आज जागतिक रंगभूमी दिवस. अवघ्या विश्वाला एका लाकडी मंचावर सादर करण्याचं सामर्थ्य आहे ते याच रंगभूमीत. जेथे सर्व रंग एकाच ठिकाणी एकत्र होतात अशी ती गजबची रंगभूमी. संहिता, अभिनय, कलाकार, नैपथ्य, संगीत, प्रकाश योजना, संगीत संयोजन, रंगमंच व्यवस्थापन, विंग, पडदा अशा अनेक शब्दांचा काही वर्षांपूर्वी माझा काडीमात्रही संबंध नव्हता. मी २० वर्षांचा होईपर्यंत कधी कोणते नाटक अथवा एकांकिका प्रत्यक्षात पाहिल्याचेही मला आठवत नाही. त्यामुळे रंगमंच, रंगभूमी, अभिनय या गोष्टींची समीक्षा करण्याचा नैतिक अधिकारही मला नाही, असे मला स्वतःला वाटते. मी स्वतः कलाकार नाही मात्र मी कलेचा पुजारी आहे. संगीत, अभिनय, संवाद, डायलॉग्स, देहबोली, डोळ्यांतील बोलकेपणा यांनी मी नक्कीच संमोहित होतो. मी बोटावर मोजण्याइतकीच नाटके किंवा एकांकिका बघितल्या आहेत, त्यामुळे अभिनयाच्या आणि कलेच्या या महान रंगभूमीवर मी क्षणभंगुर असा सूक्ष्मजीव आहे. मात्र तरीही आज मी याबद्दल माझ्या मनातल्या गोष्टी बोलू इच्छितो.
पहीलं बघीतलेलं नाटक
तसं बघायला गेलं तर मी आजही काही अगदीच नाट्यवेडा वैगेरे नाही, हे मी प्रमाणिकपणे सांगतो. ते माझं क्षेत्र नाही, पण मी नाट्यप्रेमी मात्र नक्कीच आहे. मी चित्रपट वैगेरे एका सामान्य प्रेक्षकाप्रमाणेच बघायचो. त्यातला अभिनय, स्क्रिप्ट वैगेरे इतका सखोल विचार मी कधी केलाच नव्हता. २०१६ मध्ये मी 'बॅचलर ऑफ मास मीडिया'साठी उल्हासनगरच्या 'एसएसटी महाविद्यालयात' प्रवेश घेतला. १२ वी आर्टस् सुद्धा इथूनच पास झालो होतो. 'बीएमएम' म्हणजे काय? याबाबत फारशी माहिती नव्हती. कुणीतरी सांगितलं कि, चांगले मार्क्स आहेत आर्टस् करण्यापेक्षा बीएमएम कर. मग मी घेतलं ऍडमिशन बीएमएमएला. फर्स्ट ईयरला माझे वर्गशिक्षक प्रमोद गायकवाड सर होते. अगदी फ्रेंडली स्वभावाचे. आजही आम्ही अधून-मधून भेटत असतो. तर... विषयाकडे येतो, २०१६ साली जेव्हा मी बीएमएमच्या फर्स्ट ईयरला होतो तेव्हा प्रमोद सरांनी मला आणि माझा वर्गमित्र आकाश जाधव आम्हा दोघांना नाटक बघायला नेलं होतं. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी असल्याने त्यांनी ते नाटक पाहण्यासाठी आम्हाला नेलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं ''दोन स्पेशल''... जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यात मुख्य भूमिकेत होते. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे दुपारी ३ वाजताचा प्रयोग असावा. आम्ही सर्वात स्वस्त तिकीट घेऊन मागेच बसलो. जसा पडदा उघडला तसं काहीतरी आश्चर्य बघावं असा मी रिऍक्ट झालो. मी पहिल्यांदा लाईव्ह नाटक बघत होतो. नाटक आणि चित्रपट यातला मुख्य फरक आणि बऱ्याच गोष्टी उमगल्या. सर अधून-मधून दबक्या आवाजात आम्हाला नाटकाबद्दल सांगत होते. नाटक संपल्यावर सरांनी आम्हला बॅकस्टेजला नेऊन जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांची भेट घालून दिली, फोटोज काढले, मस्त वाटलं... आयुष्य पहिल्यांदा कुण्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढला असावा. नंतर भिजत-भिजत घरी आलो. काहीतरी नवीन अनुभव घेतल्याचा आनंद तर होताच, पण सेलिब्रिटींबरोबर फोटो काढल्याचा आनंद त्यापेक्षा दुप्पट होता. कदाचित इथूनच रंगमंच, नाटक, कलाकार, अभिनय यांची ओळख झाली. नाटकाचं बेसिक कॉन्सेप्ट तरी कळलं. नाहीतर त्याअगोदर नाटक म्हणजे शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाच-गाणं एवढंच मला माहित होतं. नाटकाची ओळख प्रमोद सरांनी करून दिली त्याबद्दल त्यांना मनापासून थँक्स....
