आज १ जानेवारी....आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यातील भीमा कोरेगाव येथील विजयास्तंभाला मानवंदना दिली. प्रचंड ऊर्जा मिळाली. आपले पूर्वज किती शूरवीर, लढवय्ये होते याची ग्वाही तिकडचे वातावरण देते. सोबतच एक नवं चैतन्य निर्माण करते. चळवळीतला पँथर जागा करते. त्यामुळे आज विजयस्तंभाकडून जी उर्जा जो अनुभव मिळला तो खरच अविस्मरणीय आहे.
मागील वर्षी झालेल्या प्रकारामुळे बहुतेक लोक याठिकाणी येण्याचे टाळतील असा विचार दंगलखोरांनी केला असावा... पण त्यांच्या या स्वप्नाचा पार कचरा झाला. दरवर्षीपेक्षा कितीतरी अधिक पटीने लोक याठिकाणी आले होते. अंदाजे २५ ते ३० लाख लोक आले असल्याचे कळले. आम्हाला जेवढा तोडण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या दुप्पट ताकदीने आम्ही उभे राहू ही धमकीच जणू जमलेल्या भीमसैनिकांनी आपल्या एकतेतून या जातीयवाद्यांना दिली.
बाकी सभोवतालचे वातावरण पाहता आणि प्रशासनाने केलेली व्यवस्था फक्त नाममात्र आणि अपुरी होती. काही मोजकी दुकाने वगळता बहुतांश दुकाने बंद होती जणू काही अघोषित बहिष्कार टाकला आहे. पार्किंग व्यवस्था ही अपुरीच. रस्त्यांवर सुमारे १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था ही देखील तोकडीच.. शेवटी आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करून १० किलोमीटर चालत जाऊन विजयस्तंभाजवळ पोहोचलो आणि अभिवादन केले.
विजयास्तंभाच्या परिसरातही प्रचंड धुळीचे साम्राज्य त्यात गर्दी आणि ऊन... त्याठिकाणी ग्रीन मॅट टाकले असते तर धुळीमुळे होणारा त्रास टाळता आला असता. सकाळी ८ वाजता कल्याणहून निघालो होतो आणि संध्याकाळी ६ वाजता विजयस्तंभाजवळ पोहोचलो. प्रशासनाने भीम अनुयांनाना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याची पुरेपूर तयारी केल्याचे जाणवले. मानवंदना दिल्यानंतर पुन्हा १० किलोमीटर पायपीट करत गाडीजवळ पोहोचलो. ७:३० वाजले होते, आता थंडी जाणवायला लागली त्यात अंधारही. विजयस्तंभाजवळचा काही परिसर वगळता इतर ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधार होता पण वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहनांपासून पुरेसा प्रकाश मिळत होता. पण धुळीने मात्र शेवटपर्यंत साथ सोडली नाही त्यामुळे सर्दी - खोकला डोकेदुखी जाणवू लागली. अभिवादन करून झाले आता सर्वांना लवकरात लवकर घरी पोहोचण्याची घाई लागली. मात्र अनेक महत्त्वाचे रस्ते बंद केल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले होते त्यामुळे वाहतूक अगदी कासव गतीने होत होती. जे लोक रेल्वेने आले होते त्यांचे तर खूपच हाल झाले. कारण प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या बसेस अगदी नाममात्र असल्याने ते अपुऱ्या पडत होता. त्यामुळे बरेच लोक पायी प्रवास करत होते. एकूणच परिस्थितीत पाहता फार त्रासदायक होती. जरा नजर चुकीली की सोबत असलेले लोक विस्कळीत व्ह्यायचे. मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही आमच्या समुहापासून वेगळे झालो होतो. आम्हाला एकमेकांना शोधायला अर्धा तास गेला. त्यात प्रशासनाने इंटरनेट सेवा देखील बंद केली होती त्यामुळे खूप असुविधा झाली. कुठे काय चालले आहे कुणाला काहीच कळेना. व्हॉट्सअँप लोकेशन वापरून एकमेकांना शोधता आले असते पण भित्र्या प्रशासनाने इंटरनेट सेवाच बंद केली होती.. म्हणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न... वैगेरे.. वैगेरे... शेवटी आम्ही सगळे पुन्हा भेटलो सर्वांना प्रचंड भूक लागलेली. एका ठिकाणी मिसळ खाण्यास थांबलो तर पाव नाही पण भाव ५० रू. प्लेट.. साधा बटाटा वडाही या दिवशी १५ रुपयाला विकत घ्यावा लागला. मिळेल ते खाऊन पटकन निघालो. पार्क केलेली गाडी मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी अजून अर्धातास... ट्रॅफिकमुळे! यात मात्र ट्रॅफिक कंट्रोल करण्यास कुणीही दिसले नाही. काही भीमसैनिक रस्त्यावर उतरून सर्वांना मदत करत होते, ट्रॅफिक