टेलपासून १.४ किमी. माझ्या स्पीडने जायचं झालं तर कमीत-कमी २५ मिनिटं आणि फास्ट चाललो तरी २० मिनिटं ऑफिसला पोहोचायला वेळ लागणार हे नक्की. सकाळी-सकाळी चांगलीच फजिती. शिवाय आज पुण्याहून सिनिअर सहकारी (बॉस लोकं) येणार होते, त्यात मला ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय यामुळे डोकं फिरलं. बेलापूर गावातल्या अमृतवेल तलावासमोर उभा होतो, तेवढ्यात तिथे पार्क केलेल्या सायकलींवर नजर गेली. तशा त्या सायकली नेहमीच बघत असतो, पण आज जरा आशादायक नजरेने त्या सायकलींकडे (Yulu Bike) बघितलं. रिक्षा मिळत नाही, मिळाली तर कॅश नाही, जवळपास एटीएम नाही आणि एटीएम जरी मिळालं तरी सुट्ट्या पैशांचे वांदे. अशात सायकलवर ऑफिसला जाण्याचा विचार डोक्यात आला. (Yulu Bike Experience By Akshay Baisane)

Yulu Cycle Photo By Akshay Baisane At CBD Belapur Railway Station

हा विचार डोक्यात आला. २-३ मिनिटं विचार करण्यात गेला मग शेवटी काढला मोबाईल आणि युलु अ‍ॅप डाऊनलोड (Yulu App) केलं. तसं ते आधीही वापरलं होतं टाईमपास म्हणून... त्यात ३० रुपये होते. लगेच चांगली सायकल निवडली, सायकलची घंटी, हवा वैगेरे सगळं बघितलं, सीट हाईटनुसार अ‍ॅडजस्ट केली. अ‍ॅपमधून सायकलवरचा क्यूआर कोड स्कॅन केला, सायकल अनलॉक झाली. मग काय मस्त बसलो सायकलवर अन् निघालो ऑफिसला. सकाळची वेळ असल्याने रस्ते मोकळे, थंड हवा, त्यात सीबीडी परिसरातले रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ असल्याने सायकल चालवायला काही अवघड वाटलं नाही. शिवाय युलु सायकल चालवायला खूप स्मूथ वाटली. हॅण्डलला असलेली घंटी ट्रिंग-ट्रिंग मुद्दामच वाजवत होतो. सायकल जेवढी स्मूथ वाटत होती, तेवढी मजबूतही वाटली. सामान ठेवण्यासाठी हॅण्डलला कॅरीअर होतं, पण माझी बॅग फारशी जड नसल्याने मी ती बॅग पाठीवरच लावली होती. खूप वर्षांनी सायकल चालवल्याने जरासा दम लागला, पण तेवढीच सकाळची एक्सरसाइज म्हटलं... आकाशी रंगाच्या सायकलवर मी कसा दिसत असेल असा विचार मनात आला, फोटो काढून बघावं तर सोबत कोण नव्हतं. विचार करता-करता स्टेशनला पोहोचलोही. तेही अवघ्या सात मिनिटांत. मी ७ः५० ला निघालो होतो आणि ७ः५७ ला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळच्या युलु बाईक झोनला पोहोचलोही. (Yulu Bike Zone At CBD Belapur Railway Station)

स्टेशनला पोहोचल्यावर युलु अ‍ॅप ओपन केलं. राईड संपवली, सायकल लॉक केली आणि बिल बघतो तर अवघे १०.२० रुपये फक्त शुल्क आकारले होते. दररोज रिक्षाला मीटरप्रमाणे २० ते २६ (Base Fare 21) रुपये लागतात. पण आज मी अवघ्या दहा रुपयांत हॉस्टेल ते ऑफिस असं १.४ किमीचा प्रवास केला. तेही शून्य प्रदूषणासह, थोडंस वॉर्मअप आणि पैशांची बचत हे सगळं एका सायकलने शक्य झालं. ही अप्रतिम सेवा देण्यासाठू युलु बाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानायला हवे. आता सकाळची शिफ्ट असेल तेव्हा दररोज युलुच्या सायकलनेच ऑफिसला जायचा विचार आहे. युलुची इलेक्ट्रिक बाईकही आहे, त्याचीही टेस्ट राईड एकदा घ्यायची आहे. पण, माझ्या हॉस्टेलजवळ असलेल्या युलु झोनला इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय नाही, फक्त सायकलच आहे. पण काहीही म्हणा जवळच्या अंतराला सायकल बेस्ट आहे. बाकी एवढं करुनही ऑफिसला उशीर झालाच... चहा-नाष्टा करण्यात जरा वेळ गेला. पण, सायकल नसती तर जास्त उशीर झाला असता. असो... छोटासा अनुभव होता, शेयर करावासा वाटला, केला... तुमच्या परिसरात युलु असेल तर एकदा नक्की अनुभव घ्या!

