लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Sunday, 1 January 2023

New Job New Challanges in New Year 2023



नवं वर्ष, नवं ऑफिस

नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी

नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस

बरंच काही नवं, मी मात्र तोच...

२०२२ ने भरपूर शिकवलं 

२०२३ आणखी शिकवेल...

माझ्यातल्या 'मला' जपण्यासाठी संघर्ष मोठा असेल...

दिनांक २९ डिसेंबर २०२२ पासून न्यूज १८ लोकमतच्या युट्यूबसाठी मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून कामाला सुरुवात केली आहे. 


#अक्षय्यनामा #NewYear2023 #News18Lokmat

Sunday, 3 July 2022

'साम'... माझ्या आयुष्यातली एक आशावादी सकाळ!

I Have Completed One Year In Saam Tv's Digital Portal

आजच्या दिवशी म्हणजेच १ जुलैला 'साम' टीव्हीच्या वेबसाईटसाठी कंटेंट एडिटर म्हणून काम करताना मला एक वर्ष पूर्ण झालं. १ जुलै २०२१ ला मी साम डिजिटलला जॉईन झालो होतो. या वर्षभरातला साम टीव्हीतला अनुभव मिश्र पद्धतीचा होता. काम करताना चांगले-वाईट असे अनेक अनुभव आले आणि येतायत. पण यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे या एका वर्षात मी बरंच काही शिकलोय आणि अजूनही काम करताना शिकत असतो. लोकल माध्यमांमध्ये, यूट्यूब चॅनेल्समधली तीन वर्ष आणि 'साम'मधलं एक वर्ष यांची तुलना केल्यास मी 'साम'मध्येच सर्वात जास्त शिकलो असं मी म्हणू शकतो. पण, लोकल चॅनेल्सचाही अनुभव असल्याने दोघांमधला फरक हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. हे वर्ष एवढ्या पटकन् गेलं की, साममध्ये एक वर्ष पूर्ण झालं हे अजूनही वाटत नाही. कारण या एका वर्षात माझ्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या आणि होतायत, त्यामुळे स्वतःबाबत आणि इतरांबाबत विचार करायलाही पुरेसा वेळ मिळत नाही, अर्थात त्यालाही मीच जबाबदार आहे. टाईम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट अशा बऱ्याच गोष्टी नीट शिकण्याची गरज आहे. असो... आता जरा कामाबद्दल सांगतो.

साम डिजिटलमध्ये माझा रोल (पद)

साम टीव्ही ही एक महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारी मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची डिजिटल आवृत्ती सामटीव्ही डॉट कॉम या वेबसाईटसाठी मी काम करतो. या वेबसाईटसाठी मी कंटेंट एडिटर म्हणून काम करतोय. कंटेंट एडिटर म्हणजे सामग्री संपादक. आता सामग्री या शब्दाचा इथे टेक्स्ट (Text) असा अर्थ होतो. म्हणजे पत्रकारांनी पाठवलेल्या लीड्सवरुन किंवा पॉईंटर्सवरुन बातम्या लिहीणं आणि त्या वेबसाईटवर टाकणं हे माझं मुख्य काम आहे. हे झालं सोप्या भाषेत. पण अजूनही बरेच टास्क असतात त्याबद्दलही थोडक्यात सांगतो.

https://www.saamtv.com/author/akshay-baisane


साम डिजिटलमध्ये मी नक्की काय-काय काम करतो?

१) पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांधलं शुद्धलेखन, व्याकरण, माहिती हे सगळं तपासून बातमी प्रमाणित भाषेत लिहून ती बातमी वेबसाईटवर टाकणे. यावेळी बेसिक फोटो एडिटींग, एसईओ (SEO) अशा अनेक गोष्टी येतात त्यानंतर सीएमएसमधून (CMS) बातमी साईटवर जाते.

२) ज्या बातम्या आमच्या साईटवर नाहीत त्यांचा इतर ठिकाणांहून संदर्भ घेऊन त्या बातम्या करणे. यात हिंदी आणि इंग्रजी बातम्यांचं मराठी भाषेत भाषांतर करुन वाचनीय कंटेंट देणं हे माझं मुख्य काम आहे.

३) बातम्या सोशल मीडियावर जसे फेसबुक, ट्विटर, शेयरचॅट यांवर शेयर करुन जास्तीत जास्त ट्रॅफिक साईटवर यावा यासाठी प्रयत्न करणे.

४) वेबसाईट अपडेटेड ठेवणे. आता यातही अनेक टास्क आहेत.

a) बातमीचं वेटेज ठरवून योग्य क्रमाने लावणे.

b) वेबसाईटवरचं टिकर अपडेट ठेवणे.

c) महत्वाच्या बातम्यांचे पुश नोटीफिकेशन पाठवणे.

५) गुगल रनडाऊनला बातम्या टाकणे.

६) महत्वाचे ट्विट करणे, ट्विटरवर टॅग करणे.

(ही कामे सर्व टीम मिळून करते)

'साम'मध्ये कसा जॉईन झालो?

BMM ची डिग्री झाल्यानंतर मी फारसं काही करत नव्हतो, एकप्रकारे मीडिया फिल्डच्या बाहेर फेकल्या गेलो होतो. काहीतरी करावं म्हणून मास्टर्स करत होतो. सोबत इंटर्नशीप, कंटेंट रिलेडेट छोटी कामं केली, ब्लॉगवैगरे... असला जरा टाईमपास करत होतो. लोकल चॅनेलमध्ये काही होणार नाही हे लक्षात यायल मला तीन वर्ष लागली, अर्थात त्यामागेही वेगळं कारण आहे. पण नंतर मी तेही सोडलं, मग चांगल्या वृत्तसंस्थेत संधीसाठी शोध सुरू झाला. याबाबत माझ्यासाठी जॉब बघा असं मी अनेकांना सांगितलं होतं. यात ते लोकंही होते, ज्यांनी कधीकाळी मला मोठ्ठी आश्वासनं दिली होती. पण, कुणाकडूच काम झालं नाही. कोरोनाही सुरु झाला आणि मलाही झाला. कोरोनामुक्त झाल्यानंतर सकारात्मक बदलाला सुरूवात झाली.

 

माझी प्रिय मैत्रिण श्वेता वाळंज हिने माझ्यासाठी प्रयत्न केले. साम डिजिटलमध्ये काम करतोय यात तिचं सर्वात मोठं योगदान आहे. तिनेच मला स्वतःहून याबाबत सांगितलं, कॉन्टॅक्ट्स दिले. माझ्यासाठी तिने तिचे मार्गदर्शक तथा लोकमत कल्याण-डोंबिलीचे प्रतिनिधी प्रशांत माने सर यांना सांगून ठेवलं होतं. त्यानुसार श्वेता आणि प्रशांत सर यांच्या रेफ्रेन्सने मी सामपर्यंत पोहोचलो. यावेळी श्वेताचं सहकार्य हे माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे.

ऑनलाईन टेस्ट

सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल कंटेंट लीड विश्वास पुरोहित सर यांनी माझी सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली. १४ जून २०२१ ला त्यांना माझा रेझ्यूमे पाठवला, १५ जूनला त्यांनी बातम्यांच्या २ लिंक्स पाठवल्या, त्या मी माझ्या भाषेत ट्रान्सलेट करुन त्यांना मराठीत पाठवल्या. १६ जूनला दुपारी सव्वा एकच्या दरम्यान गुगल मीटवर त्यांनी माझी ऑनलाईन टेस्ट घेतली, यात अनेक प्रश्न, ठाकरे नावाची स्पेलिंग असे अनेक प्रश्न विचारले. यात मला अजूनही आठवतंय की, त्यांनी मला Novak Djokovic बद्दल विचारलं आणि मी त्यांना चक्क तो रशियाचा विरोधी पक्षनेता आहे आणि त्याच्यावर विषप्रयोग झाला आहे असं फालतू उत्तर दिलं. त्यांनी लगेचच माझा गैरसमज दूर केला. यादरम्यान माझ्या मास्टर्सच्या फायनल परिक्षाही सुरू होत्या. त्यामुळे २३ जूननंतर मी कॉल करतो असं मी सरांना कळवलं. त्यानंतर लेखी परिक्षा २३ जूनला संपल्या, २४ जूनला माझ्या संशोधन प्रबंधासाठी प्रशांत माने सराची मुलाखत ही प्रत्यक्षपणे डोंबिवली प्रेसरुममध्ये जाऊन घेतली. ती विश्वास सरांनाही पाठवली. विशेष म्हणजे आतापर्यंत मला इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग जमत नव्हतं, हे मी विश्वास सरांना प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्यांनी मला इनस्क्रिप्ट शिकायला सांगितलं, तेव्हापासून मी इनस्क्रिप्टमध्ये टायपिंगला सुरुवात केली आणि आज त्यात काम करतोय. मी अपूर्ण असतानाही त्यांनी माझ्यावर तेव्हा दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी मोलाचा ठरला आणि मीही तो सार्थ ठरवण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि करतोय. यासाठी विश्वास सरांचे मनापासून आभार मानायला हवे.

