लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Monday 15 June 2020

फिजिकल अंतर ठेवायचंय... सोशल नाही!!!

    
    आज सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. खरंच खूप वाईट वाटलं. त्याआधी इरफान खान, ऋषी कपूर, वाजीद खान, आणि आज सुशांतसिंग राजपूत. असे हे दिग्गज एकामागोमाग - एक निघून गेले. मात्र सुशांत त्याला अपवाद होता. त्याने स्वतःहूनच मृत्यूला जवळ केलं. त्याच्या आत्महत्येचे कारण कळेल/ न - कळेल कुणाला ठाऊक? पण नैराश्यातून माणूस काहीही  करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सुशांतच्या आत्महत्येची अनेक कारणे असू शकतील, पण त्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे - तो सध्या परिवारापासून दूर आणि एकटा राहत होता. तो परिवारासोबत असता तर कदाचित त्याने हे टोकाचं पाउल उचलताना जरा आणखी जास्त विचार केला असता आणि कदाचित त्याने स्वतःला रोखलंही असतं. इथेच  माणसाचा स्वभाव दिसून येतो. एखादी व्यक्ती कितीही परिपूर्ण असली तरी समाजात आणि माणसांत मिसळण्याची नैसर्गिक वृत्ती हीच माणसाच्या मनाचा, बुद्धिमत्तेचा, मेंदूचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करते. त्यामुळेच आज आपल्यालाला घरात बसून राहणे अक्षरशः नकोसे वाटते. एकमेकानां भेटावं, बोलावं, फिरायला जावं अशी इच्छा होणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. आजच्या घटनेने आपल्या सर्वांना एक धडा दिला आहे, तो म्हणजे मानसिक स्थिती सांभाळण्याचा... डिप्रेशनमध्ये न जाता मनाची स्थिती चांगली ठेवण्याचा...
    एकतर ह्या कोरोनाने आपल्या सगळ्यांना घरातच नजरकैद केलं आहे. घरातील व्यक्ती वगळता इतर प्रियजनांचा, मित्रांचा, जवळच्या माणसांचा एकमेकांशी होणारा नैसर्गिक संवाद बंद झालाय. डिजिटल किंवा व्हर्चुअल संवादातून फक्त माहिती पोहोचते, संवेदना नाही. समाजशील असलेले आपण घरात बसून खूप वैतागलो आहे. मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी सध्यातरी घरात राहणे हाच सर्वोत्तम असल्याने जमेल तेवढे त्याचे पालन केले पाहिजे. यात दुमत नाही. पण त्यासोबतच मनाची स्थिती सतत तपासत राहिली पाहिजे. जे वर्क फॉर्म होम करतायत त्यांचा बऱ्यापैकी दिवस निघून जातो. मात्र, ज्यांना सध्या काम नाही किंवा घरून काम करणे शक्य नाही, असे बरेचसे लोक शांत, अस्वस्थ काहीसे निराश झालेले दिसतात. ही गोष्ट काहीशी माझ्या बाबतीत सुधा लागू होते. २ - ३ महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आपली ही परिस्थिती होते, तर जन्मापासून पिंजऱ्यात वाढणाऱ्या आणि शेवटी तिथेच अस्त होणाऱ्या प्राण्यांबद्दल आपलं काय मत आहे? माणूस किती निर्दयी आहे, हे केरळमधील गर्भवती हत्तीणीला विचारा, माणसाने जे पेरलं आहे त्याचंच  फळ कोरोनाच्या रुपात त्याला मिळालं आहे. असो... विषयांतर होतंय...

    तर सध्याच्या काळात २०२० वर्ष कोरोनाच्या नावावरच आहे, असं माझं ठाम मत आहे. तज्ञ म्हणतायत कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे... नक्कीच... पण मानसिक आरोग्याचं काय? जर आपण एकमेकांशी बोललो नाही, भेटलो नाही, व्यक्त झालो नाही तर आपण मेंटल होऊ हे नक्की. कोरोनासोबत जगायला नक्कीच शिकलं पाहिजे पण आपल्या माणसांना सोबत घेऊन...नाती जपून...नियमांचं पालन करून आपण आता एकेमेकांच्या सुख - दुःखात सहभागी झालं पाहिजे. येणारा काळ फार अवघड असेल. आपल्यातला कोण जर सुशांत प्रमाणे डिप्रेशनमध्ये असेल तर...? काही अनर्थ झाल्यावर आपण जर केवळ श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवणारे असू तर आपण कसले माणूस? कसले मित्र? आणि कसले नातेवाईक? सगळं काही डिजिटल आणि व्हर्चुअल नाही होऊ शकत नाही ...बरोबर ना? कोरोनासोबत जगताना माणसांना आणि  माणुसकीला विसरता कामा नये. एकमेकाची विचारपूस केली पाहिजे, शक्य असल्यास नियम पाळून गजावाजा न करता भेटही घेतली पाहिजे हे माझं मत आहे. कारण कोरोना कधी जाईल ते माहित नाही, मात्र आपली लोक आपल्यापासून दूर जाता कामा नये. फिजिकल अंतर ठेवायचंय, सोशल नाही. 😊
 



No comments:

Post a Comment

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...