युलु अ‍ॅप डाऊनलोड व रिचार्ज (Yulu App Download & Recharge)

युलु सायकल वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर युलु अ‍ॅप डाऊनलोड करा. मग आपली माहिती भरा. त्यानंतर डिपॉजिट २०० रुपये भरावे लागतील जे रिफंडेबल असतील. यानंतर रिचार्ज करावा लागेल जो ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत टॉपअप करु शकता. गुगल पे, यूपीआय, ऑनलाईन बॅंकिंग किंवा डेबिट-क्रेडीट कार्डने हे पेमेंट करु शकता.

युलु सायकल/बाईक अशी वापरा (How To Use Yulu Bike)

युलु सायकलजवळ जा. सायकलच्या सीटमागचा किंवा मागच्या मर्डगार्डवरचा क्यूआर कोड हा अ‍ॅपमध्ये स्कॅन करा. त्यानंतर सायकल अनलॉक होईल, किंवा हातने अनलॉक करण्यास अ‍ॅपमध्ये सांगितलं जाईल. बस, सायकल अनलॉक झाल्यापासून तुम्हाला सायकलचं भाडं लागू होईल.

युलु सायकलचं भाडं (Rent Of Yulu Bike)

पहिल्या राईडसाठी काहीतरी १० रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट लागतात. नंतरच्या राईडला बेसिक भाडं ५ रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं आकारलं जातं. हे नवी मुंबई बेलापूरसाठी आहे. बाकी दुसरीकडचं मला माहित नाही.

युलु सायकल वापरण्याचे नियम (Rule For Ride Yulu Bike)

१) सायकल बुक केल्यानंतर सायकलची जबाबदारी पुर्णपणे तुमची असेलय

२) सायकल कुठेही पार्क करता येणार नाही, फक्त युलु झोनमध्येच सायकल पार्क करता येईल,

३) राईड चालू असताना मोबाईलचं इंटरनेट आणि ब्लूटूथ चालू असणं गरजेचं आहे.

४) सायकल जोपर्यंत अनलॉक आहे तोपर्यंत  १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं तुमच्या युलु खात्यातून वजा होईल.

५) वाहतुकीचे सर्व नियम पाळत सायकल चालवावी.

तर हा होता माझा आजचा मस्त अनुभव. जे चांगलं आहे, त्याबद्दल बोललंच पाहिजे, त्याचं कौतुक इतरांनाही सांगितलं पाहिजे या शुद्ध भावनेने हा वैयक्तिक प्रपंच...! 

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

Tuesday, 19 April 2022

श्रीरामा कोणता झेंडा घेऊ हाती?



हिंदुत्व म्हणजे भाजप! असं साधं-सरळ समीकरण देशात आहे. पण महाराष्ट्रात हे समीकरण जरा गुंतागुंतीचं बनलंय. कारण देशपातळीवर हिंदुत्ववादाचा चेहरा भाजप आहे, मात्र महाराष्ट्रात ही परिस्थिती वेगळी आहे. राज्यात प्रखर हिंदुत्वाचा (Hindutva) दावा करणारे तीन पक्ष आहे. ज्यात सत्ताधारी शिवसेना (Shivsena), केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणारा मनसे (MNS). हे तिन्ही पक्ष आपलंच हिंदुत्व कसं खरं आहे हे दाखवण्याची धडपड करतायत. यात मनसेला सध्या भाजपची साथ मिळतेय असं दिसत असलं तरी भाजप आपल्या हक्काचा हिंदुत्ववादी मतदार राजकीय स्वार्थाशिवाय कुणासोबतही का शेयर करेल? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सध्या शिवसेनेच्या हिंदुत्वाला गौण ठरवण्यासाठी, शिवसेना सेक्युलर झाल्याचे आरोप करणाऱ्या भाजपची ताकद सध्या कमी पडतेय. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन मोठा हिंदुत्ववादी मतदारांचा समूह तयार करण्याचा भाजपचा कार्यक्रम दिसतो. त्यामुळेच की काय काही वर्षांपूर्वी 'मराठीहृदयसम्राट' असलेले राज ठाकरे हे आता 'हिंदुजननायक' बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. एक म्हणजे मविआमध्ये (MVA) सामील होऊनही  शिवसेना हिंदुत्ववाद सोडायला तयार नाही, दुसरं हिंदुत्ववादाशिवाय भाजपचा विचार करणं शक्य नाही आणि तिसरं म्हणजे आता मनसेनंही ब्ल्यू प्रिंट सोडून भगवा हातात घेतल्यानं महाराष्ट्रातील हिंदुत्वावादी विचारसरणीच्या मतदाराला कुणाचा झेंडा हातात घ्यावा हा मोठा प्रश्न पडलाय. कुणाचं हिंदुत्व खरं? भाजपचं, शिवसेनेचं की, मनसेचं?