जॉईनिंग प्रोसेस

विश्वास सरांशी २४ आणि २५ जून २०२१ ला बोलण झालं. त्यानुसार त्यांनी कामाचं स्वरुप सांगितलं. मला अगोदर बातम्या अपलोड करण्यासाठी सकाळमध्ये घ्यायचं ठरलं होतं. पण नंतर कळलं की मला साममध्ये काम करायचं आहे. असो, सगळं बोलणं झाल्यावर मला १ जुलै २०२१ ला ऑफर लेटर ऑनलाईन आलं. फोनही आले. यावेळी जे आहे, जी सॅलरी, नियम, अटी हे सगळं आहे तसं मान्य केलं. १ जुलै २०२१ ला मी दुसऱ्यांदा सकाळ भवनमध्ये पाऊल ठेवलं. 

पहिल्यांदा सकाळ भवनात गेलो होतो तेव्हा BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला गेलो होतो, तेव्हा निलेश खरे सर हे सामचे संपादक होते. सोबतच एचआर या सुरभी समेळ मॅम होत्या. त्यांना बघितल्यासारखं वाटल्याने मी कॉलेज आयव्हीचे फोटो बघितल्यावर कळलं मला की, यांनीच आपल्याला सामचा दौरा करवून दिला होता आणि आज त्याच सुरभी मॅम यांनी आपली जॉईनिंग प्रोसेस करवून घेतली. हे लक्षात आल्यावर त्यांनाही मी कॉलेज आयव्हीचे फोटोज् दाखवले ज्यात आमच्या ग्रुपने सुरभी मॅमसोबत फोटो काढले होते. खरंचं माझ्यासाठी हा एक इमोशनल क्षण होता. 

BMM चा विद्यार्थी आणि कॉलेजच्या आयव्हीचा भाग म्हणून २९ सप्टेंबर २०१८ ला पहिल्यांचा सकाळ भवनाला भेट दिली होती.


१ जूलै २०२१, गुरुवारी सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्या आणि मी 'साम'ला जॉईन झालो. याचदिवशी पहिल्यांदांच अमित गोळवलकर सर, प्रसन्न जोशी सर, विनोद तळेकर सर अशा अनेक सिनिअर्सना भेटलो. प्रसन्न सरांशी हात मिळवताना भिती आणि आनंद या दोन्ही भावना एकत्र होत्या. अमित सर कामाच्या बाबतीत खूपच डेडीकेटेट! केवळ १५ मिनिटांत त्यांनी आम्हाला क्वीनटाईपची तोंडओळख करुन दिली. मी अगोदरच माझा स्वतःचा ब्लॉग लिहीत असल्याने, माय महानगर आणि रायगड माझा यांत डिजिटलमध्ये इंटर्नशीप केल्याने आणि टोक्नोसॅव्ही असल्याने मला हे काम चांगलं जमेल असा कॉन्फिडन्स त्याचदिवशी मला आला.

पुणे दौरा

१ जूलैला सगळ्या कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ जूलै २०२१ ला ट्रेनिंगसाठी मला पुण्याच्या बाणेर इथल्या सकाळ ऑफिसला बोलवलं गेलं, तेही ६ दिवसांसाठी. अजून एक महत्वाचं म्हणजे १ जूलैला मी, जगदीश पाटील (मल्टीमीडिया प्रोड्युसर), यश वैद्य (व्हिडिओ एडिटर) आणि रिद्धेश तरे (व्हिडिओ एडिटर) असे चारजण एकाच दिवशी साम डिजिटला जॉईन झालो होतो आज त्यांनाही 'साम'मध्ये एक वर्ष पूर्ण झालं आहे. असो... तर पुण्याचा ट्रेनिगंदरम्यानचा अनुभव मस्तच होता. पुण्यासाठी ५ जूलै २०२१ ला सकाळी कल्याणहून डेक्कन एक्सप्रेसने निघालो आणि मग पुणे स्टेशनहून बाणेरच्या सकाळ नगरमधल्या ऑफिसला पोहोचलो. जगदीश याठिकाणी आधीच आला होता, शिवाय त्याने इथे आधीही काम केलंयं, तो मला ऑफिसबाहेर घ्यायला आला. मग मी बॅगेसहीत थेट न्यूज रुममध्ये गेलो. अमित सर तेव्हा आमचे टीम लीडर होते त्यांना भेटलो, बाकीच्या टीमला भेटलो. 

Sakal Office, Baner - Pune




सर्वात अगोदर शिवानीसोबत ओळख झाली, अमित सरांनी सांगितल्याप्रमाणे तिने मला सगळं समजवून सांगितलं. नंतर दिगंबरसोबत ओळख झाली, मग सानिका, कृष्णा, प्रविण, अनुराधा अशा अनेक सहकाऱ्यांसोबत ओळख झाली. पण, सर्वात जास्त मी दिगंबर, सानिका आणि शिवानी यांच्यात राहिलो. ५ जुलैची दुपार ते ११ जुलैच्या दुपारपर्यंत असे सहा दिवस मी बाणेरमधील Ivory Estates येथील Gold coast सोयायटीतील छान गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. या गेस्टहाऊमधील रुममध्ये सहा दिवस एकटाच तेही उत्तम आणि सर्व सोयी-सुविधांचा आनंद घेत मी ट्रेनिंग पूर्ण केली आणि ११ जूलै २०२१ ला, रविवारी रात्री कल्याणला परतलो. 

प्रत्यक्ष कामाला सुरुवात

१२ जूलै २०२१ ला सोमवारी बेलापूर आफिसमधून मला लॅपटॉप देण्यात आलं आणि मग प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. कोरोनामुक्त होऊन ९० दिवस झाले नसल्याने मी व्हॅक्सिन घेतली नव्हती त्यामुळे मी सुरुवातीला कल्याण ते बेलापूर असा प्रवास दररोज बसने करायचो. १०० रुपये दररोज प्रवास खर्च आणि १५० रुपये नाष्टा, जेवण वैगरे असे २५० ते कधी ३०० रुपये नेहमी खर्च व्हायचे. मग मला वर्क फ्रॉम होम देण्यात आलं, तरिही मी आठवड्यातून एकदातरी ऑफिसला जायचोच. सुरुवातीला माझ्या कामाची गती कासवासारखी होती. इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग, क्वीन टाईप, २५० शब्दांची बातमी अशा बऱ्याच गोष्टींमुळे सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला माझ्या केवळ ४-५ बातम्या व्हायच्या. नंतर हळूहळू स्पीड येत गेला. पण घरुन काम करत असल्याने मला काम करत असल्याचा फील येत नव्हता, पण तरिही काम सुरू होतं. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२१, शनिवार कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला त्यानंतर २० नोव्हेंबर २०२१, शनिवार लसीचा दुसरा डोस घेतला. यादरम्यान मी घरुन काम करत होतो, कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता, कामातही सुधारणा झाली होती. मग नियमानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १५ व्या दिवशी लोकल प्रवासासाठी पास काढता आला आणि ६ डिसेंबर २०२१ पासून मी रेग्युलर ऑफिसला यायला सुरूवात केली.

तेव्हा कल्याणला राहायचो, मावशीकडे. मग पहाटे ४ वाजता उठायचं, सगळं आवरुन सहाला घर सोडायचं. कल्याणहून ठाणे गाठायचं, ठाण्याहून बेलापूर. मग पटकन नाष्टा आणि चहा घेऊन मग ८:२० ला काम सुरु करायचं. ८ ते ४ शिफ्ट असायची. मी ऑफिसमधून ६-७ ला निघायचो आणि ८-९ ला घरी पोहोचायचो. पण ऑफिसमधून काम करताना मजा वाटत होती. कारण आजूबाजूला असलेलं न्यूजरुमचं वातावरण आणि सिनिअर्सचे शब्द कानावर पडायचे, नवीन गोष्टी माहित व्हायच्या.

'साम'मधल्या छोट्या पण माझ्या कायम लक्षात राहणाऱ्या गोष्टी

१) कॉलेजमध्ये असताना ज्याठिकाणी आपण विद्यार्थी आणि विजीटर म्हणून आलो होतो, त्याठिकाणी काम करेल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हाही सुरभी मॅम एचआर आणि आताही... त्यामुळे ही माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. कारण एका चांगल्या ब्रॅण्डमध्ये हा माझा पहिला जॉब आहे.