निखिल आणि नाटक
कॉलेज सुरु झालं. पाहिलंच वर्ष होतं. सगळेच एकमेकांचे गुपचूप तोंडं बघत बसले होते. नंतर हळूहळू बोलायला लागलो. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एक जाडा आणि दिसायला टपोरी असा मुलगा वर्गात आला आणि पहिल्याच बाकावर येऊन बसला. तो होता निखिल जाधव सगळ्यांशी असा बोलत होता जसं काय लय दिवसांपासून ओळख आहे. पहिल्याच दिवशी सरांना नाटकाबद्दल विचारपूस करू लागला. युथ, आयएनटी वैगेरे... वैगेरे. सगळेजण त्याला विचित्रच समजायचो. शिक्षक आला कि गेला हा चिपकायला, असं तेव्हा माझ्यासह सगळेच बोलत होते. नंतर हळू- हळू मैत्री होत गेली, एकमेकांचे स्वभाव कळू लागले, मग भावा आणि शिव्या सुरु झाल्या. आता याचा नाटकाशी काय संबंध? असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल! तर... नंतर मी, निखिल, चेतन, प्रसाद, आकाश खरात अशी आमची गॅंग बनली. निखिल हा नाटकात काम केलेला मुलगा. तेव्हाही करायचा. नाटकाच्या रिहर्सलसाठी उल्हासनगरहून कल्याणच्या नालंदा शाळेत यायचा, माझ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. असं भेटणं वैगेरे तर रोजच व्हायचं, पण एकदा त्याने मला त्यांची रिहर्सल बघायला चल असा आग्रहच केला. मी पण लगेच गेलो. आम्हाला उशीर झाला होता, रिहर्सल सुरु होऊन १० मिनिटे झाली असावीत. निखिलने गेल्या - गेल्या त्याची जागा घेतली. मी मात्र तसाच दरवाजाजवळ उभा. तेवढयात एक भयंकर रागात असलेला माणूस अचानक माझ्यावर ओरडू लागला, माझी जराशी फाटलीच.. मला काहीच कळेना. निखिल कॅरेक्टर मध्ये होता, म्हणून त्याने केवळ इशाऱ्यातच मला रिलॅक्स राहण्यात सांगितले. मला वाटले कि मी यांच्या रिहर्सल मध्ये व्यत्यय आणल्याने हा माणूस माझ्यावर चिडला असावा, पण नंतर लगेच कळलं कि, तो त्याचे डायलॉग्स बोलत होता. रिहर्सल हॉल छोटा होता, त्यात मी त्याच्या जागेवरच उभा होतो जिकडे त्याचा सीन होता. तो तर त्याचं-त्याचं काम करत होता. मात्र त्यांची ऍक्टिंग एवढी असली होती कि, सुरवातीला मला ते कळलंच नाही. मला खूप इम्बॅरेसिंग फील झालं. म्हंटलं पाहिल्यांदाच आलो आणि हीअशी च्युत्यागिरी झाली. निखिलचा जाम राग आला होता, कुठं फसवलं मला ह्याने असं वाटत होत.
