लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Thursday 26 March 2020

२१ दिवसांत भारत करोनामुक्त होईल?



आज दिनांक २५ मार्च २०२० लॉक डाऊनचा पहिला दिवस. जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेणाऱ्या करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला, जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडली जावी. खरंतर याअगोदर २२ मार्च रोजी रविवारी पंतप्रधानांनी जो 'जनता कर्फ्यू' घोषित केला होता तेव्हाच त्याची चाहूल लागली होती की पुढे भारतालाही संपूर्णतः लॉकडाऊन करावे लागेल. मंगळवारी  रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत आपल्या नेहमीच्या शैलीत 'भाईयों और बहनों' असे म्हणून देश लॉकडाऊन केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागतच आहे, कारण सध्या करोना व्हायरसवर कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. जर या व्हायरसपासून आपल्याला वाचायचे असेल तर स्वतःला या व्हायरसची लागण न होऊ देणे, हा एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी अवघा देश आणि त्यातल्या जनतेने स्वतःला आपापल्या घरातच 'होम क्‍वॉरंटाईन' (अलगीकरण) करून घेणे आवश्यक आहे. आजच्या घडीला फारच गंभीर होतेय. भारतात आत्तापर्यंत ६४५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना बाधित रुग्ण आहेत, महाराष्ट्रात हा आकडा १२२ पर्यंत आहे.  
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरात ३ लाख ७२ हजार ७५७ जणांना या व्हायरसची लागण झाली असून सुमारे १६ हजार २३१ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अजूनही हा आकडा वाढतच आहे. WHO ने याआधीच करोनाला 'जागतिक महामारी' घोषित केले आहे. चीन आणि इटली सारख्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिका, ब्रिटन यांसारखे समृद्ध देशही करोनामुळे त्रस्त झालेले आहेत. एकूणच संपूर्ण जगात हा रोग झपाट्याने आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 'गुणाकार पद्धतीने' पसरत आहे. 
  तर आता आपल्या देशाचं काय? आपल्या देशातील केंद्र सरकार, राज्यातील राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्व कोरोनाला आटोक्यात आणू शकतात? आणतील तर कशाप्रकारे आणतील? दुसरे देश काय उपयोजना करतायत? भारत कोणत्या चुका करतोय? देशातील जनता करोनाकडे कशी पाहते? असे अनेक प्रश्न मला पडतात. त्याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला, ते खालीलप्रमाणे -

१) केंद्र सरकारने न घेतलेले गांभीर्य

 चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या या व्हायरसचा शोध ३१ डिसेंबर २०१९ रोजी लागला. म्हणजे आजपासून जवळपास अडीच महिन्यांपूर्वीच या नव्या व्हायरसची जगाला माहिती झाली. त्यामुळे तेव्हाच जर काही ठोस उपायोजना केल्या गेल्या असत्या तर आज परिस्थिती काही वेगळी असती. एवढ्या गंभीर साथीचा रोग असूनही आतंरराष्ट्रीय वाहतूक चालूच होती आता कुठे ती बंद करण्यात आली आहे. पण याच काळात भारतात करोनाच्या केसेस येऊ लागल्या आणि आज ५४५ करोनाबाधित रुग्ण आहेत.

२) कमी प्रमाणात तपासण्या

भारतात करोना तपासण्या ह्या केवळ लक्षणे असणाऱ्यांना, परेशातून प्रवास केलेल्यांना आणि करोना बधितांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या संशयितांच्याच होत आहे. ही लक्षणे दिसण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीमुळे नकळत अनेकांना याची लागण होऊन संसर्गाची साखळी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे भारताने जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करायला हव्यात. जेणेकरून खरी आकडेवारी कळू शकेल.

३) करोनापेक्षा राजकारणालाच महत्त्व

अवघ्या जगात करोनामुळे माणसं मारली जात आहेत. भारतातही करोना पसरत चाललाय, मात्र मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करण्यात मोठ्या नेत्यांचा वेळ आणि श्रम गेले. या काळात देशासाठी जबाबदार असलेल्या शासन कर्त्यांनी याकडे पूर्णतः लक्ष न दिल्याने आणि निर्णय न घेतल्याने हे प्रकरण वाढले.

४) धार्मिक सण, यात्रा, उत्सव

धर्मापुढे किंवा धार्मिक उत्सव, सण यापुढे करोना फिका पडला. कारोनाची भयंकर साथ असतानाही होळी, धुळवड, राजकीय सभा असे अनेक सार्वजनिक कार्यक्रम होत होते. त्यामुळे गर्दीतून हा संसर्ग अनेकांपर्यंत पसरला. योगी आदित्यनाथ यांचं ताजं उदाहरण आपलाल्या माहिती असेलच.