२) एसएसटी कॉलेजमधली माझी वर्गमैत्रिण करुणा साममध्ये अॅंकर आहे, आणि ती उत्तम अॅंकरिंग करते. मी जॉईन झालो तेव्हा बऱ्याच कालावधीनंतर आमची भेट झाली. आम्ही बेस्टफ्रेंड्स नाही आणि कधी सोबतही नव्हतो, आमचा साधा फोटोही सोबत नाहीये, पण आमच्या बॅचची ती एकमेव अशी मुलगी आहे जिला यशस्वी म्हणू शकतो त्यामुळे तिची रिस्पेक्ट आहेच. ऑफिसमध्ये आताही जास्त बोलणं होत नाही, पण दिसेल तेव्हा एकमेकांना हाय-हॅलो करायचं एवढीच आमची फॉर्मल मैत्री. असो... पण करुणाबद्दल रिस्पेक्ट आणि आपलेपणा तेवढाच वाटतो. एक छोटीशी गोष्ट शेयर करायची झाली तर, मी जॉईन झाल्यानंतर ऑफिसमध्ये काम करत होतो. तेव्हा एके दिवशी ऑफिसमध्ये चहा आला. ज्यांनी चहा मागवला होता त्या सगळ्यांना चहावाल्याने चहा दिला. करुणानेही चहा घेतला. मी चहा मागवला नव्हता, पण तरही तो चहावाला माझ्या डेस्कजवळ आला, त्याने चहा ठेवला. मी, म्हटलं मी तर नाही मागवला, तेव्हा तो म्हणाला करुना मॅडमने देने को बोला है! बस्स... मनाला खूप छान वाटलं. माझ्या आयुष्यात अशा गोष्टींना मी कधीही विसरु शकत नाही, या छोट्या गोष्टी माझ्या मनाला खूप भावतात.
सुरुवातीला ऑफिसमध्ये जाम एकटं वाटायचं, अनोखळी चेहरे आणि कर्तुत्वाने मोठ्या अशा सगळ्या माणसांमध्ये मी स्वतःला अगदी लहान समजत होतो. पण, करुणासोबत बोलंलं की हरवलेल्या गर्दीत आपलं कुणीतरी दिसावं असं वाटायचं. आमचं काम पुर्णतः वेगळं आहे, शिवाय आता आम्ही डिजिटलवाले तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झालोय. यामुळे आता अगोदरसारखं हाय-हॅलोही होत नाही. पण, जेव्हा ती ऑनएअर येते तेव्हा नक्कीच छान वाटतं. करुणा पुढे आणखीन चांगलं काम करेल याबाबत शंका नाहीच, तिला मनापासून शुभेच्छा असणार आहेत.

३) सोनाली शिंदे मॅडम. यांना मी कधीही प्रत्यक्षात भेटलो नव्हतो. पण त्यांना फेसबुकवर कॉलेजपासून फॉलो करायचो. शिवाय त्यांनी लिहीलेलं पॉलिक्लिक हे पुस्तक मी बीएमएमला असताना वाचलं होतं, वागळे सरांची पोस्ट पाहून ते पुस्तक मी विकत घेतलं आणि ते पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचवलं हे साममध्ये व्हिडिओ एडिटर असणारे योगेश गायकवाड यांनी. योगेश गायकवाड हे उल्हासनगरला भेटले आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं. शिवाय नंतर मास्टर्सच्या संशोधन प्रंबंधासाठी मी या पुस्तकातला संदर्भ घेतला आहे. त्यामुळे सोनाली मॅन यांना मी अगोदरपासून ओळखतो, त्या ओळखत नसल्या तरी.

४) राजश्री वाघमारे. लॉकडाऊनच्या काळात मी न्यूज अनकट या पुण्यातल्या न्यूज पोर्टलसाठी घरुन काम करत होतो. यात राजश्रीही होती. मी सर्वांच्या बातम्या तपासून त्या एडिट करुन पुढे पाठवायचो. ऑनलाईन काम असल्याने आमची कधी भेट झालेली नव्हती. शिवाय ती साममध्ये आहे हे पण माहित मला माहित नव्हतं. पण जेव्हा मी ऑफिसात गेलो तेव्हा तिला बघून मला वाटलं की ही, राजश्री असावी. डीपी बघितला होता... आणि मग तिनेही ओळखलं. अशी आणखी एक ओळख निघाली.

५) विकास मिरगणे. रायगड माझामध्ये काही काळ मी इंटर्नशीप केली होती. तिकडे विकास दादा होता. मी त्यावेळी मास्टर्सला नुकतचं अॅडमिशन घेतलं होतं. हे विकास यांना कळलं आणि त्यांनी मलाही मास्टर्स करायचंय, तुझ्यासोबत माझंही होऊन जाईल म्हणून मला विचारलं. मी त्यांचे सगळे फॉर्म भरले, अॅडमिशन झालं आणि ते माझे क्लासमेटही झाले. २ वर्षांत त्यांना सगळ्या नोट्स, प्रोजेक्ट आणि जमेल ती हेल्प केली आणि माझ्यासह त्यांचंही मास्टर्स पूर्ण झालं. त्यांच्या बातम्या मी नेहमी करायचो. आता ते साममध्ये नाही, पण थाडेफार संपर्कात असतात.

 




करुणा, सुरभी मॅम, सोनाली मॅम, राजश्री, विकास मिरगणे, योगेश गायकवाड, प्रशांत सागवेकर यांच्यासह अनेक लोकांना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळखतो आणि तेही ओळखतात. फक्त सध्या मी नवीन लोकं जोडणं, त्यांच्याशी बोलणं हे काहीसं विसरल्याने माझी इथे अद्याप कुणाशीही पक्की मैत्री झाली नाही, फक्त प्रोफेशनली सर्वांशी कनेक्टेड आहे. 

नंदू सरांची एन्ट्री

सुरुवातीला आम्हाला टीम लिडर अमित सर होते. पण ते पुण्याहून ऑपरेट करायचे. साम डिजिटलचा मेन डेस्क पुण्यात होता. मुंबई ऑफिसला आम्ही अवधे ३-४ जण होतो. यामुळे इथे आम्ही बेलगाम घोड्यांसारखे होतो. मुंबईत आम्हाला कॅप्टन ऑफ द शीप नव्हता. आता सामचा मेन डेस्क बेलापूर ऑफिसला आहे. नंदकुमार जोशी सर आमचे टीम लिडर आहे. ते जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतंयं, मार्गदर्शन मिळतं, दिशा मिळते. यामुळे आमच्या सगळ्याच टीमच्या कामात कमालीचा फरक पडला आहे. हे सगळं आकडेवारुन स्पष्ट कळंत. शिवाय आमच्या टीममध्ये राजकारण हे अगदी मीठासारखंच आहे. फक्त चवीएवढं. तेवढं तर हवंच ना? नाहीतर सगळं गोड-धोड असेल तर शुगर वाढायची... असो. पण कमी मनुष्यबळात कामाचा आलेख चढता ठेवण्यात नंदू सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यश येतंयं हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. 

एक वर्षाचा आढावा

गेल्या १ मार्च २०२२ पासून बेलापूरमध्ये पूर्णतः आत्मनिर्भरपणे राहतोय. कुठलाही फॅमिली सपोर्ट नाही, स्वतःच सगळं काही... पण या सगळ्या व्यापात मी माझ्या कामात मात्र कधी अडथळा येऊन दिला नाही. १२ महिन्यांत १२ सुट्ट्या फ्री असतात, त्यापैकी ९ खर्च केल्या ३ सु्ट्ट्या घेतल्याच नाही, आता ते वाया गेल्या. शिवाय आता माझ्या बातम्यांना चांगला रीच असतो, गुगल अॅनॅलिटीक्सवर बातम्या रॅंक होत असतात, डीएच मिळतं, माझ्या वेबस्टोरी सर्वात जास्त चालतात. अगोदरपेक्षा कितीतरी पटीने कामांत सुधारणा झाली आहे. शिवाय बातम्यांव्यतिरिक्त इतर टास्कही आता करतो. ही सगळी स्वतःची स्तुती नसून गेल्या एका वर्षांत मी जे शिकलो त्याचं ते फळ आहे की, हे सगळं मला करता येतंयं. दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे आता माझी मास्टर्स डिग्री (MACJ) पुर्ण झाली आहे, तेही चांगल्या मार्कांनी. यात विशेष म्हणजे मी प्रामाणिकपणे तयार केलेला संशोधन प्रबंध सर्वांनाच आवडला, त्यामुळे पोस्ट ग्रॅज्यूएट होणं नक्कीच सार्थकी लागलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे 'चष्मेबहाद्दर' झालो, आता ही गोष्ट चांगली म्हणता येणार नाही.

थोडसं मनातलं

मी हे सगळं लिहीलेलं वाचण्यात माझ्याशिवाय आणखी बोटावर मोजण्याइतक्या माझ्या जवळच्या लोकांना इंटरेस्ट असेल याची मला जाणीव आहे. पण, इतकं लांबलचक आणि सविस्तर लिहिण्याचं कारण एकच की, भविष्यात मला हे सगळं मला लक्षात रहावं. मी कुठून सुरुवात केली, कुणी कशी मदत केली, कशी वागणूक दिली हे सर्वकाही लक्षात राहणार नाही. कामाच्या व्यापात अनेक गोष्टी डोक्यातून कालांतराने निघून जातात त्यामुळे त्या सगळ्या मनातल्या गोष्टी इथे माझ्या ब्लॉगवर ओतून टाकत असतो. त्याचप्रमाणे असं काही लिहील्याने मला मानसिक शांतता आणि समाधान मिळतं, त्यासाठीही हा सगळा प्रपंच आहे.

आजच्या घडीला साममध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामात आता चांगला झालो आहे, असं म्हणता येईल. पण, अजून चांगलं होता येईल हेही तितकचं खरं आणि सिनीअर्सने सांगितलेल्या या सल्ल्यावर नक्कीच काम करेन. सध्या प्रचंड स्ट्रगल करतोय, वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पण, तरीही अद्याप माझा हवा तसा आर्थिक विकास झालेला नाही. एवढं कष्ट, करुनही जेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्याची मानवी वृत्ती आपोआप जागी होते.