हे देखील पहा -




फ्लॅशबॅक:

फडणवीसांचा कार्यकाळ संपल्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) उप-मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पावरमुळे फडणवीस गेले, उद्धव ठाकरे आले, अजित पवार मात्र टिकून राहिले. हातात आलेली सत्ता गमावल्यामुळे पेटून उठलेले फडणवीस चांगलेच अॅक्टीव्ह झाले. मात्र कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष फिल्डवरचं राजकारण, सभा, मोर्चे काही फारसं झालं नाही, तरीही फडणवीसांना जे करता आलं ते त्यांनी तेव्हाही केलं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कोरोना आटोक्यात आलाय. सभा, मोर्चे सगळं सुरु झालंय. 

मविआ सरकारला धारेवर धरण्याची फडणवीसांनी एकही संधी सोडली नाही. सर्वप्रथम पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद गमवावं लागलं. नंतर १०० कोटी वसूली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पद गमवावं लागलं, शिवाय ते सध्या तुरुंगवासही भोगत आहेत. त्यानंतर दाऊदच्या मालमत्तेशी संबंधीत मनी लॉन्ड्रींग केसमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनाही ईडीने अटक केली, तेही तुरुंगात आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik) यांना ईडीने दिलेला झटका, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडी चौकशी, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्ती, मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar patankar) यांच्यावरील ईडी कारवाई, मविआ नेत्यांच्या चौकश्या आणि धाडी. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Atidya Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. या सगळ्यांमुळे फडणवीसांची तळमळ, ताकद आणि कुटनीती दिसून येते. मात्र एवढं होऊनही मविआ सरकार टिकून आहे. आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर कितीही मोठा असला किंवा केंद्रात सत्तेत असला तरी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हरवणं भाजपला कठीण आहे याची फडणवीसांना चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच की काय २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच पुर्वतयारी आणि भाजपला पोषक अशी वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसलीये.


फडणवीसांचा मास्टर प्लॅन:

भाजप देशासह राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. पण तरीही राज्यातली सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडी बाधा ठरतेय. त्यात २५ वर्षे सोबत असणारी शिवसेना आज सत्तेत असल्यानं भाजपचं मुख्य टार्गेट शिवसेनाच असल्याचं दिसतंय. सेनेमुळे सत्ता गमावल्याची प्रचंड चीड भाजपच्या मनात आहे. सेनेला संपवायला हवं यासाठीच भाजप जास्त प्रयत्नशील दिसते. सेनेला संपवण्यासाठी सेनेचं सर्वात मोठं अस्त्र म्हणजे हिंदुत्व! भाजप हे सेनेकडून हिंदुत्वच हिसकावयाला निघालं आहे. सेनेकडून हिंदु्त्व हिसकावण्यासाठी त्यांनी राज ठाकरे नावाच्या जुन्या गड्याला 'भगवाधारी' (Bhagwadhari) करुन मैदानात उतरवलंय. या गड्यानंही आल्या आल्या जोरदार 'भोंगा' पसरवत चांगलाच गागट केलाय. भोंग्याच्या आवाजानं सेनेलाही धडकी भरली अन् सेनाही आता आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी खटाटोप करतेय. मनसेने सुरु केलेल्या हनुमान चालीसेत (Hanuman Chalisa) सेना नकळत ओढली जातेय. शिवाय राष्ट्रवादीही आपलं सेक्युलरीझम दाखवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करतेय. अशात मनसेच्या अजेंड्याला सेना-राष्ट्रवादी बळी पडली असं वाटत असलं तरी, मुख्य सुत्रधार हे फडणवीस आहेत मात्र, हे सगळ्यांना दिसत नाही. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून मनसेच्या इंजिनखाली शिवसेनेच्या वाघाला चिरडायचं आणि नंतर त्या वाघाला कमळाच्या फुलानं श्रद्धांजली द्यायची असा मास्टर प्लॅन फडणवीसांचा दिसतोय.


कोणता झेंडा हाती घ्यायचा?

हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र भाजप-मनसेची वाढती जवळीक पाहता भाजप-मनसेचा झेंडा दिसायला वेगळा असला तरी तो एकच असल्याचं किंवा भविष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या एकत्र होण्याची चिन्हं दिसतायत. शिवसेनाही आपल्या हिंदुत्वाच्या अस्त्राला बळ देण्यासाठी युवराजांना अयोध्येत (Ayodhya) पाठवण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे लवकरत अयोध्येत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र मविआच्या किमान-समान कार्यक्रमामुळे सेनेच्या वाघाला डरकाळीही हळू आवाजात द्यावी लागते असं चिंत्र आहे. या सगळ्यात फडणवीसांचा अजेंडा मात्र जोरदारपणे रेटला जातोय. ज्याला भाजप, मनसे प्रत्यक्षपणे आणि शिवसेना, राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तो अजेंडा म्हणजे हिंदुत्व... जे उत्तर प्रदेशात परिणामी देशात भाजपला सर्वशक्तीमान करतं! बाकी कॉंग्रेसचं बोलायचं झालं तर कॉंग्रेसला स्वतःच्या भविष्याची काळजी आहे की नाही हा प्रश्न पडतो.

.

.

.

- अक्षय्यनामा✍️


New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...