"हवे पंख नवे"
रिहर्सल संपली. निखिलने सर्वांची ओळख करून दिली. अशोक हंडोरे सर, विक्रांत शिंदे, स्नेहल थाटर आणि अजून काही जण असतील. हंडोरे सरांनीही मला ''येशील का रिहर्सलला'' असं विचारलं, मीही तिकडे जायला लागलो. रिहर्सलची म्युझिक ऑपरेट करायला तेव्हा कुणी नव्हते, तर मी ते करत असे. मग रिहर्सलमध्ये दररोजचे डायलॉग्स, स्क्रिप्ट, हावभाव, आवाजातील चढ-उतार, नैपथ्य, वेशभूषा, मेकअप, केशभूषा, नृत्य, प्रकाश, ऍडजस्टमेन्ट अशा अनेक गोष्टी दररोज अनुभवत होतो. मीही माझ्या कामात म्हणजेच संगीत संयोजन (म्युझिक ऑपरेटर) म्ह्णून माझे काम ठीक-ठाक पद्धतीने करत होतो. एकूणच बोधी नाट्य परिषद निर्मित, प्रेमानंद गज्वी लिखित आणि अशोक हंडोरे दिग्दर्शित - "हवे पंख नवे" या नाटकाचा ''संगीत संयोजक'' म्हणून माझे नाव लागले. अनेक आठवड्यांच्या मेहनत आणि २०-३० रिहर्सल नंतर या नाटकाचा पहिला प्रयोग पहिला प्रयोग - दि. १९/१२/२०१६ सोमवार रोजी,शिवाजी नाट्य मंदिर,दादर. संध्याकाळी ७:३० वाजता (टिकीट रु.१०० आणि रु.२००), दूसरा प्रयोग - २०/१२/२०१६ मंगळवार रोजी, अत्रे रंगमंदिर, कल्याण. रात्री ८:०० वाजता (टिकीट रु.१०० आणि रु.२००), तिसरा प्रयोग - २१/१२/२०१६ बुधवार रोजी, प्रबोधनकार ठाकरे (मिनी), बोरीवली.रात्री ८:०० वाजता (टिकीट रु.२००) असे सलग तीन प्रयोग लागले. मी अगदी नवखा असल्याने गडबड होऊ नये म्हणून पहिल्या तीन प्रयोगांच्या संगीत संयोजनासाठी दुसरी लोकं होती, मला त्यांच्या बाजूला बसून अनुभव घेण्यास सांगितले. त्यानंतर मात्र पुढचे सर्व प्रयोगांचे संगीत संयोजन मी एकट्यानेच केले. ज्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश होता.
मी नाटकात काम करण्याची दोन मुख्य कारणे होती, एक म्हणजे खास मित्राचा आग्रह, दुसरं म्हणजे नाटकाचा विषय. हे नाटक बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित असल्याने मी यात तन-मन-धन लावून काम केले. या नाटकाच्या तीस-एक प्रयोगांमध्ये मी संगीत संयोजनाचे काम केले. तसेच फेसबुकवर पेज बनवून नाटकाची जाहिरात केली. कोल्हापूर, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले ज्यात मी संगीत संयोजन केले. या नाटकाने माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी बदल घडवला. या नाटकाने नव्याने बाबासाहेब कळले. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात प्रयोग होता, तेव्हा माझा पूर्ण परिवार त्या प्रयोगाला उपस्थित होता. नाटक सुरु होत असताना जेव्हा संगीत संयोजन म्हणून माझं नाव घेतलं, तेव्हा माझ्या घरच्यांनाही नक्कीच समाधान मिळालं असेल. एकूणच नाटकात ती ताकद आहे, जी माणसाला पूर्णपणे बदलवून टाकते. नाटकामुळे मी माझ्यातला बदल अनुभवला होता. नक्कीच तो विलक्षण होता.
माझ्यातला बदल
मी नाटकात काम करण्याची दोन मुख्य कारणे होती, एक म्हणजे खास मित्राचा आग्रह, दुसरं म्हणजे नाटकाचा विषय. हे नाटक बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित असल्याने मी यात तन-मन-धन लावून काम केले. या नाटकाच्या तीस-एक प्रयोगांमध्ये मी संगीत संयोजनाचे काम केले. तसेच फेसबुकवर पेज बनवून नाटकाची जाहिरात केली. कोल्हापूर, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले ज्यात मी संगीत संयोजन केले. या नाटकाने माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी बदल घडवला. या नाटकाने नव्याने बाबासाहेब कळले. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात प्रयोग होता, तेव्हा माझा पूर्ण परिवार त्या प्रयोगाला उपस्थित होता. नाटक सुरु होत असताना जेव्हा संगीत संयोजन म्हणून माझं नाव घेतलं, तेव्हा माझ्या घरच्यांनाही नक्कीच समाधान मिळालं असेल. एकूणच नाटकात ती ताकद आहे, जी माणसाला पूर्णपणे बदलवून टाकते. नाटकामुळे मी माझ्यातला बदल अनुभवला होता. नक्कीच तो विलक्षण होता.