आपण लायक असताना जर त्याचं योग्य फळ योग्य वेळेत मिळालं नाही तर मोठी निराशा होते. आज एका वर्षात साममध्ये मी जर काही कमावलं असेल तर ते फक्त "काम आणि काम". बाकी आर्थिक बाबतीत अजूनही सर्वात मागासलेलाच आहे. अजूनही मी परफेक्ट नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, पण एवढा 'ढ' सुद्धा नाही की कुणी माझ्या कामाला आणि मला इग्नोर करावं. एकतर या जगात माणसाची नाही तर त्याच्या पदाची आणि आर्थिक स्थितीची जास्त किंमत असते. अशा जगात जर चांगलं काम करुनही आपली दखल घेतली जात नसेल आणि इतरांना मात्र जास्तच दिलं जात असेल तर प्रत्येक मानवी स्वभावाप्रमाणे माझ्याही मनात ईर्षेची भावना येतेच. मूलभूत गरजाही पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणे, अशा मोबदल्यात काम करुन पेशन्स ठेवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. पण, सध्या तेही करतोच आहे... शेवटी आयुष्य यालाच म्हणतात. पोटात भूक असताना, मनात दुःख असताना, डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ असताना कामात फोकस ठेवणं आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवणं ही कला आता शिकतोय. 

हे गरजेचं आहे

या सगळ्यात एक गोष्ट आता जाणवतेय आणि हितचिंतकांनीही सांगितलं की, मी जे काम करतो ते मला ते मला कदाचित इतरांना दाखवता आलं नाही, सेल्फ प्रमोशन करणं मला जमलं नाही. स्वतःला प्रमोट करणं, स्वतःची ब्रॅंडींग करणं हे आताच्या जगात महत्वाचं असताना मी याकडे लक्ष दिलं नाही. दुसरं म्हणजे माझा स्वभाव. Attitude Is Everything: Change Your Attitude ... Change Your Life! असं म्हटलं जातं. पण हे अॅटीट्यूड वैगेरे माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे, मला खरंचं ते जमत नाही. शेवटी आपला मूळ स्वभाव सहजासहजी बदलत नाही. जवळची माणसं म्हणतात एवढं मवाळ राहिलं आणि अॅटीट्यूड दाखवला नाही तर लोकं आपल्याला ग्रॅंटेड घेणारच म्हणून स्वभाव बदल आणि अॅटीट्यूड ठेव. आता मी स्वभावच बदलायला सांगणं म्हणजे कासवाला धावायला सांगण्यासारखं आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता मला माझ्यात, स्वभावात, देहबोलीत आणि अजून अशा बऱ्याच बाबतीत काही बदल करण्याची खरंच गरज आहे हे सत्य नाकारता येणार नाही. शेवटी जो दिखता है वही बिकता है...!

#अक्षय्यनामा✍️

Tuesday, 28 June 2022

पावसाळ्यातला चहा, पोहे अन् ती...

मुसळधार पावसात ती ॲक्टिव्हावरुन आली

रेनकोट अन् हेल्मेट काढत तिने केस मोकळे सोडले...

नाष्ता करताना मी पोह्यांकडे बघतच नव्हतो

तिने केस मोकळे सोडले आणि मी डोळे...

तिने पाहिलं, मी पाहिलं नजरेला नजर भिडताच माझी जरा फाटली

कारण, स्कूटी चालवणारा तिचा बाप माझ्याकडे बघत होता...

पोह्यांवर गरमा-गरम तर्री ओतली, तशी तिने स्माईल दिली

प्रत्येक घास खाताना तिला न्याहाळत होतो, तिही गुपचूप बघत होती...

तिच्या नादात पोह्यांत लिंबू पिळणंचं विसरलो, पोहे संपल्याचंही अचानकच कळलं

अजून थांबायचं म्हणून चहा मागवला, तेवढ्यात ऑफिसची शिफ्ट आठवली

मुसळधार पाऊस, थंडगार हवा, गरम चहा आणि ती...

हवंहवंस वातावरण, मस्त क्षण, त्यात अडकलेलं माझं मन

सगळं तिथंच सोडलं, पटकन ऑफिस गाठलं

पहिली बातमी करताना तिच आठवली, न राहून कविता लिहीली...

Friday, 17 June 2022

Sex Video Call : सेक्स कॉलचा वाईट अनुभव ज्याने आजचा पुर्ण दिवसच खराब गेला

sextortion Image Credit : Hindustan News Hub



दररोजप्रमाणे ऑफिसला निघालो. सकाळी ९ ची शिफ्ट मी सगळं आवरुन ८:४५ वाजताच डेस्कवर बसलो. सेट झालो आणि पहिली बातमी करण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जी बातमी करणार आहे त्याची हेडिंग टाकली. बातमी टाईप करायला सुरुवात करणार इतक्यात बरोबर ९ वाजून २ मिनिटाला फेसबुक मेसेंजरवर मेसेज आला. तो एका अज्ञात अकाउंटवरुन आलेला मेसेज होता. नीट बघितलं तर अंशिका गोयल (Anshika Goyal) नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन हा मेसेज आला होता. या अकाउंटवरुन मला काल म्हणजे गुरुवारी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. आता मी २०१० पासून फेसबुक वापरणारा पोरगा! अकाउंटचं थोबाड बघूनच कळलं की हे फेक अकाउंट आहे म्हणून मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नव्हतीच आणि अजूनही केलेली नाही. मात्र, त्याच अकाउंटवरुन मेसेज आल्याने मला लगेच संशय आला. 

मी अनेक अशा बातम्या एडिट केल्या आहेत आणि करत असतो. त्यामुळे सुरुवातीलाच हा हनी ट्रॅप असल्याचं मला चटकन कळलं. पण मला वाटलं की, असेल कुणीतरी ओळखीचं की जे फेक अकाउंट काढून रिक्वेस्ट मेसेज करतंयं. कारण, अगोदर अनेकदा ओळखीतल्या काही अतरंगी लोकांनी असं केलं आहे. काही नमुने तर मुलींच्या नावाने अकाउंट काढतात, फेक फोटो ठेवतात आणि लोकांची मजा घेतात. कितीतरी अकाउंट्सना मी ब्लॉक आणि रिपोर्ट केलंयं. त्यामुळे या सगळ्याबद्द्ल मी अवेअर आहे. पण, तरीही त्या मेसेजला सहजच रिप्लाय दिला. या रिप्लायमुळे माझा आजचा अख्या दिवस खराब तर गेली शिवाय कामही अर्धच झालं. 

ते चॅटींग असं होतं थोडक्यातं असं होतं. त्या फेक अकाउंटवरुन ho, Hello आलं. मी Yes म्हणालो. मग समोरुन How Are You आलं. मी म्हणालो मुद्द्यावर ये माझ्याकडे वेळ नाहीये. मग समोरुन थेट Video call sex enjoy असा मेसेज आला. याने तर मला १०१% हे क्लिक झालं की, हा तोच हनी ट्रॅप आहे ज्याच्यामुळे अनेक तरुणांनाच काय तर सगळ्याच वयातील पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मी ओके म्हणालो आणि आणखी सतर्क झालो. मला कळलं की मला लगेचच व्हिडिओ कॉल येणार आहे, ज्यात समोर विचित्र दृश्य असणार आहे. पण काहीही झालं तरी चुकुनही मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा किंवा आपलं ठिकाण दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बस! हा विचार करतो ना करतो लगेच समोरुन फेसबुक मेसेंजरवर व्हिडिओ कॉल आला. पहिला कॉल उचलायच्या आधीच कट झाला. 

काही सेकंदांनी पुन्हा व्हिडिओ कॉल आला. यात एक तरुणी दिसत होती. जी दिसायला आकर्षक होती. तिचं वय ३० च्या वर नसावं. तिला पाहून कोणताही तरुण आकर्षित होईल अशी ती होती. तिने टॉप गळ्यात कसलं तरी लॉकेट घातलं होतं. यानंतर पुढे जे काही झालं त्याने मी विचार नसेल केला तेवढा धक्का मला बसला. समोरच्या तरुणीने तिचं टॉप अगोदर थोडं वर केलं आणि मग पुर्ण वर केलं. यानंतर तिने चक्क तिची अंतर्वस्त्र (ब्रा) काढली. यानंतर लगेच तिने तिची अंडरवेयरही काढली आणि अतिशय कामुक आणि अश्लील हावभाव करु लागली मग व्हिडिओ कॉल कट झाला. हे सगळं अगदी २०-३० सेकंदात घडलं असावं. मी याबद्दल अवेअर असूनही मला जरा मोठाच धक्का बसला होता. कारण बातमी करणं वेगळं आणि तशीच घटना स्वतःसोबत घडणं यात मोठा फरक आहे. हे सगळं घटत होतं तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो, माझी शिफ्ट सुरु झाली होती. मात्र, यामुळे मी वाटलं नव्हतं तेवढा डिस्टर्ब झालो होतो, हर्ट बीट्स वाढल्या होत्या आणि भिती वाटत होती.