कंट्रोल करत होते. शेवटी हळू हळू का होईना आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रॅफिक जॅम तर होतीच, आम्ही लोणीकंदला पोहोचलो आणि इथेच आमची आणि अनेकांची अजून फजिती झाली. ट्रॅफिक जॅम,खड्डेमय खराब रस्ते, आणि रस्त्याचा चढ यामुळे बहुतेक वाहनांच्या क्लज प्लेट्स निकामी होत होत्या. त्यात आमच्याही गाडीची क्लज प्लेट बिघडली. आम्ही गाडीतून उतरून गाडीला धक्का देऊन गाडी रस्त्याच्या कडेला लावली. आमच्या पुढे अगोदरच काही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या त्यांना विचारले असता त्यांच्याही गाडीचा तोच प्रॉब्लेम होता. असेच आमच्या समोर अनेक बाईक, चारचाकी वाहने बंद पडली ते या ट्रॅफिकमुळे. आमची गाडी बंद पडली तिथे आसपास काही वस्ती वैगेरे नव्हती त्यात इंटरनेट सेवेवर बंदी असल्याने एखाद्या मेकॅनिकचा नंबर मिळवणहीे शक्य झाले नाही. शेवटी आमच्यातील दोघेजण गॅरेज किंवा मेकॅनिक शोधायला पायी निघाले आणि पाऊण तासानंतर रिकाम्या हाताने परतले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते, आता थंडीही खूप वाढली होती त्यामुळे आम्ही सर्वजण काहीवेळ गाडीतच बसलो. मदतीसाठी नातेवाईकांना फोन लावले तेव्हा कळलं की आमच्याच परिसरातले काही लोक तिकडे आले आहेत, काही वेळानंतर ती मंडळी आम्हाला भेटली आणि आमच्या मदतीसाठी पुढे निघून गेली जेणेकरून ते पुढे जाऊन गाडी टो करण्यासाठी तरी मदत पाठवतील. याचदरम्यान काळजाची तार छेडणारा आणि प्रशासनाविरोधात चीड आणणारा प्रसंग माझ्यासमोर घडला. एक ५५-६० वर्षांची महिला आमच्याकडे आली, तिने आम्हाला पोलिस स्टेशनचा पत्ता विचारला आणि तिला अचानक रडू कोसळले. आम्ही त्यांना धीर देत मावशी काय झालयं म्हणून विचारलं असता त्यांनी सांगितले की ती आपल्या नातेवाईकांसोबत साताऱ्याहून आली आहे आणि हरवली आहे. त्यात शिक्षित नसल्याने फोन नंबर किंवा पत्ता देखील त्यांना माहीत नव्हता. बिचाऱ्या त्या माऊलीबद्दल खूप वाईट वाटले. तेव्हाच आमच्या समोरून पोलिसांच्या गाड्यांचा एक ताफा जात होता आणि मध्यभागी कुणीतरी मोठा पोलीस अधिकारी होता, त्यापैकी एका गाडीला थांबवून त्यांना त्या महिलेच्या मदतीसाठी विचारले असता हो किंवा नाही असा कोणताही प्रतिसाद न देता ती पोलिसांची गाडी चक्क सरळ पुढे निघून गेली. हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. त्या महिलेबद्दल जेवढी चिंता होती त्याच्या कितीतरी अधिक पटीने मला त्या पोलिसांचा राग आला. शेवटी आमच्यातल्या एकाने त्या महिलेला १०० रू. दिले, आम्ही एक पाण्याची बाटली दिली तिला धीर देत पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले. त्यानंतर पुढे गेलेल्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने रात्री ११ वाजता आम्हाला मदत आली आणि आम्ही त्या ग्रामीण भागातून मुख्य हायवेवर दुसऱ्या गाडीतून आलो. त्या व्यक्तीचं नावं तर नाही आठवत पण त्या भल्या व्यक्तीने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी गाडी तात्पुरती दुरुस्त करून दिली आणि आमच्या ड्रायव्हरला काही सूचना दिल्या. त्या देवमाणसाचे आभार मानत आम्ही रात्री १२ वाजता परतीचा प्रवास सुरू केला. गाडीला प्रॉब्लेम असल्याने ६०-७० पेक्षा जास्त स्पीडने चालवणे शक्य नव्हते म्हणून सर्व प्रवास हळू - हळू चालू होता त्यात थंडीही खूप होती. गाडी गरम झाली की पिकअप घेत नव्हती त्यामुळे गाडी थंड करण्यासाठी तासभर तरी थांबावे लागत होते. असे तीनवेळा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही थांबलो. गाडीत भीमगीते आम्हाला नवी ऊर्जा देत होते, त्यातच कडूबाई खरात यांच्या आवाजातील गोडवा सर्व काही गोड करतो...असं करत करत शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जानेवारी ला सकाळी ८:०० वाजता आम्ही कल्याणला पोहोचलो. जवळपास २३ तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही बाहेरच होतो. असो.... शेवटी विजयस्तंभाला मानवंदना करायला मिळाली हे महत्त्वाचे.
केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वांचे असे हाल झाले त्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला "शासनाचा चोख बंदोबस्त" हा दावा फोल ठरलेला दिसतो. त्यातच १ जानेवारी २०१८ च्या त्या हिंसक घटनेचा विचार केला तरी अंगाला काटा येतो की, एकतर प्रशासनाचे असे ढिसाळ आणि अपूर्ण नियोजन त्यात महाराष्ट्रभरातून अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर अचानकपणे झालेला भ्याड हल्ला. खरंच तेव्हा काय अवस्था झाली असेल तिकडे असलेल्या आंबेडकरी जनतेची. अजूनही त्या आठवणी ताज्या आहेत.
पण...पण ते काहीही असो आंबेडकरी समाज हा कितीही विखुरलेला असला तरी तो जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याची खरी ताकद दिसून येते. ते दंगलखोर इतका जनसमुदाय बघून नक्कीच दरवाजाच्या वरच्या - खालच्या दोन्हीही कड्या लावून आत गुपचूप बसले असणार हे नक्की.. कारण मागच्या वेळी जो हल्ला झाला तो अचानकपणे झालेला होता आणि ह्यावेळी सर्वजण तयारीतच होते. आणि समोरासमोर दोन हात करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं उंदराचं नाही. ह्या डरपोक लोकाच्या असल्या भ्याड हल्ल्यांना आंबेडकरी जनता जराही भिक घालत नाही आणि घालणार नाही.
बाबासाहेबांनी बुद्धाच्या पदरी टाकून आम्हाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवला आणि सर्व समाज त्याचं आचरण देखील करत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ढिसाळ नियोजनामुळे त्रास होऊसुद्धा कुणीही दंगा केला नाही की तक्रार केली नाही. उत्साहात आले... शहिदांना अभिवादन... केले आणि शांतपणे निघून गेले. चोख नियोजन नसतानाही समाजाने कोणतीही तक्रार करता शांतता राखत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीतही आंबेडकरी जनतेने दाखवलेला संयम आणि शांतता ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
जातीयवाद्यांना आणि दंगलखोरांना एकच सांगेन - बौद्ध आहोत बौद्धच राहुद्या... अन्यथा महार झालो की काय परिणाम हे इतिहासाला विचारा!!!
शिंदे शाहीचं एक गाणं आठवलं...
तुम्ही कितीही लावा शक्ती
अन् कितीबी लढवा युक्ती
तुम्ही करारं कितीही हल्ला
लय मजबूत भीमाचा किल्ला.....
तर.... हा होता भीमा कोरेगाव येथील माझा एक अविस्मरणीय अनुभव!!!
भीमा - कोरेगावला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेचे जे काही हाल होतात ते होवू नये म्हणून पुढील उपाययोजना कराव्यात:
१) सर्वप्रथम हा एक मोठा उत्सव असल्याने शासन स्तरावर तो अधिक चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा व्हावा.
२) या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता त्याबद्दल जागरूकता निर्माण करावी.
३) या शौर्यदिनाला विरोध करणाऱ्या अथवा अडथळा आणू पाहणाऱ्या शक्तींना कडक शासन व्हावे.
४) ज्याप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांना काहीही कारण नसताना षडयंत्र रचून रा.सु.का. अंतर्गत तुरुंगात पाठवले गेले किंवा नुकतेच मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आले त्याचप्रमाणे या उत्सवात विघ्न आणणाऱ्या खऱ्या दंगलखोरांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाही व्हावी.
५) १ जानेवारी चा दिवस लक्षात घेऊन २-३ महिने अगोदरच शासनातर्फे सुरक्षा, नियोजन आणी इतर तयारी करण्यात यावी.
६) शासनाने इंटरनेट सेवा, टेलिफोन सेवा,प्रसार माध्यमे अशा कोणत्याही मध्यामावर बंधन घालू नये. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व्हावे.
७) ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता सर्व रस्ते खुले करावे, दुरुस्त करावे, मुख्य चौकात सक्षम ट्रॅफिक पोलिस यंत्रणा व अधिकारी नेमण्यात यावे.
८) विजयस्तंभ परिसरात विशेष काळजी घ्यावी. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून ग्रीन मॅटचा वापर करावा. सुचनाफलफे, मार्गदर्शनपर माहिती, नकाशे लावण्यात यावे.
९) मदतीसाठी किंवा आपातकाळासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर करावा.
१०) सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, छुपे कॅमेरे यांसह इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
११) पोलीस यंत्रणा अधिक सुसज्ज करावी आणि योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे.
१२) समता सैनिक दल हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करते, त्यामुळे समता सैनिक दलाच्या जवानांना त्या दिवशी विषेश अधिकार द्यावा. त्यांचा सन्मान व्हावा.
*अन्य काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात.
भीमा कोरेगाव बद्दल प्रसारित झालेल्या बातम्या:-
माझ्या फेसबुकवरील लिंक - https://www.facebook.com/akshay.baisane/posts/2067569606663941
या अविस्मरणीय दिवसाची काही छायाचित्रे :-
|
विजयस्तंभ!!! |
|
या निळ्या निशाणाखाली सर्व एक व्हा रे.... |
|
या माऊलीला सलाम... |
|
जनसागर.... |
No comments:
Post a Comment