सुखद धक्का
दुसरा सर्वात बेस्ट अनुभव म्हणजे प्रेमानंद गज्वी सर... माझी १० वी २०१० साली झाली. आमच्या मराठीच्या पुस्तकात पान न. ५६ वर ११ वा धडा होता - "म्या साळा सिकनार' आणि या धड्याचे लेखक आहेत... प्रेमानंद गज्वी सर!!! जेव्हा मी नाटकात काम करायला लागलो होतो तेव्हाच सरांशी भेट झाली होती. कालांतराने एकदा असंच पुस्तकांचा कप्पा साफ करताना दहावीचं माझ्याकडे असलेलं एकमेव मराठी या विषयाचं पुस्तक माझ्या हातात आलं. ते सहजच वाचायला घेतलं, तो ११ वा धडा आला आणि प्रेमानंद गज्वी हे नाव दिसलं. तसा मी सप्राईज झालो. आणि मग लक्षात आलं कि, ज्या लेखकाचा धडा आपण शाळेत शिकलो त्याच लेखकाला आपण भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या नाटकात कामही केलं... याचा शोध मला लागला. हा माझ्या आयुष्यातला एक सुखद धक्का होता.
चांगले मित्र - मैत्रिणी लाभले
पुढे कॉलेजमधली उत्खनन एकांकिका असो किंवा नांगेली एकांकिका असो यातही मी संगीत संयोजक म्हणून काम केले. मी फक्त माझ्याबद्दलच सांगतोय, याचं कारण म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, ते काम मी प्रत्यक्षात केलं, त्यामुळे त्याचं मला समाधान आहे. दुसरं म्हणजे इतरांच्या अभिनयाची आणि माझ्या संगीत संयोजक म्हणून कामची तुलना कधीच होऊन शकत नाही. शेकडो प्रेक्षकांसमोर उभे राहून अभिनय करणे, आवाज लावणे आणि व्हरांड्यात बसून लॅपटॉपवर संगीत वाजवणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. त्यामुळे सर्वच कलाकारांचं काम नक्कीच श्रेष्ठ आहे यात तिळमात्रही शंका नाही. या सर्व प्रवासादरम्यान अनेक चांगले मित्र - मैत्रिणी लाभले. ज्यात प्रणाली ताई आणि प्रशांत दादा,प्रियंका,सुनील, विरेश, हर्षदा, एकता, वर्षा, उमेश, राकेश ही मंडळी आहेत. या सगळ्या प्रवासाची सुरुवात ज्या ड्रॉयव्हरने करून दिली तो म्हणजे निखिल जाधव. हे सर्व काही घडण्यासाठी तोच निमित्त होता. त्याचे यासाठी हृदयापासून धन्यवाद!!!
उत्सव घरातच साजरे करावे लागणार
कालांतराने अनेक कारणांमुळे जसे अभ्यास, आर्थिक अडचण, वेळ यांमुळे मी नाटकापासून दुरावलो, नाटकात कोणत्याही प्रकारचे काम करणे सोडून दिले ते कायमचेच. कारण मला कुठेतरी जाणीव झाली होती कि, आवड असणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं ते वेगळं... नाटक मला नाव आणि प्रसिद्धी देत होते पण आर्थिकदृष्ट्या मला सारं काही आलबेल वाटत होत. त्यामुळे शेवटी मी नाटकात काम करणं सोडून दिलं ते कायमचच. पण आजही मी नाटकाचा चाहता आहे. नाटक बघणं, त्यावर विचार मांडणं, परीक्षण किंवा समीक्षण करणं आणि नाटकाचा आस्वाद घेणं हे मला आजही आवडतं. हा माझा नाटकाचा प्रवास अगदी छोटा होता, पण जो काहो होता तो माझ्यासाठी खूपच खास होता. प्रवास संपलेला नाही थांबलेला आहे. बघू... काय होतं ते... सध्यातरी आपलंच नाटक होतंय. कोरोना व्हायरसने अवघ्या जगाला घरात कैद केलं, त्यामुळे यंदा बऱ्याच मोठ्या उत्सवांना घरातच साजरे करावे लागणार आहे. आज लाॅकडाऊनचा तिसरा दिवस आहे. कलाकारांनी आणि नाट्य-रसिकांनी घरातच आणि वैयक्तिकरीत्या आजचा " जागतिक रंगभूमी दिन" साजरा करावा. मी नाना पाटेकरांचा "वजूद" चित्रपट बघितला आणि या दिवसाचा आनंद घेतला. आपणही असंच काही करू शकता. आपणांस जागतिक रंगूभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.