एवढं सगळं होऊनही मी माझा चेहरा फ्रंट कॅमेऱ्यात चुकुनही येणार नाही याची काळजी घेतली होती. यानंतर समोरुन मेसेज आला की, फ्रंट कॅमेरा ऑन करा, फेस टू फेस एन्जॉय करु. आणि पुन्हा कॉल आला. मी तेच फॉलो केलं, की आपला चेहरा आणि आवाज यायला नको. पण, पुराव्यासाठी पटापट स्क्रीनशॉट्स घेतले मग कॉल लगेच डिलीट झाला, कारण समोरुन सांगुनही मी फ्रंटं कॅमेऱ्यासमोर आलोच नाही. मग समोरुन मेसेज आला, की बाथरुममध्ये जाऊन कॉल करा फास्ट! मी फक्त ओके म्हणलं आणि नंतर रिप्लाय दिला नाही. समोरुन पुन्हा Bolo असा मेसेज आला. मग मी त्याला '?' केवळ असा रिप्लाय दिला आणि मग अशाप्रकारे हे संभाषण ९:२९ वाजता संपलं. यामुळे मी खूपच नर्व्हस झालो, बाजूच्या सहकाऱ्याला सांगावं तर तो कामात रमला असल्याने त्याला डिस्टर्ब करावं वाटलं नाही. मग वॉशरुममध्ये गेलो आणि चेहऱ्यावर पाणी मारलं. तरीही ही गोष्ट कुणालातरी सांगावी असं वाटत होतं. पण आज सरही आले नव्हते. नेमकं काय होत होतं हे विचाराल तर, असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं त्यामुळे भिती वाटली. समोरचं दृश्य बघून हर्ट बीट्स वाढल्या. आपल्याला फोटोशॉप करुन फसवणार तर नाही ना याची भिती, सायबर हल्ल्याची भिती आणि आणखी बरेच विचार एकत्र आल्याने मी शारिरीक आणि मानसिकरीत्या काही वेळ अस्वस्थ झालो होतो.

हे सगळं माझ्यासोबत होत असताना मी शेजारच्यालाही याचा सुगावा लागून दिला नाही. माझ्यामुळे कुणाला त्रास व्हावा असं मला कधीच वाटत नाही. मग एक अजून सहकारी जयेश ऑफिसला आला होता. त्याला सोशल मीडियाचं चांगलं नॉलेज आहे, अर्थात तो त्यातच काम करतो. मी त्याला माझ्यासोबत घडलेला प्रकार शेयर केला आणि काही धोका तर नाही ना? याबद्दल खात्री केली. मग त्यानेही धोका नाही असं सांगितलं आणि मिश्कील टीपण्णी करत मला जरा रिलॅक्स केलं. यामुळे जरा डोक्यावरचा ताण कमी झाला. मग लागलो पुन्हा कामाला. या सगळ्यात कामाला उशीर तर झालाच, पण सकाळी सकाळी मूड ऑफ झाल्याने दिवसच खराब गेला.



हा अनुभव १०० टक्के खरा आहे, यात मनाचं काहीही टाकलेलं नाही. ऑफिसमध्ये उशीरापर्यंत थांबून हा लेख लिहीण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे माझ्या प्रियजनांना आणि संपर्कातल्या सर्वांनाच याबद्दल सावध करणं, आणि दुसरं कारण म्हणजे स्वतःचा अनुभव शेयर करत स्वतःच मन हलकं करणं. केवळ या दोन कारणांसाठी मी हा लेख लिहीण्याचं कष्ट घेतलंयं. याबाबत कम्प्लेंट वैगरे काही केलेली नाही, कारण जोपर्यंत गंभीर गुन्हा घडत नाही तोपर्यंत कुणीही सिरिअसली घेत नाही. दुसरं म्हणजे एवढ्या ऑनलाईन/ऑफलाईन भानगडी करायला माझ्याकडे सध्या खरंच वेळ नाही. बाकी, पुरावे सगळे आहेत, काही झालं तर पुढे बघेन. हा लेख वाचून चार लोक जरी सतर्क झाले तरी खूप आहे. काळजी घ्या मित्र-मैत्रिणींनो, समजदारीने वागा...


या काही निवडक बातम्या वाचा, मी हा लेख का लिहीला याचं गांभीर्य कळेल!






मोठी अपडेट:

आता शनिवार १८ जून २०२२ रात्रीचे १२:३० वाजले आहेत. माझा हा लेख बऱ्याच लोकांकडे पोहोचला आहे. त्यातल्या एकाने सांगितलं की, या मुलीचा व्हिडिओ त्याने याअगोदरही पहिला आहे. त्यामुळे तो लाईव्ह कॉल नव्हता याचा साक्षात्कार मला आत्ताच झाला आहे. म्हणजे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंयं की, तो व्हिडीओ कॉल होता की रेकॉर्ड केलेला व्हिडिओ हे देखील कळलं नाही. त्यामुळे असा फेक सेक्स व्हिडिओ कॉल करून कुणीही कुणालाही फसवू शकतो. याचाच अर्थ या लोकांना किती डोकं आहे हे लक्षात येतं. साधा भोळा माणूस तर यांच्या जाळ्यात सहज अडकेल, तेही फ्री उपलब्ध असलेल्या पॉर्न क्लिपने. धन्यवाद त्या मित्राचे ज्याचं पॉर्न व्हिडिओचं नॉलेज आज कामी आलं आणि सत्य समोर आलं. हा चॅप्टर माझ्यासाठी संपला. यातून चांगला बोध घ्याल हीच अपेक्षा...
- Good Night 🌃

Thursday, 28 April 2022

प्रिय श्वेता... वाढदिवसाच्या मंगलमय कामना!




माझी खूप खूप प्रिय मैत्रिण श्वेता! आज तिचा वाढदिवस. तिच्या वाढदिवशी तिला अनेकांकडून शुभेच्छा येत असतील, तेही मोठया प्रमाणात. पण माझ्याकडून तिला शुभेच्छांसह खूप मोठं थँक्स. तिच्यासारखी मैत्रिण मिळणं हे माझं भाग्यच. २०१७ ला जेव्हा मी कॉलेजला (SYBMM) ला शिकत होतो त्याच दरम्यान कल्याणच्या जनशक्ती टीव्ही न्यूज या लोकल केबल चॅनलमध्ये मी इंटर्नशीप आणि नंतर जॉब करत होतो. इथेच श्वेता भेटली. ती याठिकाणी अँकर होती. तेव्हा सुरुवातीला मी तिला श्वेता मॅम म्हणायचो. आज ती २ वर्षांपासून झी २४ तासला काम करतेय. आमच्यातली मैत्री कधी एवढी घट्ट झाली हे मलाही कळलं नाही. ना रोजचं बोलणं, ना भेटणं पण तरीही तेव्हापासून ते आजच्या या क्षणापर्यंत आमची मैत्री पक्की होतेय आणि होत राहील.

श्वेताचं माझ्या आयुष्यातलं महत्त्वं म्हणजे एवढंच सांगेन की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. तसं मी आज यशस्वी नसलो तरी यशस्वी होण्याची जी आशा आहे ती आशा मला श्वेताने दिलीये. आज मीडिया क्षेत्रात मी जे काही, ज्या ठिकाणी काम करतोय त्याच्यामागे श्वेताची बरीच मेहनत आहे. त्यामुळेच भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. पण ही मेहनत करायची प्रेरणा ज्या व्यक्तीने दिली ती व्यक्ती म्हणजे डियर श्वेता. ब्युटी विथ ब्रेन अँड टॅलेंट म्हणजे श्वेता. नेहमीच मला चांगलं सांगणारी, चांगले सल्ले देणारी, मार्गदर्शन करणारी अशी मैत्रिण मला मिळाली आणि मी सारी जिंदगी तुला जपणार आहे हे प्रॉमिस. 

मला अजूनही आठवतं जेव्हा कॉलेज संपल्यानंतर मी मीडिया फील्डमध्ये काम करण्याची संधी शोधत होतो. श्वेता मला तेव्हापासून ते आज मी मीडियात काम करत असताना ती सतत माझ्या पाठीशी असते, बऱ्याच गोष्टी सांगत असते. साम टीव्हीमध्ये मला काम मिळावं यासाठी माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न श्वेतानेच केले. मीडिया क्षेत्रात वशिला लावणं वैगेरे शक्यतो चालत नाही, मी माझ्या प्रयत्नांनी अजूनही झटतोय. पण हीच झटण्याची प्रेरणा श्वेता नकळत मला देते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती नॉर्मली बोलता-बोलता असं काहीतरी बोलते की, पंच लागतो आणि किक मिळते. जेव्हा माझ्या आत्मविश्वासाचा पारा शून्यापेक्षा खाली गेला होता तेव्हा याच आणि फक्त या एकाच मैत्रिणीनं मला मानसिक आधार दिला. माझी विचारपूस केली. सगळं नीट होईल असं नुसतं सांगितलं नाही तर तिने सगळं नीट केलं ते माझ्यासाठी. मी म्हणायचो मला हे जमणार नाही, किंवा स्वतःवरच शंका यायची. तेव्हा श्वेता म्हणाली होती, अरे ट्रेनमध्ये जातो ना? सुरुवातीला गर्दी असते पण नंतर सीट मिळतेच ना... तिचं हे वाक्य थेट डोक्यात घुसलं आणि काहीशी अशा निर्माण झाली. आमचा एकमेकांना फोन खूप कमी असतो. रोज-रोज बोलणं किंवा चॅट करणं दोघांनाही शक्य होत नाही. पण तरीही जेव्हा आमचं बोलणं होतं त्यानंतर माझ्यात वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. ही आहे या बटलूची ताकद. छोटा पॅकेट बडा धमाका! 