५) जनता कर्फ्यु

करोनामुळे काहींचे मृत्यू झाले तेव्हा पंतप्रधानांनी रविवारी देशाला सबोधित केले. करोनाशी दोन हात करणाऱ्या विविध यंत्रणांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या - थाळ्या - घंटी वाजवून त्यांचे आभार मानावे असे आवाहन मोदींनी केले. दिवसभर घरात असलेली जनता रस्त्यावर आली आणि अक्षरशः धिंगाणा केला. शेवटी दिवसभराची मेहनत संध्याकाळी पाच वाजता पाण्यात गेली.

६) अपुरी साधने आणि वैद्यकीय सेवा

भारताची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे.  यातल्या काही हजार लोकांना जरी करोनाची लागण झाली तर भारताला ते खूप महागात पडेल. चीन प्रमाणे १००० बेडस् असलेले रुग्णालय आपण काही दिवसांत अजूनपर्यंततरी तयार करू शकलेलो नाही. त्यात मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजारामुळे झालेला तुटवडा. तसेच डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी अशा अनेकांना संरक्षक कपडे, हॅण्डग्लोज अशा अनेक साधनांचा तुटवडा आहे.

७) जनतेची असंवेदशीलता

भारतातील जनता ही या व्हायरस बाबत प्रचंड असंवेदनशील आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांचे पालन केले जात नसल्यानेच आज रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. त्यामुळेच सरकारला आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

८) २१ दिवसांत भारत करोनामुक्त होईल का?

नाही!!! केवळ लॉकडाऊन करण्याने भारतातून करोना जाणार नाही. किंवा #GoCorona असे म्हणूनही जाणार नाही. पूजा पाठ आणि गोमूत्र - शेण यांनी तर बिल्कुल नाही. तर त्यासाठी या २१ दिवसांमध्ये ककडकडीत बंद पाळणे आवश्यक आहे. या काळात जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या व्हायला हव्यात. वैयक्तिक स्वच्छतेची आता कायमची सवय लावायला हवी. झोपडीपासून ते टोलेजंग इमारती सगळ्यांचे निर्जंतुकीकरण व्हावे. जनतेच्या आरोग्याविषयी मोठे निर्णय घेऊन ते अमलात आणणे गरजेचे आहे. सोबतच आतापासून अशा साथींच्या रोगांसाठी रुग्णालयांची संख्या आणि क्षमता वाढवण्याची गरज आहे. शाळेच्या पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे आणि प्रत्यक्ष कृती करवून घेणे आणि त्याची सवय लावणे आवश्यक आहे. जेणेकरून खोकताना आणि शिंकतांना तोंडावर रुमाल ठेवला पाहिजे हे सांगण्याची गरज भासणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे जनजागृती आणि जनतेची संवेदनशीलता. जनतेने अशा आपत्कालीन परिस्थितीत जर सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तर ते देशासाठी, समाजासाठी आणि स्वतः साठीही घातकच ठरेल. जनतेची पक्की साथ असेल तर येत्या २१ दिवसांत भारतात करोना व्हायरस शेवटच्या घटका मोजत असेल...१००%

९) चांगलं काम कोण करतंय? केंद्र की राज्य?

वैयक्तिकरित्या सध्याच्या घडीला मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन. आत्तापर्यंत त्यांनी परिस्थिती खूप चांगल्याप्रकारे हाताळली आहे. अनेकवेळा पत्रकार परिषदेतून प्रश्नांची उत्तरे दिली, फेसबुकच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली. जनतेला गोंधळात किंवा संभ्रमात टाकणारे कोणतेही वक्तव्य केले नाही. करोनाबाबत सतत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. सोबतच शासकीय यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करताना दिसतायत. त्यामुळे एकूणच  सध्यस्थिती पाहता महाराष्ट्र सरकार करोनाबाबत नक्कीच चांगले काम करत आहे. आपण सर्वांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशा करूयात की लवकरच सगळं काही ठीक होईल.

टीप: वरील लेख मी माझ्या दैनंदिन अनुभवातून, निरिक्षणातून आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीने लिहिला आहे. आपले अनुभव किंवा मते यापेक्षा वेगळी असू शकतात. आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
.
.
.

#अक्षय्यनामा✍️



No comments:

Post a Comment

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...