कामाच्या बाबतीतही ती नेहमी गाईड करत असते. जनशक्तीला असतांनाच ती म्हणायची गोल्या मराठी टायपिंग शिकून घे, पण मी माझ्याच धुंदीत. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कळलं मीडिया जगतात प्रोफेशनलपणा किती महत्वाचा आहे. सामला जॉईन होण्याआधी ते होईपर्यंतसगळं काही श्वेताने सांगितलं. इंटरव्यूला काय विचारतील, कसं बोलायचं, काय बोलायचं, अशा बऱ्याच गोष्टी तिने फोनवर समजवल्या होत्या त्यानुसार फॉलो करत गेलो आणि सिलेक्ट झालो. त्यांनतरही अजूनपर्यंत बटलू मॅडम मला मार्गदर्शन करतच असतात. श्वेताच्या रूपानं एक चांगली मैत्रिण, मार्गदर्शक, मोटिवेशनल स्पीकर, कधीतरी जोकर सगळं काही मिळालं आहे. अशी सर्वगुणसंपन्न मैत्रिण तिच्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाईल आणि मला विसरणार नाही ही आशा. तसंच तिला तिच्या आयुष्याच जोडीदार हा सुद्धा तिच्यासारखाच मिळो आणि तिच्या चेहऱ्यावर कायम स्माईल, आनंद नांदत राहो ही तिच्या वाढदिवशी मंगल कामना.

जोडीदारावरून आठवलं, जेव्हा मी कॉलेजात असताना कुणाच्यातरी प्रेमात पडलो होतो आणि अचानक तथाकथित कवी बनलो होतो तेव्हा मी एक कविता  लिहिली होती (ज्याचं आता मला हसू येतं). तर ती कविता होती, प्रेम कसं होतं? माझी ही कविता श्वेताला एवढी आवडली की, ती म्हणाली होती आपण याचा व्हिडिओ बनवूया, काहीतरी करूया. ( हे आमचे बचकांडे चाळे २०१७ ला जनशक्तीला असतानाचे). तर त्या कवितेचं तिने छान वाचन केलं, त्याचा व्हिडिओ तिच्याच फेसबुकरून पोस्ट केला आणि बऱ्याच मोठया लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स आल्या होत्या. श्वेता तेव्हापासून ती अशीच आहे, तिचा हा स्वभाव आणि ती जास्त बदलू नये ही प्रार्थना. अशा माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवाच्या आभाळभर शुभेच्छा!

Thursday, 21 April 2022

'सकाळ'ला पोहोचण्यासाठी 'युलु' आली धावून अ्न मी गेलो बुरुम बुरुम

Yulu Zone At CBD Belapur Railway Station


आज सकाळी उठायला २५-३० मिनिटं उशीर झाला. सगळं आवरुन हॉस्टेलहून (नायर हॉस्टेल, बेलापूर) ऑफिसला निघालो तर, बराच वेळ रिक्षा मिळेना. ५-७ मिनिटांनंतर एक रिक्षा मिळाली पण त्या रिक्षावाल्याकडे गुगल पे नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती. सकाळी ८ ची शिफ्ट, ऑफिस (सकाळ भवन, बेलापूर) हॉस्टेलपासून १.४ किमी. माझ्या स्पीडने जायचं झालं तर कमीत-कमी २५ मिनिटं आणि फास्ट चाललो तरी २० मिनिटं ऑफिसला पोहोचायला वेळ लागणार हे नक्की. सकाळी-सकाळी चांगलीच फजिती. शिवाय आज पुण्याहून सिनिअर सहकारी (बॉस लोकं) येणार होते, त्यात मला ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय यामुळे डोकं फिरलं. बेलापूर गावातल्या अमृतवेल तलावासमोर उभा होतो, तेवढ्यात तिथे पार्क केलेल्या सायकलींवर नजर गेली. तशा त्या सायकली नेहमीच बघत असतो, पण आज जरा आशादायक नजरेने त्या सायकलींकडे (Yulu Bike) बघितलं. रिक्षा मिळत नाही, मिळाली तर कॅश नाही, जवळपास एटीएम नाही आणि एटीएम जरी मिळालं तरी सुट्ट्या पैशांचे वांदे. अशात सायकलवर ऑफिसला जाण्याचा विचार डोक्यात आला. (Yulu Bike Experience By Akshay Baisane)

Yulu Cycle Photo By Akshay Baisane At CBD Belapur Railway Station

हा विचार डोक्यात आला. २-३ मिनिटं विचार करण्यात गेला मग शेवटी काढला मोबाईल आणि युलु अ‍ॅप डाऊनलोड (Yulu App) केलं. तसं ते आधीही वापरलं होतं टाईमपास म्हणून... त्यात ३० रुपये होते. लगेच चांगली सायकल निवडली, सायकलची घंटी, हवा वैगेरे सगळं बघितलं, सीट हाईटनुसार अ‍ॅडजस्ट केली. अ‍ॅपमधून सायकलवरचा क्यूआर कोड स्कॅन केला, सायकल अनलॉक झाली. मग काय मस्त बसलो सायकलवर अन् निघालो ऑफिसला. सकाळची वेळ असल्याने रस्ते मोकळे, थंड हवा, त्यात सीबीडी परिसरातले रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ असल्याने सायकल चालवायला काही अवघड वाटलं नाही. शिवाय युलु सायकल चालवायला खूप स्मूथ वाटली. हॅण्डलला असलेली घंटी ट्रिंग-ट्रिंग मुद्दामच वाजवत होतो. सायकल जेवढी स्मूथ वाटत होती, तेवढी मजबूतही वाटली. सामान ठेवण्यासाठी हॅण्डलला कॅरीअर होतं, पण माझी बॅग फारशी जड नसल्याने मी ती बॅग पाठीवरच लावली होती. खूप वर्षांनी सायकल चालवल्याने जरासा दम लागला, पण तेवढीच सकाळची एक्सरसाइज म्हटलं... आकाशी रंगाच्या सायकलवर मी कसा दिसत असेल असा विचार मनात आला, फोटो काढून बघावं तर सोबत कोण नव्हतं. विचार करता-करता स्टेशनला पोहोचलोही. तेही अवघ्या सात मिनिटांत. मी ७ः५० ला निघालो होतो आणि ७ः५७ ला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळच्या युलु बाईक झोनला पोहोचलोही. (Yulu Bike Zone At CBD Belapur Railway Station)

स्टेशनला पोहोचल्यावर युलु अ‍ॅप ओपन केलं. राईड संपवली, सायकल लॉक केली आणि बिल बघतो तर अवघे १०.२० रुपये फक्त शुल्क आकारले होते. दररोज रिक्षाला मीटरप्रमाणे २० ते २६ (Base Fare 21) रुपये लागतात. पण आज मी अवघ्या दहा रुपयांत हॉस्टेल ते ऑफिस असं १.४ किमीचा प्रवास केला. तेही शून्य प्रदूषणासह, थोडंस वॉर्मअप आणि पैशांची बचत हे सगळं एका सायकलने शक्य झालं. ही अप्रतिम सेवा देण्यासाठू युलु बाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानायला हवे. आता सकाळची शिफ्ट असेल तेव्हा दररोज युलुच्या सायकलनेच ऑफिसला जायचा विचार आहे. युलुची इलेक्ट्रिक बाईकही आहे, त्याचीही टेस्ट राईड एकदा घ्यायची आहे. पण, माझ्या हॉस्टेलजवळ असलेल्या युलु झोनला इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय नाही, फक्त सायकलच आहे. पण काहीही म्हणा जवळच्या अंतराला सायकल बेस्ट आहे. बाकी एवढं करुनही ऑफिसला उशीर झालाच... चहा-नाष्टा करण्यात जरा वेळ गेला. पण, सायकल नसती तर जास्त उशीर झाला असता. असो... छोटासा अनुभव होता, शेयर करावासा वाटला, केला... तुमच्या परिसरात युलु असेल तर एकदा नक्की अनुभव घ्या!

युलु अ‍ॅप डाऊनलोड व रिचार्ज (Yulu App Download & Recharge)

युलु सायकल वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर युलु अ‍ॅप डाऊनलोड करा. मग आपली माहिती भरा. त्यानंतर डिपॉजिट २०० रुपये भरावे लागतील जे रिफंडेबल असतील. यानंतर रिचार्ज करावा लागेल जो ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत टॉपअप करु शकता. गुगल पे, यूपीआय, ऑनलाईन बॅंकिंग किंवा डेबिट-क्रेडीट कार्डने हे पेमेंट करु शकता.

युलु सायकल/बाईक अशी वापरा (How To Use Yulu Bike)

युलु सायकलजवळ जा. सायकलच्या सीटमागचा किंवा मागच्या मर्डगार्डवरचा क्यूआर कोड हा अ‍ॅपमध्ये स्कॅन करा. त्यानंतर सायकल अनलॉक होईल, किंवा हातने अनलॉक करण्यास अ‍ॅपमध्ये सांगितलं जाईल. बस, सायकल अनलॉक झाल्यापासून तुम्हाला सायकलचं भाडं लागू होईल.

युलु सायकलचं भाडं (Rent Of Yulu Bike)

पहिल्या राईडसाठी काहीतरी १० रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट लागतात. नंतरच्या राईडला बेसिक भाडं ५ रुपये + १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं आकारलं जातं. हे नवी मुंबई बेलापूरसाठी आहे. बाकी दुसरीकडचं मला माहित नाही.

युलु सायकल वापरण्याचे नियम (Rule For Ride Yulu Bike)

१) सायकल बुक केल्यानंतर सायकलची जबाबदारी पुर्णपणे तुमची असेलय

२) सायकल कुठेही पार्क करता येणार नाही, फक्त युलु झोनमध्येच सायकल पार्क करता येईल,

३) राईड चालू असताना मोबाईलचं इंटरनेट आणि ब्लूटूथ चालू असणं गरजेचं आहे.

४) सायकल जोपर्यंत अनलॉक आहे तोपर्यंत  १.५ (दीड रुपये) प्रति मिनिट भाडं तुमच्या युलु खात्यातून वजा होईल.

५) वाहतुकीचे सर्व नियम पाळत सायकल चालवावी.

तर हा होता माझा आजचा मस्त अनुभव. जे चांगलं आहे, त्याबद्दल बोललंच पाहिजे, त्याचं कौतुक इतरांनाही सांगितलं पाहिजे या शुद्ध भावनेने हा वैयक्तिक प्रपंच...! 

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

Tuesday, 19 April 2022

श्रीरामा कोणता झेंडा घेऊ हाती?



हिंदुत्व म्हणजे भाजप! असं साधं-सरळ समीकरण देशात आहे. पण महाराष्ट्रात हे समीकरण जरा गुंतागुंतीचं बनलंय. कारण देशपातळीवर हिंदुत्ववादाचा चेहरा भाजप आहे, मात्र महाराष्ट्रात ही परिस्थिती वेगळी आहे. राज्यात प्रखर हिंदुत्वाचा (Hindutva) दावा करणारे तीन पक्ष आहे. ज्यात सत्ताधारी शिवसेना (Shivsena), केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणारा मनसे (MNS). हे तिन्ही पक्ष आपलंच हिंदुत्व कसं खरं आहे हे दाखवण्याची धडपड करतायत. यात मनसेला सध्या भाजपची साथ मिळतेय असं दिसत असलं तरी भाजप आपल्या हक्काचा हिंदुत्ववादी मतदार राजकीय स्वार्थाशिवाय कुणासोबतही का शेयर करेल? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सध्या शिवसेनेच्या हिंदुत्वाला गौण ठरवण्यासाठी, शिवसेना सेक्युलर झाल्याचे आरोप करणाऱ्या भाजपची ताकद सध्या कमी पडतेय. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन मोठा हिंदुत्ववादी मतदारांचा समूह तयार करण्याचा भाजपचा कार्यक्रम दिसतो. त्यामुळेच की काय काही वर्षांपूर्वी 'मराठीहृदयसम्राट' असलेले राज ठाकरे हे आता 'हिंदुजननायक' बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. एक म्हणजे मविआमध्ये (MVA) सामील होऊनही  शिवसेना हिंदुत्ववाद सोडायला तयार नाही, दुसरं हिंदुत्ववादाशिवाय भाजपचा विचार करणं शक्य नाही आणि तिसरं म्हणजे आता मनसेनंही ब्ल्यू प्रिंट सोडून भगवा हातात घेतल्यानं महाराष्ट्रातील हिंदुत्वावादी विचारसरणीच्या मतदाराला कुणाचा झेंडा हातात घ्यावा हा मोठा प्रश्न पडलाय. कुणाचं हिंदुत्व खरं? भाजपचं, शिवसेनेचं की, मनसेचं?

हे देखील पहा -




फ्लॅशबॅक:

फडणवीसांचा कार्यकाळ संपल्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) उप-मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पावरमुळे फडणवीस गेले, उद्धव ठाकरे आले, अजित पवार मात्र टिकून राहिले. हातात आलेली सत्ता गमावल्यामुळे पेटून उठलेले फडणवीस चांगलेच अॅक्टीव्ह झाले. मात्र कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष फिल्डवरचं राजकारण, सभा, मोर्चे काही फारसं झालं नाही, तरीही फडणवीसांना जे करता आलं ते त्यांनी तेव्हाही केलं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कोरोना आटोक्यात आलाय. सभा, मोर्चे सगळं सुरु झालंय. 

मविआ सरकारला धारेवर धरण्याची फडणवीसांनी एकही संधी सोडली नाही. सर्वप्रथम पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद गमवावं लागलं. नंतर १०० कोटी वसूली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पद गमवावं लागलं, शिवाय ते सध्या तुरुंगवासही भोगत आहेत. त्यानंतर दाऊदच्या मालमत्तेशी संबंधीत मनी लॉन्ड्रींग केसमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनाही ईडीने अटक केली, तेही तुरुंगात आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik) यांना ईडीने दिलेला झटका, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडी चौकशी, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्ती, मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar patankar) यांच्यावरील ईडी कारवाई, मविआ नेत्यांच्या चौकश्या आणि धाडी. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Atidya Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. या सगळ्यांमुळे फडणवीसांची तळमळ, ताकद आणि कुटनीती दिसून येते. मात्र एवढं होऊनही मविआ सरकार टिकून आहे. आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर कितीही मोठा असला किंवा केंद्रात सत्तेत असला तरी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हरवणं भाजपला कठीण आहे याची फडणवीसांना चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच की काय २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच पुर्वतयारी आणि भाजपला पोषक अशी वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसलीये.


फडणवीसांचा मास्टर प्लॅन:

भाजप देशासह राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. पण तरीही राज्यातली सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडी बाधा ठरतेय. त्यात २५ वर्षे सोबत असणारी शिवसेना आज सत्तेत असल्यानं भाजपचं मुख्य टार्गेट शिवसेनाच असल्याचं दिसतंय. सेनेमुळे सत्ता गमावल्याची प्रचंड चीड भाजपच्या मनात आहे. सेनेला संपवायला हवं यासाठीच भाजप जास्त प्रयत्नशील दिसते. सेनेला संपवण्यासाठी सेनेचं सर्वात मोठं अस्त्र म्हणजे हिंदुत्व! भाजप हे सेनेकडून हिंदुत्वच हिसकावयाला निघालं आहे. सेनेकडून हिंदु्त्व हिसकावण्यासाठी त्यांनी राज ठाकरे नावाच्या जुन्या गड्याला 'भगवाधारी' (Bhagwadhari) करुन मैदानात उतरवलंय. या गड्यानंही आल्या आल्या जोरदार 'भोंगा' पसरवत चांगलाच गागट केलाय. भोंग्याच्या आवाजानं सेनेलाही धडकी भरली अन् सेनाही आता आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी खटाटोप करतेय. मनसेने सुरु केलेल्या हनुमान चालीसेत (Hanuman Chalisa) सेना नकळत ओढली जातेय. शिवाय राष्ट्रवादीही आपलं सेक्युलरीझम दाखवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करतेय. अशात मनसेच्या अजेंड्याला सेना-राष्ट्रवादी बळी पडली असं वाटत असलं तरी, मुख्य सुत्रधार हे फडणवीस आहेत मात्र, हे सगळ्यांना दिसत नाही. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून मनसेच्या इंजिनखाली शिवसेनेच्या वाघाला चिरडायचं आणि नंतर त्या वाघाला कमळाच्या फुलानं श्रद्धांजली द्यायची असा मास्टर प्लॅन फडणवीसांचा दिसतोय.


कोणता झेंडा हाती घ्यायचा?

हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र भाजप-मनसेची वाढती जवळीक पाहता भाजप-मनसेचा झेंडा दिसायला वेगळा असला तरी तो एकच असल्याचं किंवा भविष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या एकत्र होण्याची चिन्हं दिसतायत. शिवसेनाही आपल्या हिंदुत्वाच्या अस्त्राला बळ देण्यासाठी युवराजांना अयोध्येत (Ayodhya) पाठवण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे लवकरत अयोध्येत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र मविआच्या किमान-समान कार्यक्रमामुळे सेनेच्या वाघाला डरकाळीही हळू आवाजात द्यावी लागते असं चिंत्र आहे. या सगळ्यात फडणवीसांचा अजेंडा मात्र जोरदारपणे रेटला जातोय. ज्याला भाजप, मनसे प्रत्यक्षपणे आणि शिवसेना, राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तो अजेंडा म्हणजे हिंदुत्व... जे उत्तर प्रदेशात परिणामी देशात भाजपला सर्वशक्तीमान करतं! बाकी कॉंग्रेसचं बोलायचं झालं तर कॉंग्रेसला स्वतःच्या भविष्याची काळजी आहे की नाही हा प्रश्न पडतो.

.

.

.

- अक्षय्यनामा✍️


Thursday, 3 March 2022

तो जगतोय...

तो जगतोय,

कुणासाठी तरी का होईना तो जगात दिसतोय

अपेक्षांचा सुळका सर करताना दमछाक तर फार होते

जबाबदाऱ्यांचं अन् कर्तव्यांचं बिऱ्हाड वाहताना आपल्यांची उणीव फार होते

त्या उणीवेशीच आता घट्ट नातं बनलंय

या अनैतिक नात्यानं त्याला मात्र पूर्ण बदललयं

तरीही तो जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना झुरतो आहे


आवडती गाणी हल्ली हृदयाची तार छेडत नाही

सुंदर चेहरे पाहूनही हल्ली हृदय बावरत नाही

प्रेमाची भावना जास्त काळ साथ देत नाही

मैत्रीही सध्या जवळची वाटत नाही

असं वाटतं हृदयाचा दगड झालाय

मनातला भावी "तो" मेलाय

त्याच्या मनातला "तो" घायाळ झालाय

पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना लढतो आहे


पोट भरुन खा... असं ऐकायला तो आईजवळ नाही

दादा आम्हाला एक वहिनी आण असं चिडवणं ऐकायला तो बहिणीजवळ नाही

काळजी करु नको, मी आहे असं बापाकडून ऐकण्यासाठी तो वाटच पाहतोय

आईच्या हातची पोळी, भाजी, पोहे, चहा यासाठी तो रोजच तरसतोय

आईच्या वरण-भातापुढे त्याला बिर्याणाही फिकी वाटते

घरातल्या प्रत्येक क्षणांची त्याला लय खत वाटते

अनोळखी शहरात, अनोळखी लोकांत तो एकटाच फिरतोय

पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना प्रयत्न करतो आहे


तसा तो फुसका वाटला तरी कधीतरी तोही गागट करतो

स्वप्न त्याचीही आहेत, ध्येय त्याचीही आहेत

ती स्वप्न नेमकी कोणती हेच त्याला दिसत नसावं

त्यालाही वाटतं योग्य वाट दाखवणारं कुणीतरी त्याला मिळावं

भरकटलेल्या वाटेवर तो चालतचं जातोय

एका हातात कर्तव्य, दुसऱ्या हातात स्वप्न अन् डोक्यावर जबाबदारी

हा सगळा डोंबाऱ्याचा खेळ खेळत, आयुष्याच्या दोरीवर तो टिकण्याचा संघर्ष करतोय

अन्, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी?....

कुणासाठी तरी कशाला, तो आपल्याच लोकांसाठी जगतोय

कुटुंबासाठी, मित्रांसाठी, स्वतःसाठी अन् स्वतःच्या स्वप्नांसाठी तो जगतोय...

तो जगणारच... आणि मोठा होऊन तो अक्षय होणारच...!

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

Monday, 14 February 2022

नावं तिचं आठवण...


कॉलेजमध्ये असताना माझा स्वभाव भावनात्मक होता, आताही आहेच. मन कोमल होतं. पण, प्रेमात कधी चमकलचं नाही माझं भाग्य श्रीदेवीपेक्षाही सुंदर वाटायची ती. माझ्या डोळ्यातली तीच होती रोहिणी का असं केलं असेल तिने तिलाच माहीत. कधीकाळी आशेचा किरण दिसला होता, तोही आता प्रखर सूर्यप्रकाशात लुप्त झाला. बाकी वेळ मिळाला की, तिच्या सोबतच मनसोक्त बोलतो, नावं तिचं आठवण...

Thursday, 23 September 2021

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...


आज पोस्ट ग्रॅज्युएट झालो!!! मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी "मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम"(#एमएसीजे) उत्तीर्ण झालो. ६ जुलै २०१९ ला बॅचलर ऑफ मास मीडिया (#BMM) आणि आज २२ सप्टेंबर २०२१ रोजी (#MACJ) उत्तीर्ण झालो होतो. आनंद नक्कीच आहे. पण, जेवढा आनंद १२ वी पास झाल्यावर किंवा पदवीधर झाल्यावर झाला होता तेवढा आनंद यंदा नाही. त्याची अनेक कारणं आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं आणि ऑनलाईनच परीक्षा द्याव्या लागल्या हे त्याचं मुख्य कारण... त्यामुळे यंदा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनही काही विशेष केलं असं वाटलं नाही. निकाल 'हाच' असेल याचा अंदाज होताच. कारण MCQ पद्धतीनं ५० पैकी ४० प्रश्न सोडवणं तेही (अभ्यासासाठी?) दिलेल्या प्रश्नावलीतून हे अगदी १२ वी च्या विद्यार्थ्यालाही जमेल असं होतं. विजयाची माळ कष्ट न करता गळ्यात पडावी असं वाटतंय. पण असो... आता मी पदव्युत्तर पदवीधारक आहे हे मला मान्य करावं लागेल.

बाकी मी या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात काय शिकलोय हे मला फारसं आता सांगता येणार नाही. कोरोनाने नको त्यांची चांदी केली, पण आमची मात्र मजा घालवली. कॉलेजला जाण्याची मजा, नवीन मित्र-मैत्रीणी जोडण्याचा तो काळ, वर्गात बाकावर बसून शिकण्याचा तो आनंद, कॉलेज डेज आणि एकुणच अख्खी कॉलेज लाईफ या कोरोनाने हिरावून घेतली. नशीबी आलं ते कृत्रीम, व्हर्चुअल आणि ऑनलाईन जग. एकेकाळी स्मार्टफोनमध्ये तासन्-तास रमणारा मी आता या नकली ऑनलाईन जगताला खरंच वैतागलो आहे.

मला एसएसटी कॉलेजचे ते सुंदर दिवस आठवतात, जेव्हा मी रीअल कॉलेज लाईफ मनसोक्तपणे जगली होती. किती नवे मित्र, नव्या मैत्रिणी, शिक्षक अशा सर्वांशीच अगदी दिलखुलास संबंध होते. कॉलेजमध्ये थोडीफार हवा होती. पण, नंतर मास्टर्ससाठी जोशी-बेडेकर कॉलेजला आल्यावर फक्त पहिली सेमीस्टर लिखीत दिली, त्यातही खूप कमी वेळा कॉलेजला गेलो होतो त्यामुळे क्लासमेटही मला ओळखत नाही याबद्दल जरा वाईट वाटतं. कारण मला मित्र-मैत्रिणी म्हणजे अत्यावश्यक बाब वाटतात. मी घरच्यांच्या नजरेत जरी माणूसघान्या असलो तरी बाहेरच्या दुनियेत माणसाळलेला प्राणी आहे. त्यामुळे बेडेकर कॉलेजमध्ये हे एकटेपण मला सतावत होतं. एकतर मास्टर्स करायचं ठरलं नव्हतं. मग अचानक करावं असं वाटलं आणि अॅडनिमिशन घेतलं, तेही पहिल्या सेमीस्टरच्या एक ते दीड महीने अगोदर... त्यामुळे जरा गडबड झाली होती. त्यात तेव्हा मी काही दिवस ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात काम करत होतो, नतंर माय महानगरमध्ये इंटर्नशीप म्हणून मला कॉलेजला जायला जमलंच नाही. मग जेव्हा कधीतरी जायचो तेव्हा इतरांशीही काही जास्त बोलणं होत नव्हतं त्यामुळे कुणाशी खास अशी मैत्री झालीच नाही. फक्त हाय...हॅलो पुरती मैत्री मला नको वाटते. मग रेग्युलर जाण्याचा विचार केला, तसं प्लॅनिंगही केलं, मग कोरोना महाशयांमुळे लॉकडाऊन झालं ते अदयापही कॉलेज बंदच आहे. अशातच आमची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पुर्ण झाली तेही आजच ऑनलाईन कळलंय. कॉलेज लाईफ जगण्याची इच्छा कोरोनाने हिरावून तर घेतली शिवाय आयुष्यातल्या अनेक चांगल्या क्षणांपासून दुर केलं. असो... आता सगळं झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीच, पण मन मोकळं करावं म्हणून हे इकडे लिहीलं आहे.

आता अधिकृतपणे कॉलेजलाईफ संपली आणि दुनियादारी सुरु झाली. आता आयुष्यात मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नोट्स, बेंच यांची जागा सहकारी, संपादक, टास्क, डेस्क यांनी घेतली. अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदल माझ्यासाठी सकारात्मकच आहे. पण, कॉलेज लाईफचा असा दी एन्ड झाल्याने आयुष्याशी जरासा नाराज आहे, लवकरच ही नाराजगी दुर होईल... कारण माझी नाराजगी दुर करणारा मी एकटाच आहे...अद्यापही अन् सध्यातरी...! बाकी मी आज पोस्ट ग्रॅजुएट झालो याचा मला नक्कीच आनंद आहे.
एकेकाळी बारावी सायन्समधून नापास झाल्यावर.....बस्स झालं! यावर आता नंतर कधीतरी पकवेन, मला झोप आणि कंटाळा दोन्हीही एकसोबत आल्याने गुडनाईट.....

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...